भोज्जा

मंगळवार, ३० जानेवारी, २०१८

रमेश देव ,नाबाद ९० 💐🙏

मुंबई आकाशवाणीवर नोकरी करत असतांना ,जेवणाच्या मधल्या सुट्टीत “ जरा ,जाऊन येतो “ असं म्हणून , रेकॉर्डिंग स्टुडीओत १९६४ साली  येऊन पं.जितेंद्र अभिषेकींनी गायलेलं हे आजचे गाणं पुढे अजरामर झाले.पंडितजींनी  त्यांच्या  आवाजाच्या जातकुळीला न जुमानता हे गाणं इतकं अप्रतिम गायलंय कि ,पडद्यावर हे गाणं न पाहता सुद्धा संपूर्ण कोकण 🌴🥥🌊 आपल्या डोळ्या पुढे सरकन उभा राहतो.पण या गाण्याचे फक्त एवढेच वैशिष्ट्य नाही तर ....

मराठी चित्रपट सृष्टीतील नायक-नायिकेची पडद्यावरील  दुर्मिळ पेयर म्हणजे रमेश देव – जयश्री गडकर यांच्या उपस्थितीत हे गाणं पडद्यावर आपल्याला दिसते. या गाण्याची आठवण आज यायचं कारण म्हणजे , या गाण्यात दिसणारे ज्येष्ठ्य मराठी अभिनेते श्री.रमेश देव यांचा आज ३० जानेवारी हा वाढदिवस आहे ... आज त्यांनी वयाची ८९ वर्षे पूर्ण करत नव्वदी मध्ये प्रवेश केला आहे.

आयुष्याच्या एका महत्वाच्या टप्प्यावर अभिनय कां  नोकरी हा प्रश्न जेव्हा त्यांच्या समोर उभा ठाकला तेव्हां महाराष्ट्र पोलीस दलात इन्स्पेक्टर पदावर निवड झाली असतांना ,त्यांनी अभिनयाचे , बेभरवशाचे क्षेत्र निवडून ,पुढे जात मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीत जे काम केले ,नाव मिळवले ते अतिशय कौतुकास्पद होय.आजच्या दिवशी त्यांचे हार्दिक अभिष्टचिंतन... आणि त्यांना “शतायुषी भव “ या हार्दिक शुभेच्छा...👇👍👌🎂💐

गुरुवार, २५ जानेवारी, २०१८

पुन्हा दिलीपकुमार

*सुप्रभात*
झळाळी येण्यासाठी, खुद्द सोन्यालासुध्दा तापत्या मुशीतून अग्निदिव्य पार करावे लागते...

२९ नोव्हेंबर १९४४ ला मुंबईतल्या मॅजेस्टिक सिनेमाला *ज्वार-भाटा* हा दिलीपकुमार अभिनीत सिनेमा प्रदर्शित झाला.हा दिलीपकुमारचा आयुष्यातील पहिला सिनेमा.

२९ नोव्हेंबर नंतर  पुढच्या अवघ्या १५ दिवसांत त्या सिनेमा बद्दल आणि दिलीपकुमार बद्दल खालील परिक्षण फिल्म इंडिया या त्या काळच्या एकमेव सिनेमासिकांत छापून आले.

हा रिव्ह्यू वाचून दिलीपकुमारच्या जागी दुसरा कोणताही अभिनेता असतां तर ,  प्रचंड खचला असता... पण दिलीपकुमारने हा रिव्ह्यू अतिशय पॉझिटीव्हली घेतला व पुढील इतिहांस आपल्याला ठाऊक आहे... अभिनयांतील शेवटचा शब्द म्हणून त्याच्या शिवाय कोणाचेच नांव नाही...👇


मंगळवार, २३ जानेवारी, २०१८

अभिनयातील कोहीनूर : दिलीपकुमार


हिंदी सिनेमात मेथड अक्टिंगचा जनक समजले जाणारे दिलीपकुमार यांचा मध्यंतरी ११ डिसेंबर रोजी ९५ वा वाढदिवस साजरा झाला.शतायुषी भव अशा या महान अभिनेत्याला प्रथम शुभेच्छा ...

खरे तर यांच्या आधी उणीपुरी १० वर्षे अगोदर मोतीलाल यांनी मेथड ऍक्टिंग ही पद्धत हिंदी सिनेमांत सुरु केली.पण हिंदी सिनेमाला ग्लॅमर १९५० नंतर आले व दिलीपकुमार यांची कारकीर्द बहरली १९५० नंतर त्या मुळे नाव मात्र यांचे झाले. मेथड ऍक्टिंग म्हणजे  चित्रपटातील भूमिकेत संबंधित पात्र कसे वागेल ,बोलेल ,हावभाव करेल याचा अभिनेता/अभिनेत्री यांनी विचार करून कलाकाराने केलेला अभिनय म्हणजे मेथड ऍक्टिंग. मूक चित्रपटातील अभिनेते अतिरंजित किंवा नाटकीय पद्धतीने अभिनय कला सादर करत असत.त्या मुळे या मेथड ऍक्टिंगचे महत्व .

१९४४ साली  ज्वारभाट या सिनेमापासून दिलीपकुमार यांची कारकीर्द सुरु झाली.सुरवातीच्या काळात यांची जोडी जमली ती कानन कौशल यांच्या सोबत.आपल्या उण्यापुऱ्या ६० वर्षाच्या चित्रपट कारकिर्दीत यांनी अवघ्या ४१ सिनेमांत काम केले. *यांचा अभिनय म्हणून म्हणाल तर अभिनय कलेचा जणू वस्तुपाठच...पण त्या बद्दल मी हेतुपुरस्सर आज कमी बोलणार आहे* .कारण प्रचंड मोठे नाव असूनही यांच्या बद्दल बरेच उलटसुलट मतप्रवाह ,मतभिन्नता त्यांच्या चाहत्यां मध्ये आहे. काही यांना हिंदी सिनेमां सृष्टीत  देव समजतात तर काही दानव. तसेच दिलीपकुमार यांचा काळही खूप जुना असल्याने बऱ्याच जणांना त्याचा संदर्भ लागणे कठीण जाईल.


आजच्या लेखासाठी विकिपीडिया,बाबुराव पटेल यांच्या "फिल्म इंडिया"   आणि www. tanqeed.com या साईटचा संदर्भ घेतला आहे. एक देव तर दुसरा दानव या त्यांच्या प्रतिमे साठी 

यांचा जन्म जरी पेशावरचा,आणि कौटिम्बिक पार्श्वभूमी जरी उत्तम होती ,म्हणजे वडील जमीनदार व सफरचंदाचे मोठे फळ विक्रेते ,तरी १९४० साली यांनी तत्कालीन एकसंध भारतातील पेशावर मधून थेट पुणे गाठले.इंग्रजी भाषेवरील प्रभुत्वा मुळे पुण्यात त्यांनी मिलिटरी कँटीन मध्ये २ वर्षे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर सॅन्डविचचा स्टॉल चालवला.अधूनमधून नाशिक जवळील देवळालीला वडिलांच्या सफरचंदाच्या धंद्यात सुद्धा त्यांना मदत केली.

कॉन्ट्रॅक्ट मधून शिल्लक टाकलेले तब्बल ५००० र. घेऊन १९४२ साली यांनी नंतर मुंबईत जे पाऊल टाकले ते आजतागायत ...

आता यांच्या चित्रपट कारकिर्दीतील कटू मतां विषयी थोडे स्पष्ट बोलू.

खरे तर हे अभिनेते, पण काही सन्माननीय अपवाद वगळता यांनी अभिनय केलेल्या जवळपास प्रत्येक  चित्रपटात, त्याच्या निर्मिती पासून शेवटापर्यंत प्रत्येक  प्रक्रियेत अवाजवी लुडबुड करणे ,ढवळाढवळ करणे हा मोठा दोष यांच्यात ठासून भरला होता.असं काही जण म्हणतात ... पण हिंदी सिनेमा क्षेत्रांतील ते बडे प्रस्थ असल्याने सगळेच व्यावसायिक त्यांचा हा तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत गेले. त्याचा परिणाम यांची चित्रपट संख्या त्यांच्या ६० वर्षाच्या कारकिर्दीनुसार जर बघितली तर ती  अतिशय नगण्य आहे. अवघी ४१.

हिंदी सिनेमांत जेव्हा यांचं नाव झाले त्या नंतर तर यांची हि ढवळाढवळ इतकी वाढली कि, त्यांचा  प्रत्येक चित्रपट पूर्ण होण्यास किमान ३ ते ४ वर्षे लागायला लागली.यांच्या अदाकारीवर आंधळे प्रेम करणारे  किमान ४ चित्रपट निर्माते तर शब्दशः देशोधडीला लागले असं म्हणतात ...  मनमोहन देसाई या १९८० च्या दशकातील चित्रपट निर्माता ,दिग्दर्शकाचे वडील तर यांच्या मुळे साफ कंगाल झाले. यांना व यांची पत्नी सायरा बानो यांना घेऊन ते बनवत असलेला "मास्टर " हा सिनेमा ,कधीच पूर्ण होऊ शकला नाही.... असं म्हणतात कि ,सिनेमा सुरु करतांना हे इतके संपन्न होते कि यांचे कपडे पार परदेशातून शिवून यायचे आणि चित्रपट निर्मिती दरम्यान ते  पार भिकेला लागले.नूतन-दिलीपकुमार हे नायक-नायिका म्हणून १३ रिळे पूर्ण झालेला शिकवा सुद्धा दिलीपकुमार मुळे कधी पडदा बघू शकला नाही असं म्हणतात ...

