भोज्जा

शनिवार, ३१ डिसेंबर, २०११

नववर्ष शुभेच्छा...ह्या अशा ही !

आणि नववर्षाच्या तुम्हा सर्वांना माझ्या ह्या अभिनव शुभेच्छा !
२०१२ ह्या येणाऱ्या नवीन वर्षात तुमच्या प्रत्येक चालीला,प्रत्येक खेळीला यशाचा सुगंध लाभू देत...

सोमवार, २६ डिसेंबर, २०११

कै.सत्यदेव दुबे आणि अमिताभ बच्चनचा " दीवार "

अमिताभ बच्चनच्या "दीवार " मध्ये संपूर्ण सिनेमात मोजून जेमतेम पावणेदोन मिनिटांचे काम करून ही  ,स्वतःचा ठसा उमटवून ठेवणे ह्या खायच्या गोष्टी नाहीत आणि त्यामुळेच कालच स्वर्गवासी झालेले कै. सत्यदेव दुबे हे  अगदी चेहेऱ्याने जरी नाही तरी  त्यांच्या "त्या" कुलीच्या  भूमिकेमुळे अगदी सर्वसामान्य प्रेक्षकांच्या सुद्धा नक्की स्मरणात आहेत आणि राहतील असे मी जर सांगितले तर ती अतिशयोक्ती होणार नाही. "दीवार" चित्रपटाच्या ह्या व्हीडिओ क्लिप मध्ये पंचेचाळीसाव्या सेकंदाला आणि १ मी.४० व्या सेकंदाला त्यांची फक्त एक छोटीशी झलक आहे आणि ३ मिनिट ११ सेकंद ते साधारण ४ मिनिट ५५ सेकंदाला त्यांचा चित्रपटातील रोल संपला सुद्धा आहे.तथापि ह्या जेमतेम पावणेदोन मिनिटांच्या छोट्या रोल मध्ये सुद्धा,त्यांनी प्रेक्षकांना खुर्चीत   खिळवून ठेवले होते ह्यात शंका नाही.अशा ह्या अफलातून रंगकर्मीला त्या आठवणीतून ही   श्रद्धांजली..... अमिताभ सारख्या मोठ्या अभिनेत्याने  सुद्धा त्याच्या ब्लॉग वरून ह्याची आठवण सांगितली असून ह्या रंगकर्मीला आपली श्रद्धांजली अर्पण केली आहे.

व्हीडिओ सौजन्य "यू ट्यूब" ,धन्यवाद....
 

मंगळवार, २० डिसेंबर, २०११

जिब्राल्टरचा विमानतळ

जिब्राल्टर रॉक, जिब्राल्टरची सामुद्रधुनी ह्या विषयी आपण कधीतरी वाचले-पहिले असते तथापि स्पेनच्या दक्षिणेस असलेल्या, ब्रिटिशांची स्वायत्त वसाहत म्हणून जगभर ओळखल्या जाणाऱ्या  ह्या देशातील विमानतळाबाबत आपण त्या तुलनेत कमी वाचले किंवा बघितले असते.फक्त ६.८ चौ.कि.मी.एवढेच क्षेत्रफळ असणाऱ्या ह्या देशात जेथे लोकांना राहायला नीटशी जागा नाही, तेथे नागरी विमानतळा साठी जागा उपलब्ध करणे व त्यावर विमानतळ बांधणे  म्हणजे दिव्यच होते. तथापि "गरज ही शोधाची जननी असते" किंवा     whenever there is will , there is way  ह्या उक्तीला जागत ब्रिटिशांनी स्पेन आणि जिब्राल्टरला जोडणाऱ्या  विंस्टन चर्चिल या भर वाहतुकीच्या चौपदरी मुख्य रस्त्यावरचं,नव्हे त्या रस्त्यामध्येच, त्या रस्त्याला अगदी ९० अंशाच्या कोनात छेदणारा असा विमानतळ बांधलेला आहे.अर्थात हा विमानतळ फार मोठ्या वाहतुकीचा नाही.आठवड्याला येथून सुमारे ३० विमानेच  जा-ये करतात व ते हि फक्त इंग्लंडला.ह्यातील गमतीचा भाग म्हणजे त्या विमानतळावर एखादे विमान येण्यापूर्वी किंवा तेथून जाण्यापूर्वी सदरहू महामार्गावरील सुरु असलेली वाहतूक सुद्धा अगदी इतर सर्वसाधारण रस्त्या प्रमाणे फक्त तांबड्या सिग्नलनेच बंद केली जाते व विमान गेल्यावर रस्ता नेहमी प्रमाणे वाहतुकीला मोकळा केला जातो.विश्वास बसत नाही ना ?चला तर मग त्याचे हे फोटोच पहा.

मंगळवार, १३ डिसेंबर, २०११

तुमची झोपण्याची पद्धत आणि तुमचे व्यक्तिमत्व

"तुमच्या झोपण्याच्या पद्धतीवरून तुम्ही कसे असता किंवा असू शकता हे मी तुम्हाला सांगतो " असे   आपल्याला जर कुणी सांगितले तर आपण त्याला नक्कीच वेड्यात काढू.पण आजच्या ह्या इंटरनेटच्या जगात कुणीही,कधीही,कशावरूनही आणि काहीही सांगू शकतं... आपला विश्वास बसत नाही ना ? तर मग चला ही चित्रेच पहाना ! आणि मग नंतर ठरावा कि त्यात तथ्य किती नि करमणूक किती ते !

रविवार, ४ डिसेंबर, २०११

शेयरबाजारात पैसे मिळवायचे?तर मग हे वाचाच...

          उगाच पाल्हाळ लावण्या पेक्षा डायरेक्ट मुद्यालाच हात घालुयात.शेयरबाजारात आपण कुठल्याही  कंपनीचा शेयर घेतला कि त्या शेयरची ती गुंतवणूक योग्यवेळ आहे नाही,आपण जर नफ्यात असू किंवा आलो तर तो कुठे विकावा किंवा जर त्या गुंतवणुकीत तोटा होत असेल तर तो अजून किती काळ होऊ शकतो ,ह्या सर्वसाधारण आपल्या सारख्या छोट्या गुंतवणूकदारांना पडणाऱ्या प्रश्नांचे उत्तर बंगलोर येथील श्री.इलँगो ह्यांच्या स्टॉकवेल्थ ह्या ब्लॉगवर मिळू शकेल.सदरहू लेखक ही माहिती गेल्या ३ वर्षा पासून विनामूल्य आणि सर्वात महत्वाचे म्हणजे जवळपास दररोज नियमित प्रसिद्ध करतात.शेयर बाजारातील प्रमुख ५० मिड्कॅप आणि निफ्टी  मधील ५० कंपन्यांच्या शेयरची "आजची स्थिती" अशा प्रकारची "विश्वासार्ह "माहिती देणारा माझ्या माहितीतील हा भारता मधील एकमेव ब्लॉग आहे.

शुक्रवार, २ डिसेंबर, २०११

"कोलावेरी डी"!अर्थात "समर्था घरचे श्वान'

एव्हाना कोलावेरी डी चे तोंड फाटे पर्यंत कौतुक करून झाले आहे,तरुण पिढीला त्याने घातलेली भुरळ पाहता तरुणांच्या ह्या आवडी पेक्षा त्यांची खरोखरच्या श्रवणीय संगीताच्या बाबतीत सध्या होत असलेली उपासमार प्रकर्षाने नजरे समोर येते.सध्याच्या संगीतकारांच्या सिनेमातील गाण्याला दिलेल्या अति सुमार चाली पहाता,सगळ्याच वाईट गाण्यात  त्यातल्या त्यात बरे काय तर कोलावेरी डी ...आणि  म्हणून  तर खरे,ते जास्त उचलले गेले असावे अस उगीच राहून राहून वाटत.

