सोळाव्या शतकात जपान मध्ये एका राजाच्या राजवटीत एका चोराने खूप धुमाकूळ घातला होता . त्याला पकडण्याचे हर तऱ्हेचे प्रयत्न निष्फळ होत होते. विशेष म्हणजे हा चोर चोरी केल्यावर जाताना जाणूनबुजून त्याचा रुमाल तेथे सोडून जायचा ,जेणेकरून समजावे कि "तो मीच होतो." नंतर नंतर तर त्या रुमाली चोराने एखाद्या श्रीमंता कडे कडे चोरी करणे हे लोक त्याच्या श्रीमंतीचे स्टेटस सिम्बॉल मानायला लागले.
बघता बघता वर्षे उलटली आता चोर म्हातारा झाला.. तो जरी चोर असला तरी तो सुद्धा एक संसारी माणूसच होता. तो त्याच्या पत्नी आणि मुला सोबत राहत होता आणि त्याच्या पत्नीला आपल्या नवऱ्याच्या या उद्योगधंद्याची माहिती होती आणि मुलगा पण आता वयात आल्याने त्याला सुद्धा वडिलांच्या व्यवसायाबद्दल हळूहळू समजत गेले आणि भले अपकीर्ती जरी असली त्याच्या वडिलांच्या चौर्य कौशल्या बद्दल लोकांमधे असलेले कुतुहूल,भीतीयुक्त आदर त्याला समजत होता पण तो चोर मूलतःच स्वभावाने अबोल असल्याने त्याच्या मुलाला सुद्धा त्याचा दरारा वाटायचा .
मधे बरीच वर्षे गेली,आणि वय झाल्याने आता आपल्या वडिलांचे अगदी घरात सुद्धा काहीएक काम करतांना हातपाय थरथरतात हे मुलाच्या लक्षात आले. आणि त्याला वाटले कि आता आपण पण आपल्या वडिलांना त्यांच्या चोरीच्या कामात मदत केली पाहिजे जेणे करून ते निदान उतार ते वयात पकडले जाणार नाहीत, त्यांची मानहानी होणार नाही.
शेवटी एक दिवस त्या मुलाने थोडा हिय्या करून वडिलांना सांगितले कि मला सुद्धा तुमची हि चौर्यकला शिकायची आहे. तुम्ही शिकवाल का ?
चोराने मुला कडे बघितले , क्षणभर थांबला आणि म्हणाला ,
ठीक आहे ! आज रात्री तयार राहा !
बघता बघता संध्याकाळ उलटून रात्र सुरु झाली आणि ती सुद्धा नेमकी अमावस्येची. .सरणाऱ्या एकेक मिनिटागणिक मुलाची उत्सुकता आता शिगेला पोहोचायला लागली होती.
शेवटी बारा साडेबारा नंतर चोर उठला ,त्याने त्याच्या हत्यारातील एक ५ पौंडाचा हातोडा आणि एक धारदार छिन्नी ,जी त्याने आधीच लावून तयार ठेवली होती ती पोत्यात भरून मुलाला नुसत्या मानेने चल अशी खूण करून तो बाहेर पडला व चालायला लागला.
बघता बघता चोर गावाबाहेर असणाऱ्या एका शेठजीच्या बंगल्याच्या मागच्या बाजूच्या कंपाउंड वॉल मागे जाऊन थांबला. आजूबाजूचा थोडा कानोसा घेत त्याने त्या भरभक्कम भिंतीला जवळच्या छिन्नी हातोड्याने भगदाड पाडले आणि सहजगत्या बंगल्याच्या आवारातून दबक्या पावलाने पुढे जात त्याने बघता बघता बंगल्याचा दरवाजा तोडत बंगल्यात प्रवेश केला.
इतक्या अंधारात सुद्धा तो आता बंगल्यात हॉल मध्ये टांगलेल्या प्रकाश हंड्यांच्या मंद प्रकाशात अगदी सराईता सारखं चालत जात होता ..जणू त्या बंगल्यातच तो राहत होता. त्याचा मुलगा थक्क होत हे सगळं पाहात त्याच्या मागोमाग जात होता . इतरवेळी थरथरणारे ,क्वचित अडखळणारे आपल्या वडिलांचे पाऊल आत्ता मात्र न अडखळता ,थरथरता नेमके पणाने पुढे जात आहे हे पाहून तो विचार करतो न करतो तेवढ्यात तो चोर एका खोली पाशी जाऊन पोहोचला.
आता त्याने खिशात हात घालत एक किल्ली काढली ,झटक्यात त्या खोलीचे कुलूप आणि दार उघडून तो आत शिरला आणि मागोमाग आलेल्या त्याच्या मुला कडे बघत त्याने फक्त नजरेने खुणावले " तिजोरी".
बघता बघता चोराने ती तिजोरी जवळच्याच कुठल्याशा किल्लीने उघडली आणि मुलाला त्यातील वस्तू सोबत नेलेल्या पोत्यात भरायची खूण केली.मुलगा तर थक्क होऊन हे सगळे पाहत होता,अनुभवत होता.वडिलांची हि अद्भुत कला अनुभवत तो त्या तिजोरीतील वस्तू पोत्यात भरायला घेणार इतक्यात त्याला त्या खोलीचा दरवाजा आणि त्यावरचे कुलूप कुणीतरी बाहेरून लावल्याचा आवाज आला. आणि तो दरवाजा जवळ पळत गेला .. आणि बघतो ते काय त्याच्या वडिलांनी, म्हणजे त्या चोराने आता त्या खोलीला बाहेरून चक्क कुलूप लावत जोर जोरात चोर-चोर-चोर अशी आरोळी ठोकलेली मुलाने ऐकली आणि मुलगा आत मध्ये मटकन खाली बसला. चोराने या सर्व हालचाली इतक्या वेगाने केल्या पण त्याने कंपाउंडला पाडलेल्या त्या भगदाडा कडे धाव घेताना त्याचा पाय नकळत वाटेतल्या एका स्टूल वर ठेवलेल्या फ्लॉवरपॉटला लागला व तो खाली पडत खळकन मोठा आवाज झाला.
आता संपूर्ण बंगल्याला जाग आली . काहींनी चोराला त्या भगदाडातून बाहेर पडताना बघितले आणि चोर-चोर चोर अशा आरोळ्यातून एकच हलकल्लोळ माजला. काही जण त्याच्या मागे धावले पण चोराने इतक्या सफाईने पोबारा केला होता कि तो कुणाच्या हाताला म्हणून लागला नाही.
आता पहाटेचे तीन साडे तीन झाले होते . चोराचा मुलगा सुद्धा आता घरी पोहोचला . अतिशय रागाने तो सर्वप्रथम बापाच्या खोलीत गेला आणि बघतो तर काय ? त्याचा बाप डोक्यावरून पांघरून घेऊन चक्क घोरत निवांत झोपला होता.
आता मात्र त्याचा राग प्रचंड अनावर झाला व त्याने त्वेषाने वडिलांच्या तोंडावरून पांघरूण काढत त्यांना हलवून जागे केले.
वडिलांनी त्याच्याकडे पहिले आणि विचारले, अरे ! आलास का ? छान झाले. आणि पुन्हा डोक्यावरून पांघरूण घेत तो झोपी जायला लागले तसा मुलगा बापावर खूपच भडकला आणि त्याची भडास तो बापावर काढायला लागला.बापाने थोडावेळ थांबत .. ठीक आहे ,आता तू आलास ना ? बास ! झोप आता ,दमला असशील खूप .. पण मुलगा बापाचे बोलणे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता . त्याने निग्रहाने वडिलांना जागे राहायला लावले. आणि अतिशय चिडून म्हणाला तुम्ही माझे नक्की बाप आहेत का वैरी ? तुम्ही मला एकट्याला त्या खोलीत कोंडून गेल्यावर पुढे काय झाले ते माहितीयेका ? तर ऐका
बाप म्हणाला ,खरं तर मला खूप झोप आलीये आणि खरं सांगू ? तुझी गोष्ट ऐकण्यात मला काडीचा रस नाहीये ,तू परत आलयेस हीच माझ्या साठी खूप महत्वाची गोष्ट आहे, पण केवळ तू माझा मुलगा आहेस म्हणून मी तुझी गोष्ट ऐकतोय . त्यावर मुलगा सांगायला लागला .. कि..
तुम्हीं मला त्या खोलीत कोंडून जेव्हा सोडून गेलात तेव्हा माझ्या मनात पहिला प्रश्न आला कि हा माझा बाप आहे का मागच्या जन्मीचा वैरी ? हा इतका दुष्ट कसा असू शकतो . ? याने हे असे का केले असावे ? ते हि स्वतःच्या मुलाच्या बाबतीत?