यांनी त्यांच्या दुसऱ्या पत्नीशी अस्माशी विवाह केल्याचे (१९७९-१९८२) जेव्हा १९८२ साली म्हणजे तब्बल ४ वर्षांनी  जेव्हा यांनी पब्लिक आऊट केले तेव्हा ,यांच्यावर प्रचंड राळ उडाली. दुसऱ्या लग्नासाठी प्रथम १३ वर्षे संसार सोबती असलेल्या सायराला घटस्फोट,  नंतर अस्मा बरोबर लग्न आणि ४ वर्षाने पुन्हा काडीमोड आणि पुन्हा सायरा बरोबर दुसऱ्यांदा लग्न याने त्यांची जनमानसातील इमेज डागाळली गेली. सायरा बरोबरच्या पहिल्या लग्नाच्या वेळी तिचे वय होते २२ आणि तर यांचे होते ४४  हा सुद्धा त्या काळी विनाकारण थट्टेचा विषय झाला होता.

पण यांची प्रतिष्ठा खरी पणाला लागली ,जेव्हा बेगम पारा (सख्खी मोठी भावजय) , सख्खा मेव्हणा इकबाल खान व इतर जवळचे नातेवाईक यांनी मीडिया जवळ  १९८२ नंतर जेव्हा उघडपणे यांच्या कागाळ्या केल्या तेव्हा. पण तेव्हा बरे होते ,मीडिया हा बाल्यावस्थेत होता नि आजच्या इतका प्रगल्भ नव्हता ... अन्यथा १९७९ साली तत्कालीन बॉंबेचे शेरीफपद भूषविलेल्या दिलीपकुमार यांना २००० साली राज्यसभेचे खासदार करायला काँग्रेस धजावलीच नसती....

उमेदीच्या काळात , हिंदी चित्रपट निर्माते,दिग्दर्शक ,वितरक,फायनान्सर यांच्याशी यांनी जर टीमवर्क म्हणून या क्षेत्रात काम केले असते तर यांच्या चित्रपटांची संख्या आज किमान २०० च्या वर असती व येणाऱ्या पुढील पिढ्यांसाठी  आजच्या काळात दिसणाऱ्या अक्टिंगच्या कार्यशाळा दिसल्याच नसत्या. नुसते यांचे सिनेमे बघून कित्येक जणांना अभिनय कशाशी खातात हे समजले असते. जुन्या चित्रपट रसिकांना हि खंत कायम असणार यात शंका नाही...

तात्पर्य : सुरी कितीही धारदार असली तरी तिचा जर वापर झाला तरच त्या सुरीला अर्थ आहे.अन्यथा तिच्यात आणि लोखंडाच्या पात्यात फरक तो काय ?

आजच्या व्हिडीओचे वैशिष्ट्य म्हणजे ज्या मनमोहन देसाईंनी दिलीपकुमार यांच्या सोबत त्यांच्या वडिलांचा अनुभव लक्षात ठेऊन कटुतेमुळे कधी  काम केले नाही,त्यांनी त्यांच्या कोहिनूर चित्रपटावरून सुपरहिट अमर अकबर अँथनी मध्ये मात्र  एक सीन घेतलेला तुमच्या लक्षात येईल.. अपरिहार्य पणे तुम्ही दिलीपकुमार आणि अमिताभ बच्चन यांची तुलना करणारच हि मला खात्री..  👇




शनिवार, २० जानेवारी, २०१८

बेफाम ,बेलगाम परवीन बाबी

त्या ढिगारावजा टेकडीवर ,गर्दी पासून थोडी दूर , एकटीच उभी राहून १९-२० वर्षाची ती मुलगी  निवांतपणे बराचवेळ सिगारेटचे झुरके मारत,समोर चाललेले शूटिंग बघत उभी होती.आपल्याकडे कुणाचं खास लक्ष आहे हे तिच्या गावी सुद्धा नव्हते.ती तिच्याच मस्तीत मस्तपैकी रमली होती.शेवटी  न राहवून त्यानं युनिट मधल्या स्पॉट बॉयला जवळ बोलावत तिला बोलावण धाडलं. ती सुद्धा येस ? ”  म्हणंत ,अतिशय निर्विकार चेहऱ्याने त्याच्या समोर येऊन उभी राहिली.

सिनेमात काम करायला आवडेल का ? ” त्यानं थेट प्रश्न विचारात मुद्द्याला हात घातला.           
नक्कीच ! पण मला यातील कोणताही अनुभव नाही.तिने सुद्धा थेट उत्तर दिले. ठीक आहे “  म्हणत त्यानं तिच्या हातात स्वतःच कार्ड दिले आणि मुंबईला येऊन भेटण्यास सांगितले.

हा प्रसंग घडला होता १९६९-७० साली जेव्हा निर्माता दिग्दर्शक बी आर इशारा त्याच्या कुठल्याशा सिनेमाचे आउट डोअर शूटिंग बाहेर गावी करत होता तेव्हा आणि ती तेव्हाची १९-२० वर्षाची ती मुलगी होती परवीन बाबी.जी १३ वर्षां पूर्वी  आज २० जाने.ला आपल्यातून गेली.( २० जाने.२००५) 

त्या काळी इशाराने दिलेले त्याचे ते कार्ड घेऊन पुढे काही दिवसांत खरोखरच मुंबईच्या  बी.आर इशाराच्या ऑफिस मध्ये येऊन जेव्हां परवीन , दत्त म्हणून उभी राहिली तेव्हा  इशाराने सुद्धा दिलेल्या शब्दाला जागत   तिच्या सोबत कॉन्ट्रॅक्ट केले आणि  तिला आपल्या पुढील सिनेमाची नायिका म्हणून कायम केले. सिनेमा तर लगेच सुरु होणार नव्हता, त्या मुळे चित्रपट सुरु होई पर्यंत तिला खर्चा साठी म्हणून काही एक रक्कम दरमहा देण्याचे परस्पर संमतीने ठरल्यावर तिनेहि मान डोलावत त्याला होकार दिला  आणि ती ऑफिस मधून बाहेर पडली.

सिनेमा तर इशारा काही लगेच सुरु करू शकला नाही पण ती खर्चाची दरमहा रक्कम मात्र तो  तिला पुढील साधारण दीड पावणेदोन वर्षे नियमित देत होता आणि ती सुद्धा प्रत्येक महिन्याला ते पैसे त्याच्या ऑफिस मधून न चुकता घेऊन जात असे.सगळ्यात कहर म्हणजे त्या कालवधीत परवीनने इशाराला  सर ,अपनी पिक्चर कब शुरू करेंगे “ ? असं एकदाही विचारलं नाही.

दरम्यानच्या काळात तिने   साईड बाय साईड काही मॉडेलिंगची कामे करत वर खर्चाची जुळवा जुळव केली . दरम्यानच्या काळात तिची  ओळख चित्रपट सृष्टीत होणाऱ्या पार्ट्यां मधल्या तिच्या नियमित हजेरीने  सिनेमावाल्यांना होत गेली आणि त्यांचे तिच्याकडे लक्ष वेधले गेले.त्या सुरवातीच्या काळात  निर्माते तिला त्यांच्या सिनेमात काम करण्या संबंधी विचारपूस करायचे ,पण ही इतकी स्ट्रेट फॉर्वर्ड होती किती सुद्धा त्या निर्मात्यांना निरागसपणे बी.आर.इशारा कडे जणू तो तिचा सेक्रेटरी आहे अशा थाटात पाठवीत असे .

हा प्रकार वारंवार व्हायला लागल्यावर  शेवटी न राहवून इशारानेच  त्या काळातील हॅंड्सम् क्रिकेटियर सलीम दुराणीला घेऊन हिच्या सोबत "चरित्र " नावाचा सिनेमा केला.पण तो सिनेमा आला कधी ? पडला कधी ? नि गेला कधी हे कोणाला समजले देखील नाही पण इशाराने त्याच्या शब्दाला जागत हिला कॅान्ट्रॅक्ट मधून आधीच मुक्त केल्याने हि आता फ्री लान्स पद्धतीने कोणत्याही सिनेमात काम करायला मोकळी झाली..  नि फ्री लान्स झाल्यावर मग मात्र  ती सुटलीच.

पारंपारिक भारतीय हिरोईनच्या प्रतिमेस संपूर्ण छेद  देऊन  वेस्टर्नाइज् पद्धतीचे फीचर्स, हावभाव,वागणे, बोलणे ,चालणे आणि वावरणे याची परफेक्ट पद्धतीने हिंदी चित्रपट सृष्टीला ओळख करून देणे हे परवीन बाबीचे हिंदी चित्रपट सृष्टीतील सर्वात मोठे योगदान.तसे पाहिले तर अभिनयात ही फार अफलातून होती वगैरे काहीच नाही. गमतीची गोष्ट ,म्हणजे निर्माते दिग्दर्शक सुद्धा ते जाणून होते पण हिच्या आवाक्यातल्या भूमिकां ते तिला देत गेले ,आणि  ती  सुद्धा त्यात एकदम फिट्ट बसत गेली.

 पडद्यावर आणि पडद्याबाहेर अतिशय बिनधास्त वावर हे तिचे खास वैशिष्ट्य होते . आपल्या बहराच्या जेमतेम १० वर्षाच्या कालावधीत तिने त्या काळातल्या सर्व प्रमुख नायकां सोबत काम केले पण त्यातल्यात्यात पडद्यावरचा नायक म्हणून हिला फक्त अमिताभच सांभाळू शकला. अमिताभ सोबतच्या ८ सिनेमात हिची त्याच्या सोबत फार मस्त केमिस्ट्री जमली होती . ते आठही सिनेमे त्या काळी हिट किंवा सुपरहिट कॅटेगिरीत जाऊन बसले.

परवीनचे  करियर जरी अल्प असले तरी तिच्या बद्दल लिहिण्यासारखे आणि सांगण्या सारखे खूप काही आहे ... त्या मुळे फक्त एवढेच सांगून थांबतो कि , ज्या काळी लोकांना "लिव्ह इन रिलेशनशिप" हा प्रकार , ......प्रकार तर सोडा पण ही संज्ञा देखील माहित नव्हती त्या काळी  ही ,अनुक्रमे कबीर बेदी.डॅनी डेन्झोपा आणि महेश भट यांच्या सोबत तशी राहिलीये यातच सगळं आल.    


अशा अपघाताने चित्रपट सृष्टीत प्रवेश आणि  एक्झिट  हे जिच्या  करियरचे वैशिष्ट्य ठरले  , त्या परवीन बाबीचा अमिताभच्या गाजलेल्या १९७५ च्या दीवारमधील एक बिनधास्त सीन आज तुमच्या साठी...👇👌
आजच्या लेखा साठी सहकार्य अनिता पाध्ये यांच्या यही है जिंदगी मधील ,बी.आर.इशारा आत्म निवेदनाचे आणि यू ट्यूब चे : मनःपूर्वक धन्यवाद 


शुक्रवार, १९ जानेवारी, २०१८

मा.विनायक : मराठी सिनेमाचे ऐकेकाळचे आशास्थान


आपण बराच काळ सांभाळलेला शेयर , पैशाची नड आली म्हणून विकावा, तुमच्या कडून तो विकत घेतांना ,घेणाऱ्याने तुमच्यावर उपकार करतोय असे दाखवत त्याचा  रेट पाडून घ्यावा  आणि त्याच्या नंतर तो शेयर बाजारात ५०० पट वाढवा याला तुम्ही काय म्हणाल ???

मा.विनायक च्या बाबतीत १९३८ साली त्याच्या गाजलेल्या ब्रह्मचारीच्याबाबतीत नेमके हेच झाले. मावसभाऊ व्ही.शांताराम सोबत फारसे न जमल्याने त्याने हंस पिक्चर्सच्या बॅनर खाली आचार्य अत्रे लिखित ब्रह्मचारी हा सिनेमा मीनाक्षीला घेऊन कसाबसा पूर्ण केला,पण विनायकाच्या मनस्वी स्वभावामुळे तो करतांना त्याचे अत्र्यांच्या बरोबर सुद्धा वाजले ,अत्रे हंस पिक्चर्स मधून  बाजूला झाले .संस्थेच्या आर्थिक अडचणी वाढल्या , पिक्चर कसाबसा पूर्ण झाला आणि आता हा पिक्चर स्वतः रिलीज करायचा का ? निदान घातलेले भांडवल काढून घेत वितरकाला आउट राईट विकून टाकायचा ? असा विनायका पुढे प्रश्न उभा राहिला.

विनायकाने दुसरा सोयीचा मार्ग निवडला आणि ब्रह्मचारी एका मारवाड्याला अवघ्या १ लाखांत विकून टाकला.खरे तर त्या वेळी सिनेमा धंद्याशी त्या मारवाड्याचा काही एक संबंध नव्हता पण आता विकत घेतलाच आहे तर लाऊयात असा विचार करून तो पिक्चर त्या मारवाड्याने पुण्यातल्या आर्यन मध्ये लावला नि पहिल्या शो पासून ब्रह्मचारीअसा काही उचलला गेला कि ज्याचं नाव ते. मारवाडी तर ध्यानी मनी नसतांना इतका प्रचंड मालामाल झाला कि त्याच्या पुढच्या २-४ पिढ्यांची ददात मिटली.

ब्रह्मचारी चालण्यामागे पिक्चरच्या स्टोरीत,पटकथेत,गाण्यात,संवादात आणि सगळ्यात म्हणजे सेक्स अपीलमध्ये सर्वार्थाने दम होता हे मुख्य कारण होते .कारण १९३८ च्या काळात स्त्रियांचा  समाजाला उघडा दिसणारा जास्तीतजास्त भाग म्हणजे चेहरा,हात आणि पायाचे घोटे. अशा काळात मांड्या उघड्या टाकून  मीनाक्षीने सादर केलेले यमुना जळी खेळ खेळूया का ? हे गाणे पडद्यावर आले आणि तत्कालीन पब्लिकला वेड लाऊन गेले.

पण पिक्चर प्रचंड हिट होऊन सुद्धा विनायकाच्या हाती काहीही लागले नाही.कारण त्याचा त्याच्याशी संबंधच राहिला नव्हता. उर्वरित पुढील ९ वर्षाच्या आयुष्यात विनायकाने चित्रपट निर्मिती केली पण ब्रह्मचारीची उंची तो पुन्हा कधी गाठू शकला नाही हे वास्तव आहे. भविष्यात त्याची मुलगी नंदा हिने हिंदी सिनेमात मोठे नाव व पैसा मिळवून वडिलांची  चूक सुधारत तिच्या पदराच्या गाठीला  चांगली माया जमवून अंतिम दिवस व्यवस्थित गुजारले. पण विनायक मात्र  वयाच्या अवघ्या ४१ व्या वर्षी जलोदराने तडकाफडकी गेला.तो जायची वेळ  सुद्धा इतकी विचित्र होती कि इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त झालेला भारत, आपल्या स्वातंत्र्य प्राप्तीचा उत्सव साजरा करण्यात मग्न होती.(१९ ऑगस्ट १९४७)..त्या मुळे विनायक गेल्याचा दिवस हा सुद्धा फक्त इतिहासात नोंद ठेवण्याजोगाच होऊन बसला.        

आजचे गाणे ते तेच गाणे, ज्याने आजपासून ८० वर्षापूर्वी तमाम मराठी प्रेक्षकां मध्ये खळबळ माजवून दिलेले मा.विनायक- मीनाक्षीचे ब्रह्मचारीमधील.👇
आजच्या लेखासाठी इन्टरनेट ,आचार्य अत्रे लिखित "कऱ्हेचे पाणी " आणि यू ट्यूब यांचे सहकार्य लाभले आहे.

गुरुवार, १८ जानेवारी, २०१८

दुलारी : विस्मृतीतील चरित्र अभिनेत्री

“दुलारी”  एक जुन्या काळातील चरित्र अभिनेत्री ...हिच्या केवळ ३७ सेकंदाच्या एका सीन मुळे आज हिच्यावर मला लिहावेसे वाटले यातच सर्व काही आले. आज १८ जानेवारी हा तिचा जन्मदिवस.वडिलांच्या आजारपणामुळे वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी म्हणजे १९४३ साली हिला नाईलाजाने सिनेमात यावे लागले.नायिका म्हणून आपण येथे कधीच स्थिराऊ शकणार नाही हे तिला आधीपासूनच माहित असल्याने  हिरॉईनच्या अवती-भवतीचे रोल करत आपला मोर्चा तिने वेळीच चरित्र भूमिकां कडे वळविला व तब्बल १३५ सिनेमात काम केले.  
हिचे खरे नाव अम्बिका गौतम . १९५२ साली ध्वनी मुद्रक जे बी.जगताप यांच्या सोबत लग्न करून तिने सिनेमातून तब्बल ९ वर्षांचा ब्रेक घेतला व नंतर पुन्हा सिनेमा क्षेत्रात पुनरागमन केले होते .२०१३ साली अल्माय्झरने हि पुण्यातल्या एका वृद्धाश्रमात गेली. अंतिम काळात हिची मैत्रीण वहिदा रेहमानने चित्रपट कलाकार असोसिएशनला हिच्या आजारपणा बाबत कळवल्याने  त्या संस्थेने आर्थिक मदत पुरविली व हिची मुलगी व नातू हिला शेवटच्या दिवसांत ऑस्ट्रेलिया वरून आर्थिक मदत करत होते.

१९५०च्या सुमारास सिनेक्षेत्रातील लोकप्रिय मासिक फिल्मइंडिया मधील जाहिरातीत हिचे नाव छापून येत असे हेच खरे तर विशेष आणि हीच हिची कमाई.तिचा आजचा सीन अमिताभ-शशी कपूरच्या दीवार मधील अवघा ३७ सेकंदाचा आहे पण शशी कपूर ,ए के हंगल यांच्या सारख्या कसलेल्या कलाकारांच्या समोर सुद्धा न बुजता,न घाबरता तिने जो अभिनय केलाय तो केवळ अप्रतिम. तमाम रसिकांच्या आज सुद्धा  तो लक्षात आहे ,हेच हिच्या अभिनयाचे वैशिष्ट्य.

दीवार मधील तो सीन आज फक्त दुलारीच्या अभिनयासाठी  ...  

बुधवार, १७ जानेवारी, २०१८

बिंदू : सत्तरच्या दशकातील फटाका






बिंदूला फटाका म्हणल्याने काहीजण बावचळतील पण ,सत्तरच्या दशकातील बऱ्याच हिरॉईन्स , त्यांच्या सिनेमात ही आहे म्हणल्यावर टरकायच्या.कारण तब्बल पाच फूट सहा इंच उंची , उत्कृष्ट फीचर्स ,सर्वसाधारण स्त्रियांच्या तुलनेत उफाड्याचा पण कमनीय बांधा आणि गोरीपान कातडी असे  जातिवंत सौंदर्य लाभलेली बिंदू ,पडद्यावरच्या पेक्षा प्रत्यक्षात अधिकच सुंदर दिसायची.तिची अतिशय मुलायम तेजस्वी गोरीपान त्वचा , आणि जातिवंत डबलहाडी सौंदर्य वास्तवते मध्ये सुद्धा कित्येक पुरुषांना घायाळ करत असे.

एका यशस्वी गुजराती निर्मात्याच्या (नानूभाई देसाई) घरात १७ जानेवारी १९५१ ला जन्मलेली बिंदू,१९६७ साली  वडील वारल्याने पोरकी झाली. शिक्षणात फारसा रस नसलेली बिंदू , घरची जबाबदारी अंगावर पडल्याने लगेच तिच्या अंगभूत अॅसेटस् चा विचार करत ,वडिलांच्याच क्षेत्रात म्हणजे  सिनेमा क्षेत्रात आली.हिला हिच्या चित्रपट क्षेत्रातील करियर साठी संपूर्ण आयुष्यभर  प्रोत्साहन देणारा बालमित्र चंपक झवेरी याच्या  सोबत हिने इथे येण्या अगोदरच लग्न केलेलं होते.त्या मुळे भविष्यात सुद्धा  हिच्या पुढे कधी कुणाची तिने डाळ शिजू दिली नाही. 

हिच्या सिनेमातल्या अदाकारीवर लोक त्या काळात इतके दीवाने होते कि, बिंदूला एकदा मुंबईतल्या तिच्या रहात्या घरा जवळील पोलीस चौकीत जाऊन कम्प्लेंट नोंदवणे भाग पडले होते.कारण काय होते तर तिच्या वरच्या मजल्यावरच्या फ्लॅट मध्ये कुणी एक महाभाग रस्त्यावरच्या हिच्या बिल्डींग जवळ लावलेल्या जाहिरातीच्या होर्डिंग वर चढून रात्रीच्यावेळी हिच्या खिडकीतून डोकावून बघायचा प्रयत्न करायचा म्हणून.आता बोला.

१९७९ नंतर डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्या मुळे हिला डान्स या तिच्या रोजी-रोटीच्या कलेवर पाणी सोडावे लागले होते.त्या मुळे नंतरच्या काळात चरित्र खलनायिका,खाष्ट सासू अशा भूमिका करत हिने तिचे करियर सुरु ठेवले. नंतर-नंतर तर विनोदी भूमिका सुद्धा हिच्या कडे चालून आल्या व त्यात सुद्धा तिने आपली छाप पाडली.तर अशी ही बिंदू चित्रपट क्षेत्रातील निवृत्ती नंतर  सध्या पुण्याच्या कोरेगाव पार्क मध्ये निवांत व्यतीत करत आहे.

आजचे तिचे गाजलेले प्रसिद्ध कॅब्रेट सॉंग "जंजीर" मधील, आणि पाठोपाठ ज्या गाण्याने तिने तिची प्रेक्षकांना दखल घ्यायला भाग पडले ते मेरा नाम है शबनम हे "कटी पतंग" मधील.      


आजच्या लेखासाठी सहकार्य यू ट्यूब आणि इन्टरनेट ...





मंगळवार, १६ जानेवारी, २०१८

ओ.पी.नय्यर : वादग्रस्त संगीतकार

१९७५च्या मार्च महिन्यात  हाजी अली पाशी गाडी येताच त्यानं हातातील “ती” मानाची  फिल्म फेअर ट्रॉफी समुद्राच्या दिशेने भिरकावली ,एकवार समुद्राकडे कटाक्ष टाकत त्याने  “ते” गाणे इतिहासजमा करून टाकले आणि  त्याच्या पुढच्या प्रवासास सुरुवात केली.    

फिल्म इंडस्ट्रीत हा किस्सा ओ.पी.ऊर्फ ओमकार प्रसाद नय्यर यांच्या नावावर सांगितला जातो.ज्यांचा १६ जानेवारी हा आज जन्मदिवस आहे.वरील गाण्याचा किस्सा हा फिल्म इंडस्ट्रीतील अशा एकमेव गाण्यासाठी आहे ,जे ओ.पी.नय्यर यांच्या करिता गीतकार एच.एस.बिहारी यांनी लिहिले ,१९७२ च्या ऑगस्ट महिन्यात अवघ्या एका तासांत रेकॉर्ड केले गेले  , १९७३ च्या नोव्हेंबर महिन्यात  प्रथम रेडीओ सिलोनवर वाजवले गेले  आणि  १९७५ ला त्याला फिल्मफेयरचे अवार्ड मिळाले ....ज्या सिनेमासाठी ते तयार केले गेले तो सिनेमा होता सुनीलदत्त ,रेखाचा “ प्राण जाये पर वचन न जाये “ आणि  हा सिनेमा  रिलीज झाला १८ जानेवारी १९७४ ला.  

पण आश्चर्याची बाब म्हणजे हे गाणे सुपर हिट होऊन  देखील या गाण्याचे चित्रीकरण कधीच होऊ शकले नाही आणि हे गाणे सिनेमात सुद्धा कुठे ऐकू येत नाही. विशेष म्हणजे या गाण्याला  मार्च १९७५ ला झालेल्या फिल्मफेयर अवार्ड नाईट मध्ये १९७५चे  बेस्ट फिमेल सिंगर अवार्ड  मिळाले.पण न जाणो हे गाणे अशा कोणत्या कुमुहूर्तावर बनले होते ,कारण केवळ आशा भोसले यांच्या मुलीला त्या १९७२च्या ऑगस्ट महिन्यात ओ.पी.नय्यर यांनी मारले ,एवढे किरकोळ कारण आशा आणि ओ .पी.चा १५ वर्षांचा सांगीतिक प्रवास थांबवायला कारणीभूत ठरले होते.गाण्याचे रेकॉर्डिंग तर झालेले होते  पण ओ.पी.बरोबरच्या भांडणामुळे आशाने या गाण्याचे पैसे घेतले नाहीत आणि पैसे न घेतल्याने तिने हे गाणे सिनेमात वापरू दिले नाही.पण गाणे रेकॉर्ड केले गेल्यामुळे मात्र हे गाणे प्राण जायेच्या एल पी,ई.पी.रेकॉर्डवर कायम स्वरूपी जतन झाले.

या गाण्यानंतर ओ.पी. आणि आशा मधील दुरावा इतका टोकाला गेला कि,१९७५ फिल्म फेयर अवार्ड नाईट मध्ये या गाण्याला उत्कृष्ठ स्त्री पार्श्वगायिकेचा मान मिळतोय आणि आशा तो पुरस्कार स्वीकारायला जाणार नाहीये  हे जेव्हा  ओ.पी.ला कुठूनतरी बाहेरून समजले तेव्हां ओ.पी.ने स्वतः फिल्मफेयरवाल्यांना फोन करून  “ माझ्या एका उत्कृष्ट  पार्श्व गायिकेच्या वतीने , गाण्याचा जन्मदाता या नात्याने मी तो पुरस्कार स्टेजवर स्वीकारेन " असे काहीशा कुत्सितपणे कळवले होते .हे गाणे आशा –ओ.पी.नय्यर कॉम्बिनेशन मधील शेवटचे गाणे ठरले.