रविवार, २७ नोव्हेंबर, २०११

पुण्यातील वॉकिंगप्लाझाचे कौतुक

पुण्यातील लक्ष्मीरोड वरील वॉकिंग प्लाझाचा प्रयोग यशस्वी होत आहे अशी आजच्या वर्तमान पत्रात बातमी आहे.हा प्रयोग यशस्वी  होणार नाही  किंवा होऊ शकणार नाही असे वाटायचे खरे तर काहीच कारण नाही आणि नव्हते.कारण पोलिसी  खाते आणि अतिक्रमण खाते ह्यांनी जर ह्या पूर्वी सुद्धा,हा सध्याचा समन्वय दाखविला असता तर, खरे तर हे असले प्रयोग करण्याची  वेळ सुद्धा त्यांचे वर आली नसती.वास्तविक पाहता ह्या दोन्ही खात्यांच्या प्रचंड निष्क्रियतेतूनच सध्याची परिस्थिती उद्भवली होती आणि आहे.लक्ष्मी रोडवरील आणि तेथील फुटपाथ वरील अनधिकृत फेरीवाले अतिक्रमण खात्याला न दिसणे आणि तेथे खरेदीला आलेल्या लोकांनी त्यांच्या गाड्यां मध्ये ड्रायव्हर बसवून ठेवून,ती वाहतुकीला अडथळा उत्पन्न होईल अशी उभी करून ठेवेणे आणि ते हि अगदी एका मागोमाग एक, अशा पद्धतीने, हे सर्व सगळ्यांना दिसत असून हि पोलिसांना ते न दिसणे हे, ह्या पूर्वीही शक्य नव्हते आणि ह्या पुढे हि नसेल.

मुळात गाडीत जर ड्रायव्हर त्याच्या सीटवर बसला असेल,........

गुरुवार, २४ नोव्हेंबर, २०११

शेयर बाजार कसा चालतो ? तर असा :)

शेयर बाजार हा  समजायला,रुचायला नि पचायला तसा ही अवघड विषयच आहे,नि बाजारातील मराठी माणसाचा सहभाग पाहता शेयर बाजार नि मराठी माणसाचे विळ्या भोपळ्याचे सख्य आहे,असे म्हटले तर तितकेसे वावगे ठरणार नाही.बाजारातील होणाऱ्या व्यवहारांची व्यवस्थित माहिती नि स्व-अभ्यास  नसेल तर येथे तुमच्या चुकीला माफी नाही,कारण येथे रोजच्या रोज दुपारी साडे तीन वाजताच तुमच्या हुशारीचे मूल्यमापन  केले जाते,आणि ते ही अगदी रोख स्वरुपात.

अर्थव्यवस्थेचे अतिरंजित प्रतिबिंब वेळे अगोदरच वेळप्रसंगी बाजारात  दिसून येते असे म्हणतात कारण ती शेयर बाजाराची खासियतच आहे.बाजाराने दुरून जरी लवंग पहिली तरी ती त्यास उष्ण पडते नि वेलदोड्याच्या नुसत्या वासानेच बाजाराला हुडहुडी भरते,हे अनिवार्य कटू सत्य आहे.रावाचा रंक नि रंकाचा राव करण्याची क्षमता ज्या व्यवसायात ठासून भरली आहे,तेथे तुमच्या गरम खिशा सोबतच तुमच्या "खरोखरच्या कणखर मानसिकतेची,स्व-अभ्यासाची येथे पदोपदी परीक्षा घेतली जाते.

धर्मराजाच्या द्यूता मुळे महाभारत घडले हे माहित असूनही,माणसामधील उपजत जुगारी प्रवृत्तीला लगाम घालणे हे केवळ अशक्य आहे.त्या मुळे सर्वसामान्य सरळमार्गी लोकांनी त्या पासून चार.... नव्हे, चाळीस हात दूर राहणे हितावह असते असे म्हणतात ते खोटे नाही.ह्या पोस्ट सोबतच्या  व्यंगचित्रात शेयर बाजारातील सट्टेबाजांची मानसिकता व त्यांचे व्यवहार हा विषय व्यंगचित्रकाराने थोडा अतिरंजित पण अतिशय खुबीने मांडला आहे.चला तो  आधी पाहून घेऊयात नि मग हा विषय फक्त "आजच्या पुरताच" थोडा अजून पुढे नेऊयात...

रविवार, १३ नोव्हेंबर, २०११

सोनिया गांधींना ताप का आला ?

नुकताच  ९ नोव्हेंबरला  हृषीकेश-कर्णप्रयाग रेल्वे मार्गाच्या पायाभरणीचा समारंभ रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी आणि संरक्षण मंत्री ए.के.अँथनी यांच्या हस्ते पार पडला.आधीच्या प्रसिद्धीनुसार  सदरहू सोहळा हा रेल्वे मंत्र्यांच्या उपस्थितीत सोनिया गांधींच्या हस्ते करण्याचा काँग्रेस सरकारचा मानस होता.स्थानिक वृत्तपत्रात तशी जाहिरात सुद्धा करण्यात आली.मात्र उत्तराखंडचे मुख्यमंत्री मेजर जनरल (निवृत्त) बी सी.खंडुरी ह्यांच्या राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना पाठवलेल्या एका फॅक्सने  सोनिया गांधीना "ताप" आला,नि त्या सोहोळ्यासच  उपस्थित राहू शकल्या नाहीत.

झाले असे कि,.....

रविवार, ६ नोव्हेंबर, २०११

जे.आर.डी.टाटांचे दुर्मिळ पेंटिंग

मध्यंतरी सहजच सर्फिंग करत असता जे.आर.डी.टाटांचे  "एक दुर्मिळ पेंटिंग" पहाण्यात आले. हे चित्र म्हणे त्यांच्या रहात्या घरात ठेवले आहे.कुणा ऐक्या अनामित कलाकाराने हे पेंटिंग जे.आर.डी.टाटांना सप्रेम  भेट दिले होते.हे चित्र दिल्या वर ते नक्की कशाचे चित्र आहे हे कुणाला तसे काही उमगले नाही अशी काही ब्लॉग/साईट  वरील माहिती सांगते,आणि जे.आर.डी.ह्यांच्या निधना नंतर म्हणे त्याचे रहस्य उलगडले असे सांगतात.

तथापि ते बिलकुल पटत नाही.त्या चित्रकाराच्या ह्या अप्रतिम कलाकृतीचा पूर्ण मान राखून,असे अतिशय विश्वासाने सांगावेसे वाटते कि हि कला निश्चितच दुर्मिळ आहे तथापि अगदीच अनोखी वगैरे अशी बिलकुल नाही/नव्हती, कारण पुण्यातील "सकाळ" ऑफिस समोरील श्री आझाद मित्र मंडळाने ह्या चित्रकलेच्या पद्धतीच्या गणपतीच्या चित्राचा देखावा हा फार पूर्वी म्हणजे सुमारे १९७० ते ७५ ह्या काळात सादर केला होता.सदर मंडळाच्या विद्यमान अध्यक्षांची,श्री.अहिरे ह्यांची ह्या संदर्भात भेट होऊ शकली नाही,पण शक्य झाल्यास त्या वेळच्या त्या देखाव्याचा फोटो व त्या कलाकाराचे नाव त्या चित्रा सोबत नंतर नक्की देण्यात येईल.

सदरहू देखाव्यात त्या कलाकाराने,गणपतीचेच चित्र खाली मंचावर काढले होते आणि प्रेक्षक ते चित्र दुरून पाहणार असल्याने,आणि ह्या चित्राची मेख प्रेक्षकांच्या त्वरित लक्षात यावी ह्या हेतूने,त्या कलाकाराने स्टील रॉड ऐवजी,क्रोमियम प्लेटेड असा अर्ध गोलाकृती असा सुमारे सहा फूट उंचीचा पत्रा वापरला होता.ह्या अनोख्या देखाव्याची बातमी "सकाळ "च्या त्या वेळच्या गणेशोत्सवाच्या अंकात छापून आल्याने ,त्या काळी हा देखावा,पुणेकरांनी लांबून-लांबून येऊन बघितला असल्याचे स्मरते.

ते काहीहि  असो.सध्या आपण जे.आर.डी.टाटांचे ते दुर्मिळ पेंटिंग तर पाहूयात !

शुक्रवार, २८ ऑक्टोबर, २०११

पांडुरंगांची व्यंगचित्रे

महाराष्ट्राचे  आराध्यदैवत असलेल्या पांडुरंगाचे पंढरपूर हे ज्यांचे जन्मस्थान होते त्या, खऱ्या तर खूप मोठ्या, पण वादग्रस्त चित्रकाराला, म्हणजेच पैगंबरवासी मकबूल फिदा हुसेन ह्यांना  सर्वांच्या  भावना दुखावणारी  लक्ष्मी,सरस्वती आणि  भारतमातेची  नग्नचित्रे  काढल्याने ह्या देशातून परागंदा होऊन, लंडनला जाऊन अल्लाला प्यारे व्हावे लागले होते,त्या मुळे पांडुरंगांची व्यंगचित्रे असे वाचल्यावर आपल्या भुवया वर जाणे स्वाभाविक आहे.पण केवळ नाव साधर्म्या व्यतरिक्त ह्या पांडुरंगाचा नि आपल्या त्या पांडुरंगाचा काही एक संबंध नाही.उलट ह्या जेष्ठ कन्नड व्यंगचित्रकाराची मराठी वाचकांना माझ्या तर्फे थोडीशी तोंडओळख करून देण्याचा आणि आपल्या दिवाळीचा आनंद द्विगुणीत करून,ह्या महान व्यक्तिमत्वाला सलाम करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. 

रविवार, २३ ऑक्टोबर, २०११

आयुष्यात उंच भरारी घ्यायची आहे ? तर मग हे वाचा.....

एकदा एका राजाला अरेबिया मधून दोन अप्रतिम बहिरी ससाणे भेटी दाखल मिळाले.राजाने आजवर बघितलेल्या स्थलांतरित,प्रवासी  बहिरी ससाण्यांच्या मधील "केवळ अप्रतीम " अशी ती जोडी होती.राजाने  त्या  जोडीला त्यांच्या पुढील प्रशिक्षणासाठी  त्वरित त्याच्या दरबारातील बहिरी ससाण्याच्या प्रशिक्षकाच्या ताब्यात दिले.
काही महिन्यां नंतर एके दिवशी,त्या प्रमुख प्रशिक्षकाने राजाला येऊन सांगितले कि त्या जोडीतील एक ससाणा आकाशात उंचच उंच अशी जादुई  भरारी अगदी लीलया घेतो पण... जोडीतील दुसरा ससाणा मात्र आकाशात उडणे तर दूर  त्याला येथे आणल्या दिवसा पासून त्याच्या फांदी वरून हललेला सुद्धा नाही.

मंगळवार, ११ ऑक्टोबर, २०११

अफलातून जादुगार डेव्हिड कॉपरफिल्ड

जादुगारी विश्वात "डेव्हिड कॉपरफिल्ड" हे नाव माहीत नाही असा माणूस शोधून सापडणे कठीण.११ गिनीज वर्ल्ड रेकॉर्डस नावावर असणारा आणि २१ एमी अवार्ड्स जिंकणाऱ्या ह्या अवलिया जादुगाराचे ,सहा देशांनी पोस्टाचे तिकीट काढून त्याच्या कौशल्याचा सन्मान केला आहे.असा मान मिळणारा आणि मिळविणारा तो जगातील एकमेव जादुगार आहे असे सांगितले जाते.ह्याच्या खेळाची आजवरची विकली गेलेली तिकिटे हि फ्रँक सिनात्रा,एल्व्हिस प्रिस्ले एवढेच काय पण अगदी मायकेल जॅक्सनच्या सर्व खेळांच्या पेक्षा हि जास्त आहेत असे त्याची साईट सांगते.थोडक्यात काय तर जिवंतपणीच  दंतकथा बनलेल्या ह्या जादुगाराला सलाम.आता एवढे वाचल्यावर आपल्याला त्याचा किमान एक तरी जादूचा खेळ बघणे हे ओघानेच आले.चला तर मग पाहूयातच...

रविवार, ९ ऑक्टोबर, २०११

"तिरुपती बालाजी"च्या "तिरुमला" पर्वताचे रहस्य

देशा परदेशातील कोट्यावधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेले तिरुपती बालाजी देवस्थान हे तिरुमला पर्वताच्या सात पर्वत रांगां मध्ये वसलेले आहे.ह्या सात पर्वत रांगांचे आणि श्री बालाजीचे नाते किती आणि कसे अतूट आहे हे आपल्याला एकदा तरी अवश्य बघायलाच हवे. चला तर मग ...

रविवार, २ ऑक्टोबर, २०११

बिनकामाचे पोस्ट

अगदी शाहरुख खान सुद्धा त्याच्या लहानपणी,तुमच्या-आमच्या, चारचौघां सारखा अगदी सर्वसाधारणच होता किंवा दिसायचा,कारण मध्यंतरी एकदा सहज फिरत,फिरत बिन्स डॉट कॉम वर पोहोचलो.तेथे  हिंदी चित्रपट सृष्टीतील, आटे गेलेल्या नि आटे असलेल्या  काही नटांचे बालपणीचे दुर्मिळ फोटो  दिसले.अजून आत-आत गेल्यावर  पोळपाट म्हटल्यावर जसे लाटणे त्याच्या जोडीने आपसूक येते तशा नट्या पण सापडल्या.खरे तर ते फोटो,केवळ सहज गंमत म्हणून बघण्या  पलीकडे  आपल्याला त्याचा उपयोग असा काहीच नाही.कारण ती सुद्धा आपल्या सारखी केवळ हाडामासाची माणसेच,पण नंतर त्यांच्या-त्यांच्या कर्तृत्त्वाने नि नशिबाने ते आज जिथे पोहोचले आहेत,त्या मुळेच केवळ ह्या फोटोंचे थोडे कौतुक जास्त.चला तर त्या मुळे हे फोटो जरा नजरे खालून घालुयात तर.......

रविवार, २५ सप्टेंबर, २०११

पाकिस्तान {फोटो} दर्शन (भाग 2 )

आणि हा पाकिस्तान फोटोपुराणाचा दुसरा नि शेवटचा भाग......अगदी पोलिसांपासून..... गुंडांपर्यंत नि मुल्लांपासून ते पार जनते पर्यंत.
ह्या विषयावरील पोस्टचा पहिला भाग  अवघ्या १५ दिवसांपूर्वी प्रकाशित केला होता नि अल्पावधीत ते पहिले पोस्ट "गेल्या 30 दिवसात अधिक वाचले/बघितले गेलेले ..." ह्या यादीत पहिल्या क्रमांकावर येऊन बसले. हे पोस्ट  भारत, संयुक्त  राज्ये/अमेरिका, सिंगापूर, कझाकस्तान, जपान, लाट्‌विया, इथिओपिया, नेदरलँड, मलेशिया, संयुक्त अरब -अमीरात, स्वित्झर्लंड, हंगेरी, पोलंड, कॅनडा, फ्रान्स, नायजेरिया  ह्या आणि इतर काही देशातून बघितले गेले त्यावरून एकूणच आपण भारतीय आणि जगभरातले मराठी वाचक/प्रेक्षक  हे "पाकिस्तान " ह्या विषया बाबत किती संवेदनशील आहोत हे लक्षात येते.
न जाणो  हे फोटोग्राफ्स कदाचित अगदी नजीकच्या भूतकाळातील नसतीलही ...ते अगदी गेल्या काही दिवसातील /महिन्यातील/वर्षातील  आहेत असे जरी क्षणभर गृहीत धरले तरी पाकिस्तान हा गेल्या दशकात  अण्वस्त्रसज्ज देश बनल्याने हे फोटोग्राफ्स बघितल्यावर तेथील कायदा सुव्यवस्था नि एकूण जनतेच्या रहाणीमाना वरून ,फक्त भारतालाच नव्हे तर एकूण जगालाच पाकिस्तानची चिंता का भेडसावते ते जास्त प्रकर्षाने लक्षात येते.
परमेश्वर करो नि तेथील जनते मध्ये नि राज्यकर्त्यांमध्ये धर्म नि धर्मांधता ह्यातील सूक्ष्म फरक,सुज्ञता नि सुजाणपणा लौकरात लौकर येऊन ते माणसात येओत,त्यातच सगळ्यांचे हित सामावले आहे असे नाही का ?
ह्या वास्तवदर्शी फोटोंसाठी त्या मूळकर्त्याचे नि त्या साईटचे (www.nidokidos.org ) पुन्हा एकदा आभार.धन्यवाद.

रविवार, १८ सप्टेंबर, २०११

"मराठमोळया गप्पांची" विचकट पेट्रोल दरवाढ.

"मी मराठी" वर "मराठमोळया गप्पांची काही अंशी पेट्रोल दरवाढ" झाली. माझ्या पेट्रोल दरवाढ...व्यंगचित्र रूपाने  ह्या पोस्टचे काही अंशी संकलन करून "विचकट" ह्यांनी ते "मी मराठी" ह्या संकेत स्थळावर गप्पाटप्पा या सदरात प्रसिद्ध केले.

शुक्रवार, ९ सप्टेंबर, २०११

पाकिस्तान {फोटो} दर्शन (भाग १ )



 पाकिस्तान {फोटो} दर्शन
स्वतःच ठेवायचं झाकून पण दुसऱ्याचं पहायचं वाकून ही माणसाची जुनीच  खोड आहे.आपला शेजारी पाकिस्तान म्हणायलाच नुसता शेजारी आहे.मात्र तेथील वास्तवता नक्की काय आहे हे समजायला आपल्याला तसा काही मार्ग सुद्धा नसतो नि खरे तर काही   कारण सुद्धा नाही पण आमचे मित्र श्री.कुमार ह्यांनी मागे एकदा सहज गम्मत म्हणून एक मेल पाठविला होता त्याचा हा स्वैरानुवाद.
वरील फोटोंचे संकलन त्यांनी किंवा मूळ मेलकर्त्याने www.nidokidos.org  ह्या साईट वरून संकलित केले  असावे  किंवा आहे असे दिसते त्या मुळे त्या मूळ  फोटोग्राफरचे आणि त्या  साईटचे ह्या प्रसंगी आभार आणि धन्यवाद.ह्या फोटो मालिकेत एकूण २५-२६ फोटो आहेत,त्यातील पहिला भाग आज आपल्या समोर केवळ कुतुहला पोटी सादर.

ह्यात कोणता गौरव ?

ह्यात खरे तर महाराष्ट्राचा काय नि कोणता गौरव आहे हे आम्ही शोधतोय ..तेव्हा तो सापडल्यावर,कळल्यावर तुम्हाला कळवू. 

गुरुवार, १ सप्टेंबर, २०११

माझ्या घरातील यंदाची श्री गणेश मूर्ती ...२०११

                   माझ्या  घरात यंदा गणपती बाप्पांचे विराजमान झाल्या नंतरचे पहिले दर्शन.

रतन खत्री आणि "कुंकू"

आज बऱ्याच दिवसांनी झी मराठीच " कुंकू " बघायचा योग आला नि एकेकाळचा मटकाकिंग रतन  खत्रीची आठवण झाली.म्हणजे झालं असं कि,बावळट,दुबळ्या नि ह्या अनुषंगाने येणाऱ्या बऱ्याच विशेषणांनी युक्त म्हणजेच बिनडोक वगैरे वगैरे असलेल्या जानकी वरील सध्याच्या  नवीन अत्याचारांची मालिका बघून... हे अत्याचार आज थांबतील  ,उद्या थांबतील ह्या आशेने वर्षानुवर्षे हि मालिका बघणाऱ्या आमच्या तमाम भगिनी वर्गाची होणारी उलघाल,झालेली अगतिकता बघून खूप भरून आले.कारण संध्याकाळचे सात वाजल्यावर एकवेळ "ते" कुंकू गेलं तरी चालेल म्हणजे म्हणजे स्वतःचे सौभाग्य  पण "हे" कुंकू जाता कामा नये एवढी  ह्या  मालिकेची  महिलां  मध्ये  लोकप्रियता  आहे.थोडक्यात काय तर कामावरून घरी येणाऱ्या स्वतःच्या त्या "कुंकवा" पेक्षा,आमच्या भगिनी वर्गास  ह्या "कुंकवाची" नि जानकीची काळजी जास्त.

शनिवार, ६ ऑगस्ट, २०११

ग्लास खाली ठेवायला शिका..!

त्या दिवशी प्राध्यापकांनी अगदी वर्गात शिरताच,  एका काचेच्या ग्लास मध्ये थोडेसे पाणी घेत तो हातात लांब धरतच त्या दिवशीच्या वर्गाला सुरुवात केली.
"ह्या ग्लासचे वजन किती असेल असे तुम्हाला वाटते ?"
खरे तर प्राध्यापकांच्या ह्या अनपेक्षित प्रश्नामुळे, सुरुवातीला सगळेच  विद्यार्थी बुचकळ्यात पडले खरे, पण नंतर अंमळ थोडेसे भानावर येत,
'५० ग्रॅम' !......१०० ग्रॅम !......सव्वाशे ग्रॅम ! अशी काहीशी उत्तरे त्यांच्या कडून आली.

ह्यावर प्राध्यापक महाशयांनी,
" खरे तर ! मलाही आत्ता, ह्याचे नक्की किती वजन आहे हे माहिती नाहीये,  पण,आता मला सांगा कि,जर मी हा ग्लास असाच अजून काही मिनिटे हातात धरून ठेवला तर काय  होईल ?" हा पुढचा प्रश्न विचारला.
"काहीही नाही ! काही होणार नाही "
विद्यार्थ्यांनी एकमुखाने सांगितले.
"ठीक आहे!......आता मला सांगा कि मी हा ग्लास... असाच... ह्या पद्धतीने समजा एक तास भर जर हातात धरून ठेवला तर काय होईल?"

मंगळवार, ७ जून, २०११

आम्हाला "मुलगी" हवीये !

हो............ आम्हाला मुलगी हवीये,नि तेच कसे १००% बरोबर आहे हे आम्ही पुराव्याने सिद्ध करू इच्छितो.विश्वास बसत नाही नां ? मग हा घ्या पुरावा....... अगदी फोटोंसहित ..........

रविवार, ५ जून, २०११

६ जूनचे खरे महात्म्य

चिंतातूर जन्तूने मागच्या लेखात, मनात असलेली मळमळ थोडीफार बाहेर काढली.पण ह्या ६ जूनच्या महात्म्या बाबत थोडे खोलात जाऊन बघितल्या वर फक्त नि फक्त विषण्णताच पदरात पडली.म्हणजे "ह्याच साठी केला होता, काय तो अट्टाहास ?" हा प्रश्न मनात आल्या शिवाय राहिला नाही.कारण ज्या रायगडावर महाराजांना हिंदवी स्वराज्याचा राज्याभिषेक झाला होता,तिथली सध्याची एकूणच अवस्था पहाता,पुढील तीनशे वर्षांनी तेथे  वास्तूरूपाने एकूणच काही इतिहास शिल्लक राहू शकेल काय ह्या बद्दल शंका आहे.आता अधिक उणे काही बोलत बसण्या पेक्षा प्रत्यक्षातच थोडे फार पाहूयात ...चला तर मग ... 

शुक्रवार, ३ जून, २०११

चिंतातूर जंतू.. अर्थात डांबरट पुणेकर...

