भोज्जा

गुरुवार, २६ एप्रिल, २०१८

"रिमझिम गिरे सावन" वाली मौसमी चॅटर्जी

आज २६ एप्रिल ,मौसमी चटर्जी आज सत्तरीची झाली...”शतायुषी भव !” अशी तिला हार्दिक शुभेच्छा ! ... 

तिचा आणि  अमिताभचा  “मंझिल” पिक्चर तुम्हाला आठवतोय ? हो तोच “रिम झिम गिरे सावन “ फेम... ! आज त्या सिनेमाच्या निर्मितीच्या कहाणी  सोबत त्याच्यातील त्या  हिट गाण्याच्या शूटिंगच्या वेळची  अधिकृत कहाणी ... तुमच्या साठी ...  

मंझिल पिक्चर रिलीज जरी १९७८-७९  ला झाला तरी मुळात तो  प्रचंड रखडलेला पिक्चर होता...त्याचे शूटिंग “जंजीर”(१९७२) यायच्या अगोदर म्हणजे  अमिताभ जेव्हा कोणी ही नव्हता तेव्हा सुरू झाले होते.. अमिताभला हा पिक्चर जया भादूरीने त्याच्यावरच्या प्रेमापोटी तिचे वजन वापरुन, दिग्दर्शक बासू चटर्जीला अमिताभला घ्यायची गळ घालून मिळवून दिला होता...त्यात अमिताभचे क्रेडिट शून्य होते...  पण नेमके झाले असे कि, जंजीरच्या अगोदरचे  अमिताभचे तेव्हाचे आलेले जवळपास सगळे पिक्चर इतके सपाटून आपटले की,या पिक्चरच्या निर्माता त्रिकुटाने सिनेमाचे थोडेफार शूटिंग झालेले असताना सुद्धा सगळेच पैसे डुबायचा धोका नको म्हणून इतर निर्मात्यांनी जसे अमिताभ सोबतचे सिनेमे त्या काळी  बंद केले होते तसा त्यांचा हा सिनेमा देखील डबा बंद करून टाकला कारण निर्माते म्हणून एकतर त्यांचा हा पहिला सिनेमा ,आणि तो सुद्धा त्यांनी बासू चटर्जी केवळ कमी पैशात सिनेमा करतो म्हणून सुरू केलाला असा ...

पण १९७२ ला अमिताभचा प्रथम जंजीर आला नंतर ७३ला मजबूर,७५ला दीवार आणि नंतर शोले आला आणि सगळी गणितच बदलून गेली...नुसत्या अमिताभच्या एकट्याच्या नावावर पिक्चर चालायचे दिवस आले... त्या मुळे  त्या मंझिलच्या निर्माता त्रिकुटास त्यांनी  त्यांच्या डबाबंद केलेल्या  पिक्चरची आठवण झाली .... त्यांनी बासूला गळ घालत,अमिताभचे पाय धरत  पुन्हा पिक्चर सुरू करायला लावलं आणि त्या मुळेच निर्मिती दरम्यान मधे प्रचंड गेलेला कालावधी हा चित्रपट पहाताना लगेच लक्षात येतो... सुरवातीचा अमिताभ आणि सुरवातीची मौसमी यांच्या तब्येती आणि नंतरच्या तब्येती यात बर्‍यापैकी तफावत आहे तर असा  हा निर्मिती दरम्यानचा  कंटीन्यूटी नसलेला अमिताभचा  पिक्चर १९७९ला रिलीज झाला आणि विशेष म्हणजे निर्मात्याचे “अमिताभ लाटेत “ फक्त त्याच्या एकट्याच्या नावावर उखळ पांढरे करून गेला...

त्याच सिनेमातील गाजलेले हे खालील गाणे “रिम झिम गिरे सावन “ मौसमीला आणि अमिताभला जेव्हा पब्लिकला ओळखता येत नव्हते  तेव्हाचे होते ... ते गिरगाव चौपाटी आणि फोर्ट मधे सलग तीन दिवसाच्या खर्‍याखुर्‍या पावसात शूट झाले होते ...त्या वेळचे वैशिष्ट्य म्हणजे अमिताभ हा पडेल हीरो म्हणून निर्मात्यांमध्ये अप्रिय होता पण त्या काळातील इतर हिरोइन्सला मात्र  तो जया (भादूरी)ची प्रॉपर्टी आहे हे माहीत असून ही त्यांच्या साठी तो  “ हॉट प्रॉपर्टी” होता...आणि मौसमी सुद्धा त्याला अपवाद नव्हती...ती पण अमिताभवर लट्टू होतीच त्या मुळे  तिचे आणि अमिताभचे सूर सुद्धा  त्या काळी मस्त  जमले होते. 

या गाण्याच्या  शूटिंग तिसर्‍या म्हणजे शेवटच्या दिवशी ते जवळपास संपत आले असताना दुपारच्या लंचब्रेक मधे मौसमी दिग्दर्शक बासू चटर्जी जवळ बोलली कि , “हे इतके मस्त जमून आलेले प्रेमगीत पडद्यावर हीरो-हिरोईन गाताहेत असं तुम्ही दाखवणार आहात पण केवळ हात हातात घेण्या पलीकडे त्यांच्यात असणारी जवळीक पडद्यावर  व्यक्त होतांना दिसत नाहीये .. त्या मुळे त्यांच्यातील प्रेम दाखवण्या साठी गाण्यात अमिताभने मला किमान उचलून घेतलय एवढं तरी तुम्ही दाखवाच... मला ते  या गाण्यात  हवय ... तिने जणू हट्टच धरला .....

आता बासूची पंचाईत झाली ..कारण एक तर मौसमी पडली सिनेमाची नायिका ... त्यातून तिने स्वतःहून ही केलेली मागणी पण  सिनेमाच्या स्टोरीत मात्र नायक-नायिकेची अशी अंगाची झटा-झटी  अपेक्षित नाही कारण नायक –नायिका एकमेकाला प्रथमच भेटत असल्याने त्यांची इथवर मजल गेलेली दाखवणे हे  गाण्यात दाखवता येत  नव्हते ... पण तिकडे मौसमी तर हटून बसलेली ... या सगळ्या मधली सर्वात महत्वाची गम्मत म्हणजे  इकडे अमिताभला ,म्हणजेच चित्रपटाच्या नायकाला  दिग्दर्शक आणि नायिके मधे काय शिजतय ह्याच्यातील ओ का ठो माहीत नाही ... तो पूर्णपणे अनभिज्ञ ... आणि बासूला  ते  अमिताभ जवळ सुद्धा बोलता येईना... शेवटी त्याने सुवर्ण मध्य साधत गाण्यात अमिताभने मौसमी त्या फोर्ट मधील समुद्र कठड्या वरून चालताना तिला   हात देत व नंतर  वरुन खाली उतरवताना तिला उचलून खाली ठेवले आहे असे  गाण्यात दाखवले व दिग्दर्शक या नात्याने त्याच्या नायिकेचा “हट्ट” पूर्ण केला ... गाण्यात तो प्रसंग साधारण पावणे दोनव्या मिनिटाला येतो...आणि तो जसा घडला तसाच ठेवलाय....  पहा तर मग...

मला माहितीये ,हे गाणे तुम्ही आजवर बर्‍याचदा ऐकले आणि बघितले आहे पण आता त्या अमिताभने मौसमीला “उचलून घेतलेल्या” शॉट साठी तुम्ही ते आत्ता परत पहाणार ...

आजच्या लेखासाठी अनिता पाध्ये यांच्या "यही है जिंदगी" या पुस्तकाचा संदर्भ घेतला आहे... हिंदी सिनेमाची आवड असणाऱ्यांनी एकवार जरूर वाचून संग्रही ठेवावे असे मराठी पुस्तक... धन्यवाद पाध्ये मॅडम ...  

