भोज्जा

रविवार, २५ मार्च, २०१८

*तो* मोक्याचा क्षण



तिरंदाजीच्या असंख्य स्पर्धा जिंकल्या मुळे त्याचा अभिमान वाटण्या ऐवजी  गर्व असणाऱ्या एका तरुण तिरंदाजाने एका झेन तत्ववादी वयस्कर तिरंदाजास एकदिवस त्याच्या सोबत तिरंदाजीच्या स्पर्धेचे थेट आव्हान दिले.

असंख्य स्पर्धा जिंकलेल्या त्या तरुण तिरंदाजाचे नेमबाजीतील कौशल्य वादातीत होते ह्यात शंकाच नाही. कारण त्याने त्याच्या पहिल्याच बाणाने दूर झाडावर बसलेल्या एका पक्षाच्या डोळ्याचा नेमका वेध घेतला, .... आणि दुसऱ्या बाणाने त्या पहिल्या सोडलेल्या बाणाचे दोन तुकडे करून, छाती थोडी पुढे काढत त्याच्या हातातील ते धनुष्य त्या वयस्कर तिरंदाजांच्या हातात देत ....

" हं ! आता तुमची पाळी",बघा तुम्हांला जमतंय का ते  ?

असे म्हणत धनुष्य वयस्कर माणसा समोर ठेवले.

म्हाताऱ्याने त्याच्याकडे बघितले आणि अतिशय अविचल रहात,धनुष्याला हात सुद्धा न लावता फक्त त्या तरुण तिरंदाजाला नजरेने त्याच्या मागून यायला सांगितले आणि तो    शेजारचा उंच डोंगर चढायला लागला.

तो तरुण तिरंदाज चकित होत त्याच्या मागून चालायला लागला.तो उंचच -उंच डोंगर चढताना त्याची थोडी दमछाक होत होती, पण हा  म्हातारा आता काय करणार हि उत्सुकता त्याला म्हाताऱ्याबरोबर झप-झप पावलं उचलायला भाग पाडत होती.

थोड्याच वेळात दोघे त्या पर्वताच्या सर्वात उंच टोकावर एका दरी पाशी पोहोचले. तेथे पाहता  खाली खोल खाई नि त्या वर केवळ एक झाडाचा  कुजलेला ओंडका  पुलासारखा त्या दरीत लोम्बकळलेला त्या तरुण तिरंदाजाने बघितला, नि आता मात्र त्याची उत्सुकता शिगेस पोहोचली.

म्हातारा पुढे सरसावला…….अतिशय सावधतेने तोल सांभाळत दरीत लोम्बकळणाऱ्या त्या ओंडक्याकर म्हातारा बघता-बघता  मध्यभागी पोहोचला. खाली खोल खाई, कुजलेला तो ओंडका ... कोणत्याही क्षणी दरीत कोसळण्याची शक्यता असलेला...

म्हाताऱ्याने  तोल सांभाळत शांतपणे स्वतःच्या पाठीवरचे धनुष्य काढत त्याची प्रत्यंचा खेचली नि दरीच्या पलीकडच्या एका उंच झाडावर नेम धरला,नि क्षणात त्या दूरवरच्या झाडाचा अचूक वेध घेतला.

आणि…….

"आता तुझी पाळी "

असं म्हणत तो सावधपणे पक्क्या जमिनीवर स्थिरावला.

आता मात्र तो तरुण थोडा गांगरला .इतक्या धोकादायक परिस्थितीत हे आव्हान स्वीकारायच्या कल्पनेनेच तो तरुण जागेवर खिळला. मग आव्हान स्वीकारायचा तर प्रश्नच नव्हता.
म्हाताऱ्याला त्याची अडचण लक्षात आली त्याने थोडा दीर्घ श्वास घेत त्याला फक्त एवढेच सांगितले ....

" तुझे नेमबाजीतील कौशल्य वादातीत आहे यांत शंकाच नाही,पण मोक्याच्या क्षणी तू  तुझ्या  मनावरील नियंत्रण गमावून बसलास, आणि  हाच जेत्या मधील आणि पराभूत माणसातील फरक आहे आणि  ज्या दिवशी तू ही परीक्षा उत्तीर्ण होशील त्या दिवसापासून  तू आयुष्य खऱ्या अर्थाने जगायला सुरवात करशील.
*********************************************************************************    
ही झेन तत्वज्ञानातील कथा वाचल्यावर आता ज्याने त्याने स्वतःचे स्वतःला  खालील प्रश्नाचे उत्तर द्यावे कि ,  : *आपल्या आयुष्यातल्या मोक्याच्या क्षणी आपण  स्वतःला कधी असे तपासून बघितले आहे का ?* 

सहकार्य : इंटरनेट वरील Mind over Matter या झेन तत्वज्ञानातातील कथेचा स्वैरानुवाद ... धन्यवाद 



शनिवार, २४ मार्च, २०१८

एकदा कां कानफाट्या नाव पडले कि, पडले : अर्थात इम्रान हाश्मी

कोणाच्या कपाळावर कधी केस उगवतील काही सांगता येत नाही. म्हणजेच एखाद्याचं नशीब कुणामुळे,कशामुळे आणि कधी फळफळेल ते काही सांगता येत नाही... थोडक्यात काय तर नशिबाची सुद्धा एक गंमतच असते,.... आता हेच बघा नां ,याच्या काकानं त्याला त्या मल्लिका शेरावतच्या समोर मर्डर मधे उभा तो काय केला, ते ४-६ किसिंग सीन ते काय टाकले ? नि पिक्चर तुफान चाललं ते काय ? सगळंच अवघड .... आता लक्षात आलं ?  मी कोणाबद्दल बोलतोय ते ? बरोब्बर  मी त्या इम्रान हाश्मी बद्दलच  बोलतोय.ज्याचा आज  २४ मार्च हा जन्मदिवस आहे.त्या मुळे त्याला सर्वप्रथम शुभेच्छा ... हो !आधीच देतो....  कारण  नंतर-नंतर म्हणत परत  राहून जायला नको.  

याची बॅकग्राउंड शोधायचा एक अपयशी प्रयत्न केला पण तो सोडून दिला ... कारण याची आई ख्रिश्चन ,वडील मुस्लिम नि काका हिंदू ... सगळंच कोड्यात टाकणारं ...डोक्याचा गुंता करणारं ,त्या मुळे तो नाद सोडला पण हा महेश भटचा पुतण्या , फक्त एवढं  इथे महत्वाचे.

२००२ च्या राज सिनेमाचा असिस्टंट डायरेक्टर ते फुटपाथ नावाच्या एका  पडेल चित्रपटाचा हिरो म्हणून याची हिंदी सिनेमात कारकीर्द सुरु झाली पण फेल गेली ... त्या नंतर मात्र महेश भटने याला घेऊन  २००३-४ ला भिगे होठ तेरे फेम "मर्डर" काढला नि याचं नशीब फळफळलं. 

