भोज्जा

बुधवार, ८ ऑगस्ट, २०१८

Kai Bar Yun Hi Dekha Hai

पालकांना नको असलेलं मूल जन्माला यावं ,त्यांनी जग रहाटी म्हणत त्याचं संगोपन करावं आणि एक दिवस त्यानं ध्यानीमनी नसतांना दैदिप्यमान यश मिळवत बोर्डात प्रथम यावं आणि  हे यश केवळ मला पालकांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे मिळालं आणि मी त्यांचा सदैव ऋणी राहीन,हे यश त्यांचं आहे अशी मीडियाला सर्वप्रथम प्रतिक्रिया द्यावी... आता अशावेळी त्या पालकांचे चेहरे त्यानंतर एकमेकांच्याकडे बघतांना काय होत असतील याची फक्त कल्पना करा.     

वास्तव जीवनात या सदृश प्रसंग १९७२ साली घडला आहे . 

दिग्दर्शक बासू चॅटर्जी *रजनीगंधा* सिनेमा बनवत होते.. केवळ २-३ लाखात हा माणूस चांगला सिनेमा बनवतो व त्यावर पैसे मिळू शकतात म्हणून अमेरिकेतील २ तरुणांनी भागीदारीत निर्माता म्हणून याच प्रॉडक्शन सुरु केलं.बासूदांनी स्वतःचे बंगाली वजन वापरत सलील चौधरींना त्या साठी संगीतकार नेमलं आणि लताच्या आवाजात प्रथम "रजनीगंधा फूल तुम्हारे " हे गाणे रेकॉर्ड केले.. त्याचे शूट पूर्ण झाले .. सिनेमाचे इतर शूट सुद्धा दरम्यानच्या काळात वेगात सुरूच होते कारण सर्व अभिनेते नवीन असल्याने तारखांचा प्रश्नच नव्हता. चित्रपट संपत आला व आता केवळ एक गाणे लताच्या आवाजात रेकॉर्ड करावयाचे बाकी होते...जे पडद्यावरनायिकेवर बॅकग्राउंडवर दिसणार असल्याने ज्याचे शूट गाण्या आधीच संपले होते. 

गाणे करण्यासाठी बासुदांनी निर्मात्याद्वयाला लताजींचे त्या वेळच्या एका गाण्याचा त्या घेत असलेल्या मोबदल्याचे ३ हजार रुपये पाठवायला सांगितले. ३००० हि रक्कम त्या काळी खूप मोठी होती ... निर्माते नाराज झाले. त्यांना वाटले ,हे पैसे म्हणजे वेस्ट ऑफ मनी होतोय...कारण गाणं तसं ही बॅकग्राउंडलाच आहे आणि त्यातून जर अगदी करायचेच असेल तर कमी पैशात गाणारी दुसरी गायिका घ्या किंवा दोन हजारात जे कोणी गाईल त्याच्याकडून ते गाऊन घ्या असे त्यांनी कळवले.   पण हे गाणे लताजींनी गाणेच  गरजेचे आहे कारण ते नायिकेच्या मनाची उलघाल दाखवणारे आहे असे चित्रित होणार हे बासुदांनी त्यांना पटवून सांगायचा प्रयत्न केला पण व्यर्थ.निर्मात्यांनी दोन हजार रुपये पाठवून दिले व यांतच काय ते भागवून घ्या सांगितले..बासुदांची आता मात्र पंचाईत झाली..   

आता नवीन गायिका शोधून ऐन वेळेला प्रयोग कुठला करायचा म्हणून बासुदांनी सलील चौधरींना त्यांची झालेली गोची कानावर घातली.. ते सुद्धा सर्व कहाणी  ऐकून थक्क झाले.कारण लता हे गाणं करतीये असं ते जवळ-जवळ शेवट पर्यंत समजत होते... शेवटी केवळ नाईलाज म्हणून त्या काळी २००० रुपये प्रति गाणे मोबदला घेणारे मुकेश यांना रेकॉर्डिंगला पाचारण केले व त्यांच्या आवाजात ते रेकॉर्ड झाले.त्या काळी दोन हजाराचे मोल सुद्धा किती मोठे होते ते सांगतो म्हणजे समजेल. या चित्रपटाची नायिका विद्या सिन्हा हिला या सिनेमाचा एकूण मोबदला म्हणून रुपये ५०००/- देण्यात आला होता.      

पण या गाण्याचे  नशीब बघा या गाण्याला १९७३ साली सर्वोत्कृष्ट पार्शवगायनासाठी म्हणूनचा मुकेश यांना त्यांच्या आयुष्यातील पहिला-वहिला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला.मुकेशजींनी त्यासाठी सलिलदा आणि बासूदा यांचे त्यावेळी त्यांना इतके सुंदर गाणे गायची संधी दिल्याबद्दल जाहीर आभार मानले...आता नुसती कल्पना करा बासूदा आणि सलिलदा यांची  त्या क्षणी एकमेकांच्या कडे पाहतांना काय गोची झाली असेल...पण जी होती  ती सत्य परिस्थिती त्यां दोघांनी  मुकेश यांना शेवट पर्यंत कानावर घातली नाही.किंबहुना त्यांचे मुकेश जिवंत असे पर्यंत उभ्या आयुष्यात ते धाडसच झाले नाही.

आज  हे सगळं रामायण सांगायचं कारण म्हणजे या गाण्यांत पडद्यावर  विद्या बरोबर दिसणारा नट दिनेश ठाकूर याचा ८ ऑगस्ट हा जन्मस्मृतिदिन आहे. राजस्थान मधे जन्मलेल्या दिनेशने दिल्लीतून अभिनयाचे प्रशिक्षण घेत हिंदी सिनेमांत चरित्र भूमिका केल्या व मुंबईतील पृथ्वी थिएटर्सच्या एकूणच जडणघडणीत याचे निर्माता,अभिनेता,दिग्दर्शक म्हणून फार मोठे योगदान होते... वयाच्या ६५व्या वर्षी हा गेला सुद्धा... असो.. आता *ते* गाणे बघू... 
आजच्या लेखासाठी अनिता पाध्ये यांच्या "यही है जिंदगी" या पुस्तकाचा संदर्भ घेतला आहे. धन्यवाद अनिताजी.   


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा