हसन म्हणाला " आत्ता या क्षणी मी ती नावं सांगत बसलो तर काही दिवस,महिने,वर्षे लागतील,जो वेळ आता माझ्या कडे नाहीये ,ज्यांच्या कडून मी
आयुष्यात खूप काही शिकलो, पण माझे त्यातील ३ गुरूं असे होते
ज्यांना मी कधीच विसरू शकत नाही....
माझा पहिला गुरु एक चोर होता ...
एकदा वाळवंटात मी रस्ता चुकलो आणि एका
अपरात्री मी एका गावात येऊन पोहोचलो. सगळ्यांचे दरवाजे बंद होते त्या मुळे त्या
भयानक थंडीत मला आता कुठेच आसरा मिळायची शक्यता नव्हती ,तितक्यात माझी एका चोराशी गाठ पडली... मी त्याच्याशी
माझ्या रात्रीच्या निवाऱ्या बद्दल विचारणा केली असता तो म्हणाला , " तुम्ही चेहऱ्यावरून एखादे धार्मिक ,अध्यात्मिक गुरु
दिसताय . तुमच्या चेहऱ्यावर ते तेज मला स्पष्ट दिसतंय ,पण
व्यवसायाने मी एक चोर आहे आणि माझ्या कामाला बाहेर पडलोय... पण तुमची तयारी असेल
तर चला ,मी तुम्हांला माझ्या घरी घेऊन जातो ,तुम्ही माझ्या कडे आज मुक्काम करा...माझी काही एक हरकत नाहीये .... क्षणभर मी घाबरलो पण विचार
केला कि, मी सूफी आहे आणि हा चोर असून सुद्धा याला माझी भीती
वाटत नाही तर मी याला भिण्याचे कारण काय ??? मी त्याच्या
मागे चालत त्याच्या घरी पोहोचलो...
मी अंदाज बांधल्याचा विपरीत तो चोर स्वभावाने, वर्तणुकीने आणि
आदरातिथ्याने इतका चांगला होता कि,
मी त्याच्या कडे रमलो आणि पुढील काही महिने मी त्याच्याच घरी राहिलो...आता तो रोज रात्री मला सांगायचा
..."मी माझ्या कामाला जातोय ,पण तुम्ही तुमची
पूजा-अर्चा ,ध्यानधारणा निवांत करा,माझी
चिंता करू नका... मी रात्री उशिराने येईन..
तो रात्री परतल्यावर मी उत्सुकतेपोटी त्याला रोज विचारायचो "आज ,काही मिळालं का ?" आणि तो सांगायचा कि, .....नाही !.... आज काही नाही
मिळालं पण उद्या मात्र नक्की मिळेल... हा
प्रकार पुढे जवळपास महिनाभर असाच सुरु राहिला ,..... चोर रोज
रात्री चोरी करायला जायचा आणि रिकाम्या हाताने परत यायचा... पण मला त्याचे नेहमी आश्चर्य वाटायचे कि, त्या महिन्याभरात तो मला
कधीही निराश झालेला दिसला नाही...तो मला
रोज सांगायचा " देव करो नि, उद्याचा दिवस माझा असेल...
माझं काम होईल...या उपर तो मला म्हणायचा कि, "महाराज !
तुम्ही तर इतके देवधर्माचें करता ,तुम्ही तर आमच्या पेक्षा
देवाच्या जास्त जवळचे आहात त्या मुळे
तुम्ही सुद्धा देवाकडे माझ्या साठी प्रार्थना करा कि, या गरीब माणसाला मदत कर ...त्याला त्याच्या कार्यात यश मिळू दे ! त्याचे काम उद्या नक्की होऊ दे....
तर हा चोर होता माझ्या आयुष्यातील माझा पहिला गुरु...कारण मी वर्षानुवर्षे
ध्यानधारणा करून,कित्येकवेळा
देवप्राप्तीच्या अतिशय जवळ पोहोचायच्या पायरीवरून जेव्हा-जेव्हा मागे खेचला जायचो आणि
माझा देवावरील ,देवाच्या अस्तित्वावरील विश्वास उडायची वेळ
यायची तेव्हा-तेव्हा मला या चोराचे ते शब्द आठवायचे कि, " देव करो नि उद्याचा दिवस माझा असेल",मी उद्या
पुन्हा प्रयत्न करेन ! ... आणि मी
तेव्ह-तेव्हा आठवायचो कि,हा चोर असूनही "त्या
उद्या" करीत इतका प्रयत्नवादी आणि आशावादी राहू शकतो तर मी अजून एक दिवस
प्रयत्न करायला का हरकत नाही ? आणि मी पुन्हा ध्यानधारणेच्या
मार्गावर मार्गस्थ व्हायचो...