२००९च्या मोहित सुरीच्या राझ पर्यंत सगळं आलबेल होतं पण २००९ला हा एका भलत्याच प्रकरणामुळे चर्चेत आला.....झालं असं कि, यानं तेव्हा बांद्रयात एका उच्च्भ्रू सोसायटीत एक फ्लॅट घेतला नि त्याची एन ओ सी मिळायला त्याला वेळ लागला......झालं याने थेट अल्पसंख्यांक आयोगाकडे धाव घेत "मी मुस्लिम असल्याने मला नाकारले जात असल्याची" ओरड करत मीडियामध्ये जाऊन गोंधळ माजवला.

नेहमीप्रमाणे   .... याचा काका महेश भट लगेच त्याच्या बाजूनं उभा राहिला.... पण सिनेसृष्टीतल्या शाहरुख खानने  मात्र "मला कधी असा अनुभव आला नाही,हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत अनुभव असू शकतो"  असे सांगत व सलमान खानने "लोक आपल्याशी असे कां  वागताहेत याचा प्रथम स्वतःच्या वर्तणुकी कडे लक्ष देत विचार करावा. विनाकारण धर्म -जात वगैरे मधे आणून लोंकांची फुकटची सहानुभूती मिळवायचा प्रयत्न करू नये". असे सुनावले. 

त्याला अर्थातच  हे सुनवायला पडद्या मागचं अजून हे ही एक कारण असावं कि,२००९ पर्यंत , तसाही हा ऍग्रेसिव्ह लव्हर बॉयच्या इमेज मधे सिनेमातून फिट होत चालला होता नि सलमान -शाहरुखला सुद्धा हा थ्रेटच  होत होता,त्या मुळे त्या दोघांनी सुद्धा या आल्या संधीचा फायदा उठवत पाहुण्याच्या काठीने साप मारायची संधी साधली.शाहरुख-सलमान याच्या सोबत नाही म्हणल्यावर विषयच संपला... बांद्र्यातला त्याचा फ्लॅट झाला पण इंडस्ट्रीत मात्र त्याच्या करियरला ब्रेक लागला. असो... 

नेहमी मी अशी कथा संपल्यावर त्या दिवसाच्या त्या उत्सवमूर्तीच्या गाण्याचा -एखाद्या सीनचा  व्हिडीओ वगैरे टाकतो पण आज त्याला फाटा देणार कारण आज मोबाईल साथ देत नाहीये. त्या मुळे त्या ऐवजी आज या कहाणीतून बोध देणार आहे. 

बोध : आयुष्यात तुम्ही यशस्वी व्हायला सुरवात झाली कि,प्रथम ते यश पचवायला शिका . लगेच उडायला लागू नका कारण तुमचे पंख कापायला ल *य*  जणं टपलेले असतात,कारण *त्यांच्या* आकाशातील एक जागा बळकावत तुम्ही त्यांना अडचण होत असता...      

दुर्बोध : वास्तवते मधे फक्त वय-वर्षे ३ ते ५ पर्यंतच छान दिसणारी पण ते लक्षात न घेता मुलीं मधे व स्वतःला अजून मुलीच समजणाऱ्या महिलां मधे प्रचंड लोकप्रिय असणारी  पाऊट ची नेहमीच  विचित्र आणि ओंगळवाणी दिसणारी फोटो-पोज म्हणजेच चंबू पोझ  इम्रान हाश्मीच्या पडद्यावरच्या येडचाळ्यां मुळे रूढ झाली अशी जाणकारांची माहिती आहे.... त्या मुळे ती शक्यतो टाळा ... ती सरसकट सगळ्यांना जमत पण नाही आणि शोभत पण नाही.... बऱ्याच जणींच्या हे लक्षात येत नाही पण त्यांचा तो फोटो लोकं बारकाईनं,छान आला म्हणून न बघता ही म्हातारपणी कशी दिसेल याचा अंदाज बांधत वेळ घेत असतात .....       

शनिवार, १७ मार्च, २०१८

संगीताचा गुलाम आणि गुलामचं संगीत

१९७३ च्या फिल्मफेयर अॅवाॅर्ड नाईट मध्ये स्टेजवर अचानक एक बाका प्रसंग उद्भवला.मनोजकुमारच्या ”बेईमान” या त्या वर्षीच्या ७ फिल्मफेयर अॅवाॅर्ड जिंकलेल्या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचं पारितोषिक "प्राण" या बुजुर्ग अभिनेत्याला  जाहीर झालं आणि प्राणने ते स्टेजवर जात स्वीकारायचं मात्र नाकारलं.

त्या मागचं कारण मात्र जेव्हां त्यानं सांगितलं तेव्हा उपस्थितांमधील  १०० पैकी १०० जणांची त्याला मनापासून मान्यता होती पण फक्त प्रायोजकांची त्याला मान्यता नव्हती.प्राणने त्या मागचे कारण देतांना त्या वर्षीचे संगीताचे फिल्मफेयर अॅवॉर्डचे खरे मानकरी त्याच्या मते पैगंबरवासी गुलाम मोहम्मद होते आणि ते सुद्धा त्यांच्या  निधनानंतर ४ वर्षांनी प्रदर्शित झालेल्या  “पाकीजा “ च्या  त्यांच्या ऑल टाईम ग्रेट म्युझिक साठी.

खरं तर प्राणचा आणि "पाकीजा" चा काडीचा संबंध नव्हता पण त्याने अभिनय केलेला व त्या वर्षीचा हिट सिनेमा असलेल्या “बेईमान”च्या शंकर जयकिशन च्या तद्दन सामान्य संगीता पेक्षा पाकीजाचे म्युझिक कैक पटीने उजवे होते यात शंकाच  नाही.आणि म्हणूनच प्राणने त्याचा विरोध करत  त्याचे ते तेव्हाचे पारितोषिक नाकारले.प्राणची ती कृती किती योग्य होती हे  आज २०१८ मधे म्हणजेच पाकीजाच्या ४२ वर्षा नंतर सुद्धा लक्षात येते कारण पाकीझाचे संगीत तरुण पिढीला आजही भावते नि बेईमान नावाचा एक ७ फिल्मफेयर अॅवाॅर्ड विनर सिनेमा येऊन गेला होता हे माहित देखील नाही यातच सगळे आले. तेव्हाच्या एच.एम.व्ही.ला म्हणजेच आत्ताच्या सारेगामाला १९९७ साली ते पाकीजा़चे म्युझिक पुनः प्रदर्शित करावे लागले यातच सगळे आले. 

या पाकीजाच्या वेळच्या घटना आठवायचं आज कारण म्हणजे त्याचे संगीतकार गुलाम मोहम्मद ज्यांचा आज १७ मार्च २०१८ हा बरोब्बर ५० वा स्मृतिदिन आहे. १९०३ मध्ये जन्मलेले गुलामजी हिंदी सिनेमात त्यांच्या उमेदीच्या काळात उत्कृष्ट तबलजी व ढोलक वादक म्हणून प्रसिद्ध होते.राजकपूरच्या गाजलेल्या बरसात मधील “बरसात में ताक धीं ना धीं " त्यांनीच वाजवलंय...उमेदीच्या काळात आपल्यापेक्षा १४-१५ वर्षांनी लहान असणाऱ्या नौशाद यांचा सहाय्यक म्हणून त्यांनी आपली कारकीर्द सुरु केली आणि १९४८ ते १९५५ वर्षाला प्रत्येकी तीन या प्रमाणे चित्रपटांचे स्वतंत्र यशस्वी संगीत दिग्दर्शक अशी ८ वर्षे त्यांची प्रमुख कारकीर्द झाली. पण १९५५ नंतर व खास करून १९५७-५८ च्या पाकीजाच्या निर्मितीच्या सुरवातीच्या काळा नंतर त्यांच्या कारकीर्दीला जे ग्रहण लागले ते लागलेच.खरे तर कारण कोणतेच नाही पण गुलामजी त्यांत भरडून निघाले आणि पाकिजा अर्धवट असतांना १९६८ सालीच ते अल्लाला प्यारे झाले.पाकीजाचे नंतरचे त्यांचे राहिलेले थोडे संगीत नौशाद यांनी त्यांच्यावरील प्रेमाला जागून पुरे केले.

हा पाकिजा त्या काळी त्या सिनेमाशी संबंधित असणाऱ्या बऱ्याच जणांच्या आयुष्याशी खेळून गेला,धूळधाण उडवून गेला.मुळात पाकीजाची निर्मिती जवळपास पंधरा वर्षे सुरु होती.निर्माता दिग्दर्शक आणि सिनेमातील नायिका मीनाकुमारी हिचा खाजगी जीवनात  पती असलेला कमाल अमरोही हा म्हटलं तर तसा सणकीच होता.या सिनेमासाठी त्याने वारेमाप खर्च करून लावलेले लंबे चौडे सेट्स, चित्रपट पूर्ण होण्यास लागलेला वेळ ,मीनाचे दारूच्या आहारी जात तिच्या तब्येतीची उडालेली धूळधाण ,सिनेमाचा संगीतकार गुलाम मोहम्मद आणि त्याचे कॅमेरामन जोसेफ विरस्चींग यांचे निधन आणि सर्वात महत्वाचे  म्हणजे फायनान्सर लोकांचा अमरोही वरील पूर्ण उडालेला विश्वास या अशा वातावरणात १९७२च्या फेब्रुवारीत पाकीझा रिलीज झाला.

पाकीझाच्या निर्मितीच्या काळातले संगीत आणि तो पूर्ण होतानाचा आर .डी.बर्मनच्या काळातील बदललेले संगीत या मुळे चित्रपट संगीताची  व्याख्या पूर्णपणे बदलली होती.त्या मुळे पाकिजा रिलीज व्हायच्या अगोदर त्याचे संगीत जरी रेडीओ वर हिट होउन  वाजत होते तरी त्या काळी फक्त चित्रपटातील हिट संगीत चित्रपट चालायला पुरेसे नसायचे.त्या मुळे पाकीजाचे पडद्यावर स्वागत मात्र अतिशय थंड झाले.पहिल्या दोन चार आठवड्यात तर प्रचंड खर्चिक अशा ऑल टाईम सुपर फ्लॉप मध्ये त्याची नोंद होतच  होती  तेवढ्यात कथेत एक मोठा  ट्वीस्ट आला नि ३१ मार्च १९७२ ला म्हणजे चित्रपट रिलीज झाल्यावर त्याच्या दुसऱ्याच महिन्यात मीनाकुमारी गेली.झाले ... मीनाकुमारी प्रती प्रेक्षकांचा असणारा स्नेह ,आणि सहानुभूतीच्या लाटेने प्रेक्षक मीनाकुमारीची पाकीझातील तिची शेवटची अदाकारी बघायला सिनेमा थेटरात खेचले गेले आणि नंतर चित्रपटाने दैदिप्यमान यश संपादन केले.

पण वाईटात कां होईना एक बरे झाले कि, त्या मुळे १९४० ते १९७० च्या हिंदी सिनेमाच्या संगीताच्या सुवर्णयुगातील संगीतातील तारा पै.गुलाम मोहम्मद हे पाकीजाच्या रूपाने लोकांनी त्या काळी अनुभवले.

आजचे गुलामजींचे त्याच पाकीझा मधील प्रचंड गाजलेले गाणे या निमित्ताने 👇

मंगळवार, १३ मार्च, २०१८

नासिरभाई ! अल्लाह आपको सलामत रखे !

तुम्हांला मायकेल बेव्हन आठवतोय ? ...
बघा ! हा कोण होता ? इथपासून तुमची सुरवात झाली ... अहो ! हा आत्ता –आत्ता १२-१५ वर्षापूर्वी रिटायर झालेला ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू ! विसरलात नां तुम्ही ?... अहो ! त्यां लोकांच्या क्रिकेट इतिहासात हा बऱ्यापैकी मोठा समजला जातो...कारण वन डे मध्ये पाचव्या सहाव्या किंवा वेळप्रसंगी सातव्या नंबरला येऊन सुद्धा यान त्यांच्या कित्येक गेलेल्या मॅचेस काढून दिल्या आहेत.... बघितलं नां ? आपली मेमरी आपल्याला कसा धोका देते ते ?... असंच होत आपलं ... त्यात नवीन काही नाही...

हे आज सांगायचं कारण म्हणजे आज १३ मार्चला आज पासून १६ वर्षापूर्वी गेलेल्या नासीर हुसेनच देखील तेच झालंय  ...नासीरच  वैशिष्ट्य म्हणाल तर आयुष्यभर लोकांना त्याचे यशाचे सिक्रेट समजून देखील ....म्हणजेच ...एकाच कथेवर त्याच-त्याच पठडीतले तेच-तेच नियमित सिनेमे काढत राहून देखील , लोकांच्या डोक्याला बिलकुल ताप न देता त्यानं अतिशय उत्तमोत्तम संगीताचे सिनेमे दिले आणि ते प्रचंड चालले सुद्धा ..... लोकं त्याचे  हे सर्व सिक्रेट जाणून होते तरी त्याच्या प्रत्येक सिनेमाला ते  हुं म्हणून गर्दी करायचे,जणू प्रत्येकवेळी आपण काही तरी नवीन पहातोय या भावनेने , पण एवढं असून देखील   त्याचा संगीताचा कान आणि सेन्स किंवा  सिनेमा या माध्यमा वरची   पकड ही इक्विवॅलेंट टू राजकपूर होती  असं त्याला त्याच्या उभ्या हयातीत कधी कुणी म्हणल नाही... हे त्याला तेव्हा कुणी म्हणल नाही तर  त्या मुळे तो गेल्यावर तर त्याला कोण लक्षात ठेवणार ?...

पण नाही ! त्याला आम्ही लक्षात ठेवलंय महाराजा ! कारण त्याच्या वरच्या  नि त्या वेळच्या  अशाच काही जणांच्या वरच्या केवळ निस्सीम प्रेमापोटी त्यांचे  सिनेमे कॉलेजेस् बंक करून बघयला मिळावेत या साठी आम्ही आमच्या कॉलेजची तेव्हाची ३ वर्षाची शिक्षण ५-५ वर्ष लांबवली आहेत.आज तुम्हांला हा थोडा आगावू पणा वाटेल पण या रूपाने आमच्या पिढीने जणू या लोकांना त्यांच्या जिवंतपणीच श्रद्धांजली वाहिली आहे.  

त्या मुळेच आज त्या नसीर हुसेनची आठवण त्याच्या सोळाव्या स्मृतीदिनी पुन्हा एकदा त्याच्या १९७६च्या   एका गाजलेल्या सिनेमातील एव्हर ग्रीन गाण्यातून करून देताना एक वेगळा आनंद होत  आहे. 

बाय द वे , हे गाणं बघतांना मला एक सहजच  कवी कल्पना सुचली ती ही सांगून टाकतो कारण हे गाणे नीतू सिंगवर गेस्ट अार्टिस्ट म्हणून चित्रित झालंय जी आज २०१८ मधे सुद्धा अतिशय सरळ साधी नि निरागस दिसते आणि आहे ... पण पुढे-मागे त्या रणबीर कपूरचे लग्न झाल्यावर,त्याची बायको म्हणजेच नीतूसिंग ची सून  आणि नितूचे न जाणो  काही एक कारणाने जर कधी काळी त्यांच्या घरातल्या-घरात वाजले तर नितू तिला तिचं हे गाणं दाखवून क्षणात चूप करू शकेल नि म्हणेल “बाई ,तुला मी काय होते ते माहित नाही ! आली मोठी शहाणी...! लागली  मला अक्कल शिकवायला !!!!! आधी हे बघ ! म्हणजे तुला कळेल मी काय चीज होते ते !!!! .... माझ्या पुढे फार हुशारी करू नकोस 😜

असो...बास ... आता गाणं बघा !
👇👍

बुधवार, ७ मार्च, २०१८

संगीतकार कल्याणजीं मधील आनंदजी

मध्यंतरीची  २ फेब्रुवारी म्हणजे होळी आणि त्या बरोबरच संगीतकार कल्याणजी-आनंदजी जोडगोळीतील आनंदजी यांचा तेव्हां वाढदिवस होता.ते त्या दिवशी  ८४ वर्षांचे झाले.तरुण पिढीला ते माहित आहेत ते त्यांच्या डॉन मधल्या “ ये मेरा दिल,प्यार का दिवाना" आणि मै  हूं मै हूं मैं हूं  डॉन  मुळे.पण वास्तवता अशी आहे कि,त्यांनी डॉनच्या अगोदर आणि नंतर सुध्दा असंख्य सुश्राव्य गाणी  आज वर केलेली आहेत. 

कच्छ गुजरातमधल्या एका ग्रोसरी,किराणामाल दुकानदाराचा कल्याणजी हा मोठा मुलगा आणि धाकटा मुलगा आनंदजी हि गुजराथी मुले.त्यांचे वडील कच्छ मधून धंद्यात नशीब काढायला मुंबईत आले आणि थेट गिरगाव मधल्या मराठी वस्तीत रमले.दोन्ही भावांचे बालपण नि तारुण्य गिरगाव मध्ये गेल्याने गुजराथी कुटुंबात जन्म घेऊन देखील आनंदजी अतिशय उत्तम मराठी बोलतात.... कदाचित कित्येकांना  हे माहित देखील  नाही.

हिंदी सिनेमा क्षेत्राची नि संगीताची कोणतीही पार्श्वभूमी नसतांना गिरगावातील त्या काळीचे उच्चप्रतीचे सामाजिक,बौद्धिक आणि सांगितीक वातावरण त्यांना संगीताची गोडी लावायला कारणीभूत ठरले.संगीतकार म्हणून १९५४ ते १९९६ या  त्यांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत त्यांनी सर्वप्रकारचे फिल्मी,राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवले आहेत.आणि आजच्या तारखेला एक यशस्वी निवृत्ती जीवन ते अतिशय आनंदाने जगत आहेत. 

आपल्या ४२ वर्षाच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी दिलीपकुमार,अमिताभ,अनिल कपूर,विनोद खन्ना, रेखा ,श्रीदेवी या सारख्या बिनीच्या कलाकारांना घेऊन देशात आणि परदेशात असंख्य सांगीतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून देशातील आणि परदेशातील असंख्य समाजसेवी संस्थांना शब्दशः करोडो रुपयांची रुपयांची देणगी मिळवून दिली आहे.

संगीताप्रती त्यांच्या असलेल्या निष्ठेने  त्यांना फक्त येथेच थांबवले नाही तर त्यांनी नवोदित गायक-गायिकांच्या साठी   स्वतःची सांगीतिक अकादमी सुरु करून तरुण पिढीस त्यांचा संगीतातील प्रवास सुकर होण्यास प्रचंड मदत केली आहे.मार्गदर्शन केले आहे.त्यांनी हिंदी सिनेमात प्रथम ब्रेक  दिलेले गायक गायिकांची यादी तर इतकी भली मोठी आहे कि ती वाचतांना आपण थकतो.

कुमार शानू,अलका याद्निक, साधना सरगम,मनहर उदास,सपना मुखर्जी, उदित नारायण ,सुनिधी चौहान यांचे संगीतातील प्राथमिक शिक्षण आणि गायक-गायिका म्हणून ब्रेक कल्याणजी-आनंदजी यांच्या माध्यमातूनच झाला आहे.भारतीय सिने संगीताच्या सुवर्णयुगातील सर्वच्या सर्व प्रमुख गायकांच्या सोबत त्यांनी २५० हून अधिक सिनेमात असंख्य कर्णमधुर गाणी दिली आहेत.

आजचे त्यांचे कर्णमधुर गाणे शशी कपूर –शर्मिला टागोरच्या “आमने सामने” मधून घेतले आहे.आता या आमने सामने मुळे थोडे विषयांतर होतेय पण तरी सांगतोच ज्याचा कल्याणजी-आनंद्जीं सोबत शून्य संबंध आहे 
.. पण या गाण्यात सुद्धा शशी कपूर त्याच्या कपूर खानदानाच्या “तब्येतीच्या खासियतीला “ जागलाय.ही कपूर मंडळी म्हणजे हिंदी सिनेमातली  एक गम्मतच आहेत. त्यांना यश मिळायला सुरुवात झाली कि ,त्यांची कमरेखाली वाढ व्हायला  सुरवात होते.हे या मंडळींचे वैशिष्टय....या गाण्यात सुद्धा पहा , शशी कपूरच्या खांद्या पेक्षा त्याचं सीटच  जास्त बाहेर आलंय ... आत्ताच्या पिढीतला रणबीर कपूर हे सर्व जाणून आहे कारण त्याला हे माहित आहे कि,आपल्या बापजाद्यांना प्रेक्षकांनी असं सहन केले पण आत्ताची तरुण पिढी मात्र ते खपवून न घेता त्याच्या , त्याच ढुंगणावर लाथ घालेल. 😜

रणबीर कपूरचं सोडा पण या गाण्यात मात्र  त्या “ वाढता-वाढता वाढे ,भेदिले शून्य मंडळा”  अशा शशी कपूरला सहन कराच...प्लीज....  

त्या सोबत दुसरे असे सांगणे कि,शशीकपूर गाण्याच्या काही कडव्यात बूट घातलेला दिसतो  तर  काहीत अनवाणी ? हे कसे ? तर  त्याचे उत्तर  अतिशय सोप्पे आहे ,सिनेमाची नायिका शर्मिला ही सुद्धा संपूर्ण गाण्यात पूर्ण अनवाणी आहे...बहुदा त्या वेळी ती तिच्या  चित्रपटातील आई-बापाला फसवून,त्यांचा डोळा चुकवून  आलेच जाऊन इथे असं सांगून घरातून बाहेर पडली असावी व इकडे दऱ्या खोऱ्यात येऊन गाणी गात बसली असावी... असो... 

...... आता कल्याणजी- आनंद्जींचे ते अप्रतिम गाणे पहा.👇


सोमवार, ५ मार्च, २०१८

टिनू आनंद : अर्थात खुद्द अमिताभचा शहेनशहा

नर्गिसचे आज लग्न झाले” ही  आम्हा दोघां भावातील  गॉसिप-वजा चर्चा माझ्या वडिलांनी ऐकली आणि आपली मुलं “वाया जाणार “ याची त्यांना खात्री पटली ,कारण नंतर आमच्या वडिलांनी त्या बातमीची खातरजमा करायला लगेच त्यांच्या सोर्सेसला फोन केले नि ती गोष्ट खरी आहे हे जेव्हा त्यांना समजले  , त्या नंतर तर आमच्या “वाया जाण्यावर “ शिक्का मोर्तब झाले आणि  त्यांनी दुसऱ्या दिवशी  आमची रवानगी लगेच मुंबईहून  अजमेरच्या मायो कॉलेजच्या बोर्डिंग मध्ये केली .हा किस्सा टिनू आनंद २०१३ साली एका प्रदीर्घ इंटरव्ह्यू मध्ये सांगत होता. 

हा टिनू आनंद म्हणजे राजकपूरच्या जुन्या जमान्यातील त्याचा यशस्वी चित्रपट लेखक,सहकारी  आणि बरेच काही असे बडे प्रस्थ असलेल्या इंदर राज आनंद यांचा थोरला मुलगा आणि पुढे जाऊन अमिताभच्या सुवर्णकाळात त्याचा दिग्दर्शक म्हणून लागोपाठ ३ हिट सिनेमे दिलेला दिग्दर्शक ,अभिनेता ज्याचा आज ५ फेब्रुवारी हा जन्मदिवस. 

अमिताभच्या चित्रपट कारकिर्दीत ,त्याला आयुष्यात प्रथम  प्रत्यक्ष –अप्रत्यक्ष रुपेरी पडदा दाखवायचं संपूर्ण श्रेय सुद्धा फक्त आणि फक्त टिनू आनंदचे आहे हे खुद्द हिंदी चित्रपट सृष्टीत देखील कित्येकांना ठाऊक नाही.अर्थात त्याची सुद्धा एक लंबी कहानी है ,जो छोटी करके इसी पोस्ट में बादमे आनेही वाली है ! तर असो....

टिनू चे वडील इंदर राज आनंद यांनी चित्रपट सृष्टीतील गळेकापू स्पर्धा स्वतः अनुभवली असल्याने आपली मुले या क्षेत्रात येऊ नये अशी त्यांची मनापासून इच्छा होती.पण मॅट्रिक पर्यंत गेल्यावर टिनूने त्याला सिनेमातच दिग्दर्शक म्हणून करियर करायचे आहे हे जेव्हा वडिलांना सांगितले आणि  तो त्याच्या या निर्णय पासून ढळत नाहीये असे जेव्हा इंदर राज यांनी बघितले तेव्हा त्यांनी नाईलाजाने स्वतःचे वजन वापरत टिनूला तीन ऑप्शन दिले.त्या तीन ऑप्शन पैकी त्या वेळी केवळ निर्माता ,दिग्दर्शक के.ए.अब्बास यांच्या सिनेमात एका छोट्याश्या भूमिकेने चित्रपट क्षेत्रात प्रवेश ,सत्यजित रे यांचा सहायक दिग्दर्शक किंवा इटलीतील एका नावाजलेल्या दिग्दर्शकाचा सहाय्यक असे ते ३ ऑप्शन होते. के. ए.अब्बास तेव्हा “सात हिंदुस्थानी”बनवायच्या प्रक्रियेत असल्याने हा  ऑप्शन लगेच अमलांत येण्या सारखा असल्याने टिनूने तो ऑप्शन निवडला....आणि त्याच्या ऑप्शन चॉईस मधील पहिला  चॉइस म्हणजे  “ सत्यजित रे “ यांच्या कडे त्याची सहाय्यक दिग्दर्शक हा ऑप्शन त्याने थोडा बाजूला ठेवला..

पण नियतीच्या मनात तेव्हां काही वेगळेच होते कारण पुढे जाऊन टिनू आयुष्यात यशस्वी चित्रपट दिग्दर्शकच झाला पण सत्यजित रे यांचा सहाय्यक दिग्दर्शक होण्या अगोदर ,हिंदी चित्रपट सृष्टीच्या इतिहासातील एक फार मोठी घटना टिनू आनंदच्या हातून घडून गेली.त्याचे झाले असे कि, वडील इंदर राज आनंद सोबतचे घरगुती संबंध लक्षात घेता अब्बास यांनी  टिनू ची सातवा हिंदुस्थानी म्हणून त्यांच्या सिनेमात निवड तर केली ,पण  याच सात हिंदुस्थानी साठी अब्बास साहेब तेव्हां नवीन नायिकेच्या शोधात पण होते .ऐके दिवशी त्यांनी टिनू ची एक  दिल्ली मधील नीना सिंग हि मैत्रीण टिनू च्या  घरी आलेली    बघितली आणि त्यांनी टिनू ला विचारले कि ,तुझी हि मैत्रीण आपल्या सिनेमात काम करायला तयार आहे कां ? ते तीला विचार . बघ !

टिनू ने तिला विचारले आणि टिनूच्या  प्रस्तावाला  होकार देत नीना सिंग तयार सुद्धा झाली पण नुसती तयार नाही झाली तर  तिने तिच्या कलकत्त्यातील बर्ड अॅंड कंपनी मधील एक मित्र जो सिनेमात अभिनय करू इच्छितो त्या मित्राचा फोटो पण टिनू ला दिला व याला पण एखादा छोटासा रोल देता येईल का म्हणून टिनू कडे  विचारणा केली.

 इकडे सगळ्या या घटना घडत असतांना एके दिवशी अचानक टिनू ला सत्यजित राय यांनी सहायक दिग्दर्शक म्हणून त्यांच्या कडे बोलावले आणि दिग्दर्शन हा टिनू चा पहिला चॉइस असल्याने त्याने के.ए.अब्बासचा सात हिंदुस्थानी सोडायचा निर्णय घेतला. टिनू ने हि गोष्ट अब्बास यांच्या कानावर घातली. सोबत आता चित्रपटाची नवीन नायिका झालेल्या नीना सिंगच्या मित्राची गोष्टपण त्यांना सांगितली व विचारणा केली कि,आता मी सातव्या हिंदुस्थानीचा  रोल करत नाहीये नि अनायसे नीना ने तिचा मित्र काम मागतोय हे आपल्याला सांगितलंय तर त्याला मी इकडे मुंबईला बोलावून घेऊ का ?.. अब्बासने क्षणभर विचार केला नि सांगितले कि,हरकत नाही ,पण त्याला स्पष्ट शब्दात ही  कल्पना दे कि, त्याने त्याच्या खर्चाने येथे यायचे आहे,जायचे आहे ,रहायचे  आहे आणि त्याची फक्त ऑडिशन घेतली जाईल.त्या ऑडिशनला   ८ दिवस लागतील नाही तर १५ दिवस लागतील.आत्ता सांगता येत नाही आणि त्यातून त्याची जर निवड झाली तर पुढचे पुढे पाहू. 

 टिनूच्या सांगण्यावरून नीना सिंगने तिचा तो कलकत्त्याचा मित्र मुंबईत बोलावून घेतला आणि टिनू ने  त्याला  त्या नंतरच्या एका दिवशीच्या संध्याकाळी अब्बासच्या समोर उभा केला.त्या दिवशी  तो अब्बासच्या समोर टिनू ने उभा केलेला उमेदवार दुसरा तिसरा कुणी नव्हता तर तो खुद्द अमिताभ बच्चन होता ,ज्याने पुढे चित्रपट सृष्टीत स्वतःच्या नावाचा इतिहास रचला.

त्या दिवशी मात्र अमिताभची भेट अब्बास सोबत झाल्या नंतर अब्बासने टिनू ला ऑफिसमध्ये बोलावून घेत आता  त्याच्यावर एक पुढची कामगिरी सोपवली.अब्बासने टिनू ला सांगितले कि, त्या सकाळच्या पोराला आपण सातवा हिंदुस्थानी म्हणून घेऊ पण त्याला संपूर्ण सिनेमासाठी फक्त ५ हजार रुपये इतकाच मोबदला देण्यात येईल आणि सिनेमा बनायला वर्ष लागो नाहीतर ५ वर्ष लागो त्यात काडीचा बदल होणार नाही आणि हे सगळे त्याला तू आधीच सांगायचे आहे.... बघ तो तयार असेल तर त्याला घेऊ.

अब्बासचा प्रस्ताव नंतर संध्याकाळी टिनूने अमिताभच्या कानावर घातला.प्रस्ताव ऐकून त्या वेळी अमिताभचा धाकटा भाऊ अजिताभ ,जो त्या वेळी अमिताभ सोबत होता  तो तर   अतिशय खट्टू झाला.पण अमिताभ मात्र त्या सिनेमात काम करायला इतका उत्सुक होता कि,त्याने तो प्रस्ताव स्वीकारायचे ठरविले व त्यास मान्यता दिली. अशा तऱ्हेने टिनूच्या त्या सिनेमातील रोल नाकारण्याने अमिताभचा चित्रपट सृष्टीतील प्रवेश सुकर झाला नि सुरु झाला. पण हि कथा एवढ्यावरच संपत नाही.

गोवा मुक्ती संग्रामाची पार्श्वभूमी लाभलेल्या सात हिंदुस्तानीचे पहिले शूटिंग शेड्युल गोव्यात लागले नि पूर्ण झाले.शूटिंग नंतर जो तो विखुरला नि काही दिवसांनी पुन्हा दुसऱ्या शेड्युल साठी सगळ्यांना बोलावणे गेले पण चित्रपटाची नायिका नीना सिंग ही पहिल्या शेड्युल नंतर  दिल्लीला  जी गेली ती गेलीच.गायबच झाली....पुन्हा म्हणून कधी ती आलीच नाही.झालं चित्रपटाची  नायिका शोधण्यापासून पुन्हा सुरवात झाली..... थोडक्यात काय तर अमिताभला जिच्या रेकमेंडेशन मुळे या सिनेमात बोलावले गेले ती नीना सिंग आणि ज्या टिनू आनंदच्या या सिनेमातून  जाण्याने त्याला हा रोल मिळाला ते दोघेही या सिनेमातून कमी झाले नि अमिताभचा चित्रपट सृष्टीतील प्रवास सुरु झाला अशी ही एकूण कहाणी आहे बघा !  

पण अमिताभने सुद्धा त्याची जाण पुढे आयुष्यभर ठेवली.व टिनू स्वतंत्र दिग्दर्शक झाल्यावर त्याच्या सोबत लागोपाठ ३ सुपरहिट सिनेमे केले.खुद्द के ए अब्बास यांच्या अखेरच्या दिवसात त्यांचा हॉस्पिटलचा संपूर्ण खर्च अमिताभने त्याला ते समजल्यावर टिनू च्या माध्यामतून केला.या उपर या गोष्टीची वाच्यता सुद्धा कुठेही करायची नाही हे सुद्धा त्याने टिनू ला बजावले.टिनू ने सुद्धा दिलेला शब्द पाळत अब्बास साहेब गेल्यावर २०१३ च्या एका इंटरव्ह्यू मध्ये प्रसंगानुरूप हे सांगितले.... असो...

अमिताभचा आणि टिनू चा विशेष स्नेह जडला तो त्याने त्याचे लागोपाठ ३ सुपर हिट सिनेमे दिल्यावर ... त्याच्या पहिल्या *“कालिया”* च्या वेळची  गम्मत ऐकण्या सारखी आहे. टिनू जेव्हा त्याच्या सिनेमात अमिताभने काम करावे म्हणून त्याच्या मागे फिरत होता तेव्हा अमिताभ त्याच्या करीयरच्या सर्वोच्च उंचीवर होता आणि त्याला शब्दशः खाजवायला सुद्धा वेळ नव्हता.टिनू अमिताभने त्याचे कथानक ऐकावे म्हणून रोज त्याच्या मागे या स्टुडीओ मधून त्या स्टुडिओ मध्ये फक्त फिरत राहायचा. अमिताभला सुद्धा हे कळायचे पण त्याचा हि नाईलाज होता.शेवटी एकदिवस अमिताभलाच अपराधीपणाची जाणीव झाली व त्याने टिनूला हं तुझे कथानक ऐकवं !  म्हणून एका सिनेमाच्या सेटवरच सांगितले.टिनूने सगळे कथानक ऐकवले नि नंतर अमिताभ कडे पाहिले... आणि क्षणभरा नंतर तो अमिताभला तडक म्हणाला कि,मला माहितीये तुला माझ्या चित्रपटाची कथा मनापासून आवडलीये आणि तू हा सिनेमा करतोयस...

अमिताभ टिनू चे ते बोलणे ऐकून अतिशय चकित  झाला नि त्याने टिनूला विचारले कि,पण तुला हे कसे कसे समजले ?

त्यावर टिनू ने दिलेल्या उत्तराने अमिताभ इतका बेहद्द खुश झाला कि,पुढे त्यांचे असोशिएशन कायमचे जमले.टिनू ने त्याला एवढेच सांगितले कि,मला माहितीये कि तुला जर एखाद्या  चित्रपटाचे कथानक आवडले नाही तर तू दिग्दर्शकाने कथानक ऐकवल्या नंतर प्रथम आकाशाकडे बघतोस ,नंतर डोक्यावर हाताच्या बोटांनी तू तुझ्या केसांना हलकेच थापटतोस आणि नंतर समोरच्या दिग्दर्शकाला “ नाही “ म्हणतोस.माझे संपूर्ण कथानक ऐकून झाल्यावर या पैकी तू काहीच केले नाहीस त्या अर्थी तू हा सिनेमा करतोयेस  हे मी लगेच ओळखले.... टिनू च्या या निरीक्षणावर अमिताभ नंतर इतका खुश झाला कि त्याने त्याला त्या वेळी खळखळून हसून मनापासून दाद दिली.....तर असा हा अवलिया नव्हे तर औलादी टिनू आनंद. 