मंगळवार, २४ एप्रिल, २०१८

पू S S रे पचास हजार !!! हीच याची ओळख ...


न्यूयॉर्कच्या विमानतळावरील एका अमेरिकन इमिग्रेशन ऑफिसरने मागे एकदा जेव्हा “शोले” मधील   “सांबा “ म्हणून मॅकमोहनला ,त्याचा पासपोर्ट न बघताच लगेच ओळखले होते  तेव्हा त्याच्या बायकोचा म्हणजेच  “मिनी”चा ऊर अभिमानाने नक्कीच भरून आला असणार यात शंका नाही... पण त्या मागची खरी कहाणी काही वेगळीच होती...      
पू S S रे  पचास हजार !!! या शोलेतल्या केवळ तीन शब्दांनी ज्याची “सांबा” म्हणून  जगभर ओळख निर्माण झाली  त्या  शोलेच्या शूटिंगसाठी  मॅकमोहनने  मुंबई- बंगलोर च्या तब्बल २७ वार्‍या केल्या होत्या ...त्या काळी एका मल्टी स्टारकास्ट फिल्म मध्ये मोठा रोल मिळाला म्हणून तो बेहद्द खुश होता ... शोले मधल्या त्याच्या रोलवर त्याचे करियर खूप काही अवलंबून असल्याची त्याला पूर्ण जाणीव होती ... पिक्चर रिलीज व्हायची तो सुद्धा वाटच बघत होता , पण पिक्चर वाजवी पेक्षा खूपच मोठा झाल्याने सांबाच्या रोलला ,रमेश सिप्पीला नाइलाजाने कात्री लावणे भाग पडले...पण हे मॅकला तो पिक्चर बघितल्यावरच समजले आणि त्या मुळेच  १९७५-७६ साली मिनर्व्हा मधून शोलेचा प्रिमियर पाहून बाहेर पडतांना मॅकमोहन प्रचंड नाराज आणि निराश झाला होता...रमेश सिप्पी त्याची नाराजी जाणून होता आणि त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न करत होता पण..... तो त्या वेळी कुणाचे ,काहीच ऐकून घ्यायच्या मनःस्थितीत नव्हता .... पण त्या पू S S रे  पचास हजार !!! या ३ शब्दांनी नंतर  त्याचे उभे आयुष्य बदलून गेले... सांबा हीच  त्याची पुढील आयुष्यात ओळख बनली....  व तो भारतीय प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहिला ...      

पूर्वी  एकदा मॅकमोहन सहकुटुंब पुण्यात आला असता ,कुठूनशी तो अमुक-अमुक हॉटेलमध्ये उतरलाय अशी लोकांना खबर लागली... बघता-बघता हॉटेल बाहेर इतकी गर्दी जमली की, सांबा-सांबा अशा आरोळ्यांनी परिसर दुमदुमून गेला... शेवटी पोलिसांना बोलावून त्या गर्दीतून सांबाला व त्याच्या कुटुंबियांना बाहेर काढतांना नाकात दम आले ... शोलेच्या रिलीज नंतर इतक्या वर्षांनी सुद्धा मॅक मोहनची त्या छोट्याश्या रोल मधील इतकी प्रसिद्धी बघून त्याचे कुटुंबिय तेव्हा प्रचंड आश्चर्यचकीत झाली होते...

आज २४ एप्रिल हा मॅक मोहनचा जन्मदिवस .. तो आज जर असता तर त्याने ८१ व्या वर्षात आज पदार्पण केले असते... पण २०१० साली फुफ्फुसच्या कॅन्सरने  तो गेला.... १९३८ साली तेव्हाच्या अखंड भारतात तो कराची मध्ये एका मिलिटरी ऑफिसरच्या घरात जन्माला आला.भारत स्वतंत्र झाल्यावर प्रथम त्याचे कुटुंबीय लखनौला व नंतर मुंबईत येऊन स्थिरावले... मॅक मोहन सिनेमा क्षेत्रात तसं म्हणल तर अपघाताने आला कारण बर्‍याच जणांना हे माहीत नाही की, मॅक हा एक उत्कृष्ट क्रिकेटियर होता व त्याला क्रिकेट मध्ये करियर करण्यात रस होता.. पण मेव्हणा रवी टंडन    चित्रपट क्षेत्रात असल्याने त्याने सुद्धा ऍडिशनल नॉलेज अधिक थोडीफार आवड या नात्याने  अभिनयाचे रीतसर प्रशिक्षण घेतले व प्रथम अमिताभ-प्राण सोबत मजबूर मध्ये “प्रकाश” ची  व नंतर शोले मधली सांबाची भूमिका केली आणि पुढे त्याचे क्रिकेट चे  क्षेत्रच बदलून गेले. नव्वदी च्या दशकातील रविना टंडनचा तो नात्याने मामा लागत होता...

मॅक मोहन हिन्दी सिनेमा क्षेत्रातील अशा अभिनेत्यात मोडायचा की ज्याचे इंग्रजी भाषेवर अतिशय उत्तम प्रभुत्व होते... तो इंग्रजी अतिशय अस्खलित बोलू आणि लिहू शकत असे... रीडर्स डायजेस्ट हे त्या काळातील बुद्धिजीवी वर्गाचे मासिक त्याचे सर्वात आवडते मासिक होते... त्याच्या कुटुंबियांच्या मते म्हणे मॅकचा “ड्रेस सेन्स “ पुष्कळ चांगला होता  ...तो त्याचे कपडे अमेरिकेतील  लॉस एंजल्स किंवा मुंबईतील “कचीन्स” मधील “माधव” या त्याच्या ठरलेल्या शिंप्या कडूनच शिवत असे ...    त्याच्या खाजगी आयुष्या बद्दल सांगायचे तर त्याच्या तरुणपणी  त्याचे नाव बराच काळ गीता (सिद्धार्थ काक)  बरोबर जोडले जायचे ... ही गीता सिद्धार्थ म्हणजे तीच जी शोले मध्ये ठाकुर झालेल्या संजीव कुमारची थोरली सून म्हणून दाखवली गेली होती ती... पण त्यांचे लग्न झाले नाही... तिने नंतर “सुरभि” वाल्या सिद्धार्थ काक बरोबर लग्न केले आणि मॅक मोहनची लग्न गाठ जुहू मधील आयुर्वेदिक आरोग्य निधी हॉस्पिटल मधील  आयुर्वेदिक डॉक्टर असलेल्या डॉ. मिनी सोबत जमून गेली.... मॅकचे वडील त्यांच्या वार्धक्यात  ती काम करत असलेल्या हॉस्पिटल मध्ये   अॅडमिट असताना योगायोगाने मॅकचे आणि तिचे सूर जमून आले होते...व त्याचे “निदान” लग्नात झाले...    

एक यशस्वी संसार असे मॅकच्या संसाराचे थोडक्यात वर्णन करता येईल... त्याच्या दोन्ही मुली व मुलगा आज हिन्दी सिनेमात वेगवेगळ्या क्षेत्रात आपापला ठसा उमटवुन कार्यरत आहेत.... तर असा हा मॅक मोहन .... सिनेमात वरवर रफ अँड टफ ... टपोरी .. दिसणारा ,भासणारा....   पण वास्तवते मध्ये अतिशय बुद्धीमान आणि निराळा असणारा.... थोडक्यात काय तर दिसतं तसं नसतं हेच खरं....  वुई मिस यू  मॅक ...
आजच्या लेखासाठी साठी संदर्भ.. Actor Mac Mohan: Cricketer who became Sambha in Sholay आणि इंटरनेट ...                         
Read more at: http://www.merinews.com/article/actor-mac-mohan-cricketer-who-became-sambha-in-sholay/15884493.shtml&cp

शनिवार, २१ एप्रिल, २०१८

उत्तर हे नेहमी तुमच्या पाशीच असते...


एकदा एका राजाला राज्यकारभारात ३ महत्वाचे प्रश्न पडले की, कोणतेही कार्य सुरू करण्या अगोदर १) त्याची नेमकी वेळ कशी ओळखावी ? २)  ते  पार पाडण्यासाठी कोणती योग्य  माणसे नेमावीत आणि कोणती टाळावीत ?आणि सर्वात महत्वाचे म्हणजे   ३) ते अयशस्वी होऊ नये या साठी त्या-त्या  वेळी नेमके कशाला महत्व द्यावे ? ...या प्रश्नांवर  त्याने खूप विचार केला ,पण त्याला समाधानकारक उत्तर मात्र मिळाले नाही त्या मुळे शेवटी त्याने त्याच्या सल्लागारांना बोलावून घेतले.

सल्लागारांनी त्यांची आपापली मते सांगितली,पण राजाचे मात्र काही समाधान झाले नाही. शेवटी निराश होत राजाने मनाशी काही एक ठरवले नि एके दिवशी सकाळी-सकाळी काही मोजकी माणसे घेऊन तो दूरवर एका जंगलात गेला ... जंगलात आतवर गेल्यावर त्याने आपली ओळख पटू नये या साठी राजवस्त्रे उतरवून अतिशय साधा वेश परिधान केला, आणि  सोबतच्या सैनिकांना तेथेच थांबायला सांगून तो ,त्या जंगलात रहाणार्‍या एका कृश शरीरयष्टीच्या ज्येष्ठ साधू पुरुषा समोर उभा येऊन ठाकला.

राजा जेव्हा त्याच्या पाशी गेला तेव्हा ,तो साधूपुरुष त्याच्या हातात असलेल्या एका छोट्याशा कुदळीने ,त्याच्या झोपडी शेजारील जमीन उकरत होता...

राजाने त्याला प्रणाम करत त्याला पडलेले ते 3 प्रश्न  आता त्या साधू पुरुषाला विचारले आणि तो त्याच्या उत्तराची वाट पाहू लागला.. पण साधू पुरुषाने त्या कडे दुर्लक्ष करत आपल्या हातातील काम सुरूच ठेवले...पण थोड्याच वेळात  तो खूपच दमला आणि जमिनीत गेलेले कुदळ त्याला बाहेर काढता येईना.... हे बघून राजाने पटकन पुढे होत त्याला मदत करायच्या दृष्टीने साधू पुरुषाला  बाजूला व्हायची विनंती करत त्याच्या हातातील कुदळाचा ताबा घेत जमीन उकरायला सुरुवात केली... की, जेणे करून  काम झटपट संपेल व साधू त्याच्या प्रश्नांची उत्तरे त्याला देऊन मोकळा करेल... पण राजा स्वतः पुढे होऊन स्वइच्छेने मदत करतोय म्हणल्यावर काम वाढू लागले... 
बघता-बघता दुपार झाली ... अंगमेहनतीच्या कामाची सवय नसल्याने राजा सुद्धा दमला हे बघून साधू उठला.  त्याने झोपडीत जाऊन कंदमुळे आणि काही फळे आणली आणि ती राजासोबत बसून खात दोघांनी भूक भागवली... वर पाणी पिऊन झाल्यावर क्षणभर थांबत राजाने पुन्हा पहिले राहिलेले काम पूर्ण करायला  घेतले ...आणि  बघता –बघता उन्हं कलली आणि संध्याकाळची चाहूल लागली ... सरते शेवटी राजाच्या हातातील त्याचे काम संपले... 

आता आपल्याला आपल्या त्या सकाळच्या 3 प्रश्नांची उत्तरे हा साधू देईल या अपेक्षेने राजा आता  त्या  साधू पुरुषा सोबत  त्याच्या झोपडी पर्यन्त आला ,पण तेथे येऊन   तो समोर बघतो तर काय ?त्याला  झोपडी शेजारून  एक माणूस पोटावर हात ठेऊन काहीसा विचित्र चेहरा करत त्याच्या दिशेने येतांना त्याला  दिसला... राजाजवळ येताच  त्याने काही एक  बोलण्यासाठी तोंड उघडले पण  त्याच्या तोंडातून पटकन रक्ताची एक मोठी गुळणी बाहेर पडली...व त्याची शुद्ध हरपली...  राजाने पटकन त्याच्या जवळ जात बघितले तर त्याच्या पोटाला मोठी जखम झालेली  होती.. राजाने साधूच्या मदतीने त्याला पटकन झोपडीत नेले ,त्याच्या  जखमे वर  साधूने   दिलेला झाडपाला जवळच्या फडक्याने करकचून बांधला आणि त्याला साधूच्या शयन मंचावर झोपवले...

या सगळ्या भानगडीत वेळ मात्र इतका गेला की,बाहेर अंधार पडला...आणि  राजा सुद्धा  सकाळ पासूनच्या  मेहनतीने आता इतका दमला  होता की त्याने सुद्धा थोडी विश्रांती घ्यायच्या उद्देशाने तेथेच ,त्या झोपडीच्या दारातच थोडी पाठ टेकवली... आणि तेथेच बघता बघता राजाला गाढ झोप लागली...

राजा जेव्हा दुसर्‍या दिवशी सकाळी उठला आणि त्याने स्वतःला जेव्हा त्या झोपडीत बघितले नि समोरचा तो जखमी माणूस जेव्हा हात जोडून त्याची क्षमा मागतोय असे त्याला जेव्हा दिसले तेव्हा  त्याचे त्यालाच आश्चर्य वाटले नि,तो त्याचा कालचा दिन क्रम आठवू लागला ...

“मला मोठ्या मनाने क्षमा करा “ तो जखमी माणूस राजाला विनंती करत होता.. राजाला लक्षात येईना .. त्याला क्षमा करायचा त्याचा संबंध काय ?... त्या वर तो जखमी माणूस पुढे सांगू लागला ... आपण मला ओळखत नाही पण मी आपल्याला खूप चांगल्या प्रकारे ओळखतो ... आपण या नगरीचे राजे आहात हे मी जाणतो... मी आपल्या शेजारच्या शत्रू राज्याचा रहिवासी आहे.मात्र माझा भाऊ येथे तुमच्या राज्यात रहातो .  तुमच्या लोकांनी  त्यास खोट्या गुन्ह्या खाली  अटक करून त्याची संपत्ति जप्त केली आहे.  या गोष्टीचा  मला खूप राग आला होता ...त्यातच  काल, तुम्ही  येथे साधू महाराजांच्या कडे एकटेच येत आहात ही बातमी  मला समजली.त्यामुळे  ती संधी साधून  खरतर आपला खून करण्याच्या इराद्याने मी येथवर पोहोचलो होतो...पण वाटेत मला तुमच्या सैनिकांनी घेरले व त्यांना माझा हेतु लक्षात येताच त्यांनी मला भोसकले ... त्यांच्या तावडीतून कसाबसा मी सुटलो आणि तुम्हा पाशी इथवर कसाबसा पोहोचलो ... त्या नंतरचा इतिहास आपण जाणता ...

कृपया आपण मला क्षमा करा ... एका राज्याचा राजा असूनही माझ्या सारख्या एका अनोळखी पांथस्था सोबतचे आपले आपले कालचे वर्तन पाहून मला ही जाणीव  झाली की,मी काल फार मोठी चूक करत होतो... आपण माझ्या भावा संबंधी घेतलेला निर्णय हा योग्य असणार याची मला कालचा प्रसंग अनुभवता खात्री पटली आहे... आपण ,कृपया मला माझ्या उर्वरित आयुष्या करिता आपण मला आपल्या सेवेत  सामावून घेऊन एक प्रामाणिक सेवक म्हणून आपली सेवा करण्याची मला संधी द्यावी अशी आपल्या चरणी माझी नम्र प्रार्थना आहे. असे म्हणत त्याने राजाचे पाय धरले...

राजाने त्याची कहाणी ऐकल्यावर त्याच्या सेवकांना बोलावून घेत ,त्याच्या पुढील औषधोपचारची व्यवस्था करायला सांगत त्याची स्वतःच्या राज्यात रवानगी करायची व्यवस्था केली... एका शत्रूचे आपल्या मित्रात झालेले रूपांतर बघितल्याने राजा प्रसन्न झाला ,आणि त्या नंतर त्याने त्या साधू पुरुषाला नमस्कार करत तेथून प्रस्थान करायचे ठरवले... ...

निघतांना एक शेवटचा प्रयत्न म्हणून त्याने त्या साधू पुरुषास त्याच्या त्या ३ प्रश्नांची पुन्हा एकवार उत्तरे विचारावीत असे मनाशी ठरविले... कारण ज्या साठी तो इथवर आला होता  त्याची उत्तरे त्याला अजून मिळाली नव्हती... म्हणून तो त्या साधू पुरुषा समोर येऊन उभा राहिला ...

साधू पुरुष हसला आणि म्हणाला ,राजा ,तुला तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे कालच मिळाली आहेत... तू  काल जर येथे न थांबता आल्या पावली जर तसाच निघाला असतास तर तुझ्यावर हल्ला झाला असता,पण त्या वेळी तुला माझी दया आली व  मला रोपे लावायला मदत व्हावी या हेतूने जमीन खोदाईचे काम तू येथे करत बसलास  ... जे त्या वेळी तुझ्यासाठी सर्वात महत्वाचे होते...
त्या नंतर संध्याकाळी जेव्हा तो माणूस तुझ्याकडे धावत आला, खाली पडला आणि तू त्याला जी त्या नंतर मदत केलीस ती खूप महत्वाची होती कारण ती मदत त्याला वेळेत मिळत नव्हती तर त्याचा जीव वाचणे कठीण होते.. म्हणजे तो माणूस त्यावेळी तुझ्या साठी फार महत्वाचा होता ... आणि त्याच्या साठी त्यावेळी तू जे काही केलेस ते काम तुझ्या साठी फार महत्वाचे होते..
त्या मुळे नेहमी लक्षात ठेव की,प्रत्येकवेळी  वेळ ही फार महत्वाची असते..कारण फक्त तेव्हाच तिचा उपयोग करण्याची तुम्हाला संधी असते आणि त्या-त्या  वेळी जी व्यक्ति तुमच्या सोबत असते  फक्त तीच  व्यक्ति त्या वेळी तुमच्या साठी महत्वाची असते...

जसे लियो टॉलस्टॉयच्या   “थ्री क्वेश्चन्स” या कथेचा  स्वैरानुवाद आत्ता या क्षणी तुम्ही इथे अगदी मन लाऊन वाचताय ,म्हणजे हेच काम आत्ता याक्षणी तुमच्या साठी महत्वाचे होते आणि त्याला निमित्त मी झालोय म्हणजे........     
  
धन्यवाद ::::
        


बुधवार, ११ एप्रिल, २०१८

माशाने गिळलेले माणिक : प्रिया राजवंश

समुद्रातील माशाने गिळलेले माणिक जसे पुन्हा कधी मिळू शकत नाही तसे काहीसे हिच्या म्हणजे प्रिया राजवंशच्या  आयुष्याचे झाले... *अभिनेत्रीचा बाथरूम मधील संशयास्पद मृत्यू* याचे  प्रिया राजवंश हे    हिंदी  सिनेमा सृष्टीतील पहिले उदाहरण आहे. १९७०- ८० च्या दशकात अवघ्या ६ सिनेमांतून दिसलेली पण तेव्हाच्या लोकांच्या  तरीही  लक्षात राहिलेली आणि पडद्यावरच्या पेक्षा प्रत्यक्षात जास्त सुंदर,देखणी आणि खानदानी दिसणारी आणि असणारी ही अभिनेत्री.     

सिनेअभिनेत्री असूनसुद्धा प्रिया तिच्या चित्रपट कारकिर्दी पेक्षा प्रेक्षकांच्या स्मरणांत मात्र भलत्याच कारणानें लक्षात राहिली हे मात्र तितकेच खरे.  त्याचे कारण म्हणजे यशस्वी आणि उत्कृष्ट  लिव्ह इन रिलेशनशिप चे भारतीय चित्रपट सृष्टीतील एकमेव उदाहरण म्हणजे प्रिया राजवंश-चेतन आनंद हि जोडी. तसे बघितले तर दोघांच्या वयात तब्बल १६ वर्षांचे अंतर पण तरी हि ३० वर्षाहून अधिक काळ म्हणजेच चेतन आनंदच्या मृत्यू पर्यंत चेतन आनंद-प्रियाचे  नाते अतिशय अतूट आणि अभेद्य राहिले.त्यातल्या प्रिया राजवंशाचा मागच्या महिन्यात २७ मार्चला १८ वा स्मृतिदिन होता.  
  
प्रिया राजवंश चा हिंदी सिनेमांत प्रवेश तसा म्हणला तर अपघातानेच झाला.कारण सिमल्या सारख्या नयनरम्य ठिकाणी स्वातंत्र्यपूर्व काळात फॉरेस्ट ऑफिसर म्हणून काम करणाऱ्या सुंदर सिंग यांची हि मुलगी ,हिचे खरे नाव "वीरा" सिंग. त्यांच्या कुटुंबाचा आणि चित्रपट क्षेत्राचा दूर-दूर संबंध नव्हता.पण सिमल्यात कॉलेजमध्ये शिकतांना इंग्रजी नाटकातून कामे करत हि कॉलेजचे सेन्सेशन बनली आणि कॉलेजातील मुलेच ,हि पुढे जाऊन हिंदी सिनेमांत आघाडीची अभिनेत्री होणार अशी अटकळ बांधायला लागले. पण झाले भलतेच.

हिच्या वडिलांची इंग्लंड मध्ये बदली झाली नि हि लंडनला गेली. तिथे नाट्यक्षेत्रातील डिप्लोमा करतांना १९५८  साली ,हिच्या २२व्या वर्षी एका फोटोग्राफरने काढलेला तिचा फोटो काही एक कारणाने चेतन आनंद म्हणजे देवानंद यांच्या मोठ्या भावा पर्यंत १९६२  सुमारास पोहोचला. ते तेव्हा त्यांचा भारत-चीन युद्धावरील आधारित "हकीकत " हा सिनेमा......  जो पुढे जात प्रचंड हिट झाला तो बनवायच्या विचारात होते.त्या हकीकत साठी चेतन यांनी लीड हिरॉईन म्हणून *वीरा* ची निवड करत तिच्या  खानदानी सौंदर्याला साजेसे तिचे नामकरण "प्रिया राजवंश " म्हणून केले आणि प्रियाचा फिल्मी प्रवास सुरु झाला. 

हकीकत रिलीज झाला ,हिट सुद्धा झाला आणि १९६४च्या सुमारास उमा सोबतच्या ११ वर्षांच्या संसाराला वैतागलेल्या चेतन यांनी वेगळे रहायचा निर्णय घेतला आणि प्रियाने त्यांना साथ द्यायचा निर्णय घेतला. लौकिक अर्थाने हि साथ विवाह बंधनात कधीच अडकली नाही पण प्रियाने चेतनशी आयुष्यभर संपूर्ण एकनिष्ठ रहात त्याच्या १९९७च्या मृत्यू पर्यंत त्याला साथ दिली.चेतन आनंदच्या सिनेमांच्या व्यतिरिक्त प्रियाने तिला असंख्य संध्या येऊनही बाहेरच्या कोणत्याही सिनेमात आयुष्यात कधी काम केले नाही.यातच सगळे आले  कि,तिची साथ काय होती ते !  आपल्या पेक्षा वयाने १६ वर्षांहून मोठ्या असलेल्या चेतन आनंदवर प्रियाने निस्सीम प्रेम केले. चेतनने सुद्धा त्याच्या प्रियावरील निस्सीम प्रेमाला जागत बांद्र्या मध्ये त्या काळी तिच्या साठी प्रथम फ्लॅट घेतला व नंतर तिला  सुंदर बंगला बांधून दिला व तिच्या  संपूर्ण आयुष्याची जबाबदारी स्वीकारली व निभावली.  

प्रियाचे आणि चेतनचे हे आगळे-वेगळे नाते ,आनंद कुटुंबाने सुद्धा त्याला मान्यता देत मनोभावे जपले. पण १९९७ला चेतन आनंद गेला आणि नंतर सगळेच बदलले.प्रिया आणि चेतन यांना कोणतीही संतती नव्हती  आणि चेतनच्या कुटुंबीया सोबत १९६४ पासून निरोगी नाते  जपल्याने प्रियाने सुद्धा नंतर चेतनने तिला बांधून दिलेल्या बांद्र्यातील बंगल्यात त्याच्या दोन मुलांची नावे  लावण्यास सुद्धा संमती दिली होती पण बाप गेल्यावर चेतनच्या दोन्ही मुलांची बुद्धी फिरली व त्यां दोघांनी प्रियाच्या बंगल्यातील दोन्ही नोकरांना हाताशी धरून वयाची साठी उलटून गेलेल्या प्रियाला अपमानास्पद वागणूक देत प्रॉपर्टीवरून त्रास द्यायला सुरवात केली.

हा सगळा प्रकार पहाता "गुल " या प्रियाच्या भावाने तिला सगळे सोडून तू लंडनला निघून ये असे हि सांगून पाहिले  कारण आई-वडील गेल्यावर प्रियाचा एक भाऊ इंग्लंडला व एक भाऊ अमेरिकेत सेटल झालेले होते आणि तसेही आता इथे भारतात तिचे आपले असे  कोणीच  नव्हते. चेतन आनंदच्या मुलांचे वर्तन पहाता आणि उतारवयात भावांवर भार होण्या पेक्षा तिच्या वाट्याचा बंगल्याचा भाग किंवा संपूर्ण बंगला विकून तिच्या वाट्याचा मोठा असा तिसरा आर्थिक हिस्सा पदरात पाडून  घेऊन प्रिया तिच्या  सिमल्यातील मोठ्या बंगल्यात तिचे उर्वरित आयुष्य काढायचा विचार करत होती.

पण बापाच्या माघारी मिळालेल्या प्रॉपर्टीच्या आणि तिच्यातून  मिळू शकणाऱ्या प्रचंड संपत्तीच्या अति हव्यासापोटी दोन्ही मुलांनी २७ मार्च २००० साली रात्रीच्या वेळी तिच्याच बाथरूम मध्ये त्याच बंगल्यातील २ नोकरांच्या मदतीने खून केला आणि तिच्या अपघाताचे नाट्य रचले.पण चेतन आनंद यांचा धाकटा भाऊ विजय आनंद यांच्या नावे प्रियाने लिहून ठेवलेले एक पत्र आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्याच बंगल्यात घटनेपूर्वीच्या काळात  घरगडी म्हणून काम करणारा  १६-१७ वर्षीय सुरेश अरुमुघम याची साक्ष महत्वाची ठरली आणि सदरहू खुनातील सर्व आरोपींना आजन्म सक्तमजुरीची कारावासाची शिक्षा झाली.... असो.                     

    
 थोडक्यात काय तर अवघ्या ६ सिनेमांत काम केलेल्या या अभिनेत्रीने २०१८ मधे चित्रपट कथेची वानवा असलेल्या हिंदी सिनेमा नव लेखकांना तिच्या मरणाने सुद्धा पैसे कमवायची संधी उपलब्ध करून दिली. तिच्या आयुष्यावरील येऊ घातलेल्या सिनेमांत प्रिया राजवंशच्या रूपात सोनाक्षी सिन्हा म्हणे प्रमुख भूमिकेत दिसणार आहे असे समजते.


अशा या प्रियाचे आजचे गाणे हे त्या काळी एक प्रचंड गाजलेले पण ऑल टाईम हिट गाणेच आहे हे वेगळे सांगायला नकोच.... विशेष म्हणजे प्रत्यक्षात यातील हीरो हा वयाने तिच्या पेक्षा त्या वेळी १० वर्षांने लहान होता .. पण वाटत नाही तसे यातच प्रियाचे सौंदर्य आले…..जाता जाता अजून फक्त एवढेच सांगतो कि चेतन आनंद-प्रिया राजवंश या मुलुखा वेगळ्या जोडीचे सर्व सिनेमे हे राजवंश या तिच्या  इंग्रजी नावातल्या त्यातल्या शेवटच्या या अक्षरावरून म्हणजेच  *ह* या नावाने सुरुवात होणारेच आहेत. उदा. हकीकत,हिर-रांझा ,हसते-जख्म  वगैरे.... चेतन आनंद आयुष्यभर तिच्या प्रेमाला किती जागला होता त्याचे हे अनोखे आणि अतिशय दुर्मिळ उदाहरण होय...   


  शुक्रवार, ६ एप्रिल, २०१८

सरदारजीं वर विनोद करण्या आधी हे वाचा .....


जालंधर रेल्वे स्टेशनवर मी उभा असतांना एक लांब दाढी वाढवलेला ,शर्टावर समोरच्याला पटकन नजरेत भरेल अशा पद्धतीने  कृपाण खोवलेला आणि डोक्यावर काळा टर्बन बांधलेल्या एका तरुण सरदारजीने माझे लक्ष वेधून घेतले.खरं तर हे म्हणायचं कारण काहीच नाही पण त्याच्या उग्र व्यक्तिमत्वामुळे  आणि त्याच्या त्या पेहराव मुळे दिसायला तो जणू एखादा अतिरेकीच  असावा असे विनाकारण मला त्या वेळी वाटले.

 माझी ट्रेन यायलापण  अजून अवकाश होता.अशावेळी वेळ कसा काढायचा हा मला प्रश्न असतांना नेमके  समोर असे व्यक्तिमत्व नजरेत आल्याने ,आता  मी विनाकारणच त्याची प्रत्येक कृती त्याच्या नकळत न्याहाळत वेळ घालवू लागलो.तेवढ्यात प्लॅटफॉर्मवर  एक पॅसेंजर ट्रेन आली.ट्रेन खचाखच भरली होती,पण तरीही ती प्लॅटफॉर्मवर  लागल्यालागल्या एकच झुंबड उडाली.तो तरुण सरदारजी सुद्धा  त्या ट्रेनमध्ये घुसायचा नेटाने प्रयत्न करायला लागला,पण ट्रेन लगेचच सुटल्याने तो प्रयत्न निष्फळ ठरला व तो गाडी पासून थोडासा हताश पणे दूर झाला.

त्या तरुण सरदारजीची ती धडपड ,मागच्या डब्यातील दारात उभा राहिलेला एक तरुण  माझ्याप्रमाणेच प्रवासातील करमणूक म्हणून बघत होता. तेवढ्यात  आता ट्रेन सुटल्याने ,त्या तरुण सरदारजी पासून कोणताही “धोका” होणार नाही याची खात्री पटल्याने त्याने त्याचा डबा सरदारजी पाशी येताच सरदारजीला जाता-जाता थोड  खिजवायच्या  उद्देशाने ,त्याच्या कडे हसत-हसत बघत “सरदारजी बारा बज गये “ असे म्हणत हात हलवला.

त्या तरुण सरदारजीने ते ऐकलेन खरे पण त्यावर काही बोलायच्या ऐवजी  त्याच्या उत्तरादाखल त्याच्या कडे बघत काहीसे गूढ हास्य केले.

मात्र त्याचे ते गूढ हास्य त्या क्षणी मला विनाकारणच बेचैन करून गेले.गर्दी थोडी पांगल्यावर मी पुढाकार घेत त्या सरदारजी पाशी जाऊन त्याला त्याच्या त्या हसण्या मागे काय कारण आहे हे विचारायचे ठरवले.

मी सरदारजी  पाशी जात त्याला त्याचे कारण विचारले पण ,त्याने मला  जे उत्तर दिले त्याने मात्र मी साफ भुईसपाट झालो.

सरदारजी म्हणाला कि,तुम्ही समजता तसं तो माझी खिल्ली उडवत नव्हता तर तो माझ्या कडे मदत मागत होता,असा त्याचा अर्थ आहे ...अर्थात त्या मागे फार मोठा इतिहास आहे आणि तो प्रत्येकाला माहित असतोच असे नाही.... त्या नंतर तो पुढे सांगू लागला कि,.....

आज २१वे शतक सुरु आहे पण १७व्या शतकात हिंदुस्थानवर मुघल राज्य करत असतांना ते येथील हिंदूंवर अनन्वित अत्याचार करत त्यांना पशूची वागणूक देत असत.ते त्यांच्या स्त्रियां स्वतःची मालमत्ता समजत आणि हिंदूंना त्यांचा धर्म बदलावयास भाग पाडून इस्लाम धर्म  स्वीकारायची जबरदस्ती करत असत.जे ते करावयास नकार देत असत त्यांना ते जीवे मारत असत.

वर्षानुवर्षे देशात अशी परिस्थिती असतांना व या विरुद्ध कुणीच मदतीला येत नसल्याने काही काश्मिरी हिंदू ब्राह्मण पंडित शिखांचे नववे धर्मगुरू श्री गुरु तेगबहादूरजी यांना भेटले व त्यांनी त्यांच्या कडे स्वतःच्या व इतर हिंदू कुटुंबियांच्या संरक्षणाची व या मुघल आक्रमणाचा बंदोबस्त करावयची विनंती केली.श्रीगुरु तेग बहादूरजी यांनी ती मान्य केली.      

श्री गुरु तेग बहादूरजी त्या हिंदू काश्मिरी पंडितांच्या वतीने तत्कालीन मुघल सम्राटास त्या वेळी भेटले व त्यास त्यांनी विनंती केली कि, तुम्ही हिंदूंवर व त्यांच्या स्त्रियांवर हे अत्याचार थांबवा ,त्या ऐवजी (तुमच्यात धमक असेल तर ) मला आणि माझ्या अनुयायांना ईस्लाम धर्म स्वीकारायला राजी करून दाखवा किंवा भाग पाडून  दाखवा आणि हे काम जर तुम्हांला जमले तर मी स्वतः माझ्या सर्व अनुयायांना व सर्व हिंदूंना तुमचा धर्म स्वीकारायला सांगेन आणि  ते तो प्रस्ताव मान्य करतील  असा शब्द देतो.मात्र ते जर तुम्हांला जमले नाही तर तुम्ही हिंदूंवर व हिंदूंच्या स्त्रियांवर अत्याचार करणे कायमचे सोडून द्या.

तत्कालीन मुघल सम्राटाने श्री गुरु तेग बहादूरजी यांचा हा प्रस्ताव मान्य केला.पण त्या नंतर लाख प्रयत्न करून देखील तो श्री गुरु तेग बहादूरजी व त्यांच्या अनुयायांना ईस्लाम धर्म स्वीकारायला राजी करू शकला नाही.सरतेशेवटी त्याने त्यांचा व त्यांच्या अनुयायांचा अत्याचार करत छळ मांडला व त्यातच दिल्लीच्या चांदणी चौकात श्री गुरु तेग बहादूरजी व त्यांच्या अनुयायांचा शेवट झाला.

श्री गुरु तेग बहादूरजी यांनी ,स्वधर्माचा काही एक संबंध नसतांना ,केवळ दिलेला शब्द पाळत दुसऱ्या म्हणजेच हिंदू धर्माच्या रक्षणा साठी स्वतःचा देह ठेवला ... आणि “हिंद की चद्दर “ अशी स्वतःची  संपूर्ण जगाला ओळख करून दिली.. पण त्यावेळी ज्यांच्या साठी श्री गुरु तेग बहादूरजी यांनी त्यांचे सर्वस्व दिले त्या पैकी मात्र  कोणीही केवळ स्वतःच्या जीवाच्या भीतीने श्री गुरु तेगबहादूर जी यांचे पार्थिव उचलण्या साठी त्या वेळी  पुढे झाले नाही हा इतिहास आहे.

श्री गुरु तेग बहादूरजी यांच्या नंतर त्यांचे पुत्र श्री गुरु गोविंद सिंग जी  शिखांचे दहावे गुरु,यांनी एकूण परिस्थिती लक्षात घेता “खालसा” ची स्थापना करत ,संपूर्ण शीख धर्मियांना,मानवतेचे धडे देत संपूर्ण जगात स्वतःची ,स्वतंत्र ,वेगळी आणि अशी ओळख निर्माण करून द्यायचा चंग बांधला.ज्या योगे अगदी दहा हजार लोकांत सुद्धा शीख धर्मीय ठळकपणे  ओळखला जाऊ लागला.


सुरवातीला शीख धर्मीय इतर समाजापासून वेगळी अशी त्यांची स्वतंत्र ओळख नसल्याने पटकन ओळखता येत नसत,तसेच त्यांची संख्या ही कमी होती , पण श्री गुरु गोविंद सिंग जींच्या  मुळे आता ते सोपे झाले.त्यांच्यातील एकजूट जास्त वाढीला लागली.अशातच  १७३९ साली मुघल घुसखोर,लूटखोर  नादिर शाह  हिंदूंची लूट करत त्यांच्या २२०० बायका रातोरात पळवून नेत आहे  ...ही  बातमी वाऱ्याच्या वेगाने पसरत त्या वेळच्या शीख आर्मीचे  प्रमुख कमांडर जस्सा सिंगजी यांच्या कानावर गेली.त्यांनी लगोलग नादिर शाहच्या त्या खलिफा वर रातोरात हल्ला चढवला व ते पळवून नेत असलेली हिंदूंची लूट आणि त्यांच्या २२०० बायका,स्त्रिया यांची सुटका करत,त्यांना सन्मानाने त्यांच्या-त्यांच्या घरी पोहोचविले.

हा प्रकार त्याकाळी फक्त एवढ्यावरच थांबला नाही .त्या नंतरच्या काळात अब्दाली किंवा इराणी घुसखोर जेव्हा-जेव्हा या प्रकारे हिंदुस्थानची लूट करून पळून जाऊन हिंदू स्त्रियांना अब्दालच्या बाजारात नेऊन विकण्या साठी नेण्याचा प्रयत्न करायचे तेव्हा-तेव्हा त्या-त्या वेळचे कडवे शीख लढवय्ये त्यांना रात्रीच्या बाराच्या त्या युद्धात पराभूत करून हिंदूंची आणि त्यांच्या बायकांची मुघलांच्या तावडीतून सुटका करायचे. 


खरे तर त्या वेळी शीख लढवय्ये सैनिक संख्येने त्या तुलनेत खूप कमी असत पण ते ज्या त्वेषाने आणि एकजुटीने मुघालांवर रात्री बाराच्या सुमारास हल्ला चढवत असतं ते लक्षणीय होते.

