भोज्जा

मराठी चित्रपट लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मराठी चित्रपट लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, ३० जानेवारी, २०१८

रमेश देव ,नाबाद ९० 💐🙏

मुंबई आकाशवाणीवर नोकरी करत असतांना ,जेवणाच्या मधल्या सुट्टीत “ जरा ,जाऊन येतो “ असं म्हणून , रेकॉर्डिंग स्टुडीओत १९६४ साली  येऊन पं.जितेंद्र अभिषेकींनी गायलेलं हे आजचे गाणं पुढे अजरामर झाले.पंडितजींनी  त्यांच्या  आवाजाच्या जातकुळीला न जुमानता हे गाणं इतकं अप्रतिम गायलंय कि ,पडद्यावर हे गाणं न पाहता सुद्धा संपूर्ण कोकण 🌴🥥🌊 आपल्या डोळ्या पुढे सरकन उभा राहतो.पण या गाण्याचे फक्त एवढेच वैशिष्ट्य नाही तर ....

मराठी चित्रपट सृष्टीतील नायक-नायिकेची पडद्यावरील  दुर्मिळ पेयर म्हणजे रमेश देव – जयश्री गडकर यांच्या उपस्थितीत हे गाणं पडद्यावर आपल्याला दिसते. या गाण्याची आठवण आज यायचं कारण म्हणजे , या गाण्यात दिसणारे ज्येष्ठ्य मराठी अभिनेते श्री.रमेश देव यांचा आज ३० जानेवारी हा वाढदिवस आहे ... आज त्यांनी वयाची ८९ वर्षे पूर्ण करत नव्वदी मध्ये प्रवेश केला आहे.

आयुष्याच्या एका महत्वाच्या टप्प्यावर अभिनय कां  नोकरी हा प्रश्न जेव्हा त्यांच्या समोर उभा ठाकला तेव्हां महाराष्ट्र पोलीस दलात इन्स्पेक्टर पदावर निवड झाली असतांना ,त्यांनी अभिनयाचे , बेभरवशाचे क्षेत्र निवडून ,पुढे जात मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीत जे काम केले ,नाव मिळवले ते अतिशय कौतुकास्पद होय.आजच्या दिवशी त्यांचे हार्दिक अभिष्टचिंतन... आणि त्यांना “शतायुषी भव “ या हार्दिक शुभेच्छा...👇👍👌🎂💐

शुक्रवार, १९ जानेवारी, २०१८

मा.विनायक : मराठी सिनेमाचे ऐकेकाळचे आशास्थान


आपण बराच काळ सांभाळलेला शेयर , पैशाची नड आली म्हणून विकावा, तुमच्या कडून तो विकत घेतांना ,घेणाऱ्याने तुमच्यावर उपकार करतोय असे दाखवत त्याचा  रेट पाडून घ्यावा  आणि त्याच्या नंतर तो शेयर बाजारात ५०० पट वाढवा याला तुम्ही काय म्हणाल ???

मा.विनायक च्या बाबतीत १९३८ साली त्याच्या गाजलेल्या “ब्रह्मचारीच्या” बाबतीत नेमके हेच झाले. मावसभाऊ व्ही.शांताराम सोबत फारसे न जमल्याने त्याने हंस पिक्चर्सच्या बॅनर खाली आचार्य अत्रे लिखित “ब्रह्मचारी “ हा सिनेमा मीनाक्षीला घेऊन कसाबसा पूर्ण केला,पण विनायकाच्या मनस्वी स्वभावामुळे तो करतांना त्याचे अत्र्यांच्या बरोबर सुद्धा वाजले ,अत्रे हंस पिक्चर्स मधून  बाजूला झाले .संस्थेच्या आर्थिक अडचणी वाढल्या , पिक्चर कसाबसा पूर्ण झाला आणि आता हा पिक्चर स्वतः रिलीज करायचा ?  का ? निदान घातलेले भांडवल काढून घेत वितरकाला आउट राईट विकून टाकायचा ? असा विनायका पुढे प्रश्न उभा राहिला.

विनायकाने दुसरा सोयीचा मार्ग निवडला आणि ब्रह्मचारी एका मारवाड्याला अवघ्या १ लाखांत विकून टाकला.खरे तर त्या वेळी सिनेमा धंद्याशी त्या मारवाड्याचा काही एक संबंध नव्हता पण आता विकत घेतलाच आहे तर लाऊयात असा विचार करून तो पिक्चर त्या मारवाड्याने पुण्यातल्या आर्यन मध्ये लावला नि पहिल्या शो पासून “ब्रह्मचारी” असा काही उचलला गेला कि ज्याचं नाव ते. मारवाडी तर ध्यानी मनी नसतांना इतका प्रचंड मालामाल झाला कि त्याच्या पुढच्या २-४ पिढ्यांची ददात मिटली.

ब्रह्मचारी चालण्यामागे पिक्चरच्या स्टोरीत,पटकथेत,गाण्यात,संवादात आणि सगळ्यात म्हणजे सेक्स अपीलमध्ये सर्वार्थाने दम होता हे मुख्य कारण होते .कारण १९३८ च्या काळात स्त्रियांचा  समाजाला उघडा दिसणारा जास्तीतजास्त भाग म्हणजे चेहरा,हात आणि पायाचे घोटे. अशा काळात मांड्या उघड्या टाकून  मीनाक्षीने सादर केलेले “यमुना जळी खेळ खेळूया का ? हे गाणे पडद्यावर आले आणि तत्कालीन पब्लिकला वेड लाऊन गेले.

पण पिक्चर प्रचंड हिट होऊन सुद्धा विनायकाच्या हाती काहीही लागले नाही.कारण त्याचा त्याच्याशी संबंधच राहिला नव्हता. उर्वरित पुढील ९ वर्षाच्या आयुष्यात विनायकाने चित्रपट निर्मिती केली पण ब्रह्मचारीची उंची तो पुन्हा कधी गाठू शकला नाही हे वास्तव आहे. भविष्यात त्याची मुलगी नंदा हिने हिंदी सिनेमात मोठे नाव व पैसा मिळवून वडिलांची  चूक सुधारत तिच्या पदराच्या गाठीला  चांगली माया जमवून अंतिम दिवस व्यवस्थित गुजारले. पण विनायक मात्र  वयाच्या अवघ्या ४१ व्या वर्षी जलोदराने तडकाफडकी गेला.तो जायची वेळ  सुद्धा इतकी विचित्र होती कि इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त झालेला भारत, आपल्या स्वातंत्र्य प्राप्तीचा उत्सव साजरा करण्यात मग्न होती.(१९ ऑगस्ट १९४७)..त्या मुळे विनायक गेल्याचा दिवस हा सुद्धा फक्त इतिहासात नोंद ठेवण्याजोगाच होऊन बसला.        

आजचे गाणे ते तेच गाणे, ज्याने आजपासून ८० वर्षापूर्वी तमाम मराठी प्रेक्षकां मध्ये खळबळ माजवून दिलेले मा.विनायक- मीनाक्षीचे “ब्रह्मचारी” मधील.👇
आजच्या लेखासाठी इन्टरनेट ,आचार्य अत्रे लिखित "कऱ्हेचे पाणी " आणि यू ट्यूब यांचे सहकार्य लाभले आहे.

मंगळवार, २ जानेवारी, २०१८

२ जानेवारी ,सदाशिव अमरापूरकर ,यांचा जन्मदिवस

जेव्हा पाहिजे तेव्हा फक्त डोळ्यातूनच अभिनय करत भय,लालसा,लंपटपणा,अगतिकता किंवा मिश्कीलपणा दाखविण्याचे अंगभूत कौशल्य असलेले अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांचा आज जन्मदिवस. आज ते असते तर ते ६७ वर्षांचे असते.     

खरं तर अभिनयापेक्षा अभिनेत्याला आजच्या काळात देखणं असणं ही गरज आहे ,पण अमरापूरकर हे त्या दृष्टीने नशीबवान कारण ते अशा काळात अभिनय क्षेत्रात आले कि जेव्हा अभिनेत्याच्या कुळा पेक्षा नि सौंदर्यापेक्षा त्याच्या अभिनय कर्तुत्वाला दाद देणारा प्रेक्षक उपलब्ध होता.

नगर सारख्या तेव्हाच्या निमशहरी गावातून येऊन त्यांनी थेट मराठी नाट्य चित्रपट व्यवसायात आणि हिंदी सिनेमा जगात जे कर्तुत्व आणि नाव कमावले त्याला तोड नाही.आपल्या पहिल्याच “अर्धसत्य” या हिंदी सिनेमात फिल्मफेयर सारखे सिने जगतातील मानाचे पारितोषिक मिळवत त्यांनी तेथे राखीव अशा ए श्रेणीच्या अभिनेत्यांच्या पंगतीत स्थान मिळवले.अमरापूरकारांचे वैशिष्ट्य असे कि , हिंदी सिनेमात तगडे मानधन घेत असतांना देखील त्यांनी मराठी रंगभूमी आणि सिनेमांत जसा वेळ उपलब्ध असेल तेव्हां काम केले.

आजकाल मराठीतून हिंदीत गेलेले किंवा मराठी भाषिक असून देखील फक्त हिंदीत काम करतांना मराठीत काम केले तर ,आपले हिंदीतील मानधन कमी होईल हि भीती वाटणारे असंख्य कलाकार आहेत . उदा.माधुरी दीक्षित,श्रेयस तळपदे वगैरे ..ते मराठीत काम करत नाहीत कारण  हिंदीत टॉपला असतांना केवळ मराठीत काम करण्याने हिंदीत कमी मानधनाचा धनी होण्याची भीती  त्यांना सदैव भेडसावते.किंवा त्यांचे करियर उतरणीला लागल्यावर “ मला चांगला रोल मिळाला तर ,मराठीत काम करायला देखील आवडेल “ वगैरे सारखी फालतू कारणे ती लोकं देतात पण अम्रापूरकरांना असे फालतू प्रश्न कधीच पडले नाही.कारण त्यांचा स्वतःवर ,स्वतःच्या अभिनयावर इतका दांडगा विश्वास होता कि ते एकाच वेळी मराठी आणि हिंदीत अतिशय सहजगत्या वावरायचे.त्यांनी त्यांच्या स्टारडमचे कधीही अवडंबर माजवले नाही.सामन्यांमधील असामान्य वावर कसा असावा ते आजच्या पिढीच्या अभिनेत्यांनी यांच्या कडून शिकावे.
त्यांचा आजचा सीन हा १९८७ च्या अमिताभच्या सुपरहिट ‘आखरी रास्ता” मधून घेतलाय.आपल्या हिंदीतल्या व्हिलन म्हणून कारकिर्दीला त्यांनी इथून सुरवात केली होती.खलनायक म्हणून हा त्यांचा जरी पहिलाच सिनेमा होता आणि समोर अमिताभ जरी होता तरी त्यांनी ,या सिनेमावर आपली इतकी छाप सोडलीये कि ज्याचं नाव ते. तुम्हांला देखील फक्त या छोट्याशा प्रसंगातून ती जाणवेल असा विश्वास आहे...  

सोमवार, १ जानेवारी, २०१८

अशोक सराफ , नाना पाटेकर , १ जानेवारी ,जन्मदिवस

आज तारखे प्रमाणे नूतन वर्षारंभ ...

आज १ जानेवारी हा अशोक सराफ , नाना पाटेकर आणि जैकी श्रॉफ यांचा जन्मदिवस...  त्या तिघांना मनःपूर्वक शुभेच्छा... आज अशोक आणि नानाचे  मी अनुभवलेले दोन किस्से या निमित्ताने ...


अशोकला मी प्रत्यक्षात बघितले होते १९८५-८६ साली  त्याच्या छक्केपंजे या मराठी सिनेमाच्या शुटींगच्या वेळी ,पुण्याच्या डेक्कनवरच्या  सध्याच्या जगन्नाथ राठी इन्स्टीट्यूट मध्ये. त्या वेळी त्याच्या शॉटला अजून थोड अवकाश होता आणि तो निवांतपणे एका झाडी खाली ,योगायोगाने आमच्या जवळच खुर्चीतच  बसला होता आणि आजूबाजूला असणारी तुरळक गर्दी न्याहाळत होता.त्याच्या चेहऱ्यावर अतिशय निश्चल ,निवांत किंवा काहीसे गंभीर किंवा क्वचित काहींच्या मते थोडे शिष्ट ,आगावू वाटणारे असे म्हणले तरी चालेल असे भाव होते.ते भाव  पाहता , हा माणूस या नंतर अगदी थोड्या वेळात  कॅमेर्या पुढे जाऊन विनोदी शॉट देणार आहे असे त्या वेळी मला जरा सुद्धा वाटत नव्हते.

पण थोड्याच वेळात दिग्दर्शक व्ही के नाईक यांनी इतर सहकलाकारांची रिहर्सल घेऊन याला यायला सांगितले आणि इतकावेळ बोली भाषेत ज्याला मढ म्हणतात तसं तोंड करून बसलेला अशोक, डायरेक्टरने  “एक्शन” म्हणताच असा काही सुटला कि आम्ही ते बघून चकणेच झालो. शॉट पहिल्याच टेकला ओ.के.झाला...

मराठी आणि हिंदी मध्ये याने पुढे इतके मोठे नाव  मिळवले ते त्याच्या याच अफलातून अदाकारीवर ...

दुसरं किस्सा आहे नाना पाटेकरचा... याला त्याच्या तरुणपणी प्रत्यक्षात बघायचा योग मला कधी आला नाही ,पण आमच्या मित्राच्या परिचयातील पुण्यातील पेरुगेटा  जवळील मंदार भोपटकरांच्या घराची डागडुजी,किरकोळ रिनोवेशनचे काम करतांना अपघाताने मला नानाचे पुण्याच्या बाजीराव रोडवरच्या बँक ऑफ महाराष्ट्रचे द.म.अवघे १०० रु.च्या रिकरिंग अकौंटचे पासबुक हाती लागले होते.नाना हा मंदार भोपटकरांचा पुण्यातला स्नेही ...  हि घटना आहे साधारण ९६-९७ मधली..  पासबुक मात्र जुने होते ,नानाचे नाव व्हायच्या अगोदरचे म्हणजे तो नाटकात होता तेव्हाचं.त्या पासबुकात  ते रिकरिंग चालू केल्यानंतर साधारण फक्त ४-५ एन्ट्रीच केल्या गेल्या होत्या. पुढे नाना बहुदा अंकुश,परिंदा नंतर मुंबईला शिफ्ट झाल्याने ते बंद पडले होते... आणि ९६-९७ पर्यंत नाना हिंदी सिनेमात बडं प्रस्थ झाला होता.

पण त्याचं ते त्या वेळच १०० रुपयाच रिकरिंग अकौंट बघून मला तेव्हा खूप गम्मत वाटली होती. ते पासबुक मी “ हे बघा “ असं म्हणत भोपटकरांना सुद्धा दाखवले होते.. पण ते नानाचे चांगले परिचित असल्याने त्यांना त्याचे काही विशेष वाटले नव्हते....
“ कुणाचंच ? नानाचंय ना ? मग बोलायला नको !”
पण  हे सांगतांना त्यांच्या डोळ्यातले  मिश्कील भाव मात्र तेव्हां बरचं काही  सांगून गेले ... 


नानाला आजच्या दिवशी त्याच्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा... आणि अशोकचा एक विनोदी सीन आणि नाना-जैकीचा परीन्दातील एक सीन त्या निमित्ताने..  ↓   
  👍