अशा या टिनूने  जरी हिंदी सिनेमात दिग्दर्शक म्हणून जरी नाव मिळवले तरी तो नको-नको म्हणत असतांना देखील काही निर्मात्यांनी  त्याला अभिनेता म्हणून त्यांच्या सिनेमात काम करायला भाग पाडलंय.त्याचा आजचा सीन हा कमल हसनच्या गाजलेल्या पुष्पक या मूक चित्रपटातील आहे.हा सिनेमा सुद्धा टिनूला मिळायचं कारण म्हणजे कमल हसन चा आग्रह आणि अमरीश पुरीची अनुपलब्धता. 
   
पुष्पक बनताना एक दिवस सारिकाचा म्हणजे त्यावेळच्या 🤣😜 कमल हसनच्या बायकोचा टिनू ला फोन आला कि उद्या आम्हांला भेटायला मद्रासला ये.आम्ही पुष्पक नावाने एक मूक चित्रपट काढतोय नि,कमल ने कुठल्याश्या मासिकांत म्हणे तुझा एक फोटो पाहिलाय आणि आता अमरीश पुरीच्या तारखा नसल्याने तो त्याच्या जागी व्हिलन म्हणून तुला घेतोय.तर तू लगेच निघ.  

टिनू ने तिला बरेच समजवायचा प्रयत्न केला कि,अगं मी आत्ता अमिताभला घेऊन शहेनशाह नावाचा मोठा सिनेमा करतोय नि मी त्याचा डायरेक्टर आहे.मी त्यात अॅक्टिंग करत नाहीये.पण सारिका त्याचं काही ऐकून घ्यायच्या मनःस्थितीत नव्हती ती म्हणली कि ते तू मला काही सांगू नकोस ,कमलचा तसा मला निरोप आहे ...आणि तू उद्या ये. टिनू धर्मसंकटात सापडला. अमिताभच्या तारखा तर घेतलेल्या नि इकडे हे हुकुमवजा प्रेमाचं बोलावण.संध्याकाळी भीत-भीत टिनू ने हि बाब अमिताभच्या कानावर घातली व त्याला विचारले कि,आता मी काय करू ते सांग .
अमिताभने त्याला शांत केले नि सांगितले कि,” काही काळजी करू नकोस तू उद्या जाऊन ये मी तुला पुढच्या तारखा देतो.पण   कमल ची ही संधी वाया घालवू नकोस.टिनू त्या प्रमाणेच वागला नि कॉमिक व्हिलन या पद्धतीची एका वेगळ्या पद्धतीची भूमिका टिनू ला करायची संधी मिळाली.टिनू ने त्या संधीचे अर्थातच सोने केले हे वेगळे सांगायला नको.


........लेख बराच मोठा होऊन ताणला गेलाय ते मला कळतंय पण तरी  या निमित्ताने पहा ... त्या पुष्पक मधील टिनू आणि कमल हसनचा एक मस्त सीन.
ता.क. (ताजा कलम)
हा पुष्पक त्या काळी कमल हसनचा मूक चित्रपट होता सुंदरच.पण संपूर्ण देशात तो त्याच्या वेगळेपणा बरोबरच “बिन मिशीचा  हंड्सम कमल हसन “ पहायला लोकांनी केलेल्या तुफान गर्दी मुळे देखील गाजला होता... पहा तर मग....👇 आजच्या लेखासाठी सहकार्य २०१३ मधील रेडीफ डॉट कॉम वरील टिनू आनंद  यांची प्रदीर्घ मुलाखत : मनःपूर्वक धन्यवाद 


रविवार, ४ मार्च, २०१८

तगड्या पर्सनॅलिटिचा इफ्ते़कार

जालंधर मध्ये १९२० ला जन्म झालेला आणि  १९९५ ला ४ मार्चला  म्हणजे आज अल्लाला प्यारा झालेला  सय्यदाना इफ्तेकार अहमद शरीफ उर्फ “इफ्तेकार”  हा चार भाऊ आणि एका बहिणीतला सगळ्यात थोरला .मॅट्रिक झाल्यावर लखनौच्या आर्ट्स कॉलेज मधून पेंटिंग डिप्लोमा पूर्ण करत,  संगीताची आवड त्याला कलकत्त्याला घेऊन गेली.त्या काळातील गायक-अभिनेता के.एल.सैगलचा त्याच्यावर इतका प्रभाव होता कि,त्याने कलकत्त्यात संगीतकार कमल दासगुप्ताकडे गायक म्हणून ऑडिशन सुद्धा दिली.पण झाले भलतेच.दासगुप्ता इफ्तेकारच्या पर्सनॅलिटिनेच इतका प्रभावित झाला होता कि,त्याने गायका एेवजी चक्क अभिनेता म्हणून त्याची एम.पी.प्रॉडक्शन कडे शिफारस केली आणि १९४४ च्या “तकरार “ मध्ये तो अभिनेता म्हणून पडद्यावर आला.

इकडे १९४६ पर्यंत  मुंबईत त्याची धाकटी बहिण “ वीणा ” (तजौर सुल्ताना ) हिंदी सिनेमात बऱ्यापैकी मोठी अभिनेत्री झाली होती.१९४६ला तर त्याने स्वतःच्या  “शहजाद प्रॉडक्शन लिमिटेडच्या बॅनर खाली अशोककुमारच्या सहकार्याने , त्यालाच स्वतःच्या बहिणी समोर हिरो घेऊन सिनेमे काढले आणि चांगल्यापैकी पैसे मिळवले.१९४६ साली त्याने मुंबईत तेव्हाचे ५ लाख रुपये खर्चून चांगल्यापैकी प्रॉपर्टी सुध्दा विकत घेती.... असो.

१९६० नंतर इफ्तेकार चरित्र अभिनेता म्हणून हिंदी सिनेमात जास्त दिसू लागला.त्याच्या स्वतःच्या वयाच्या चाळीशी नंतर त्याने प्रमुख अभिनेत्याच्या भूमिकेतून अतिशय सहजपणे ,तरूण वयातच वडील,काका,आजोबा ,पोलीस ऑफिसर,पोलीस कमिशनर, कोर्ट रूम मधील जज्ज ,डॉक्टर या सारख्या भूमिकां सोबत क्वचित प्रसंगी खलनायकी शेडच्या भूमिका सुद्धा तितक्याच सुंदरपणे केल्या.

१९४७च्या भारत-पाकिस्तान फाळणीत याचे जवळचे नातेवाईक,भाऊ-बहिण एवढेच काय तर याचे आई वडील सुद्धा भारत सोडून पाकिस्तानात गेले पण ज्यू धर्मीय पत्नी व दोन मुलींच्या सह हा मात्र त्यावेळी अशोककुमारचा  पाठिंबा आणि सहकार्य याच्या बळावर  इथे भारतातच राहिला आणि त्याच्या आयुष्याचे सोने झाले.