या प्रसंगा नंतरच्या आपल्या पुढील ३५ वर्षांच्या सांगीतिक प्रवासात नंतर ओ.पी.ने अलका याद्निक ,कविता कृष्णमूर्ती,कृष्णा कल्ले ,शारदा यांना घेऊन काही गाणी केली खरी पण ओ.पी.-आशाचा टच पुन्हा कोणत्याच गाण्यात अनुभवायला मिळाला नाही व ओ.पी.मागे पडला तो पडलाच . तसे बघितले तर  ओ.पी. आणि वाद हे समीकरण त्या काळी चित्रपट सृष्टीला नवीन नव्हते.आशा बरोबरच्या भांडणा अगोदर केवळ त्याच्या संगीत शैलीला लताचा आवाज सूट नाही या त्याच्या आग्रही भुमिके मुळे त्याने त्याच्या संपूर्ण फिल्मी करियर मध्ये लताला घेऊन एकही गाणे केले नाही आणि रफी बरोबरच्या कुरबुरी मुळे महेंद्र्कपूर,मुकेश,किशोरकुमार यांना घेऊन त्याने नंतरच्या काळात वेळ मारून नेली होती. पण एवढे असूनदेखील १९६०च्या दशकात एका सिनेमाच्या संगीता साठी निर्मात्या कडून वाजवून १ लाख रुपये मोबदला घेणारा असा तो दुर्मिळ संगीतकार होता.विशेष म्हणजे संगीताचे कोणतेही प्राथमिक शिक्षण न घेता अतिशय मोजक्या वाद्यवृंदाच्या सहाय्याने ओ.पी.ने अप्रतिम संगीत देत ,रसिकांचे कान तृप्त करत त्यांच्या मनात स्वतःची जागा केली हे त्याच्या सांगितिक प्रवासातील विशेष.

चला तर मग ऐकूयात ते वादग्रस्त गाणे...  

सोमवार, १५ जानेवारी, २०१८

फक्त एक चुकीचा निर्णय = मीना शौरी

मीना शौरी हिचे खरे नाव खुर्शीद जेहान. मूळच्या  पाकिस्तानी असलेल्या या नटीने १९५५ पर्यंत भारतीय सिनेमात नाव आणि पैसा कमवला पण १९५५ नंतर हि पाकिस्तानात गेल्यावर हिची ओळख बदलत गेली.एके काळच्या लारीलप्पा गर्ल या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या मीनाने  १९४० पासून १९६२ पर्यंत    एकूण ५ लग्ने केली. पण हिचे जे लग्न सगळ्यात जास्त टिकले ते हिंदू असलेल्या रूप के.शौरी यांच्या सोबत (१९४६ ते १९५६) आणि ती मीना शौरी या नावानेच  पुढे आयुष्यभर ओळखली गेली.

चित्रपटाची नायिका विनोदी अंगाने सादर करू शकणारी भारतीय चित्रपट सृष्टीतील पहिली  अभिनेत्री अशी  हिची ओळख हि जास्त योग्य ओळख ठरेल.१९५५ चा  गुरुदत्तच्या  मि.एन्ड मिसेस ५५ या चित्रपटावरून प्रेरित होत पाकिस्तान मधील निर्माते जे एस आनंद यांच्या निमंत्रणावरून हि आणि शौरी पाकिस्तानांत गेले.तिथे शौरींनी मिस ५६ हा सिनेमा काढला . चित्रपटानंतर शौरी भारतात परतले पण मीना मात्र तिथेच रमली.विशेष म्हणजे रूप शौरींचा जन्म सुद्धा क्वेट्टा,पाकिस्तान मधलाच होता.  

मात्र पाकिस्तानी चित्रपटसृष्टीची तेव्हाची वास्तवता देखील हीच होती कि, मुंबईच्या चित्रपट सृष्टीच्या सहाय्या शिवाय,आधाराशिवाय  ती तगू शकत नव्हती आणि केवळ त्या मुळेच फाळणी नंतर जेवढे म्हणून मुस्लीम कलाकार,निर्माते,दिग्दर्शक भारत सोडून पाकिस्तानात कायमचे निघून गेले ,त्यातील जवळपास सगळ्यांचे तेथील उर्वरित आयुष्य हे अतिशय वाईट अवस्थेत गेले.साधारण १९६० नंतर तर ,१९४७ पर्यंत आपापसातील शिल्लक असणारा ओलावा ,जिव्हाळा हा देखील संपला व या सर्व मंडळींचा भारतातील परतीचा मार्ग बंद झाला.

हे थोडेसे अतिशयोक्तीपूर्ण वाटेल पण भारत-पाकिस्तान फाळणी नंतर लगेचच पुढे अवघ्या २ एक वर्षात मुस्लिमांनी भारतापासून वेगळे होण्याचा निर्णय हा १०० टक्के चुकीचा निर्णय आहे /होता  ही  वास्तवता सगळ्यांच्याच लक्षात येत होती आणि आली होती.त्या काळातील भारतीय चित्रपट आणि राजकारण या विषयाला वाहिलेल्या कै. बाबुराव पटेल यांच्या फिल्म इंडिया या मासिकांत संपादक या नात्याने  पटेलांनी वारंवार याचा उहापोह करत गंभीर इशारा सुद्धा त्या काळी दिला होता. पण त्या काळी भारतीय किंवा पाकिस्तानातील कोणतेही राजकीय व्यक्तिमत्व तेव्हा याचा विचार करण्याच्या मनःस्थितीत नव्हते.... त्या मुळेच आज २०१८ मधील पाकिस्तानची भीषण अवस्था बघता ,जाणकारांना त्याचे विशेष वाटत नाही.

म्हणजेच गम्मत बघा , १९४७च्या  फाळणी मुळे  पाकिस्तानात जन्म झाला असे मानले गेलेले  ,पण फाळणी नंतर सुद्धा तिकडे न गेलेले कलाकार म्हणजे, दिलीपकुमार,देवानंद ,राजकपूर किंवा जे  कलाकार ,गीतकार,संगीतकार,गायक  किंवा दिग्दर्शक  जे जन्माने मुस्लीम होते पण फाळणी नंतर सुद्धा जे पाकिस्तानात न जाता सच्चे भारतीय म्हणून इथेच राहिले व इथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला ,व आज सुद्धा हयात आहेत त्यांना फक्त भारतीयच नव्हे तर जगभरातील त्यांच्या चाहत्यांचे प्रचंड प्रेम लाभले. असो.


तर मीना शौरीचे पाकिस्तानातील आयुष्य ,खास करून १९७४ नंतरचे ,जेव्हा तिचे समकालीन इथे भारतात प्रसिद्धीच्या शिखरावर विराजमान होते तेव्हा , तिकडे ती मात्र अतिशय खस्ता हालत अनुभवत होती.पुढे जात तर तिची इतकी बिकट अवस्था झाली कि, ती गेल्यावर तिच्या पाशी कुणीही नव्हते आणि तिचा अंत्यसंस्कार एका धर्मादाय संस्थेला करणे भाग पडले... लारा-लप्पा गर्लचा असा हृदयद्रावक शेवट हा तिच्या एका चुकीच्या निर्णयाचे फलित होय.   मीना शौरीचे ते गाजलेले १९४९ च्या एक थी लडकी मधले  लारा-लप्पा गाणे फ्रेंड्स व्हिडीओ आणि पुरुषोत्तम आनंद यांच्या  सौजन्याने.



https://marathmolyagappa.blogspot.in/2018/01/blog-post_36.html

हिंदी सिनेमाच्या स्मृती जागवताना


१९५० च्या सुमाराची काही फिल्मी मासिके चाळली असता असं लक्षात येत कि,काही मोजक्या ठराविक अभिनेत्री वगळता त्या काळी इतर कुणाला फारसा वाव नव्हता, किंवा तो पर्यंत चांगल्या घरातील स्त्रिया सरसकट या क्षेत्राकडे फार मोठ्याप्रमाणावर आकर्षिल्या गेल्या नव्हत्या.त्या मुळेच  त्या काळात सुरैया ,मधुबाला,कामिनी कौशल, १९५० नंतर नर्गिस आणि इतर अजून २-४ जणी यांचे वर्चस्व सहजगत्या दिसून येते. 

१९४७ च्या भारत-पाकिस्तान फाळणी नंतर सर्वात मोठे नुकसान झाले असेल तर ते त्या काळच्या चित्रपट सृष्टीचे ,कारण फाळणी पर्यंत अखंड भारताच्या सिनेमांना ,मग तो अगदी व्ही.शांताराम यांचा कुंकू ,माणूस किंवा अगदी शेजारी हा सिनेमा कां असेना, त्यांना तिकडे पार पूर्वेला त्या काळच्या बर्मा म्हणजेच आत्ताच्या ब्रह्मदेश पर्यंत आणि पश्चिमेला पार अफगाणिस्तान पर्यंत बाजारपेठ अगदी सहजच खुली होती.

पगारी अभिनेत्यांना पदरी बांधून त्या काळी चित्रपट संस्थांनी जे काही कमावले त्याची तुलना आजच्या काळात अगदी दोन पाचशे कोटी रुपये कमावणाऱ्या सध्याच्या सिनेमांना सुद्धा नाही. आज पासून त्या काळातील काही सिनेमांच्या जाहिराती आणि नायक –नायिकांचे अतिशय दुर्मिळ फोटोग्राफ्स मी शक्य होईल तसे आपल्या भेटीस आणणार आहे.आशा आहे कि,त्या जुन्या स्मृतींना उजाळा देणे आपल्यापैकी काहींना आवडेल.


या चित्रमाले करिता त्या काळातील बाबुराव पटेल यांच्या गाजलेल्या फिल्म इंडिया, आणि काही इतर  मासिकांची  मदत घेतली आहे. यातील जवळपास सर्वच फोटोग्राफ्स आपण प्रथमच पहाणार आहात असा माझा अंदाज आहे.

बुधवार, १० जानेवारी, २०१८

छोटीसी बात : “बासू चटर्जी” के बारे में

१९७५ ला आलेल्या शोलेचे बजेट होते ३ कोटी आणि १९७४ चा हिट पिक्चर रजनीगंधाबासूने बनवला होता अवघ्या २ लाखांत. विद्या सिन्हाला दिले होते तेव्हा त्यानं ५ हजार रुपये आणि अमोल पालेकरला बुक केला होता १० हजारांत. या दोघांचेही हे पहिलेच हिंदी सिनेमे.

विशेष म्हणजे विद्याचे पहिले लग्न होऊन तेव्हां त्याला ही ६ वर्ष झाली होती.पण याच्या सिनेमाची मात्र ती नायिका होती  ... कमाल म्हणायची कि नाही याची ? हा होताच मुळी अफलातून.... अतिशय लो बजेटमध्ये आशयघन ,चांगले सिनेमे बनवणं हा याचा डाव्या हातचा मळ होता.....मध्यमवर्गीय प्रेक्षकांची नेमकी नाडी समजलेला हा हिंदी चित्रपट सृष्टीतील एक दुर्मिळ निर्माता ,दिग्दर्शक होता.

मघा पासून मी बासूला  होता-होता म्हणतोय त्याचं कारण फक्त एवढंच आहे कि आज १० जानेवारीला बासू ८८ वर्षांचा झाला पण त्यानं सिनेमा करणं फार पूर्वीच थांबवलय..   आयुष्यातील तब्बल १८ वर्षे ब्लिट्झ या इंग्रजी साप्ताहिकासाठी चित्रकार व व्यंगचित्रकार म्हणून काम केल्यावर त्यानं चित्रपट शिकायचा निर्णय घेतला.१९६८ च्या शैलेन्द्रच्या तीसरी कसमचा३ रा असिस्टंट डायरेक्टर म्हणून त्यानं  उमेदवारी सुरु केली व १९७२ च्या जया भादुरी अनिल धवनच्या पिया का घरच्या निमित्ताने हा स्वतंत्र दिग्दर्शक बनला.पिया का घर मराठीतील गाजलेल्या मुंबईचा जावई चा रिमेक होता.

बासूचं वैशिष्ट्य असं कि, त्यानं १९७५ ते ८३ पर्यंत अवघ्या ९ वर्षात पार अमिताभ ,राजेश,जितेंद्र,धर्मेंद्र ,अनिल कपूर,ते अशोककुमार अशा नावाजलेल्या स्टार्स सोबत काम केले पण त्यातील एकालाही त्यांच्या त्या वेळच्या बाजारभावा प्रमाणे मोबदला दिला नाही.छोटीसी बातच्या वेळी तर यानं प्रत्येक सिनेमाला अडीच लाख रुपये घेणाऱ्या अशोककुमारला अवघ्या पन्नास हजार रुपयात काम करायला लावल होतं.याच्या सिनेमा बनवण्याच्या पद्धतीवर फिदा होत यातील  मंडळीनी सुद्धा याच्या कडे काम करतांना कधी कुरकुर केली नाही. जितेंद्र,राजेश,धर्मेंद्र,हेमामालिनी यांनी तर त्याच्यावर पदरचे पैसे लावून सिनेमे काढले. ९० टक्के आउट डोअर व जेमतेम १०% ते सुद्धा अगदी नाईलाज झाला तरच इनडोअर शूटिंग करत सिनेमा झटपट पूर्ण करणे हि याची खासियत होती.

आजचा त्याच्या सिनेमातील घेतलेला सीन छोटीसी बातमधला गाजलेला सीन आहे ,जो त्यानं अशोककुमारचे ५०,००० धरून अवघ्या ३ लाखात बनवला होता. मात्र त्याचा निर्माता बी आर चोप्राने (महाभारत फेम) त्या साठी बँकेकडून १२ लाख रुपये काढले होते  नि आजच्या  काळात ज्याला टाकणे म्हणतात तसं बासूला चोप्रानं टाकून” ,नफ्यातील ५० टक्के हिस्सा द्यायचं कबूल केले असूनही त्याची अवघ्या  २ लाखांवर बोळवण केली होती.बासूही बिचारा साधा होता कारण त्यानं ही ते २ लाख घेत त्याचा म्हाडाचा फ्लॅट तेव्हा निल करून टाकला होता नि तो पुढच्या सिनेमाच्या तयारीला लागला होता ..

रजनीगंधा ने त्या काळी किमान कोटभर रुपयाचा गल्ला जमवला होता .. म्हणजे लक्षात घ्या ... चोप्राने या छोट्याश्या बातीतकसली छपाई केली होती ... असो. बासूला आजच्या दिवशी शतायुषी भव हि मनस्वी शुभेच्छा ... छोटीसी बात मधला "तो" सीन इथे पहा ..👴



सोमवार, ८ जानेवारी, २०१८

आईएँ मेहेरबान .. कमर जलालाबादी


ओम प्रकाश भंडारी उर्फ कमर जलालाबादी यांना जाऊन आज (९ जानेवारी) १४ वर्ष झाली,पण जो पर्यंत कॅलेंडर मधे १ तारीख आहे तो पर्यंत त्यांना कुणी कधी विसरू शकणार नाहीत . कारण १९५४ ला आलेल्या सुधीर फडके संगीत दिग्दर्शित " पहिली तारीख " मधील "खुष है जमाना आज पहिली तारीख है " या गीताचे गीतकार कमर जलालाबादीच होते.

पंजाब  मधल्या जलालाबाद जवळील एका खेड्यात १९१९ साली जन्माला आलेला हा उर्दूप्रेमी माणूस.गावाच्या नावाने आपली ओळख निर्माण करत त्यांनी तब्बल १५६ सिनेमातून सुमारे ७०० गीते लिहिली. मॅट्रिक होत शालेय शिक्षण पूर्ण करत त्यांनी पत्रकार म्हणून लाहोर मध्ये काही दैनिकात काम केल्यावर १९४० ला ते पुण्यात प्रभात फिल्म कंपनीत आले आणि नंतर १९४२ ला मुंबईला जाऊन यशस्वी गीतकारांच्या पंक्तीत जाऊन स्थिरावले.

आपल्या १९४२ नंतरच्या ४० वर्षाच्या चित्रपट गीतलेखनाच्या प्रवासात त्यांनी त्या-त्या काळातील सर्व यशस्वी संगीतकार आणि गायक-गायिकांच्या साठी चित्रपट गीतलेखन केले. आपल्या चाहत्यांच्या हिंदी,उर्दू,इंग्रजी आणि प्रादेशिक भाषातून आलेल्या प्रतिसादाला उत्तरे पाठवत तिला फॅनमेल संबोधणे आणि चाहत्यांना " पंखे " म्हणणे यांनीच चित्रपट सृष्टीत रूढ केले.ते आपल्या चाहत्यांच्या प्रत्येक पत्रास स्वतःचा एक फोटो जोडत वैयक्तिकरित्या उत्तरे देत असत.

ते अतिशय सहृदयी आणि  धार्मिक प्रवृत्तीचे होते.त्यांच्या बहिणीची परिस्तिथी बिकट आहे असे बघितल्यावर त्यांनी त्या काळी आपला राहता खार ,मुंबई मधील बंगला तिला देऊन टाकला आणि ते स्वतः जुहू मधे एका छोट्या घरात पुढे रहावयास लागले.

अशा या मोठ्या मनाच्या गीतकारास आजच्या दिवशी मनापासून मानवंदना आणि अभिवादन ... 

आजचे गाणे त्यांनी गीतलेखन केलेल्या आणि त्या काळी प्रचंड गाजलेल्या " हावडा ब्रिज " मधून घेतले आहे...
व्हिडीओ सहकार्य : यू ट्यूब आणि लेखन सहकार्य : इन्टरनेट 
मनःपूर्वक धन्यवाद .