हा प्रकार त्या काळी त्या नंतर इतक्या वेळा वारंवार घडू लागला कि,रात्रीचे बारा वाजले कि सरदारजींच्या मदतीची आस असणारे निश्चिंत होत आणि त्यांची भीती असणारे हादरून जात जीव मुठीत धरून बसायला लागले.त्या मुळे त्यांच्या शत्रूंनी आणि स्वतःला अति हुशार समजणाऱ्या काही मंडळींनी  त्या नंतर असा अपप्रचार सुरु केला कि, रात्री बारा नंतर सरदारजी  बेफाम,बेलगाम होतात,त्यांचा काही भरवसा देता येत नाही ,ते कोणत्याही थराला जाऊ शकतात.पण “सरदारजी बारा बज गये “ मागचे खरे कारण वरील प्रमाणे आहे....

त्या मुळेच मघाशी त्या रेल्वेतल्या तरुणाने जेव्हां मला , “सरदारजी,बारा बज गये” असा आवाज दिला तेव्हा त्याची बहिण,पत्नी,किंवा आई संकटात आहे आणि तिला मदत करण्यासाठी तो माझ्यापाशी याचना करतोय असाच  मी त्या ‘सरदारजी,बारा बज गये “ चा अर्थ घेतला आणि मला , मी सरदारजी असल्याचा अभिमान वाटला म्हणून माझ्या तोंडावर ते हसू आले.

“सरदारजी,बारा बज गये” चा हा एवढा प्रदीर्घ इतिहास मला तेव्हा पूर्णपणे नवीन होता आणि जेव्हा तो मी या तरुणाच्या तोंडून ऐकला त्या क्षणी माझ्या मनात सरदारजींच्या प्रती एक वेगळा स्नेह आणि आदर वाढीस लागला.

त्या मुळे या देशातील प्रत्येक नागरिकाने या पुढे सरदारजींच्या वर जोक करण्या आधी याचा विचार प्रथम केला पाहिजे कि,या देशात एक सच्चा सरदारजी जन्माला येण्यासाठी शीख समाजाने अगोदर काय-काय खस्ता खाल्लेल्या आहेत.

त्या मुळे त्या प्रत्येक शहीद सरदारजी साठी, हा लेख तुम्हांला किमान एकाला तरी फॉरवर्ड करावासा वाटला तरी त्या प्रत्येक शहीद सरदारजीला ही आदरांजली असेल....धन्यवाद.  

मंगळवार, ३ एप्रिल, २०१८

आयुष्यात वेग सांभाळणे महत्वाचे


एका संध्याकाळी वीस बावीस वर्षाचा जॉन  त्याच्या  नुकत्याच  २ महिन्यापूर्वी घेतलेल्या १२ सिलिंडरच्या काळ्या कुळकुळीत पॉश जग्वार एक्स के ई  मधून शिकागो जवळच्या काहीशा मोकळ्या रोडवरून नेहमीपेक्षा जरा भन्नाट वेगानेच ड्राईव्ह करत चालला होता .
थोडे पुढे जाताच त्याने रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या गाड्यां मधून एका मुलाला धावपळ करतांना बघितले व त्याने त्याच्या गाडीचा स्पीड किंचित  कमी केला.त्या मुलाला क्रॉस करत त्याने गाडी थोडी पुढे काढली न काढली तोच त्याला त्याच्या नव्याकोऱ्या जग्वारवर “धडाम दिशी “ एक विटेचा तुकडा येऊन आदळल्याचा भला मोठ्ठा आवाज आला.

संतापलेल्या जॉनने पुढे जात करकचून ब्रेक दाबला व गाडीतून जवळपास उडी मारत बाहेर येऊन ती वीट भिरकावण्याऱ्या मुलाला पळत जात पकडले आणि त्याला पार्किंग लॉट मधील गाडीपाशी जवळपास ढकलत नेउन , अतिशय राग-रागाने त्याची कॉलर पकडून त्याला त्याच्या कृत्याचा जाब विचारायला सुरवात केली...

तू हे काय केले हे तुला समजते आहे कां?
 ही चूक तुला खूप महागात पडणार आहे ...
या गाडीची किंमत किती आहे नि तुझ्या या गाढवपणाची तुला काय किंमत मोजावी लागणार आहे त्याची तुला कल्पना आहे का ?
तुझे पालक कुठे आहेत ? तू कोणाबरोबर आला आहेस ? वगैरे-वगैरे

साहेब,.....साहेब ......आता , त्या मुलाच्या डोळ्यातून घळा-घळा पाणी टपकत होते आणि त्याही अवस्थेत  तो लहान मुलगा त्या तरुणाला सांगायचा प्रयत्न करत होता कि, “मला माफ करा ...प्लीज.... ,पण मला त्या क्षणी खरच काही सुचलं नाही आणि म्हणून.... नाईलाज म्हणून मी ती वीट तुमच्या गाडीवर फेकून मारली ... खरंच ...

 “जरा प्लीज थांबा” असं   बऱ्याच जणांना मी सांगायचा प्रयत्न करून सुद्धा कोणी थांबायला तयार नव्हते केवळ म्हणून....... हे  तो सांगताना सुद्धा त्याला हुंदका अनावर होत होता.......तिकडे-पलीकडे आम्ही जात असतांना माझाभाऊ व्हीलचेयर वरून घरंगळून खाली पडलाय ,तो तोंडावरच पडल्याने त्याला खूप मार लागलाय  , पण त्याचे वजन जास्त असल्याने मला त्याला उचलून पुन्हा व्हीलचेयर मध्ये बसवता येत नाहीये ... म्हणून प्लीज त्याला उचलायला मला जरा कुण्या मोठ्या माणसाची मदत हवी होती....आणि म्हणून मी.... असे म्हणत त्याने जॉनला  “सर ! तुम्ही मदत करता का ? प्लीज ?...”  असे  विचारले ...

रागावलेल्या जॉनने त्या मुलाच्या तोंडून त्याची ही कहाणी ऐकलीन खरी नि नंतर मात्र तो पुढे काही बोलूच शकला नाही.... एक भला मोठ्ठ आवंढा गिळत त्याने पटकन पुढे होत त्याला त्याचा भाऊ कुठे आहे ते विचारले व तो त्याला उचलून व्हीलचेयर वर बसवायला लागला.त्या जमिनीवर पडलेल्या मुलाचे  वजन खरोखरच जास्त असल्याने ,जॉनला सुद्धा त्याला व्हीलचेयर वर बसते करायला  बरेच कष्ट पडले.नंतर त्याने खिशातून त्याचा रुमाल अधून त्याचे रक्त पुसले त्याच्या जखमा पुसून काढल्या आणि त्या छोट्या मुलाच्या पाठीवर थाप देत “चल ! मी तुम्हांला तुमच्या घरा पर्यंत सोबत येतो असे म्हणत त्याने त्याची गाडी स्टार्ट केली.

त्या दिवशी ,नंतर जॉनने त्याच्या गाडीचा डावा दरवाजा नंतरच्या प्रवासात पूर्णवेळ उघडा ठेऊन ती १२ सिलिंडर ची जग्वार व्हील चेयरच्या स्पीडच्या  गतीने त्या मुलांच्या घरा पर्यंत चालवत नेली.

त्या प्रसंग नंतर ,जॉनने त्याची ती जग्वार एक्स के ई  पुढे काही वर्षे चालवली पण त्याने तिच्यावरचा  पडलेला पोचा,तो डेंट मात्र शेवट पर्यंत तसाच जपला ... केवळ त्याला ही सदैव जाणीव रहाण्यासाठी कि, आयुष्याचा वेग इतपतच मर्यादित हवा कि,कुणाला त्यावर वीट फेकून मारायची वेळ येऊ नये ... कारण ती प्रत्येक वीट  प्रत्येकवेळी  “इतकी” नरम असेलच असं नाही....आणि त्या पेक्षाही त्याला हा खूप महत्वाचा धडा शिकायला मिळाला कि, परमेश्वराकडे तुमच्या कडे येणाऱ्या प्रत्येक वाईट गोष्टी सोबत एक चांगले आणि योग्य उत्तर नेहमी तयार असते... त्या मुळे “ऑल वेज बी पॉझेटिव्ह “...

रविवार, १ एप्रिल, २०१८

कधी प्रयत्नच न करणे हे जास्त लाजिरवाणे

Bonnie and Jay Thiessens 

अवघ्या २०० डॉलरच्या गुंतवणुकीच्या मशीन शॉप पासून व्यवसायास सुरुवात करून नंतरच्या काळात आपल्या उद्योगातून दरसाल  ५ दशलक्ष डॉलरची उलाढाल करणाऱ्या जय थायसन याने तब्बल काही दशके त्याचे एक *सिक्रेट* स्वतः पाशीच दडवून ठेवले होते पण  त्या मुळे तो मात्र  प्रचंड अस्वस्थ होता. अमेरिकेतील एक यशस्वी उद्योजक, त्यामुळे त्याच्या  व्यवसायाचा वाढलेला  पसारा आणि त्यातून होणारी  प्रचंड उलाढाल याच्या  नावाखाली त्याचे ते सिक्रेट अर्थातच आजवर आपोआपच दडले जायचे हि सुद्धा त्या मागे पार्श्वभूमी होतीच.

दिवसभराच्या नवऱ्याच्या  व्यस्त धावपळी नंतर  रोज संध्याकाळी मात्र त्याची बायको त्याला त्याचा पत्रव्यवहार सांभाळायला तिला जसे जमेल तशी घरातील कामे करून   लिव्हिंग रूम मध्ये  किंवा जेवणाच्या टेबलवर किंवा वेळप्रसंगी अगदी बेडवर सुद्धा मदत करायची...होता होईतो या दिनक्रमात  थायसन सुद्धा न चुकता कधी खंड पडू द्यायचा नाही ... अगदी रोजच्या रोज तो सुद्धा तिच्या जणू  मागे लागून तो पत्रव्यवहार रोजच्या रोज पूर्णत्वाला न्यायचा.

पण बायकोच्या मदतीने पत्रव्यवहार पूर्ण करायच्या मागचे थायसनचे खरे कारण मात्र असे होते कि, लौकिक अर्थाने सुशिक्षित म्हणजे मेकॅनिकल इंजिनियर असलेल्या  थायसन्सला कागदावर लिहिलेली कोणतीही गोष्ट वाचता येत नव्हती आणि त्याच्या बाबतीत ती भयानक  वास्तवता होती.

पण  थायसन्सच्या कंपनीचा कारभार प्रगतीपथावर आणि अतिशय समधानकारक होता त्या मुळे त्याच्या अगदी  रोजच्या उठण्या बसण्यातल्या त्याच्या बी एंड जे मशीन टूल्स कंपनीच्या अगदी आतल्या गोटातील त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुद्धा आजवर त्यांच्या मालकाची हि वास्तवता  कधी समजली नव्हती  कि, लक्षात सुद्धा आली नव्हती ,हे ही तितकेच खरे होते.

त्याच्या सोबत तब्बल सात वर्षे काम करणाऱ्या जॅक सला याला जेव्हा हि गोष्ट समजली तेव्हा तर त्याच्या आश्चर्याला पारावर उरला नाही.कारण कंपनीच्या कायदेशीर बाबींच्या  पत्र व्यवहारात तू माझ्या पेक्षा हुशार आहेस असे त्याला थायसन्स नेहमी जे म्हणायचा ते का ? याचे उत्तर त्याला जेव्हा थायसन्सचे हे सिक्रेट कळले  तेव्हा समजले ... कारण त्या वेळी त्या पत्र व्यवहारातील मजकुरात  नेमके काय लिहिले आहे हे त्या दोघांतील फक्त जॅकच वाचू शकायचा हि त्या मागची वास्तवता आणि खरे कारण होते हे त्याला आता समजत होते.

थायसन्सच्या वयाच्या ५५ व्या वर्षांपर्यंत त्याच्या जवळच्या अगदी काही निवडक लोकांच्या व्यतिरिक्त त्याची ही खाजगी बाब कधी जगाला समजली नाही,पण थायसन्सला मात्र प्रत्येक वेळी याची लाज वाटल्या शिवाय राहिले नाही.एक आजोबा म्हणून नातवंडांना ते  झोपतांना केवळ एखादी गोष्ट वाचून दाखवता यावी अशी त्याची प्रबळ इच्छा होती जी त्याची ही  मंडळी जाणायची त्या मुळे वयाच्या ५६ व्या वर्षी त्याने हि बाब जगापुढे मांडली ,आणि तो एका मोठ्या मानसिक द्वंद्वातून बाहेर पडला .नंतर एक स्वतंत्र शिक्षक नेमून तो वयाच्या ५६व्या वर्षी वाचायला शिकला.  

१९९९ साली अमेरिकेतील अत्यंत यशस्वी उद्योजक ,ज्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत छोट्या व्यवसायाचे रुपांतर मोठ्या व्यवसायात केले अशा निवडक ६ उद्योजकांच्या समवेत वाशिंग्टन येथे थायसन्सने अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स चे पारितोषिक स्वीकारले...

थायसन्सच्या भूतकाळात जाऊन पहाता असे लक्षात येते कि ,थायसन्स सेन्ट्रल नेवाडातील शाळेत पहिलीत  किंवा दुसरीत  असतांना ,त्याला लिहिलेले वाचतांना त्रास व्हायचा ,किंवा इतर मुलांच्या प्रमाणे  पटकन वाचायला जमायचे नाही,त्या मुळे त्या वेळची त्याची वर्गशिक्षिका भर वर्गात प्रत्येकवेळी त्याचा मूर्खअसे संबोधत पाणउतारा करायची. पण त्या मुळे  झाले असे कि, थायसन्स वर्गात गप्प-गप्प रहात मागच्या बाकावर बसणे पसंत करायला लागला.

थायसन्सच्या मते  केवळ अशा विद्यार्थ्याचे तोंड नियमित बघायला लागू नये केवळ यासाठीच कदाचित मला सर्व शिक्षक शाळेत वरच्या वर्गात ढकलत गेले.आणि इन्जीनियारीन्ग्ची पदवी मिळताना केवळ गणित या विषयातील त्याची हुकुमत आणि विज्ञान या  ऑटो मेकॅनिकल इंजिनियरिंग साठी आवश्यक असणाऱ्या विषयात आकृत्या नीट लक्षात ठेवण्याच्या त्याच्या बुद्धी कौशल्या मुळे तो इंजिनियर झाला असे त्याचे मत आहे.

मात्र शिक्षकांच्या मते आपल्याला वाचता येत नाही याचा त्या वेळी  त्याच्या बालमनावर एक असा परिणाम झाला किउपजत ग्रहण क्षमतेमुळे, तो एक उत्कृष्ठ श्रोता बनला व त्याचा त्याला त्याच्या व्यवसायात भविष्यात खूप मोठा फायदा झाला.

ते काही असो पण सरते शेवटी त्याची बायको बोनी थायसन्स यांचे मत मात्र काहीसे वेगळेच आहे... तिच्या मते तुम्हांला वाचता न येणे यात लाज वाटण्या सारखं फारसे काहीच नाही पण तुम्ही त्या साठी कधी प्रयत्नच न करणे हे जास्त लाजिरवाणे आहे....(जे थायसन्सने वयाच्या ५५ व्या वर्षां पर्यंत केले )

थोडक्यात काय तर थायसन्सची असो नाही तर तुमची असो ... बायको ही शेवटी बायकोच असते.... तिचे समाधान होणे जरा अंमळ कठीणच . ...   
 . ...   
Grapplers Inc. Store
Credits : https://www.grapplersinc.com/about-us/ and free translation of his one read story. Thanks...