आजच्या तरूण पिढीला इफ्तेकार थोडाफार माहित आहे तो त्याच्या अमिताभ सोबतच्या दीवार, किंवा डॉन मधल्या काही गाजलेल्या सीन्स मुळे. पण एक काळ असा होता कि,  चरित्र अभिनेता म्हणून त्याला   हिंदी चित्रपट प्रेमींच्या  मनातील एका कोपऱ्यात नक्की स्थान होते. त्या मुळे आज इफ्तेकारचा त्याच दीवार मधला  त्याचा गाजलेला सीन खास तुमच्या साठी...👇




गुरुवार, १ मार्च, २०१८

R.K .मधली एकेकाळची होळी

खरं तर राजकपूर गेला , नि हिंदी सिनेमातली होळीच संपली.हे आज आठवायचं कारण म्हणजे शबाना आझमीने यंदा श्रीदेवी गेल्यामुळे तिच्या घरी होळी साजरी करणार नाही म्हणून सांगितलं नि ते जुने दिवस आठवले.
च्यायला काय दिवस होते ते.......आर के मधल्या म्हणजे राजकपूरच्या  होळीचं आमंत्रण मिळाव म्हणून सिनेमा सृष्टीतली भलेभले तेव्हा तरसायचे इतके ते निमंत्रण मानाचे समजले जायचे .... आरके स्टुडीओतील तो रंगाने भरलेला हौद ,त्यातल्या नट नट्यांच्या लाजत-मुरडत नको-नको म्हणत मारलेल्या डुबक्या ,ते नंतरच भांगेच्या नावाखाली वाट्टेल ते पिणं आणि त्या नंतर खरं तर त्या होळी पार्टीत केलेला कल्ला यात जी मजा होती ती काही औरच होती.

मिडिया सुद्धा त्या काळी काही प्रथा पाळून असल्याने त्या आर.के.च्या होळीचं वृत्त नंतरच्या फिल्म फेयर ,स्टारडस्ट,स्टार अॅंड स्टाईल  मध्ये यायचं पण होळी नंतरच्या पहिल्या  अंकात बरंचस फिल्टर होऊनच .... त्या होळी पार्टीचं खरं वृत्त मग यायला लागायचं ते त्या नंतरच्या अंकात प्रसंगानुरूप त्याचा-किंवा तिचा किस्सा छापताना...कि,अमुक-अमुक नटाचा तेव्हां कसा तोल ढळला होता वगैरे,वगैरे.... 
त्या काळी आर के च्या होळीत खरा कल्ला करायच्या त्या बी ग्रेडच्या नट्या ज्या “सगळ्याचं लक्ष वेधून घेण्यासाठी “ नानविध क्लुप्त्या करायच्या ... उदाहरणार्थ मुद्दाम पांढरा स्वच्छ ,अंगा लगत शिवलेला ,पण बराचसा झिरझिरीत सलवार कमीज त्या  घालून यायच्या... ,भीड चेपावी म्हणून नंतर त्या थोडी जास्तीची टाकून  दंगा करायच्या  ,पार्टी रंगात आल्यावर रंगाच्या हौदात  मर्जीतल्या हिरोला,निर्मात्याला किंवा दिग्दर्शकाला ओढत नेऊन  डुबक्या मारणे, आघाडीच्या कलाकारां सोबत त्यांच्या बायकांसमोर त्या माहोलचा फायदा उठवत जरा जास्तीची लगट करणे,उघड उघड बिनधास्त फ्लर्ट करणे वगैरे,वगैरे.

.... या असल्या भानगडीत त्या काळी हिंदी सिनेमातल्या त्या काळातल्या व्हॅंपकॅंप मधल्या  आशा  सचदेव,आणि  गॅंग आघाडीवर असायच्या ... कारण त्यांना पक्क ठाऊक असायचं कि,या निमित्ताने आपल्याकडे बऱ्याच जणांचे हवे तेथे लक्ष जाते नि त्याचा पुढील रोल मिळायला आपल्याला सोयीचे होते.

राजकपूरला सुद्धा हे सगळं माहित असायचं त्या मुळे तो सुद्धा दरवर्षी हटकून त्या सगळ्यांना आवर्जून आमंत्रण द्यायचा.पण या दरम्यान हिरों सोबत होळी पार्टीला आलेल्या नटांच्या बायकांच्या पोटात गोळा उठायचा.त्या तिथून झटपट लौकरात लौकर बाहेर कसं पडता येईल याची गडबड करायच्या... घरी जाऊन नंतर नवरा-बायकोत भांडणं लागायची ती वेगळीच. 

आर.के.च्या या होळीचं वृत्त स्टार अॅंड स्टाईल मध्ये देवयानी चौबळ हि डॅशिंग महिला पत्रकार फार मस्त तिरकस पद्धतीनं बिनधास्त लिहायची.ही देवयानी चौबळ म्हणजे तीच,  जिचं राजेश खन्ना बरोबर त्याच्या लग्ना आधी नि नंतर सुद्धा अतिशय मस्त ब्रॅकेट होतं नि जिने धर्मेंद्र – हेमामालिनीचे  लग्ना अगोदरचे लफडे पहिल्यांदा बिनधास्त छापून धर्मेंद्रचा एका पार्टीत त्यानं टाकल्यावर  शब्दशः मार खाल्ला होता....तीच ही देवयानी चौबळ ... असो... 

नंतर तो राजकपूर पण गेला ,ती देवयानी सुद्धा गेली नि ते निधडे, अभ्यासू पत्रकार सुद्धा संपले... त्या मुळे शबानाने तिच्या कडची होळी यंदा कॅन्सल केली काय नि न केली काय ? आपल्यासाठी दोन्ही सारखचं ... 

त्या आर केच्या होळीची खरी मजा सुद्धा १९७२ ला पृथ्वीराज कपूर गेल्या नंतर पुढील १०-१२ वर्षेच  आली.नंतर राजकपूरच्या दम्याच्या आजारामुळे त्यातील रंग सुद्धा उडून गेला. त्यातून मग १९८८ ला राजकपूर गेला ,मिडिया सुद्धा हळूहळू अनावश्यक लायकीपेक्षा स्ट्रॉंग झाला, अभ्यासू पत्रकार संपले आणि  “आनी ,पानी, लोनी “ म्हणणारी तरुण पोरंसोरं पत्रकार म्हणून मिरवायला लागली आणि  मग तर  त्या पार्ट्यातली  सगळी उरली-सुरली गंमत सुद्धा  निघून गेली.... असो... 

आज २०१८ मधे त्या मुळेच १९७५च्या सुनील दत्तच्या “जख्मी “ फिल्म मध्ये गौहर कानपुरीने दिलमें होली जल रही है असं गाण्यात कां लिहून ठेवलं होतं ? ते आत्ता समजतंय ....  कालाय् तस्मै नमः म्हणायचं नि दुसरं काय ? चला ...... निदान त्या गाण्याच्या निमित्ताने कोणे ऐके काळी १९७४ ला मुंबई अशी पण होती हे तरी निदान तुम्हांला या निमित्ताने कळेल ......आज तेव्हढ ही पुरेसं आहे...चला तर मग ...👇