शनिवार, ६ जानेवारी, २०१८

रामेश्वरी , ६ जानेवारी , जन्मदिवस

लंचब्रेक मध्ये बागेतल्या लाकडी खुर्चीवर बसत तिने तिच्या तेलगु असिस्टंटला तिच्या भाषेत पाणी आणायला सांगितले आणि आपल्या भाषेत कुणीतरी बोलतंय हे बघून तारेच्या कम्पाउंड पलीकडे सुरु असलेल्या बांधकामावरील जेवायला बसलेल्या कामगार स्त्रियांच्या माना तिच्या कडे गर्कन वळल्या.

 पुण्यातल्या वानवडी परिसरातील हा किस्सा आहे. १९८० च्या दशकांत हिंदी सिनेमात नाव कमावलेली  पण मुळची तेलगु असलेली रामेश्वरी तिच्या कुठल्याश्या हिंदी सिनेमा साठी तेव्हा वानवडीच्या एका बंगल्यात शूटिंग करत होती.त्या काळी वानवडी हा पुण्याचा भाग किंवा उपनगर वगैरे समजले जात नसे.त्या मुळे बघ्या प्रेक्षकांची संख्या जेमतेम हाताच्या बोटावर मोजता येईल एवढीच होती त्या मुळे दुपारच्या लंचब्रेक मध्ये एका निवांत क्षणी रामेश्वरी बंगल्या बाहेरच्या एका खुर्चीत येऊन बसली होती आणि वरील प्रसंग घडला होता...  

मुळात ही प्रत्यक्षात काही फार देखणी ,ग्लामरस वगैरे अशी कधी नव्हतीच ,होती  ती प्रत्यक्षात काळी सावळीच... आणि त्यातून खरं नि स्पष्ट बोलायचं तर काळीच,  पण अभिनयाच्या उपजत गुणामुळे हिने १९७५ मध्ये पुण्यातूनच फिल्म्स एन्ड टेलिव्हिजन इन्स्टी ट्यूट मधून अभिनयाचा डिप्लोमा केला होता आणि “ दुल्हन वही.......” नंतर हिचे बऱ्यापैकी नाव झाले असल्याने निर्माते तिला हेरून  चित्रपटात घ्यायचे...

पण त्या काळी  त्या बांधकाम कामगार स्त्रियांना ही कोण आहे, किती मोठी आहे ? हे माहित नसल्याने आणि ती सुद्धा त्यांच्या सारखीच काळी-सावळी असल्याने त्यांनी हिच्याशी तेलगूत गप्पा मारायला सुरवात केली होती. बऱ्याच दिवसांनी आपल्या भाषिक माणसाशी मातृभाषेत बोलायला मिळतंय हि संधी साधून तिने हि त्यांच्याशी संवाद साधला. ही सिनेमात काम करतेय हे त्या बायकांना तिच्या बोलण्यातून समजले  त्या मुळे त्यातील पोक्त बायकांनी तिला ,तू लहान आहेस , घर सोडून एकटीच इकडे आलीयेस आणि त्यातून या असल्या सिनेमातल्या लोकांच्या मध्ये आहेस ... त्या मुळे जरा जपून रहा बाई , ही सिनेमावाली लोकं फार काही चांगली नसतात असं हि ऐकलय असा वर तिला पोक्त सल्ला ही   दिला होता .. खरं तर तेव्हा हिचा “ दुल्हन वही जो पिया मन भाए “ येऊन हिंदीत हिचे बऱ्यापैकी नाव झाले होते.

वरील किस्सा हा त्या काळी पुण्याच्या दै.सकाळ मध्ये छापून आला होता ..


अशा या रामेश्वरीचा ,पण पुढे म्हणे कुठल्याशा सिनेमाच्या शुटींगच्या वेळी हिच्या अभिनयाचे बलस्थान असणाऱ्या डोळ्यांनाच अपघात झाला आणि हिची रियल ब्यूटी लोप पावली. नंतर हिने त्वरित आपल्या एफ टी आय आय मधील जुन्या सहकाऱ्यासोबत लग्न केले व संसारात रमली. सध्या ती उत्तम गृहिणी बनून, नवरा आणि दोन मुलां सोबत सुखाचा संसार करत आहे.   

आजचे तिचे गाणे तिच्या गाजलेल्या सुपरहिट " दुल्हन वही जो पिया मन भाए " मधून घेतले आहे.


लेखा साठी सहकार्य इन्टरनेट आणि यू ट्यूब : धन्यवाद ...



शुक्रवार, ५ जानेवारी, २०१८

मुक्री ,५ जानेवारी, जन्मदिवस

कोकणातल्या अलिबागला काझी म्हणून उदरनिर्वाह करणारा मुक्री वयाच्या २२व्या वर्षी हिंदी सिनेमात आला. तो आणि दिलीपकुमार यांचे हिंदी सिनेमातील पदार्पण एकाच वर्षीचे आणि एकाच सिनेमातले. आपल्या अंगभूत वैशिष्ट्यपूर्ण अभिनय कौशल्यावर त्याने तब्बल ६०० हून अधिक सिनेमात काम केले.

जेमतेम ५ फूट उंची लाभलेल्या या अभिनेत्याने त्याला मिळालेल्या उंचीचा आपल्या अभिनयात दिग्दर्शकाच्या सहाय्याने भरपूर उपयोग करत हिंदी सिनेमात अगदी छोट्यातल्या छोट्या रोल मधे सुद्धा स्वतःचा ठसा नेहमीच उमटवला. समोरचा अभिनेता किती ही मोठे नाव असणारा असला तरी त्या-त्या सीनमध्ये त्याने आपले अस्तित्व नेहमीच टिकवले. कमी असलेल्या उंची मुळे खरतरं याला फ्रेममध्ये बसवताना कॅमेरामनची नेहमीच तारांबळ उडायची आणि त्याची त्याला सदैव जाणीव असायची त्या मुळे फक्त चेहऱ्या मधून अभिनय करत याने तब्बल ६ दशके हिंदी चित्रपट सृष्टीच्या गळेकापू स्पर्धेत स्वतःचे अस्तित्व टिकविले हा जणू एक विक्रमच असावा. प्रेक्षकांना सुद्धा हा इतका आपल्यातला वाटायचा कि ,त्याचं वय झाल्यावर सुद्धा त्याला  कदाचित त्याच्या घरातली ५-२५ लोकं आणि त्याच्या सेटवरील लोकं वगळता ,त्याच्या माघारी कुणी कधी अहोजाहो करत संबोधलं नसेल असं मला उगीचच राहून-राहून वाटतंय.. तमाम प्रेक्षकांनी याच्यावर भरभरून प्रेम केले.
त्या मुळेच या छोट्या उंचीच्या मोठ्या अभिनेत्याचे स्मरण आज त्याच्या जन्मदिनी १९७० च्या दशकातील गाजलेल्या त्याच्या १  प्रसंगांच्या आणि गाण्याच्या व्हिडीओ मधून आपण पाहू ...  ↓   
आजच्या लेखासाठी इन्टरनेट मायाजालाचे सहकार्य घेतले आहे. 


गुरुवार, ४ जानेवारी, २०१८

आज ४ डिसेंबर आर डी बर्मनची ची १३ वी पुण्यतिथी.


“ इतना समझा दिया है इधर गांडू ”
सोबतच्या म्युझीशियन सोबत असा त्याच्या पद्धतीने प्रेमाचा संवाद साधत त्यानं पुढच्या अवघ्या ५ मिनटात हे गाणं तयार केलं होत... कारण हा होताच मुळी प्रचंड मनस्वी नि मुलखावेगळा.

 आज ४ डिसेंबर आर डी बर्मनची ची १३ वी पुण्यतिथी.  

यानं नाव कमावलं हिंदीत पण त्याचं हिंदी शेवटपर्यंत यथातथाच होत.समोरच्या बरोबर हिंदीत  संवाद साधतांना त्याची फार त्रेधातिरपीट उडायची . एखाद गाणं बनवताना किंवा नंतर एखाद्या लाईव्ह कॉन्सर्ट मधे ते सादर करतांना गाण्याचे मूळ शब्द होता-होईतो त्याच्या नीट लक्षात रहात नसत. पण त्याच्या संगीतातील अफलातून योगदानावर तेव्हा आणि आजसुद्धा रसिक इतके खुश होते  आणि आहेत कि त्याचे हे असले अजून १०० गुन्हे रसिकांनी त्याला  माफ केले असते.

चित्रपट संगीतकार म्हणून ३६ वर्षांची कारकीर्द केल्यावर त्या कारकिर्दीतील  शेवटच्या सिनेमाला सुद्धा त्याच्या मरणोत्तर सर्वोत्कृष्ट संगीतकाराचा फिल्मफेयर बहुमान मिळाला ,या पेक्षा त्याचे  मोठेपण सिद्ध करायला अजून काय हवे ?    

