भोज्जा

सोमवार, ९ मे, २०११

"कोई चुपके से आ के, सपने सुला के,...चा "अनुभव"

"कोई चुपके से आ के, सपने सुला के,मुझ को  जगा के बोले.... कि मै आ रहा हूँ !  कौन आये,ये मै कैसे जानू ? "  वा ! काय कमालीचे शब्द आहेत.अहो  असे अर्थपूर्ण नि आशयघन शब्द गीता दत्त साठी  फ़क्त कपिल कुमारच लिहू शकतो. तो सत्तरीचा काळच काही वेगळा होता कि असे नि ह्या प्रकारचे किती तरी ओघवते काव्य त्या वेळी रसिक श्रोत्यांच्या कानावर येऊन ठेपत असे.खरे तर त्याचे रसग्रहण करण्याची नीटशी संधी सुद्धा त्या काळी त्या पिढीला मिळाली नाही.कारण उत्तमात उत्तम आंबेमोहोर अगदी मुबलक पणे बाजारात मिळत असेल तर अगदी बासमती सुद्धा क्षणभर बाजूला पडतो  नि रेशनच्या जाड्या भरड्या तांदळा साठी  तर कोण कशाला रांग लावेल असा तो काळ..... त्यां मुळे इतकी अर्थपूर्ण नि रसाळ काव्ये तेव्हा गाण्यांच्या रूपाने इतकी लागोपाठ रसिकां समोर यायची कि त्यात सुद्धा नाईलाजास्तव थोडे  डावे उजवे करावे लागायचे.,नव्हे आपोआप व्ह्यायचे.
आज ह्या गोष्टीची आवर्जून आठवण व्हायचे कारण म्हणजे सकाळीच न्हाव्याकडे कटिंगला गेलो असता "लोकसत्ताची" लोकरंग पुरवणी वाचनात  आली.तसे आमचे पवार सलूनवाले सुद्धा रसिकच,त्या मुळे बोलबोलता विषय निघाला नि थेट ७० सालात जाऊन पोहोचलो.आजच्या लोकरंग मध्ये ह्या गाण्या विषयी वाचनात आले नि तो सुवर्ण काळ आठवला.
हे गाणे १९७१ साली आलेल्या संजीव कुमार,तनुजाच्या "अनुभव"चित्रपटातील.हां चित्रपट त्या काळातील लो बजेटचा एक क्लासिकल पीस.समांतरच्या जवळ जाणारा,  पण लोकाभिमुख असलेला.मुळात बासू भट्टाचार्यचा 'स्त्री पुरुष संबंध"नि पती पत्नीच्या विसंवादातून ताणले गेलेले वैवाहिक जीवन हां आवडता नि हातखंडा विषय.चित्रपटाची कथा तर तयार होती पण बजेट सगळ्याच दृष्टीने अगदीच तुटपुंजे होते.शेवटी तनुजा ... म्हणजे आपल्या काजोलची आई नि अजय देवगणची सासू पदर खोचून "कार्याला" पुढे झाली.संजीव कुमार अजून तसा पूर्ण एस्टॅब्लिश व्हायचा होता पण त्याचा संवेदनक्षम अभिनेता हा दर्जा तेव्हाही वादातीतच होता.त्या मुळे त्याची चित्रपटाचा हिरो म्हणून नि तनुजाची हिरॉइन म्हणून निवड झाली.बजेट इतके यथातथा होते कि अगदी स्टुङिओचे भाडे सुद्धा "परवडेबल" नव्हते,त्या मुळे ह्याचे शुटींग सुद्धा तनुजाच्या त्या वेळच्या रहात्या फ्लॅट मधेच केलेय. आता इतक्या मारामारी नंतर चित्रपटाच्या संगीता साठी मोठे  नाव थोडेच येणार होते ? बासूने बंगालीतील कानू रॉयला ह्याचे म्युझिक करायला दिले... पण जणू एका अलिखित अटीवर ... कि कमीत कमी म्युझिशियन नि त्या मुळेच अर्थात कमीत कमी  वाद्ये ह्या साठी वापर हे सांगून.त्या मुळे ह्या चित्रपटातील सर्व संगीत आपणास जर कधी ऐकण्याचा योग आला तर ती  जरूर ऐका.फक्त बासरी,सतार नि पियानो ह्या जोड वाद्यांना घेऊनच ह्याचे संगीत तयार झाले आहे. त्यात हि " मुझे जाँ ना कहो मेरी जाँ " हे गाणे तर आवर्जून कधी ऐका.हे गाणं तर कुठल्याही वाद्यवृंदा शिवाय केवळ व्हायब्राफोन नि एक तालवाद्य ह्यांच्या मदतीने तयार झाले आहे. ह्या चित्रपटातील गाणी म्हणजे गुलझार नि कपिलकुमार ह्यांच्या ह्या खरे तर कविताच आहेत पण कानू रॉयच्या सुरावटींनी हे शब्द अधिक भिडले आहेत.  
ह्या गाण्यात तनुजा सोबत दिसणारा तरुण हा दिनेश ठाकूर आहे.सत्तरीच्या दशकातील एक नियमित दाढी राखणारा नि नाटकातून सिनेमात आलेला  एक चांगला अभिनेता.पण हा पुढे जाऊन लुप्त झाला.हा इथे नि बासू चटर्जीच्या "रजनीगंधात' विद्या सिन्हा बरोबर सेकंड लीड मध्ये दिसला तेवढाच, खरं तर पोटेन्शियल असून हि  ह्याची कारकीर्द अभिनेता म्हणून फार काही बहरू शकली नाही.असो.
चला…. गाण्याच्या निमित्ताने निदान तेव्हाच्या तनुजाच्या फ्लॅटमध्ये तर जाऊ. चला तर मग येताय  नां  
ह्या लेखासाठी श्री.सुनील देशपांडे ह्यांच्या दै.लोकसत्ताच्या "लोकरंग" मधील लेखाची अमूल्य मदत झाली आहे. देशपांडे साहेब धन्यवाद.व्हीडिओ  सौजन्य यु ट्यूब              
  

२ टिप्पण्या:

  1. खरे तर ह्या व्हिडीओची पिक्चर क्वालिटी तितकीशी चांगली नाहीये पण काही गाणी हि प्रेक्षणीय पेक्षा श्रवणीय जास्त असतात..... त्या पैकी हे एक...

    उत्तर द्याहटवा
  2. ह्या पोस्टचा ह्या गाण्याचा पहिला व्हीडिओ हा युट्यूबने काढून टाकला असल्याने आज हा अधिकृत शेयर केला गेलेला व्हीडिओ ह्या पोस्ट सोबत जोडला आहे.ह्या व्हीडिओ च्या सौजन्याबद्दल युट्यूब आणि गीतांजली,wwwgeetaduttcom01's Channel ह्यांचे धन्यवाद.

    उत्तर द्याहटवा