भोज्जा

बुधवार, १४ फेब्रुवारी, २०१८

मधुबाला : शापित गंधर्व कन्या

 एकदा बांद्र्याच्या मेहबूब स्टुडीओ जवळून जात असतांना हिंदी सिनेमात एक काळ  गाजवलेल्या  प्रेमनाथनी त्यांच्या  ड्रायव्हरला गाडी स्टुडिओ मध्ये  घ्यायला सांगितली .ही गोष्ट आहे साधारण १९७२-७३ मधली जेव्हा प्रेमनाथ त्याच्या अभिनयाच्या दुसऱ्या इनिंग मध्ये पुन्हा टॉपचा व्हिलन म्हणून नावारुपाला आला होता तेव्हाची आणि प्रेमनाथने ड्रायव्हरला गाडी आत मध्ये घ्यायला सांगायचे कारण होते  ,मधुबालाचा बाप अताउल्ला खान हा गृहस्थ . 

अताउल्ला खान त्यावेळी स्टुडिओत तिथेच मागच्या बाजूला एका छोट्याश्या खोपटात त्याचे शेवटचे दिवस काढतोय असं  प्रेमनाथला कुठूनसं समजलं होतं.  प्रेमनाथ जेव्हा  अताउल्ला खानला भेटला तेव्हा त्याची खस्ता हालत बघून त्याचे डोळे क्षणभर पाणावले , काही न बोलता त्याने  खिशात हात घातला आणि अताउल्ला खानच्या उशाखाली एक लाख रुपये सरकावले आणि तो तिथून निघाला.

गाडीत बसल्यावर त्याचा मुलगा मॉन्टीने त्याला  याचे कारण विचारले ,त्यावर प्रेमनाथने अतिशय खिन्न मनाने त्याला सांगितले कि ,”बेटा, मी विशेष काही केलं नाही,केवळ जावयाचे कर्तव्य पार पाडलं .आमचं लग्न होऊ शकलं  नाही ,पण मधुवर मी मनापासून प्रेम केले पण आमचे लग्न मात्र नियतीच्या मनात नव्हते.जर आमचे लग्न झाले असते तर मी हेच करणे योग्य ठरले असते ! नाही कां ?   

वरील प्रसंगाची आज आठवण यायचं कारण म्हणजे आज १४ फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे आणि  हिंदी सिनेमातील शापित गंधर्व कन्या मधुबालाचा जन्मदिवस...... दोन्ही आजच..... जिने जवळपास दीड दशक हिंदी सिनेमाची अनभिषिक्त सम्राज्ञी म्हणून एक काळ गाजवला होता...

खाजगी आयुष्यात सपशेल अयशस्वी झालेल्या  मधुबालाच्या आयुष्यात प्रेमनाथ,दिलीपकुमार,भारतभूषण,किशोरकुमार वगैरे मंडळी जरी आली तरी तिचा हात तिच्या पालकांना जाऊन मागायचं धाडस मात्र  फक्त प्रेमनाथने दाखविले होते.पण हिंदू-मुस्लीम धर्माचा ,जातीचा बागुलबुवा करत तिच्या घरच्यांनी हि सोन्याची कोंबडी तेव्हा  हातची जाऊ दिली नाही, आणि तिचे आयुष्य सडवले.मधुबालाच्या नकारानंतर प्रेमनाथ बिना रायशी लग्न करून मोकळा झाला ,पण वेळ आल्यावर  त्याच्या जुन्या प्रेमाला नकार मिळून देखील आणि आता त्याचा काही एक संबंध नसताना सुद्धा मधुबालाच्या वडिलांच्या अडचणीच्या काळात तो त्यांच्या पाठीशी उभा राहिला.

दिलीपकुमारने मात्र  इतर अनेकजणीं प्रमाणे हिचे सुद्धा खेळणे केले नि भारतभूषण विधुर असल्याने हिने त्याला नकार दिला.राहता राहिला किशोर ज्याच्या गळ्यात हिने सरतेशेवटी माळ घातली.पण मधुबाला वैवाहिक किंवा वैयक्तिक आयुष्यात कधीच सुखी होऊ शकली नाही.

हिंदी सिनेमात बेबी मुमताज नावाने हि जेव्हा बाल कलाकार म्हणून  काम करायची तेव्हा हिचा बाप सकाळी हिला स्टुडीओत सोडून नंतर मुंबईतल्या रस्त्यावर शब्दशः  भीक मागायचा धंदा करायचा .हिच्या  आईं-बापाच्या एकूण ११ पोरांच्या पोरवड्यात हि पाचवी पण हिच्या बापाचा नि नंतर नाव झाल्यावर हिच्या केवळ पैशामुळे जवळ आलेल्या नातेवाईकांचे  संसार मात्र हिने आयुष्यभर ओढले .हिच्या उमेदीच्या काळात हिच्या जीवावर अनेकवर्षे  हिचे ४०-५०  जणांचे कुटुंब अय्याशी पद्धतीने जगत होते.हि गेल्यावर मात्र त्या कुटुंबाची धूळधाण उडाली.....असो....काळाचा महिमा आणि दुसरं काय  ??  काय म्हणायचं याला ?????

आजच्या माहितीचा संदर्भ फरहाना फारूक यांनी प्रेमनाथ यांचे चिरंजीव मॉन्टी प्रेमनाथ यांचा फिल्मफेयर २०१७ साठी घेतलेल्या  इंटरव्ह्यू मधून घेतला आहे.👍🙏

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा