भोज्जा

रविवार, २६ ऑगस्ट, २०१८

आयुष्याशी झुंज घ्यावी तर अशी : ए.के. हंगल

आज २६ ऑगस्ट २०१८ ,आजच्या दिवशीच ७ वर्षांपूर्वी तब्बल ९७ वर्षांचे ज्येष्ठ अभिनेते ए के हंगल यांचे देहावसान झाले होते. एक संवेदनशील अभिनेता म्हणून त्यांची ओळख आपल्याला आहेच पण मला त्यांच्या अभिनेता या ओळखी पेक्षा त्यांची देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील सक्रिय पण अंतिमक्षणी अतिशय उपेक्षित राहिलेले स्वातंत्र्य सेनानी हि ओळख मनाला जास्त भावून जाते.

१९१४ साली पाकिस्तानात एका संपन्न काश्मिरी ब्राह्मण कुटुंबात जन्मलेले ए के हंगल हे भारताचे प्रथम पंतप्रधान पंडित नेहरू यांचे अतिशय जवळचे नातेवाईक होते हे बहुदा असंख्य लोकांना माहित नसेल.पंडितजींची पत्नी आणि स्व.इंदिरा गांधी यांची आई कै .सौ.कमला नेहरू आणि ए.के.हंगल यांची आई या सख्ख्या चुलत बहिणी होत्या. आणि त्या मुळेच हंगल यांची त्याच काँग्रेसच्या कारकिर्दीत त्यांच्या वृद्धापकाळी विपन्नावस्थेमुळे झालेली वाताहत मनाला फार चटका लावून जाते.

स्वातंत्र्या साठी आपली उभी जवानी ज्या माणसाने देशासाठी वाहिली, ज्यांची १९४६ ते १९४९ अशी ऐन जवानी मधील मोलाची ३ वर्षे पाकिस्तान मध्ये तुरुंगात गेली  ,कशा साठी ??? तर इंग्रजांनी केलेल्या जालियन वाला हत्याकांडा विरुद्ध त्यांनी आवाज उठवला म्हणून,पण अशा व्यक्तिमत्वाचे विस्मरण नंतरच्या काळात तत्कालीन सरकारला व्हावे याचे फार वैषम्य वाटते.पण हे गृहस्थ इतके मानी होते कि,त्यांनी त्यांच्या विपन्नावस्थेत सुद्धा  ते नेहरू कुटुंबाचे जवळचे नातेवाईक असूनही कधी त्याचे भांडवल करून सहानुभूती किंवा मदत मिळवण्याचा कधी प्रयत्न केला नाही.हा इतका मुलखावेगळा माणूस होता कि, त्यांनी २२५ चित्रपटात काम केले पण त्यातील त्यांनी जेमतेम ५० सिनेमेच आपल्या आयुष्यात बघितले.शेवटच्या काही वर्षात तर ते ८-८ १०-१० महिने घराबाहेर सुद्धा पडत नसत..   

स्वतः जन्माने काश्मिरी पंडित असूनही त्यांनी त्यांचा परंपरागत व्यवसाय सोडून टेलरिंग या विषयात इतके प्राविण्य मिळवले होते कि, त्यांचे स्वतःचे पेशावर मध्ये भले मोठे टेलरिंग शॉप होते. ते स्वतः सूट शिवण्यात स्पेशालिस्ट होते ... इतके कि ते  *त्या काळी* एका सूटची शिलाई तेव्हाचे ८०० रुपये घेत असत व लोक त्यांना ती देत असत.   

आता विचार करा कि, असा हा वेलसेटल्ड माणूस जेव्हा १९४९ साली त्या कराचीतील तुरुंगातून सुटून स्वातंत्र्य सेनानी म्हणून ३५व्या वर्षी जेव्हा खिशात अवघे २० रुपये घेऊन बाहेर पडला असेल आणि त्याला देशाची झालेली फाळणी, त्या सोबतचा हिंसाचार ,कत्तली ,हत्याकांडे स्वतःचा धंदा,कुटुंब  उध्वस्त झालेलं बघावं लागलं असेल तेव्हा त्याची काय मानसिक अवस्था झाली असेल याचा विचारही करवत नाही.

पण त्यांनी हार मानली नाही कि कुठल्या सवलतीची ,आरक्षणाची किंवा सहानुभूतीची मदत अपेक्षित धरली नाही.त्यांनी आयुष्याला पुन्हा नव्याने सुरवात करत आपले उर्वरित आयुष्य ऑल टुगेदर नवीन म्हणजेच पूर्णवेळ अभिनेता होऊन सन्मानाने सुरु केले व त्यात नावलौकिक मिळवत राष्ट्रपतींच्या हस्ते "पद्म भूषण " हा मानाचा 'किताब मिळविला..


तर अशा या ए.के. हंगल यांचा हा आयुष्यपट पहाता आजच्या तरुणपिढीस त्यातून एकच आदर्श घेता येईल कि, *आयुष्याशी झुंज घ्यावी तर अशी* 

हंगल जींच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांचा एक गाजलेला सीन आज तुमच्या साठी.
   आजच्या लेखासाठी गुगल इमेज,विकिपीडिया व यूट्यूब यांचे सहकार्य घेण्यात आले आहे. संबंधितांचे मनापासून आभार 

बुधवार, ८ ऑगस्ट, २०१८

Kai Bar Yun Hi Dekha Hai

पालकांना नको असलेलं मूल जन्माला यावं ,त्यांनी जग रहाटी म्हणत त्याचं संगोपन करावं आणि एक दिवस त्यानं ध्यानीमनी नसतांना दैदिप्यमान यश मिळवत बोर्डात प्रथम यावं आणि  हे यश केवळ मला पालकांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे मिळालं आणि मी त्यांचा सदैव ऋणी राहीन,हे यश त्यांचं आहे अशी मीडियाला सर्वप्रथम प्रतिक्रिया द्यावी... आता अशावेळी त्या पालकांचे चेहरे त्यानंतर एकमेकांच्याकडे बघतांना काय होत असतील याची फक्त कल्पना करा.     

वास्तव जीवनात या सदृश प्रसंग १९७२ साली घडला आहे . 

दिग्दर्शक बासू चॅटर्जी *रजनीगंधा* सिनेमा बनवत होते.. केवळ २-३ लाखात हा माणूस चांगला सिनेमा बनवतो व त्यावर पैसे मिळू शकतात म्हणून अमेरिकेतील २ तरुणांनी भागीदारीत निर्माता म्हणून याच प्रॉडक्शन सुरु केलं.बासूदांनी स्वतःचे बंगाली वजन वापरत सलील चौधरींना त्या साठी संगीतकार नेमलं आणि लताच्या आवाजात प्रथम "रजनीगंधा फूल तुम्हारे " हे गाणे रेकॉर्ड केले.. त्याचे शूट पूर्ण झाले .. सिनेमाचे इतर शूट सुद्धा दरम्यानच्या काळात वेगात सुरूच होते कारण सर्व अभिनेते नवीन असल्याने तारखांचा प्रश्नच नव्हता. चित्रपट संपत आला व आता केवळ एक गाणे लताच्या आवाजात रेकॉर्ड करावयाचे बाकी होते...जे पडद्यावरनायिकेवर बॅकग्राउंडवर दिसणार असल्याने ज्याचे शूट गाण्या आधीच संपले होते. 

गाणे करण्यासाठी बासुदांनी निर्मात्याद्वयाला लताजींचे त्या वेळच्या एका गाण्याचा त्या घेत असलेल्या मोबदल्याचे ३ हजार रुपये पाठवायला सांगितले. ३००० हि रक्कम त्या काळी खूप मोठी होती ... निर्माते नाराज झाले. त्यांना वाटले ,हे पैसे म्हणजे वेस्ट ऑफ मनी होतोय...कारण गाणं तसं ही बॅकग्राउंडलाच आहे आणि त्यातून जर अगदी करायचेच असेल तर कमी पैशात गाणारी दुसरी गायिका घ्या किंवा दोन हजारात जे कोणी गाईल त्याच्याकडून ते गाऊन घ्या असे त्यांनी कळवले.   पण हे गाणे लताजींनी गाणेच  गरजेचे आहे कारण ते नायिकेच्या मनाची उलघाल दाखवणारे आहे असे चित्रित होणार हे बासुदांनी त्यांना पटवून सांगायचा प्रयत्न केला पण व्यर्थ.निर्मात्यांनी दोन हजार रुपये पाठवून दिले व यांतच काय ते भागवून घ्या सांगितले..बासुदांची आता मात्र पंचाईत झाली..   

आता नवीन गायिका शोधून ऐन वेळेला प्रयोग कुठला करायचा म्हणून बासुदांनी सलील चौधरींना त्यांची झालेली गोची कानावर घातली.. ते सुद्धा सर्व कहाणी  ऐकून थक्क झाले.कारण लता हे गाणं करतीये असं ते जवळ-जवळ शेवट पर्यंत समजत होते... शेवटी केवळ नाईलाज म्हणून त्या काळी २००० रुपये प्रति गाणे मोबदला घेणारे मुकेश यांना रेकॉर्डिंगला पाचारण केले व त्यांच्या आवाजात ते रेकॉर्ड झाले.त्या काळी दोन हजाराचे मोल सुद्धा किती मोठे होते ते सांगतो म्हणजे समजेल. या चित्रपटाची नायिका विद्या सिन्हा हिला या सिनेमाचा एकूण मोबदला म्हणून रुपये ५०००/- देण्यात आला होता.      

पण या गाण्याचे  नशीब बघा या गाण्याला १९७३ साली सर्वोत्कृष्ट पार्शवगायनासाठी म्हणूनचा मुकेश यांना त्यांच्या आयुष्यातील पहिला-वहिला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला.मुकेशजींनी त्यासाठी सलिलदा आणि बासूदा यांचे त्यावेळी त्यांना इतके सुंदर गाणे गायची संधी दिल्याबद्दल जाहीर आभार मानले...आता नुसती कल्पना करा बासूदा आणि सलिलदा यांची  त्या क्षणी एकमेकांच्या कडे पाहतांना काय गोची झाली असेल...पण जी होती  ती सत्य परिस्थिती त्यां दोघांनी  मुकेश यांना शेवट पर्यंत कानावर घातली नाही.किंबहुना त्यांचे मुकेश जिवंत असे पर्यंत उभ्या आयुष्यात ते धाडसच झाले नाही.

आज  हे सगळं रामायण सांगायचं कारण म्हणजे या गाण्यांत पडद्यावर  विद्या बरोबर दिसणारा नट दिनेश ठाकूर याचा ८ ऑगस्ट हा जन्मस्मृतिदिन आहे. राजस्थान मधे जन्मलेल्या दिनेशने दिल्लीतून अभिनयाचे प्रशिक्षण घेत हिंदी सिनेमांत चरित्र भूमिका केल्या व मुंबईतील पृथ्वी थिएटर्सच्या एकूणच जडणघडणीत याचे निर्माता,अभिनेता,दिग्दर्शक म्हणून फार मोठे योगदान होते... वयाच्या ६५व्या वर्षी हा गेला सुद्धा... असो.. आता *ते* गाणे बघू... 
आजच्या लेखासाठी अनिता पाध्ये यांच्या "यही है जिंदगी" या पुस्तकाचा संदर्भ घेतला आहे. धन्यवाद अनिताजी.   


शुक्रवार, ३ ऑगस्ट, २०१८

बेक़रार करकें हमें यूँ न जाइए !

मैत्रीची आजवर आपण अनेक उदाहरणे बघितली पण या मैत्रीचे हे उदाहरण दुर्मिळ या सदरात मोडते. 

गोष्ट आहे १९६७-६८ सालातली.प्रख्यात हिंदी गीतकार आणि कवि शकील बदायुनी हे त्यांच्या वयाच्या अवघ्या ५०व्या वर्षी पाचगणीला एका आरोग्य केंद्रात मधुमेह आणि क्षयरोगाने त्रस्त होऊन अतिशय हालाकीच्या परिस्थितीत आपला  शेवटचा काळ घालवीत होते. 

कुठूनशी हि बातमी त्यांचे जिवलग स्नेही नौशाद ,ज्यांनी त्यांना हिंदी सिनेमांत गीतकार म्हणून प्रथम ब्रेक दिला होता त्यांच्या कानावर गेली. ते त्वरित पांचगणीला पोहोचले. शकील यांची पैशाअभावी झालेली खस्ता हालत त्यांना बघवली नाही.. त्यांनी त्वरित मुंबईला जाऊन त्यांना ३ सिनेमांचे गीतकार म्हणून कॉन्ट्रॅक्ट देववले आणि त्या तीनही सिनेमांच्या गाण्यांच्यासाठी साठी त्यांना प्रत्येकी दसपट मोबदला मिळवून दिला. 

आजचे शकील यांचे १९६८च्या आदमी सिनेमातील गाणे हे त्या काळातीलच आहे... ज्यांची आज ३ ऑगस्ट हि पुण्यतिथी आहे.हे गाणे आत्ता पडद्यावर जरी तुम्ही दिलीपकुमार यांच्यावर चित्रित झालेले बघत असाल तरी शकील यांना ते आयुष्यात कुठल्या टप्प्यावर येऊन पोहोचले आहेत याची त्यांना जाणीव असणारे आहे त्यामुळे हे गाणे तुम्ही आज शकील बदायुनी,नौशाद आणि रफी साहेब यांच्या नजरेतून बघितले तर त्यात एक अतिशय वेगळा,गहिरा आणि अतिशय दर्दभरा अर्थ भरलेला दिसून येईल. 

हे गाणे करतांना त्याचे संगीतकार नौशाद आणि गायक मोहम्मद रफी यांची मनःस्थिती कशी झाली असेल याची आज आपण कल्पनादेखील करू शकत नाही... 

त्यामुळे आज हे गाणे पहाण्या ऐवजी मी म्हणेन कि, ऐका फक्त...  😥😭👇
सौजन्य : या लेखासाठी इंटरनेट आणि यू ट्यूब यांचे सहकार्य घेतले आहे. संबंधितांचे मनापासून आभार