पण यावर मला जास्त विचार करायला तेव्हा वेळ मिळाला नाही कारण बाहेरच्या दिवाणखान्यात आता लोक जमले होते व घरात चोर घुसलेला आहे हे त्यांना समजल्याने ते त्याचा आता कसून शोध घेत होते. आता घरमालक शेठजी सुद्धा हॉल मध्ये आलेले होते .. चोराला सगळीकडे शोधल्यावर आणि तो न सापडल्यावर जेव्हा सगळे पुन्हा हॉल मध्ये जमले तेव्हा शेठजींनी त्यांच्या जुन्या जाणत्या नोकराला तिजोरीची खोली बघायला सांगितले. चोराने पळून जाताना तिजोरीच्या खोलीला कुलूप लावल्याने ती बाहेरून बंद होती .. नोकराने तेथील कुलूप पाहून शेठजींना तसे सांगितले. सगळ्यांना हायसे वाटले ..
आता बाकी सगळे उद्या दिवस उजाडल्यावर बघू असे शेठजी म्हणाल्याचे ऐकल्यावर मात्र आतमध्ये आता माझ्या अंगात कापरे भरले. आता उद्या सकाळी मी चोरी न करता देखील आयताच पकडला जाणार या जाणिवेने मी हबकून गेलो आणि का कोण जाणे पण मी काहीतरी करून त्या खोलीचा दरवाजा उघडला जावा या हेतूने खोलीतून मांजराच्या पिलाचा आवाज काढला..
रात्रीच्या शांततेमुळे तो सगळ्यांनी ऐकला नि शेठजींनी घरातील जुन्या जाणत्या स्त्री नोकराणीला ती तिजोरीची खोली उघडून त्या पिलाला बाहेर काढायला सांगत तेथून प्रस्थान केले. संध्याकाळी मी खोली बंद करतांना हे पिल्लू तिथे नव्हते म्हणतच तिने खोलीचे दार उघडले अन ती संधी साधून मी तिला जोरदार धक्का देत जीवाच्या आकांताने कंपाउंड वॉल च्या त्या पाडलेल्या भगदाडातून जीव मुठीत घेऊन बाहेर पळालो. घरातील लोक माझा पाठलाग करायला लागले.
घरातल्या लोकांची बोंबाबोंब ऐकून आता बघताबघता चोर चोर ओरडत ५० लोक माझा पाठलाग करायला लागले आणि आता मी पकडला जाणार असे मला स्पष्ट दिसायला लागले ,तेवढ्यात पळताना मला गावा बाहेरच्या विहिरीजवळ एक मोठ्ठी शिळा नजरेला पडली .. आणि कसे ते माहिती नाही पण एक क्षणभर विचार करत आहे नाही ती ताकद लावून मी ती उचलली आणि त्या विहिरीत टाकली. त्याचा भलामोठा आवाज आला आणि विहिरीतून पाण्याचा जो मोठ्ठा फवारा उडला त्या गडबडीत मी जवळच्या पिंपळाच्या झाडामागे जाऊन लपलो.
आता माझा पाठलाग करणारे विहिरीजवळ येऊन ठेपले होते. विहिरीतून उडणारा पाण्याचा फवारा त्यांनी सुद्धा बघितला असल्याने पडला पडला चोर पाण्यात पडला असा त्यांनी जल्लोष केला. काही जण त्या अंधारात चोराला शोधायला लागले. मी सुद्धा आता हळूच त्या गर्दीत सामील झालो .. काही जण म्हणाले .. चला बरे झाले सापडला ,कारण विहिरीला पायऱ्या नसल्याने आता चोर वर येऊ शकणार नाही म्हणून आता त्याला उद्या सकाळी येऊन पकडून चोप देऊ. असे म्हणत गर्दी पांगली .. आणि हे बघा मी आत्ता तुमच्या समोर उभा आहे .
हे सांगताना मात्र त्याच्या नजरेत त्या वेळी " बोला ,या सगळ्याला आता तुम्ही काय म्हणणार असा आत्मप्रौढीचा प्रश्नार्थक भाव होता. बापाने तो ओळखला .
बापाने त्याच्या डोळ्यात शांतपणे पहात फक्त इतकेच सांगितले "आता उद्या पासून तू तुझे काम एकट्याने करायला हरकत नाही. तुझे ट्रेनींग संपले आहे."
तात्पर्य : मिळालेल्या यशाची कधी चर्चा करू नका.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा