भोज्जा

बुधवार, २३ मे, २०१८

देव करो ,नि उद्याचा दिवस माझा असेल !


 ग्रेट सूफी संत हसन शेवटच्या घटका मोजत असता त्याचे काही शिष्य त्याला म्हणाले "महाराज , आपल्या कडे या क्षणी सुद्धा जगाला खूप काही देण्यासारखं आहे  हे आम्ही जाणतो ...   आपण अजून बोलू शकत आहात ,तरी कृपया आपण आम्हांला आपल्या गुरूंचे ते नांव सांगा ,ज्यांच्या कडून आपल्याला इतकी अगाध ज्ञानप्राप्ती या आयुष्यात झालीये...

हसन म्हणाला " आत्ता या क्षणी मी ती नावं सांगत बसलो तर काही दिवस,महिने,वर्षे लागतील,जो वेळ आता माझ्या कडे नाहीये ,ज्यांच्या कडून मी आयुष्यात खूप काही शिकलो, पण माझे त्यातील ३ गुरूं असे होते ज्यांना मी कधीच   विसरू शकत नाही....

माझा पहिला गुरु एक चोर होता ... 

एकदा वाळवंटात मी रस्ता चुकलो आणि एका अपरात्री मी एका गावात येऊन पोहोचलो. सगळ्यांचे दरवाजे बंद होते त्या मुळे त्या भयानक थंडीत मला आता कुठेच आसरा मिळायची शक्यता नव्हती ,तितक्यात माझी एका  चोराशी गाठ पडली... मी त्याच्याशी माझ्या रात्रीच्या निवाऱ्या बद्दल विचारणा केली असता तो म्हणाला , " तुम्ही चेहऱ्यावरून एखादे धार्मिक ,अध्यात्मिक गुरु दिसताय . तुमच्या चेहऱ्यावर ते तेज मला स्पष्ट दिसतंय ,पण व्यवसायाने मी एक चोर आहे आणि माझ्या कामाला बाहेर पडलोय... पण तुमची तयारी असेल तर चला ,मी तुम्हांला माझ्या घरी घेऊन जातो ,तुम्ही माझ्या कडे आज मुक्काम करा...माझी काही एक हरकत नाहीये .... क्षणभर मी घाबरलो पण विचार केला कि, मी सूफी आहे आणि हा चोर असून सुद्धा याला माझी भीती वाटत नाही तर मी याला भिण्याचे कारण काय ??? मी त्याच्या मागे चालत त्याच्या घरी पोहोचलो...

मी अंदाज बांधल्याचा विपरीत तो चोर स्वभावाने, वर्तणुकीने  आणि आदरातिथ्याने इतका चांगला होता  कि, मी त्याच्या कडे रमलो आणि पुढील काही महिने मी त्याच्याच  घरी राहिलो...आता तो रोज रात्री मला सांगायचा ..."मी माझ्या कामाला जातोय ,पण तुम्ही तुमची पूजा-अर्चा ,ध्यानधारणा निवांत करा,माझी चिंता करू नका... मी रात्री उशिराने येईन..

तो रात्री परतल्यावर मी उत्सुकतेपोटी त्याला रोज विचारायचो  "आज ,काही मिळालं का ?" आणि तो सांगायचा  कि, .....नाही !.... आज काही नाही मिळालं  पण उद्या मात्र नक्की मिळेल... हा प्रकार पुढे जवळपास महिनाभर असाच सुरु राहिला ,..... चोर रोज रात्री चोरी करायला जायचा आणि रिकाम्या हाताने परत यायचा... पण  मला त्याचे नेहमी आश्चर्य वाटायचे कि, त्या महिन्याभरात तो  मला कधीही  निराश झालेला दिसला नाही...तो मला रोज सांगायचा " देव करो नि, उद्याचा दिवस माझा असेल... माझं काम होईल...या उपर तो मला म्हणायचा कि, "महाराज ! तुम्ही तर इतके देवधर्माचें करता ,तुम्ही तर आमच्या पेक्षा देवाच्या जास्त जवळचे आहात त्या मुळे  तुम्ही सुद्धा देवाकडे माझ्या साठी प्रार्थना करा कि, या गरीब माणसाला मदत कर ...त्याला त्याच्या कार्यात यश मिळू दे ! त्याचे काम उद्या नक्की होऊ दे....  

तर हा चोर होता माझ्या आयुष्यातील माझा पहिला गुरु...कारण मी वर्षानुवर्षे ध्यानधारणा करून,कित्येकवेळा देवप्राप्तीच्या अतिशय जवळ पोहोचायच्या पायरीवरून जेव्हा-जेव्हा  मागे खेचला जायचो आणि माझा देवावरील ,देवाच्या अस्तित्वावरील विश्वास उडायची वेळ यायची तेव्हा-तेव्हा मला या चोराचे ते शब्द आठवायचे कि, " देव करो नि उद्याचा दिवस माझा असेल",मी उद्या पुन्हा प्रयत्न करेन !  ... आणि मी तेव्ह-तेव्हा आठवायचो कि,हा चोर असूनही "त्या उद्या" करीत इतका प्रयत्नवादी आणि आशावादी राहू शकतो तर मी अजून एक दिवस प्रयत्न करायला का हरकत नाही ? आणि मी पुन्हा ध्यानधारणेच्या मार्गावर मार्गस्थ व्हायचो...माझा दुसरा गुरु एक कुत्रा होता !


एकदा मला  तहान लागल्याने पाणी पिण्यासाठी मी एका नदी तीरापाशी आलो. तिथेच हा कुत्रा मला दिसला...त्याला सुद्धा  तहान  लागली होती... पण तो नदीकाठी जायचा पाण्यात त्याचेच प्रतिबिंब पहायचा ,घाबरायचा त्या प्रतिबिंबावर भुंकायचा आणि मागे फिरायचा असे दोन-चारदा झाले ... पण त्या कुत्र्याला तहानच इतकी लागली होती कि, शेवटी हिय्या करून त्याने त्या पाण्यातल्या त्याच्या प्रतिबिंबावर चाल केली आणि पाण्यात उडी घेतली.. प्रतिबिंब गायब झाले ,कुत्र्याने त्याची क्षुधा भागवली आणि तो पोहत-पोहत निवांतपणे पाण्याबाहेर पडला... 


हा सगळा प्रकार दूर उभा राहून मी पाहत होतो... मला लगेच लक्षात आले कि, या प्रसंगाच्या निमित्ताने देवाने मला संदेश पाठवलाय ... कि, वेळ आल्यावर तुम्हाला त्या अज्ञाताची कितीही भीती वाटो ,पण  त्या भीतीवर स्वार होत जर तुम्ही त्यात उडी घेतली,स्वतःला विश्वासाने त्यात झोकून दिले तर ती भीती कायमची दूर होते.... मग मी विचार केला कि, जर त्या कुत्र्याला ते जमू शकले तर मला का म्हणून जमणार नाही ???  आणि त्या नंतर माझ्या मनांतील "एखादी गोष्ट करतांना "ती मला जमेल नां " ही माझी भीती कायमची गेली... तर अशा तऱ्हेने तो कुत्रा हा माझा दुसरा गुरु होता...

माझा तिसरा गुरु एक छोटा मुलगा होता ...

एकदा मी एका गावात संध्याकाळी जवळपास अंधार पडत असतांना शिरलो आणि मला समोरून एक छोटा मुलगा मशिदीच्या दिशेने हातात पेटवलेली मेणबत्ती अतिशय सांभाळून नेतांना दिसला... हातातील ती मेणबत्ती विझू नये म्हणून त्याने एका हाताने तिच्या ज्योतीवर काळजीपूर्वक आडोसा धरला होता आणि  तो जपून चालत होता..... का कोण जाणे पण  मी त्याला वाटेतच जरा थांबवलं... आणि विचारलं कि, "ही मेणबत्ती तू स्वतः पेटवली का ? तो म्हणाला हो !" मग मला त्याची थोडीशी गम्मत करावीशी वाटली, म्हणून मी त्याला विचारलं कि,मग त्यात उजेड कोठून आला ? कारण हि मेणबत्ती पेटवे पर्यंत तेथे अंधार होता आणि ती तू पेटवल्यावर पेटली .... तर आता मला सांग कि, त्यात उजेड कोठून आला कारण तू तो उजेड येतांना बघितला असणार ! नाही का ?

माझ्या या प्रश्नावर तो मुलगा मनापासून खळखळून हसला आणि त्याने त्या मेणबत्तीच्या ज्योतीवर जोरात फुंकर मारली आणि ती विझवली... मला समजलं नाही कि, त्यानं हे असं का केलं ते ? पण नंतर त्याने माझ्याकडे वळून पाहिलं आणि मला विचारलं कि, "आत्ता हि मेणबत्ती तुमच्या समोर पेटलेली होती... तिच्यात उजेड होता ,आणि आत्ता तुमच्या डोळ्यादेखत तो उजेड नाहीसा झालेला तुम्ही बघितलात तर आता तुम्ही मला सांगा कि, तो उजेड कुठे गेला ?... तुमच्या डोळ्यादेखत सगळा प्रसंग घडलाय !


त्या मुलाच्या त्या अनपेक्षित कृतीने मी आता गांगरून गेलो.. निरुत्तर झालो ... माझ्यातला "स्वाभिमान" कितीही नाही म्हणलं तरी दुखावला गेला .. माझ्या ,ज्ञानाला,बुद्धिमत्तेला त्याने मोठा हादरा बसला ... मी जमिनीवर आलो आणि त्या क्षणापासून माझ्यातला  माझा "मी" हा तेथेच गळून पडला....     

 स्वैर अनुवाद.. :ओशो -सिक्रेट ऑफ सिकेट्स  वरून साभार   गुरुवार, २६ एप्रिल, २०१८

"रिमझिम गिरे सावन" वाली मौसमी चॅटर्जी

आज २६ एप्रिल ,मौसमी चटर्जी आज सत्तरीची झाली...”शतायुषी भव !” अशी तिला हार्दिक शुभेच्छा ! ... 

तिचा आणि  अमिताभचा  “मंझिल” पिक्चर तुम्हाला आठवतोय ? हो तोच “रिम झिम गिरे सावन “ फेम... ! आज त्या सिनेमाच्या निर्मितीच्या कहाणी  सोबत त्याच्यातील त्या  हिट गाण्याच्या शूटिंगच्या वेळची  अधिकृत कहाणी ... तुमच्या साठी ...  

मंझिल पिक्चर रिलीज जरी १९७८-७९  ला झाला तरी मुळात तो  प्रचंड रखडलेला पिक्चर होता...त्याचे शूटिंग “जंजीर”(१९७२) यायच्या अगोदर म्हणजे  अमिताभ जेव्हा कोणी ही नव्हता तेव्हा सुरू झाले होते.. अमिताभला हा पिक्चर जया भादूरीने त्याच्यावरच्या प्रेमापोटी तिचे वजन वापरुन, दिग्दर्शक बासू चटर्जीला अमिताभला घ्यायची गळ घालून मिळवून दिला होता...त्यात अमिताभचे क्रेडिट शून्य होते...  पण नेमके झाले असे कि, जंजीरच्या अगोदरचे  अमिताभचे तेव्हाचे आलेले जवळपास सगळे पिक्चर इतके सपाटून आपटले की,या पिक्चरच्या निर्माता त्रिकुटाने सिनेमाचे थोडेफार शूटिंग झालेले असताना सुद्धा सगळेच पैसे डुबायचा धोका नको म्हणून इतर निर्मात्यांनी जसे अमिताभ सोबतचे सिनेमे त्या काळी  बंद केले होते तसा त्यांचा हा सिनेमा देखील डबा बंद करून टाकला कारण निर्माते म्हणून एकतर त्यांचा हा पहिला सिनेमा ,आणि तो सुद्धा त्यांनी बासू चटर्जी केवळ कमी पैशात सिनेमा करतो म्हणून सुरू केलाला असा ...

पण १९७२ ला अमिताभचा प्रथम जंजीर आला नंतर ७३ला मजबूर,७५ला दीवार आणि नंतर शोले आला आणि सगळी गणितच बदलून गेली...नुसत्या अमिताभच्या एकट्याच्या नावावर पिक्चर चालायचे दिवस आले... त्या मुळे  त्या मंझिलच्या निर्माता त्रिकुटास त्यांनी  त्यांच्या डबाबंद केलेल्या  पिक्चरची आठवण झाली .... त्यांनी बासूला गळ घालत,अमिताभचे पाय धरत  पुन्हा पिक्चर सुरू करायला लावलं आणि त्या मुळेच निर्मिती दरम्यान मधे प्रचंड गेलेला कालावधी हा चित्रपट पहाताना लगेच लक्षात येतो... सुरवातीचा अमिताभ आणि सुरवातीची मौसमी यांच्या तब्येती आणि नंतरच्या तब्येती यात बर्‍यापैकी तफावत आहे तर असा  हा निर्मिती दरम्यानचा  कंटीन्यूटी नसलेला अमिताभचा  पिक्चर १९७९ला रिलीज झाला आणि विशेष म्हणजे निर्मात्याचे “अमिताभ लाटेत “ फक्त त्याच्या एकट्याच्या नावावर उखळ पांढरे करून गेला...

त्याच सिनेमातील गाजलेले हे खालील गाणे “रिम झिम गिरे सावन “ मौसमीला आणि अमिताभला जेव्हा पब्लिकला ओळखता येत नव्हते  तेव्हाचे होते ... ते गिरगाव चौपाटी आणि फोर्ट मधे सलग तीन दिवसाच्या खर्‍याखुर्‍या पावसात शूट झाले होते ...त्या वेळचे वैशिष्ट्य म्हणजे अमिताभ हा पडेल हीरो म्हणून निर्मात्यांमध्ये अप्रिय होता पण त्या काळातील इतर हिरोइन्सला मात्र  तो जया (भादूरी)ची प्रॉपर्टी आहे हे माहीत असून ही त्यांच्या साठी तो  “ हॉट प्रॉपर्टी” होता...आणि मौसमी सुद्धा त्याला अपवाद नव्हती...ती पण अमिताभवर लट्टू होतीच त्या मुळे  तिचे आणि अमिताभचे सूर सुद्धा  त्या काळी मस्त  जमले होते. 

या गाण्याच्या  शूटिंग तिसर्‍या म्हणजे शेवटच्या दिवशी ते जवळपास संपत आले असताना दुपारच्या लंचब्रेक मधे मौसमी दिग्दर्शक बासू चटर्जी जवळ बोलली कि , “हे इतके मस्त जमून आलेले प्रेमगीत पडद्यावर हीरो-हिरोईन गाताहेत असं तुम्ही दाखवणार आहात पण केवळ हात हातात घेण्या पलीकडे त्यांच्यात असणारी जवळीक पडद्यावर  व्यक्त होतांना दिसत नाहीये .. त्या मुळे त्यांच्यातील प्रेम दाखवण्या साठी गाण्यात अमिताभने मला किमान उचलून घेतलय एवढं तरी तुम्ही दाखवाच... मला ते  या गाण्यात  हवय ... तिने जणू हट्टच धरला .....

आता बासूची पंचाईत झाली ..कारण एक तर मौसमी पडली सिनेमाची नायिका ... त्यातून तिने स्वतःहून ही केलेली मागणी पण  सिनेमाच्या स्टोरीत मात्र नायक-नायिकेची अशी अंगाची झटा-झटी  अपेक्षित नाही कारण नायक –नायिका एकमेकाला प्रथमच भेटत असल्याने त्यांची इथवर मजल गेलेली दाखवणे हे  गाण्यात दाखवता येत  नव्हते ... पण तिकडे मौसमी तर हटून बसलेली ... या सगळ्या मधली सर्वात महत्वाची गम्मत म्हणजे  इकडे अमिताभला ,म्हणजेच चित्रपटाच्या नायकाला  दिग्दर्शक आणि नायिके मधे काय शिजतय ह्याच्यातील ओ का ठो माहीत नाही ... तो पूर्णपणे अनभिज्ञ ... आणि बासूला  ते  अमिताभ जवळ सुद्धा बोलता येईना... शेवटी त्याने सुवर्ण मध्य साधत गाण्यात अमिताभने मौसमी त्या फोर्ट मधील समुद्र कठड्या वरून चालताना तिला   हात देत व नंतर  वरुन खाली उतरवताना तिला उचलून खाली ठेवले आहे असे  गाण्यात दाखवले व दिग्दर्शक या नात्याने त्याच्या नायिकेचा “हट्ट” पूर्ण केला ... गाण्यात तो प्रसंग साधारण पावणे दोनव्या मिनिटाला येतो...आणि तो जसा घडला तसाच ठेवलाय....  पहा तर मग...

मला माहितीये ,हे गाणे तुम्ही आजवर बर्‍याचदा ऐकले आणि बघितले आहे पण आता त्या अमिताभने मौसमीला “उचलून घेतलेल्या” शॉट साठी तुम्ही ते आत्ता परत पहाणार ...

आजच्या लेखासाठी अनिता पाध्ये यांच्या "यही है जिंदगी" या पुस्तकाचा संदर्भ घेतला आहे... हिंदी सिनेमाची आवड असणाऱ्यांनी एकवार जरूर वाचून संग्रही ठेवावे असे मराठी पुस्तक... धन्यवाद पाध्ये मॅडम ...  

मंगळवार, २४ एप्रिल, २०१८

पू S S रे पचास हजार !!! हीच याची ओळख ...


न्यूयॉर्कच्या विमानतळावरील एका अमेरिकन इमिग्रेशन ऑफिसरने मागे एकदा जेव्हा “शोले” मधील   “सांबा “ म्हणून मॅकमोहनला ,त्याचा पासपोर्ट न बघताच लगेच ओळखले होते  तेव्हा त्याच्या बायकोचा म्हणजेच  “मिनी”चा ऊर अभिमानाने नक्कीच भरून आला असणार यात शंका नाही... पण त्या मागची खरी कहाणी काही वेगळीच होती...      
पू S S रे  पचास हजार !!! या शोलेतल्या केवळ तीन शब्दांनी ज्याची “सांबा” म्हणून  जगभर ओळख निर्माण झाली  त्या  शोलेच्या शूटिंगसाठी  मॅकमोहनने  मुंबई- बंगलोर च्या तब्बल २७ वार्‍या केल्या होत्या ...त्या काळी एका मल्टी स्टारकास्ट फिल्म मध्ये मोठा रोल मिळाला म्हणून तो बेहद्द खुश होता ... शोले मधल्या त्याच्या रोलवर त्याचे करियर खूप काही अवलंबून असल्याची त्याला पूर्ण जाणीव होती ... पिक्चर रिलीज व्हायची तो सुद्धा वाटच बघत होता , पण पिक्चर वाजवी पेक्षा खूपच मोठा झाल्याने सांबाच्या रोलला ,रमेश सिप्पीला नाइलाजाने कात्री लावणे भाग पडले...पण हे मॅकला तो पिक्चर बघितल्यावरच समजले आणि त्या मुळेच  १९७५-७६ साली मिनर्व्हा मधून शोलेचा प्रिमियर पाहून बाहेर पडतांना मॅकमोहन प्रचंड नाराज आणि निराश झाला होता...रमेश सिप्पी त्याची नाराजी जाणून होता आणि त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न करत होता पण..... तो त्या वेळी कुणाचे ,काहीच ऐकून घ्यायच्या मनःस्थितीत नव्हता .... पण त्या पू S S रे  पचास हजार !!! या ३ शब्दांनी नंतर  त्याचे उभे आयुष्य बदलून गेले... सांबा हीच  त्याची पुढील आयुष्यात ओळख बनली....  व तो भारतीय प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहिला ...      

पूर्वी  एकदा मॅकमोहन सहकुटुंब पुण्यात आला असता ,कुठूनशी तो अमुक-अमुक हॉटेलमध्ये उतरलाय अशी लोकांना खबर लागली... बघता-बघता हॉटेल बाहेर इतकी गर्दी जमली की, सांबा-सांबा अशा आरोळ्यांनी परिसर दुमदुमून गेला... शेवटी पोलिसांना बोलावून त्या गर्दीतून सांबाला व त्याच्या कुटुंबियांना बाहेर काढतांना नाकात दम आले ... शोलेच्या रिलीज नंतर इतक्या वर्षांनी सुद्धा मॅक मोहनची त्या छोट्याश्या रोल मधील इतकी प्रसिद्धी बघून त्याचे कुटुंबिय तेव्हा प्रचंड आश्चर्यचकीत झाली होते...