आर डी चे आजचे गाणे १९८२च्या त्याच्या ऋषी कपूर,पूनम धिल्लो ,टीना मुनिमच्या “ ये वादा रहा “ सिनेमा  मधलं आहे .. अवघ्या ५ मिनिटाच्या सिटींग मध्ये हे गाणं बनलं होत आणि नंतर त्या काळी पॉप्युलर झालं होत... त्या गाण्याचे ते सिटींग आणि नंतर गाण्याच्या मुखडा इथे ऐका आणि नंतर पहा...





या दोन्ही व्हिडीओ साठी  अनुक्रमे श्रीधर शिवराम , गाने सुने अनजाने आणि यू ट्यूब यांचे मनःपूर्वक आभार    

मंगळवार, २ जानेवारी, २०१८

२ जानेवारी ,सदाशिव अमरापूरकर ,यांचा जन्मदिवस

जेव्हा पाहिजे तेव्हा फक्त डोळ्यातूनच अभिनय करत भय,लालसा,लंपटपणा,अगतिकता किंवा मिश्कीलपणा दाखविण्याचे अंगभूत कौशल्य असलेले अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांचा आज जन्मदिवस. आज ते असते तर ते ६७ वर्षांचे असते.     

खरं तर अभिनयापेक्षा अभिनेत्याला आजच्या काळात देखणं असणं ही गरज आहे ,पण अमरापूरकर हे त्या दृष्टीने नशीबवान कारण ते अशा काळात अभिनय क्षेत्रात आले कि जेव्हा अभिनेत्याच्या कुळा पेक्षा नि सौंदर्यापेक्षा त्याच्या अभिनय कर्तुत्वाला दाद देणारा प्रेक्षक उपलब्ध होता.

नगर सारख्या तेव्हाच्या निमशहरी गावातून येऊन त्यांनी थेट मराठी नाट्य चित्रपट व्यवसायात आणि हिंदी सिनेमा जगात जे कर्तुत्व आणि नाव कमावले त्याला तोड नाही.आपल्या पहिल्याच “अर्धसत्य” या हिंदी सिनेमात फिल्मफेयर सारखे सिने जगतातील मानाचे पारितोषिक मिळवत त्यांनी तेथे राखीव अशा ए श्रेणीच्या अभिनेत्यांच्या पंगतीत स्थान मिळवले.अमरापूरकारांचे वैशिष्ट्य असे कि , हिंदी सिनेमात तगडे मानधन घेत असतांना देखील त्यांनी मराठी रंगभूमी आणि सिनेमांत जसा वेळ उपलब्ध असेल तेव्हां काम केले.

आजकाल मराठीतून हिंदीत गेलेले किंवा मराठी भाषिक असून देखील फक्त हिंदीत काम करतांना मराठीत काम केले तर ,आपले हिंदीतील मानधन कमी होईल हि भीती वाटणारे असंख्य कलाकार आहेत . उदा.माधुरी दीक्षित,श्रेयस तळपदे वगैरे ..ते मराठीत काम करत नाहीत कारण  हिंदीत टॉपला असतांना केवळ मराठीत काम करण्याने हिंदीत कमी मानधनाचा धनी होण्याची भीती  त्यांना सदैव भेडसावते.किंवा त्यांचे करियर उतरणीला लागल्यावर “ मला चांगला रोल मिळाला तर ,मराठीत काम करायला देखील आवडेल “ वगैरे सारखी फालतू कारणे ती लोकं देतात पण अम्रापूरकरांना असे फालतू प्रश्न कधीच पडले नाही.कारण त्यांचा स्वतःवर ,स्वतःच्या अभिनयावर इतका दांडगा विश्वास होता कि ते एकाच वेळी मराठी आणि हिंदीत अतिशय सहजगत्या वावरायचे.त्यांनी त्यांच्या स्टारडमचे कधीही अवडंबर माजवले नाही.सामन्यांमधील असामान्य वावर कसा असावा ते आजच्या पिढीच्या अभिनेत्यांनी यांच्या कडून शिकावे.
त्यांचा आजचा सीन हा १९८७ च्या अमिताभच्या सुपरहिट ‘आखरी रास्ता” मधून घेतलाय.आपल्या हिंदीतल्या व्हिलन म्हणून कारकिर्दीला त्यांनी इथून सुरवात केली होती.खलनायक म्हणून हा त्यांचा जरी पहिलाच सिनेमा होता आणि समोर अमिताभ जरी होता तरी त्यांनी ,या सिनेमावर आपली इतकी छाप सोडलीये कि ज्याचं नाव ते. तुम्हांला देखील फक्त या छोट्याशा प्रसंगातून ती जाणवेल असा विश्वास आहे...  

सोमवार, १ जानेवारी, २०१८

अशोक सराफ , नाना पाटेकर , १ जानेवारी ,जन्मदिवस

आज तारखे प्रमाणे नूतन वर्षारंभ ...

आज १ जानेवारी हा अशोक सराफ , नाना पाटेकर आणि जैकी श्रॉफ यांचा जन्मदिवस...  त्या तिघांना मनःपूर्वक शुभेच्छा... आज अशोक आणि नानाचे  मी अनुभवलेले दोन किस्से या निमित्ताने ...


अशोकला मी प्रत्यक्षात बघितले होते १९८५-८६ साली  त्याच्या छक्केपंजे या मराठी सिनेमाच्या शुटींगच्या वेळी ,पुण्याच्या डेक्कनवरच्या  सध्याच्या जगन्नाथ राठी इन्स्टीट्यूट मध्ये. त्या वेळी त्याच्या शॉटला अजून थोड अवकाश होता आणि तो निवांतपणे एका झाडी खाली ,योगायोगाने आमच्या जवळच खुर्चीतच  बसला होता आणि आजूबाजूला असणारी तुरळक गर्दी न्याहाळत होता.त्याच्या चेहऱ्यावर अतिशय निश्चल ,निवांत किंवा काहीसे गंभीर किंवा क्वचित काहींच्या मते थोडे शिष्ट ,आगावू वाटणारे असे म्हणले तरी चालेल असे भाव होते.ते भाव  पाहता , हा माणूस या नंतर अगदी थोड्या वेळात  कॅमेर्या पुढे जाऊन विनोदी शॉट देणार आहे असे त्या वेळी मला जरा सुद्धा वाटत नव्हते.

पण थोड्याच वेळात दिग्दर्शक व्ही के नाईक यांनी इतर सहकलाकारांची रिहर्सल घेऊन याला यायला सांगितले आणि इतकावेळ बोली भाषेत ज्याला मढ म्हणतात तसं तोंड करून बसलेला अशोक, डायरेक्टरने  “एक्शन” म्हणताच असा काही सुटला कि आम्ही ते बघून चकणेच झालो. शॉट पहिल्याच टेकला ओ.के.झाला...

मराठी आणि हिंदी मध्ये याने पुढे इतके मोठे नाव  मिळवले ते त्याच्या याच अफलातून अदाकारीवर ...

दुसरं किस्सा आहे नाना पाटेकरचा... याला त्याच्या तरुणपणी प्रत्यक्षात बघायचा योग मला कधी आला नाही ,पण आमच्या मित्राच्या परिचयातील पुण्यातील पेरुगेटा  जवळील मंदार भोपटकरांच्या घराची डागडुजी,किरकोळ रिनोवेशनचे काम करतांना अपघाताने मला नानाचे पुण्याच्या बाजीराव रोडवरच्या बँक ऑफ महाराष्ट्रचे द.म.अवघे १०० रु.च्या रिकरिंग अकौंटचे पासबुक हाती लागले होते.नाना हा मंदार भोपटकरांचा पुण्यातला स्नेही ...  हि घटना आहे साधारण ९६-९७ मधली..  पासबुक मात्र जुने होते ,नानाचे नाव व्हायच्या अगोदरचे म्हणजे तो नाटकात होता तेव्हाचं.त्या पासबुकात  ते रिकरिंग चालू केल्यानंतर साधारण फक्त ४-५ एन्ट्रीच केल्या गेल्या होत्या. पुढे नाना बहुदा अंकुश,परिंदा नंतर मुंबईला शिफ्ट झाल्याने ते बंद पडले होते... आणि ९६-९७ पर्यंत नाना हिंदी सिनेमात बडं प्रस्थ झाला होता.

पण त्याचं ते त्या वेळच १०० रुपयाच रिकरिंग अकौंट बघून मला तेव्हा खूप गम्मत वाटली होती. ते पासबुक मी “ हे बघा “ असं म्हणत भोपटकरांना सुद्धा दाखवले होते.. पण ते नानाचे चांगले परिचित असल्याने त्यांना त्याचे काही विशेष वाटले नव्हते....
“ कुणाचंच ? नानाचंय ना ? मग बोलायला नको !”
पण  हे सांगतांना त्यांच्या डोळ्यातले  मिश्कील भाव मात्र तेव्हां बरचं काही  सांगून गेले ... 


नानाला आजच्या दिवशी त्याच्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा... आणि अशोकचा एक विनोदी सीन आणि नाना-जैकीचा परीन्दातील एक सीन त्या निमित्ताने..  ↓   
  👍