आम्ही रिटायर्ड,म्हणजे लोकांच्या दृष्टीने रिकामटेकडे,पण आमच्या दृष्टीने सर्वात जागरूक असे पुणेकर सध्याच्या "वाघ्या" नाट्या विषयीच्या गदारोळा मुळे  फार नाराज आहोत.ह्या विषयातील तज्ञ, इतिहास संशोधक त्यातील सत्य-असत्य,वास्तवता-काल्पनिकता ह्याचा जरूर  तो पाठ पुरावा करतील,तो महाराष्ट्र पुढे आणतील ह्यात आमच्या मनात शंका नाही.पण ह्या भानगडीत त्यांनी "आमच्या" सारख्यांचे फार "नुसकान" केले आहे.   
छ्या ! पुरावे देऊन काहींनी  खेळातील सगळी गम्मत घालवायचा चंगच बांधलाय राव ! हे बरोबर नाही,अस नसतं चालत.आत्ता कुठे गणगौळण संपून वगाच्या दिशेने प्रवास सुरु होणार होता नि मधेच काही लोकं सगळा खेळाच्या रंगाचा बेरंग करून टाकतात.आमच्या सारख्या रिकामटेकड्या  पुणेकरांची  आत्ता-आत्ता कुठे ह्या विविध गुणदर्शनाच्या प्रयोगां मुळे थोडीशी करमणूक देखील व्हायला लागली होती,नि बेजान नीरस आयुष्यात रंग भरायला लागला होता नि मध्येच काहींनी  ही अशी (खरी) माहिती उपलब्ध करून सगळा रंगाचा बेरंग करून  टाकला.एक तर आम्ही रिटायर झाल्या पासून हिंग लाऊन आम्हाला कोणी विचारात नाही.जुनं  पुणं,आताची बिघडलेली तरुण पिढी....(हो ! म्हणजे आमच्या मते,....कारण वय झाल्यावर तसं म्हणायचा एक प्रघात असतो ) पुण्यातील वाढती गर्दी  , बेशिस्त वाहतूक,वाढती महागाई,सध्याचे राजकारण ते पार लादेन-बिदेन असले अगदी नॅशनल,इंटरनॅशनल विषयसुद्धा चघळून चघळून पार चोथा झाले होते,त्या मुळे,असं कोणी काही नवीन पिल्लू आमच्या डोक्यात सोडलं कि,सर्वात प्रथम म्हणजे आम्हाला रमायला होतं! नंतर आमची तल्लख बुद्धी प्रवासाला निघते म्हणजेच चालायला लागते नि नंतर नंतर तर पळायला लागते.

रविवार, २९ मे, २०११

डोक्याचा वापर !

जेव्हा एखाद्या उपयोग योग्य उत्पादनाची उपयुक्तता एका मर्यादे पर्यंत जाऊन पोहोचते, नि त्यात काही नवीन बदल करणे काही नैसर्गिक बंधनां मुळे शक्य होत नाही आणि केवळ त्या मुळे जर त्या उत्पादनाचा खप, खरे तर गरजेचा असूनही एका सॅच्युरेशन पॉइन्ट पर्यंत जाऊन पोहोचत असेल ,नि त्यात आता काही नवीन सुधारणा करणे शक्य नाही असे वाटत असतानाच कुणाच्या तरी डोक्यातून अफलातून कल्पना बाहेर येते नि त्या जुन्या उत्पादना मध्येच नाविन्य निर्माण होते.हेल्मेट हि वस्तू त्या पैकीच एक.आता  ह्या हेल्मेटच्या खालील चौदा प्रकारां मधून सर्वात जास्त नाविन्यपूर्ण अशी कोणती हेल्मेट निवडायची ह्या साठी सुद्धा आपल्याला पुन्हा डोक्याचाच  वापर करावा लागणार !:)  

शुक्रवार, २७ मे, २०११

उंटा(वर)चे शहाणपण !

ही एक अतिशय सरळ, साधी,अगदी छोटीशी अशी चित्ररूप गोष्ट आहे,पण ह्या छोट्याशा गोष्टीत सुद्धा, आपल्या पैकी काहींना, कदाचित, विचार करायला भाग पडण्या साठी,खूप काही अर्थ दडलाय ...



बुधवार, २५ मे, २०११

कैच्या कै !


कधी कधी एखादा दिवस असा उजाडतो कि त्या दिवशी नक्की कळत नाही कि आज काय-काय कामं हाता वेगळी करावीत... !  का नुसतं नेट वरच  बसावं... ते ! थोडक्यात आळसटलेली भंजाळावस्था ..... :)  
 
Can you Drag > From आ  to ?

रविवार, २२ मे, २०११

कनीमोझीचे फेस(फेक)बुक अकौंट

तामिळनाडू  मध्ये हे अकौंट सध्या फारच चर्चेचा विषय होऊन बसले आहे,अगदी काल्पनिक असले तरी.खरं तर तमिळ भाषेत कनी म्हणजे गोड..किंवा मधुर... नि एकूण अर्थ बहुदा "मधुरा" असा काहीसा आहे . त्या वरून हिच्या नावांत  गोडवा तर आहे, पण वास्तवात मात्र लोकांना तो सध्या फारच कडवट लागतोय.फार  सिरीयस  होऊ नका,पण करुणानिधींच्या मुलीचे म्हणजेच kanimozhi चे  तिच्या वरच्या अति प्रेमा मुळे किंवा द्रमुक वरील अती निष्ठेमुळे बनविलेले हे काल्पनिक तसेच खोटे फेसबुक  अकौंट आहे पण तामिळनाडू मधील जनता काय किंवा देशातील जनता काय सध्या काय विचार करते आहे त्याचा हा मासलेवाईक नमुना  आहे..   आपण मराठी वाचक निदान एक करमणूक म्हणून तरी त्या कडे पाहूयात.चला तर मग...

शुक्रवार, २० मे, २०११

त्या "चपट्या" नाकवाल्याची गोष्ट

खरं तर हे चपट्या नाकाचं, लहानसं, एक अगदी सर्वसाधारण कुत्र्याचं पिल्लू होतं,म्हणजेच "पग".मात्र, लोक त्याला "हच डॉग" म्हणूनच  ओळखायचे. ते छोटंसं  पिल्लू असताना त्याचे आयुष्यं खूप मस्तं चालले होते.एकदम आनंदात.
 खायचं,प्यायचं, खेळायचं नि झोपायचं ...... 

बुधवार, १८ मे, २०११

अजितदादा पवार.. एक (काल्पनिक) चित्रकथा.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेमुळे सध्या अजितदादा पवार पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.खरे तर "काँग्रेसी संस्कृतीत फिट्ट न बसणारे असे जे " ते अजितदादा असे त्यांचे वर्णन केले तर ते फारसे चुकीचे नसेल.कारण  कुठल्याही पण त्यातल्या त्यात अडचणीच्या गोष्टीवर कधीच कुठलीही प्रतिक्रिया न देणे,त्वरित तर त्याहून नाही अशी काँग्रेसजनांची  खरे तर ख्याती आहे.अडचणीची ती गोष्ट किंवा तो मुद्दा अशा पद्धतीने लळत-लोंबकाळत ठेवायचा कि नंतर तो आपोआप बाजूला पडतो नि लोकं देखील कालांतराने तो विसरतात,हे वरवर दिसायला अतिशय साधे पण अंमलात आणायला अतिशय कठीण असे टेक्निक वारंवार पण अतिशय खुबीने काँग्रेसजन  वर्षानुवर्षे वापरत आले आहेत.तथापि अजितदादा मात्र त्याला अपवाद आहेत.ते त्वरित रीअँक्ट होतात अन मिडीयाला आयतेच खाद्य मिळते.तसे दादा ह्या प्रकरणा व्यतरिक्त सुद्धा ह्या ना त्या निमित्ताने तसे चर्चेत होतेच,अन त्यांच्या काकांना,म्हणजेच शरद पवारांना  मधे-मधे  हस्तक्षेप करणे भाग पडायचे.

पण सध्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मागे लाऊन दिलेल्या ह्या बँकेच्या प्रकरणांमुळे ते फारच अडचणीत आले आहेत,त्या मुळे माझ्या सारख्या  सामान्य नागरिकाच्या मनात खालील कपोलकल्पित चित्र उभे राहिले.सगळी व्यक्तिमत्वे हि खूपच मोठी असल्याने त्यांचे सर्व भावमुद्रा असणारे त्यांचे वेगवेगळ्या प्रसंगी घेतलेले,काढले गेलेले फोटो गुगल इमेज मध्ये सहजगत्या उपलब्ध असतात/आहेत ते  केवळ मी माझ्या बालबुद्धी प्रमाणे संकलित करून,त्यात काल्पनिक संवाद घालून हे पोस्ट तयार केले आहे,अर्थातच त्याचा वास्तवाशी काही एक संबंध नाहीये हे आपणां सारखे सर्व सुज्ञ वाचक जाणतातच.पण झाल्या प्रकार बद्दल सामान्य नागरिक अगदी बाकी काही नाही तर ह्या प्रकारा कडे  थोड्या विनोदी  नजरेने  तर पाहू शकतोच ना ?  तुम्हाला काय वाटतंय ते  पाहून तुम्ही ठरवालच  म्हणा !

सोमवार, १६ मे, २०११

पेट्रोल दरवाढ...व्यंगचित्र रूपाने

आताशा पेट्रोलची दरवाढ हा विषय खरे तर अनपेक्षित किंवा धक्कादायक वगैरे बिल्कुल राहिलेला नाहीये.आंतर्राष्ट्रीय बाजारातील पेट्रोलची वाढती किंमत,देशांतर्गत पेट्रोकेमिकल कंपन्यांची वाढती वित्तीय तूट ह्या वास्तवाचा केवळ तत्कालीन सरकारने पुरेशी खबरदारी घेऊन जर योग्य वेळी सामना केला नाही तर ह्या गोष्टी अपरिहार्य असतात.खरे तर प्रत्येक पक्ष हा प्रथम सत्ता मिळविणे नि नंतर ती टिकविणे ह्यासच प्राधान्य देत असतो,त्या मुळे वित्तीय तुटीचा जेव्हा अगदी कडेलोट व्हायची वेळ येते तेव्हा हे कटू निर्णय हे घ्यावेच लागतात.आपण सर्व सामान्य जनता हि भाबडी(बावळट),निरागस (मूर्ख) असल्याने ह्या दरवाढीस सरकारच्या सांगण्या नुसार "फक्त" आंतर्राष्ट्रीय बाजारातील पेट्रोलच्या  वाढत्या किंमती वर अज्ञाना पोटी विश्वास ठेवून मोकळे होतो,नि सरकारी यंत्रणेच्या योग्य वेळी योग्य निर्णय क्षमतेच्या नाकर्तेपणा मुळेच होणारी वाढती वित्तीय तूट,त्या मुळेच वाढणारा महागाई दर वगैरे सोयीस्कररित्या  विसरून जातो. चला तर मग ह्या वेळी सुद्धा तेच करू... फक्त व्यंगचित्र रूपाने

शनिवार, १४ मे, २०११

बंगाली जादू

मुळात प.बंगाल मधील राजकारण हे फक्त आपल्यालाच नव्हे तर उभ्या भारताला न उलगडलेले कोडे आहे.वर्षा नु वर्षे  ....नव्हे दशकानुदशके  राज्यात कम्युनिझमच्या नावा खाली कोणतेही मोठे उद्योग उभारू द्यायला स्वतःच  विरोध करणारे असे जे कुप्रसिद्ध सरकार ते कम्युनिस्टांचे अशी ज्याची ओळख होती  ते सरकार मुळात इतके वर्ष  अमर्याद सत्ता उपभोगू शकले हा भारतीय लोकशाहीतील एक मोठ्ठा विनोद आहे.फार पूर्वी तेथे हल्दिया ग्रुपचे नि आत्ता लेटेस्ट टाटा ग्रुपचे  जे दिवाळे नि वाभाडे निघाले,ते कोणताही उद्योजक अगदी ठरविले तरी सहजा सहजी विसरू शकणार नाही.नॅनोला प.बंगाल मधून घालवितांना  ममता बाईंनी,अगदी नावात जरी ममता असली तरी वागण्यात नि बोलण्यात जो क्रूरपणाचा कळस गाठला होता,त्याला तोड नाही.मुळात वर्षानुवर्षे केंद्रातील कॉंग्रेसला तेथे असलेल्या अल्प जनाधारा ,प्रतिसादा मुळे तेथे त्यांचे सरकार नसल्याने कोणतीही समाज उपयोगी योजना राबविणे कधीच आवडत नव्हते नि साम्यवादाची घोंगडी पांघरलेले मा.क .प.चे सरकार सुद्धा निवांत झोपत होते.ह्या सगळ्या पार्श्व भूमीवर तेथील जनते पुढे हतबल होण्या शिवाय पर्यायाच नव्हता.राज्यातील बहुसंख्य गरीब, अशिक्षित नि निर्बुद्ध जनतेच्या जीवावर तीच ती लोकं वर्षानुवर्षे निवडून येत होती नि सत्तेचे लोणी चाखत होती.

सोमवार, ९ मे, २०११

"कोई चुपके से आ के, सपने सुला के,...चा "अनुभव"

"कोई चुपके से आ के, सपने सुला के,मुझ को  जगा के बोले.... कि मै आ रहा हूँ !  कौन आये,ये मै कैसे जानू ? "  वा ! काय कमालीचे शब्द आहेत.अहो  असे अर्थपूर्ण नि आशयघन शब्द गीता दत्त साठी  फ़क्त कपिल कुमारच लिहू शकतो. तो सत्तरीचा काळच काही वेगळा होता कि असे नि ह्या प्रकारचे किती तरी ओघवते काव्य त्या वेळी रसिक श्रोत्यांच्या कानावर येऊन ठेपत असे.खरे तर त्याचे रसग्रहण करण्याची नीटशी संधी सुद्धा त्या काळी त्या पिढीला मिळाली नाही.कारण उत्तमात उत्तम आंबेमोहोर अगदी मुबलक पणे बाजारात मिळत असेल तर अगदी बासमती सुद्धा क्षणभर बाजूला पडतो  नि रेशनच्या जाड्या भरड्या तांदळा साठी  तर कोण कशाला रांग लावेल असा तो काळ..... त्यां मुळे इतकी अर्थपूर्ण नि रसाळ काव्ये तेव्हा गाण्यांच्या रूपाने इतकी लागोपाठ रसिकां समोर यायची कि त्यात सुद्धा नाईलाजास्तव थोडे  डावे उजवे करावे लागायचे.,नव्हे आपोआप व्ह्यायचे.
आज ह्या गोष्टीची आवर्जून आठवण व्हायचे कारण म्हणजे सकाळीच न्हाव्याकडे कटिंगला गेलो असता "लोकसत्ताची" लोकरंग पुरवणी वाचनात  आली.तसे आमचे पवार सलूनवाले सुद्धा रसिकच,त्या मुळे बोलबोलता विषय निघाला नि थेट ७० सालात जाऊन पोहोचलो.आजच्या लोकरंग मध्ये ह्या गाण्या विषयी वाचनात आले नि तो सुवर्ण काळ आठवला.

शनिवार, ७ मे, २०११

लता मंगेशकर अन कॅबेरे साँग

S S जाने S जा......

लता मंगेशकर अन कॅबेरे साँग म्हणजे भांगेत तुळस..... नव्हे, खरं तर तुळशीत भांग. कारण  लताच्या वाट्याला हिंदी सिनेमाच्या  ७० च्या दशकात  "कॅबेरे डान्स साँग " म्हणजेच खास करून हेलेन वर चित्रित झालेली गाणी तशी कमीच  आली.मध्यंतरी खुद्द लताने सुद्धा हे स्वतः एका मुलाखतीत बोलून दाखविले.कारणे भले काहीही असोत पण १९६९ साली येऊन गेलेल्या संजय (हा त्या काळी पुढे खान हे आडनाव लावत नसे)साधना,अशोककुमार नि हेलेनच्या "इन्तकाम" मधील राजेंद्र कृष्ण लिखित नि लक्ष्मीकांत-प्यारेलाल जोडीने संगीतबद्ध केलेले हे "कॅबेरे साँग" त्यास अपवाद आहे.गाण्याच्या सुरुवातीस हेलेनने ज्या नजाकतीने नि अदाकारीने तिच्या कंबरेचा नि शरीरसौष्ठवाचा वापर ह्या गाण्यात केलाय त्याला तोड नाही.अहो, मुळात आ जाने जा म्हणून ती आव्हानच देतीये त्या मुळे गाण्यातील ज्येष्ठ (दिवंगत)अभिनेता असित सेनच्या तोंडाला लाळ सुटली नसती तरच नवल होतं :)  शेवटी हेलेन ती हेलेनच तिला तोड नाही .....आणि नसेल हि..... 

बुधवार, ४ मे, २०११

लादेन... किती खरा नि किती खोटा ?

ओसामा संपला पण नेहमी प्रमाणे बरेच प्रश्न अनुत्तरीत ठेवून.खरं तर मराठी नि हिंदी सिरीयलचे आम्ही हक्काचे प्रेक्षक ह्याला आता चांगलेच सरावलो आहोत  कि असे बिनडोक प्रश्न आम्हाला आता सहसा पडत नाही. पण इथे कसं डायरेक्ट लादेन आहे नि लादेन बाबत अगदी खुद्द अमरिकेने नव्हे खुद्द ओबामाने जरी  अगदी आमच्या वर त्याची किंवा त्याच्या देशाची हि कृती  लादेन असं जरी सांगितलं तरी आम्ही ती सहजा सहजी लादून घेणार नाहीये. काही बेसिक, भाबडे म्हणजेच बावळट असे प्रश्न हे पडतातच. मुळात तो खरच संपला का ? का संपला असे सांगून अमेरिकेने  नेहमी प्रमाणे स्वतःची एकदाची सुटका करून घेतली ? कारण कुणी म्हणत तो निःशस्त्र होता तर कुणी म्हणत कि त्याच्या कडून  प्रतिकार झाल्याने त्याला गोळ्या घातल्या. आता जर तो निःशस्त्र होता  नि अगदी नेम धरून त्याच्या डोक्यात गोळ्या घाले पर्यंत जर जवळ जाता येत होते तर त्याला जिवंत पकडता का नाही आले ?त्या सद्दाम हुसेन सारखा ? नि इतक्या घाई घाईने त्याला समुद्रात का फेकले ? का हि सुद्धा एक फेकच आहे का खरा लादेन कदाचित पूर्वीच मेला असेल वा नसेल पण केवळ या  विषयावर कायमचा पडदा टाकण्या साठी  हे अमेरिकेचे नेहमी प्रमाणे एक नवे पण नेहमी प्रमाणेच बेमालूम नाटक  आहे

अहो, आमच्या वाड्यात अगदी बोहारीण जरी भां S डी SS ...ये करत शिरली तरी ती कुणाच्या दारा समोर उभी राहून आवाज देतीये हे शेजारच्या काकू हातातलं काम सोडून बघतात नि इथे तर अनोळखी देशाची ४-४ हेलीकॉप्टर  रात्री बेरात्री विनापरवानगी एखाद्याच्या प्रदेशात उतरतायेत, ३०-४० मिनिट आमच्या हिंदी सिनेमातल्या प्रमाणे फुल फायटिंग करतायेत नि शत्रूचा खात्मा करून भुरकन पुन्हा उडून जाताहेत.अन ते सुद्धा म्हणे त्या आय.एस.आय च्या तळाच्या फक्त ७०० मीटर अंतरावर.सगळेच संशयास्पद.एक कुणी १०-१२ वर्षाचा मुलगा काही सांगतो नि आपण आपले तोंडाचा आ करून बघत राहायचे ? बरं, फोटो दाखवून टी.व्ही. न्युज चॅनल वाले ज्याला अलिशान- आलिशान हवेली म्हणून संबोधतायेत ते घर तरी कसले डोंबलाचे अलिशान ?कुठल्या तरी एन्गलने ते अलिशान वाटते का?अहो आमच्या कडच्या सरपंचाचे घर त्या पेक्षा अलिशान असते नि सर्वात महत्वाचे म्हणजे ते  दिसते.का लोक पहातेहेत नि ऐकताहेत म्हणून हुं म्हणून काहीही रेटत रहायचं ?  
मुळात एखाद्या गोष्टीचे उत्तम प्रेझेन्टेशन करण्याचे अमेरिकेचे कौशल्य वादातीत आहे.अगदी चंद्रावर माणूस उतरला पासून ते इराक मध्ये सद्दाम हुसेनने केमिकल वेपन्स ठेवली आहेत ते वर्ल्ड ट्रेड सेंटर पाडण्या -पडण्या पर्यंत.मागे ७० च्या दशकात अमेरिका-रशियाच्या त्या कोल्डवॉरच्या काळात चंद्रावर तो आर्मस्ट्रोंग उतरला काय नि न उतरला काय त्याने इथे कुणालाच फरक पडणार नव्हता. आमचा भुगोलातला तो अवघ्या २ मार्कांचा प्रश्न.  पण अगदी बेंबीच्या देठापासून शंख केलेल्या सद्दाम बाबत ही सरते शेवटी हाती काहीच लागले नाही ना? ना केमिकल वेपन ना अजून काही.तो सद्दाम सुद्धा शेवटी एखाद्या अगदी हुतात्म्या सारखा फासावर गेला.अहो  तिथली बहुसंख्य जनता अजून ही बऱ्या पैकी   मागासलेलीच होती नि आहे.नाही तर हां सद्दाम  दशाकानुदशके तेथे सत्ता उपभोगु शकला असता का ? का अमेरिका नि ब्रिटन ला येनकेंन  प्रकारे संपत चाललेल्या जगातील तेलसाठ्याची जी चिंता भेडसावत होती त्या वर जगाची सहानुभूति मिळवून,बघा आम्ही होतो म्हणून तुम्ही वाचलात हे उपकार केल्याचे दाखवून त्या वर फ़क्त ताबा मिळवायचा होता? हे प्रश्न अनुत्तरितच आहे. वर्ल्ड ट्रेड सेंटर बाबत सुद्धा बरेच प्रश्न अनुत्तरितच आहेत.हेरम्ब ओकच्या ह्या पोस्ट  मुळे तर त्यास पुष्टीच मिळते.त्या मुळे अगदी जरी खरोखरचा लादेन मारला गेला असे जरी आपण मान्य केले गृहीत धरले तरी हे एनकौंटर  म्हणजे  नेहमी प्रमाणे दर ४-६ महिन्याने टी.व्ही. वर येणारया त्या लादेनच्या टेपला आता हे अमेरिके कडून कायमचे उत्तर देऊन त्याला पूर्ण विराम देण्याचा प्रयत्न आहे का ? ह्या नंतर सुद्धा अमेरिके कडून ह्या विषायावर बरेच उलट सुलट दावे बातम्या येतंच रहातील पण  आम्हां सामान्यांचा बुद्ध्यांक मुळातच कमी असल्याने असे प्रश्न मग ते कदाचित बिनबुडाचे सुद्धा असतील पण पडू शकतात नि मुळातच हुशार नसल्याने अगदी स्टॅटिस्टीकली ते मांडून त्याचा शहानिशा सुद्धा करू शकत नाही. कां लादेन संपला हे ही नेहमी प्रमाणेच उत्तर नसलेले कायमचे  कोडेच   राहणार आहे.       


रविवार, १ मे, २०११

“शेवटचं पान”

ही  गोष्ट आहे अमेरिकेतली. १८९० च्या सुमारास न्यूयॉर्क शहरातील ग्रीनविच व्हिलेज मध्ये बरेच कलाकार वास्तव्यास असायचे. स्यू  आणि जोन्सी ह्या दोघी त्या पैकीच एक. अगदी पहिल्यांदा त्या दोघी एकमेकींना जेव्हा  तिथल्या एका रेस्टाँरंट मध्ये भेटल्या,तो त्यां वर्षीचा मे  महिना होता.
मी मेन स्टेट मधून आलेय नि मासिकांच्या कथांसाठी  चित्रे काढून देते.
स्यू ने आपली ओळख करून देत जोन्सीला  सांगितले.
"आणि मी कॅलीफोर्नियाची, पण खरे तर मला मनातून इटलीला जायची  खूप इच्छा आहे.नि तेथे जाऊन  बे ऑफ नेपल्सची खूप चित्रे काढायची ईच्छा  आहे."
जोन्सी उत्तरली.
त्या दिवशी त्या दोघींची ती पहिलीच भेट असून सुद्धा  अगदी पहिल्या भेटीतच दोघींचे सूर असे काही जुळले कि त्यांनी त्यांच्या कला ह्या विषया बरोबरच अगदी कपडे, ड्रेस, खाण्यापिण्याची आवड निवड ह्या विषयावर सुद्धा मनसोक्त गप्पा मारल्या.

बुधवार, २७ एप्रिल, २०११

एका रिकाम्या सोपकेसची गोष्ट

जपानी लोकांच्या सौंदर्य उत्पादने तयार करणाऱ्या एका कंपनीच्या इतिहासात एक अतिशय अविस्मरणीय असा किस्सा घडून गेला…….झाले असे कि एका ग्राहकाची एक अशी तक्रार त्यांचे कडे आली कि त्याने त्यांच्या उत्पादनातील एक प्रख्यात साबण ,सोपकेस सह बाजारातून खरेदी केला,…..घेतलेला,मिळालेला पीस सुद्धा अगदी पॅकबंद,सीलबंद होता.तथापि तो गृहस्थ  ..ती सोपकेस घरी घेऊन गेल्यावर उघडून बघतो तर काय ? सोप केस रिकामी ... आत मध्ये साबणाचा पत्ताच  नाही.. नुसतीच डबी. झाले ... कंपनीला तक्रार करण्या शिवाय पर्यायाच नव्हता. कंपनी सुद्धा नामांकित असल्याने त्यांनी सुद्धा त्या तक्रारीची गंभीरतेने दाखल घेतली. नि कंपनीच्या विश्वासार्हतेचा प्रश्न निर्माण झाल्याने कंपनीचे सर्व प्रशासन सुद्धा खडबडून जागे झाले.

सोमवार, २५ एप्रिल, २०११

आयुष्या वर पाहू काही..

आयुष्या वर बोलू पाहू काही..
खरे तर ह्या फोटो मधल्या बऱ्याच गोष्टी ह्या  खरे तर आपल्याला माहिती असतात,कळत हि असतात  पण त्याची नेटाने अंमलबजावणी करणे अंमळ अवघडच असते.पण तरी हि आपण सगळे त्या बघून त्यातील आपल्याला कितपत रुचतंय,झेपतंय हे आपापले आपणच ठरवू यात.चला तर मग ... जरा वेळात वेळ काढून एक नजर टाकताय ना?


 रोज किमान एक अर्धा तास तरी फिरण्याचा व्यायाम हवाच..आणि हो असं हसता आल तर सोन्याहून पिवळ !  नाही का?

शनिवार, २३ एप्रिल, २०११

ही मराठी ब्लॉगर्सची मानसिकता ? का अजून काही?

              मराठी ब्लॉगिंग मध्ये अगदी थोडीफार  लुडबुड करायला लागल्या पासून बऱ्याच  मराठी ब्लॉग्जला भेट द्यायचा योग आला.काहींचे लिखाण हे खूप आवडले ,तर काहींचे तितकेसे नाही.ह्यातील सर्वात खटकलेली गोष्ट म्हणजे एखाद्या ब्लॉगरचे एखादे पोस्ट  आपल्याला अगदी वाचल्या वाचल्या त्या क्षणी आवडले म्हणून आपण अतिशय उत्साहाने त्यावर काही कॉमेंट दिली तर जवळपास ९० टक्क्याहून ब्लॉग वर "आपली टिप्पणी मंजुरी मिळाल्यानंतर दृश्यमान होईल" हि पाटी त्वरित आपल्या समोर येते नि आपण खट्टू  होऊन जातो.साल म्हणजे होत कस कि आपण एखाद्याच्या मुलाचे तो परीक्षेत  चांगल्या मार्काने पास झाला म्हणून अगदी कौतुकाने बाजारातून अगदी चांगले पेन विकत घेऊन त्याला  प्रेझेंट  द्यायला वेळात वेळ काढून त्याच्या घरी जावे तर त्याच्या बापाने.......... "तो  स्कॉलरशिपच्या अभ्यासाची तयारी करतोय तुम्ही नंतर भेटा"...  असे सांगितल्या सारखे होते.आता हातातले आणलेले पेन त्याच्या बापाने आता बघितलेलेच असल्याने ते त्याला देण्या शिवाय पर्यायच राहिला नसल्याने पेन त्याच्या बापाकडे सोपवून "बरंय येतो" म्हणत आपण काढता पाय घेतो,अन तो हि ते  पेन (निर्लज्जपणे)हातात घेत "पुन्हा या" म्हणायला मोकळा.आपण तिथून बाहेर पडता पडता मनात ठरवलेलेच असते कि “सालं, कौतुकानं म्हणून आलो तर तू  हि ट्रीटमेंट देतोयेस,मुलाला दोन मिनिट भेटू द्यायला काय झाल होत? ”

"झक मारली नि तुझ्या कडे आलो.पुन्हा कोण कशाला मरायला तुझ्या दारात येतंय?”

गुरुवार, १४ एप्रिल, २०११

"एका लग्नाची गोष्ट" पण चित्ररूप

तिचे नाव कॅटी आणि त्याचे नाव निक.
उत्कटप्रेम हे दोन प्रेमीजीवांना कुठवर घेऊन जाऊ शकतं त्याचे हे अतीशय दुर्मीळ उदाहरण बघीतलं की थक्क व्ह्यायला होतं.पहिल्यांदा बघितल्यावर पुन्हा दुसऱ्यांदा नजर त्या वरुन आपोआपच फ़िरते.वाटलं तर तुम्हीहि अनुभव घेऊन बघा.

मंगळवार, १२ एप्रिल, २०११

बायको ही बायकोच असते


हो ...........  

बायको ही बायकोच असते,

कारण तिच्या लेखी 

तुम्ही कोण आहात ......

नि   काय आहात....  ह्याच्याशी तिला  काही  घेणं देणं नसतं.

बाहेर भले तुम्ही ,राजे असाल ,

पण घरात मात्र, तीच राणी असते. 

रविवार, १० एप्रिल, २०११

चांगल्या नोकरीच्या शोधात आहात? तर येथे भेटा....

या नोकरीत "वाचण्या" सारखं काहीच नाही,आपल्यातल्या टॅलंटला इथे कितपत वाव आहे हे ज्याचे त्यांनी आपापलेच  ठरवायचे आहे. विश्वास बसत नसेल तर बघा...... आणि वाटलं... तरच फक्त अप्लाय करा.

शुक्रवार, ८ एप्रिल, २०११

पैसा भले तुमचा असेल पण त्याच्या उगमस्रोताची मालकी समाजाकडेच आहे

जर्मनी हा देश औद्योगिकदृष्ट्या प्रचंड प्रगत देश आहे. बेन्झ,बी एम डब्लू ,सिमेन्स हे जगप्रसिद्ध ब्रान्ड   सुद्धा इथलेच. अगदी अणुभट्टी साठी  लागणारे पंप सुद्धा इथे एखाद्या छोट्या शहरामध्ये सुद्धा बनतो अन त्यांच्या प्रचंड प्रगतीची साक्ष देतो.

इथे यायच्या अगोदर वरील सगळ्या पार्श्वभूमीमुळे,इथले लोक हे अतिशय चैनीचे अन छानछोकीचे   जीवन  जगत  असणार हा माझा स्वाभाविक समज होता,अन त्यात काही गैर सुद्धा नव्हते

मी जेव्हा जर्मनीतील दुसऱ्या अन  युरोपमधील आठव्या क्रमांकाच्या मोठ्या शहराला म्हणजेच  हॅम्बर्गला जेव्हा पोहोचलो ,तेव्हा तेथे माझ्या मित्रांनी माझ्या स्वागताच्या जय्यत तयारीचा एक भाग म्हणून एका रेस्टॉरंटमध्ये भोजन समारंभाचे आयोजन केले होते. 


आम्ही जेव्हा हॉटेल मध्ये पोहोचलो तेव्हा फारशी गर्दी अशी नव्हतीच.बरीच टेबले अजून रिकामीच होती.कोपऱ्यातल्या एका टेबलावर एक तरुण जोडपे जेवत बसले होते.समोर फक्त दोन बियरचे  कॅन अन दोन डिशेस,...बसं...   इतक्या मस्त अशा ह्या तरुण जोडप्याचे हे असे  एवढेसे जेवण, 'हे' रोमँटिक जेवण इथे ह्यांच्या देशात असूच कसे शकते ह्या कल्पनेनेच मी चकित झालो.हे सगळ बघून "सालं ह्या चिक्कू प्रियकराला हे सगळ पाहून हि पोरगी सोडून तर जाणार नाही ना?" असा हि  विचार क्षणभर माझ्या डोक्यात उगीचच येऊन गेला.