भोज्जा

शनिवार, ४ जुलै, २०१५

द्यावे ! पण कसे ?

कृष्णा, या पृथ्वी तलावावर सर्वात दानशूर व्यक्ती कोण ? … अर्थातच "कर्ण " ……. कर्णाच्या दातृत्वा बद्दल अर्जुनाच्या एका प्रश्नाला उत्तर देत असताना कृष्णाने वरील गौरवोद्गार काढले. कृष्णाचे उत्तर ऐकून अर्जुन त्रस्त झाला … … कर्ण हा रणांगणावरील त्याचा शत्रू … तो बोलला काही नाही पण त्याचे त्या क्षणी गप्प बसणे नि ईर्ष्येने वर गेलेल्या भुवया कृष्णाच्या नजरेतून सुटल्या नाहीत … त्याने आपले हसू कसेबसे लपविले … नि तो विषय तेथेच थांबला…

काही दिवसानंतर एके संध्याकाळी ते दोघे घोड्यांवर रपेट मारत असता दूरवर पोहोचले … त्यांचे लक्ष मावळतीला जाणाऱ्या सूर्याची किरणे दूरवरच्या दोन डोंगरावर पडून ते पिवळे जर्द जणू सोन्याने न्हाले होते तिकडे गेले …कृष्णाने अर्जुनास विचारले कि अर्जुना ते दोन डोंगर बघितले ? ते आत्ता ह्या क्षणा पासून सोन्याचे झाले … तू आता फक्त एक करायचे … त्या डोंगराच्या पायथ्याला असलेल्या गरीब खेडुतान मध्ये हे सोने वाटून टाक आणि तुझे काम झाल्यावर मला कळव …

आयत्याच चालून आलेल्या ह्या संधीचा कृष्णावर छाप पाडायला नि  त्याचे शब्द मागे घ्यायला भाग पाडायला चांगला उपयोग होऊ शकेल  हे जाणून अर्जुनाने त्वरित सेवकां करवी त्या गावांतील गावकऱ्यांना गोळा केले.

"तुमच्या साठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे, हे दोन सोन्याचे  पर्वत मी तुम्हा सर्वांच्या मध्ये वाटून टाकणार आहे "

अर्जुनाच्या तोंडून हे उद्गार बाहेर पडताच तेथेच अत्यानंदाने गावकर्यांनी  अर्जुनाच्या नावाचा उद्घोष केला …


उत्कृष्ठ राज्यकारभार नि नियोजना बाबत लोकमान्यता मिळालेल्या अर्जुनाने अतिशय उत्साहात त्याचे काम सुरु केले… बघताबघता दोन दिवस उलटले… तहान भूक हरपून अर्जुनाने काम करून देखील पर्वतामधील सोने संपायचे काही नाव घेईना … जेवढं तो वाटप करी त्याच्या कितीतरी पट तेथे अजून शिल्लक राही… सरतेशेवटी त्याच्या सहनशक्तीचा अंत झाला नि उर्वरित काम करण्या अगोदर त्याने काही दिवस विश्रांती घ्यायची ठरविली…व तसे कृष्णा जवळ प्रांजळपणे सांगितले .

त्यावर काही प्रतिक्रिया देण्या ऐवजी कृष्णाने कर्णास तेथे हजार रहावयास सांगावा धाडला,नि कर्ण तेथे उपस्थित झाला …

"ते समोरचे दोन सोन्याचे पर्वत बघितलेस ?"
"होय"
तो महान योद्धा नम्रपणे उत्तरला …

ते दोन्ही पर्वत त्यांच्या पायथ्याशी असलेल्या गावकऱ्यांच्या मध्ये वाटून टाक … नि तुझे काम झाल्यावर मला कळव …कृष्णाने त्यास सांगितले मात्र ……  आणि

 क्षणाचीही उसंत न घेता कर्णाने लगेचच तेथून पायवाटेने जाणाऱ्या त्या गावच्या दोन  गावकर्यांना बोलावून घेतले …

"ते समोरचे दोन सोन्याचे डोंगर बघितलेत ? " 

"हो "

ते ह्या क्षणापासून तुमचे … तुमच्या मर्जी प्रमाणे तुम्ही त्याची विल्हेवाट लावू शकता ….

हे सांगत असता,त्याचे सुर्या सारखे तेजाने तळपणारे मुखकमल त्या क्षणी  अजूनच विलोभनीय दिसत होते … 

कृष्णाला नम्रपणे वाकून वंदन करून ज्या वेगाने कर्ण तेथे पोहोचला होता तितक्याच त्वरेने तो तेथून अतिशय निष्काम चेहेऱ्याने अंतर्धान पावला…

अचानक झालेल्या ह्या घडामोडी पाहून अतिशय विस्मयचकित झालेला अर्जुन त्याच्या बसल्या जागी निःशब्द झाला ….  


"अर्जुना "

कृष्णाच्या ह्या प्रेमळ पण धीरगंभीर हाकेने अर्जुन काहीसा भानावर आला.

"सोन्याचे मूल्य नि त्या बद्दल तुझ्या अंतर्मनात असलेली आसक्ती ह्याने तुझे मन व्यापून गेले होते. तू त्या कडे आकर्षित झाला होतास,त्या मुळे त्याचे वाटप करताना तुझे मन स्वच्छ नव्हते… तुझ्यामते लायक नि योग्य असणाऱ्या लोकांना ते मिळावे असा तुझा त्याकडे बघण्याचा दृष्टीकोन होता . त्या मुळे  तू अवचेतन झालास … हे काम दिसते तितके सोपे नाही असे तुझ्या मनाने घेतले…नि त्यामुळेच त्या पर्वतांची उंची आहे त्याच्या पेक्षा तुझ्यासाठी मोठी झाली… नि तुझे मन,आत्मा नि हात थकून गेले …

अर्जुनाने हे सत्य अतिशय शांतपणे ऐकून घेतले नि पचविले …


आणि कर्णाचे काय ?


त्याच्या साठी  सोने हे मुळात "सोने" नव्हतेच… आपल्याला कुणाला तरी काही तरी देता येतंय हीच त्याच्या साठी मोठी भेट होती … त्या मुळे त्याला कुठलीही गणिते करावी लागली नाहीत,कि त्या बदल्यात त्याने काही परतफेडीची अभिलाषा बाळगली … नि त्या मुळेच तो अतिशय स्वच्छ मनाने नि शुद्ध अंतःकरणाने येथून स्थितप्रज्ञपणे त्याच्या पुढील कामासाठी निघून गेला …

अर्जुना

आयुष्यात चेतनापूर्ण मार्गावरून पुढे जाणे ह्यालाच म्हणत नाही का ? ……

(मराठमोळ्या गप्पा ब्लॉग साठी स्वैरानुवाद श्री. Ilango ह्यांच्या ब्लॉग वरून )