आज २४ एप्रिल हा मॅक मोहनचा जन्मदिवस .. तो आज जर असता तर त्याने ८१ व्या वर्षात आज पदार्पण केले असते... पण २०१० साली फुफ्फुसच्या कॅन्सरने  तो गेला.... १९३८ साली तेव्हाच्या अखंड भारतात तो कराची मध्ये एका मिलिटरी ऑफिसरच्या घरात जन्माला आला.भारत स्वतंत्र झाल्यावर प्रथम त्याचे कुटुंबीय लखनौला व नंतर मुंबईत येऊन स्थिरावले... मॅक मोहन सिनेमा क्षेत्रात तसं म्हणल तर अपघाताने आला कारण बर्‍याच जणांना हे माहीत नाही की, मॅक हा एक उत्कृष्ट क्रिकेटियर होता व त्याला क्रिकेट मध्ये करियर करण्यात रस होता.. पण मेव्हणा रवी टंडन    चित्रपट क्षेत्रात असल्याने त्याने सुद्धा ऍडिशनल नॉलेज अधिक थोडीफार आवड या नात्याने  अभिनयाचे रीतसर प्रशिक्षण घेतले व प्रथम अमिताभ-प्राण सोबत मजबूर मध्ये “प्रकाश” ची  व नंतर शोले मधली सांबाची भूमिका केली आणि पुढे त्याचे क्रिकेट चे  क्षेत्रच बदलून गेले. नव्वदी च्या दशकातील रविना टंडनचा तो नात्याने मामा लागत होता...

मॅक मोहन हिन्दी सिनेमा क्षेत्रातील अशा अभिनेत्यात मोडायचा की ज्याचे इंग्रजी भाषेवर अतिशय उत्तम प्रभुत्व होते... तो इंग्रजी अतिशय अस्खलित बोलू आणि लिहू शकत असे... रीडर्स डायजेस्ट हे त्या काळातील बुद्धिजीवी वर्गाचे मासिक त्याचे सर्वात आवडते मासिक होते... त्याच्या कुटुंबियांच्या मते म्हणे मॅकचा “ड्रेस सेन्स “ पुष्कळ चांगला होता  ...तो त्याचे कपडे अमेरिकेतील  लॉस एंजल्स किंवा मुंबईतील “कचीन्स” मधील “माधव” या त्याच्या ठरलेल्या शिंप्या कडूनच शिवत असे ...    त्याच्या खाजगी आयुष्या बद्दल सांगायचे तर त्याच्या तरुणपणी  त्याचे नाव बराच काळ गीता (सिद्धार्थ काक)  बरोबर जोडले जायचे ... ही गीता सिद्धार्थ म्हणजे तीच जी शोले मध्ये ठाकुर झालेल्या संजीव कुमारची थोरली सून म्हणून दाखवली गेली होती ती... पण त्यांचे लग्न झाले नाही... तिने नंतर “सुरभि” वाल्या सिद्धार्थ काक बरोबर लग्न केले आणि मॅक मोहनची लग्न गाठ जुहू मधील आयुर्वेदिक आरोग्य निधी हॉस्पिटल मधील  आयुर्वेदिक डॉक्टर असलेल्या डॉ. मिनी सोबत जमून गेली.... मॅकचे वडील त्यांच्या वार्धक्यात  ती काम करत असलेल्या हॉस्पिटल मध्ये   अॅडमिट असताना योगायोगाने मॅकचे आणि तिचे सूर जमून आले होते...व त्याचे “निदान” लग्नात झाले...    

एक यशस्वी संसार असे मॅकच्या संसाराचे थोडक्यात वर्णन करता येईल... त्याच्या दोन्ही मुली व मुलगा आज हिन्दी सिनेमात वेगवेगळ्या क्षेत्रात आपापला ठसा उमटवुन कार्यरत आहेत.... तर असा हा मॅक मोहन .... सिनेमात वरवर रफ अँड टफ ... टपोरी .. दिसणारा ,भासणारा....   पण वास्तवते मध्ये अतिशय बुद्धीमान आणि निराळा असणारा.... थोडक्यात काय तर दिसतं तसं नसतं हेच खरं....  वुई मिस यू  मॅक ...
आजच्या लेखासाठी साठी संदर्भ.. Actor Mac Mohan: Cricketer who became Sambha in Sholay आणि इंटरनेट ...                         
Read more at: http://www.merinews.com/article/actor-mac-mohan-cricketer-who-became-sambha-in-sholay/15884493.shtml&cp