माझा दुसरा गुरु एक कुत्रा होता !
एकदा मला तहान लागल्याने पाणी
पिण्यासाठी मी एका नदी तीरापाशी आलो. तिथेच हा कुत्रा मला दिसला...त्याला सुद्धा तहान
लागली होती... पण तो नदीकाठी जायचा पाण्यात त्याचेच प्रतिबिंब पहायचा ,घाबरायचा , त्या
प्रतिबिंबावर भुंकायचा आणि मागे फिरायचा असे दोन-चारदा झाले ... पण त्या
कुत्र्याला तहानच इतकी लागली होती कि, शेवटी हिय्या
करून त्याने त्या पाण्यातल्या त्याच्या प्रतिबिंबावर चाल केली आणि पाण्यात उडी घेतली..
प्रतिबिंब गायब झाले ,कुत्र्याने त्याची क्षुधा भागवली आणि
तो पोहत-पोहत निवांतपणे पाण्याबाहेर पडला...
हा सगळा प्रकार दूर उभा
राहून मी पाहत होतो... मला लगेच लक्षात आले कि, या प्रसंगाच्या निमित्ताने देवाने
मला संदेश पाठवलाय ... कि, वेळ आल्यावर तुम्हाला त्या
अज्ञाताची कितीही भीती वाटो ,पण त्या भीतीवर स्वार होत जर तुम्ही त्यात उडी
घेतली,स्वतःला विश्वासाने त्यात झोकून दिले तर ती भीती कायमची दूर होते.... मग मी विचार केला कि, जर
त्या कुत्र्याला ते जमू शकले तर मला का म्हणून जमणार नाही ??? आणि त्या नंतर माझ्या मनांतील "एखादी गोष्ट करतांना "ती मला जमेल नां " ही माझी भीती कायमची गेली... तर अशा तऱ्हेने तो कुत्रा
हा माझा दुसरा गुरु होता...
माझा तिसरा गुरु एक छोटा मुलगा होता ...
एकदा मी एका गावात संध्याकाळी जवळपास अंधार पडत असतांना शिरलो आणि मला समोरून
एक छोटा मुलगा मशिदीच्या दिशेने हातात पेटवलेली मेणबत्ती अतिशय सांभाळून नेतांना दिसला... हातातील ती मेणबत्ती विझू नये म्हणून त्याने एका हाताने तिच्या
ज्योतीवर काळजीपूर्वक आडोसा धरला होता आणि
तो जपून चालत होता..... का कोण जाणे पण
मी त्याला वाटेतच जरा थांबवलं... आणि विचारलं कि, "ही मेणबत्ती तू स्वतः पेटवली का ?
तो म्हणाला हो !" मग मला त्याची थोडीशी गम्मत करावीशी वाटली, म्हणून
मी त्याला विचारलं कि,मग त्यात उजेड कोठून आला ? कारण हि मेणबत्ती पेटवे पर्यंत तेथे अंधार होता आणि ती तू पेटवल्यावर
पेटली .... तर आता मला सांग कि, त्यात उजेड कोठून आला ? कारण तू तो उजेड येतांना बघितला असणार
! नाही का ?
माझ्या या प्रश्नावर तो मुलगा मनापासून खळखळून हसला आणि त्याने त्या
मेणबत्तीच्या ज्योतीवर जोरात फुंकर मारली आणि ती विझवली... मला समजलं नाही कि, त्यानं हे असं का केलं ते ? पण नंतर त्याने माझ्याकडे वळून पाहिलं आणि मला विचारलं कि, "आत्ता हि मेणबत्ती तुमच्या समोर पेटलेली होती... तिच्यात उजेड होता ,आणि आत्ता तुमच्या डोळ्यादेखत तो उजेड नाहीसा झालेला तुम्ही बघितलात तर
आता तुम्ही मला सांगा कि, तो उजेड कुठे गेला ?... तुमच्या डोळ्यादेखत सगळा प्रसंग घडलाय !
त्या मुलाच्या त्या अनपेक्षित कृतीने मी आता गांगरून गेलो.. निरुत्तर झालो ...
माझ्यातला "स्वाभिमान" कितीही नाही म्हणलं तरी दुखावला गेला .. माझ्या ,ज्ञानाला,बुद्धिमत्तेला
त्याने मोठा हादरा बसला ... मी जमिनीवर आलो आणि त्या क्षणापासून माझ्यातला माझा "मी" हा तेथेच गळून पडला....
स्वैर अनुवाद.. :ओशो -सिक्रेट ऑफ सिकेट्स वरून साभार