भोज्जा

काही अफलातून लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
काही अफलातून लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, २३ सप्टेंबर, २०२५

महाचोर ( The Thief)

 

                                              सोळाव्या शतकात जपान मध्ये एका राजाच्या  राजवटीत एका चोराने खूप धुमाकूळ घातला होता . त्याला पकडण्याचे हर तऱ्हेचे प्रयत्न निष्फळ होत होते. विशेष म्हणजे हा चोर चोरी केल्यावर जाताना जाणूनबुजून त्याचा रुमाल तेथे सोडून जायचा ,जेणेकरून समजावे कि  "तो मीच होतो." नंतर नंतर तर त्या रुमाली चोराने एखाद्या श्रीमंता कडे कडे चोरी करणे हे लोक त्याच्या श्रीमंतीचे स्टेटस  सिम्बॉल मानायला लागले.

                                           बघता बघता वर्षे उलटली आता चोर म्हातारा झाला.. तो  जरी चोर असला तरी तो सुद्धा एक संसारी माणूसच होता. तो त्याच्या पत्नी आणि मुला  सोबत राहत होता आणि त्याच्या पत्नीला आपल्या नवऱ्याच्या या उद्योगधंद्याची माहिती होती आणि मुलगा पण आता वयात आल्याने त्याला सुद्धा वडिलांच्या व्यवसायाबद्दल हळूहळू समजत गेले  आणि भले अपकीर्ती जरी असली त्याच्या वडिलांच्या चौर्य कौशल्या बद्दल लोकांमधे असलेले  कुतुहूल,भीतीयुक्त आदर त्याला समजत होता पण तो चोर मूलतःच  स्वभावाने अबोल असल्याने त्याच्या मुलाला सुद्धा त्याचा दरारा वाटायचा .    

                                           मधे  बरीच वर्षे गेली,आणि वय झाल्याने आता आपल्या वडिलांचे अगदी घरात सुद्धा काहीएक काम करतांना हातपाय थरथरतात हे मुलाच्या लक्षात आले.  आणि त्याला वाटले कि आता आपण पण आपल्या वडिलांना त्यांच्या चोरीच्या कामात मदत केली पाहिजे  जेणे करून ते निदान उतार ते  वयात पकडले जाणार नाहीत, त्यांची मानहानी होणार नाही.

                                        शेवटी एक दिवस त्या मुलाने थोडा हिय्या करून वडिलांना सांगितले कि मला सुद्धा तुमची हि चौर्यकला शिकायची आहे. तुम्ही शिकवाल  का ?


चोराने मुला कडे बघितले , क्षणभर थांबला आणि म्हणाला ,

ठीक आहे ! आज रात्री तयार राहा !

                                         बघता बघता संध्याकाळ उलटून  रात्र  सुरु झाली आणि  ती सुद्धा  नेमकी अमावस्येची. .सरणाऱ्या एकेक मिनिटागणिक मुलाची उत्सुकता आता शिगेला पोहोचायला लागली होती.  

                                       शेवटी बारा  साडेबारा नंतर चोर उठला ,त्याने त्याच्या हत्यारातील एक ५ पौंडाचा हातोडा आणि एक धारदार छिन्नी ,जी त्याने आधीच लावून तयार ठेवली होती ती  पोत्यात भरून  मुलाला नुसत्या मानेने चल अशी खूण  करून तो बाहेर पडला व चालायला लागला.

                               बघता बघता चोर गावाबाहेर असणाऱ्या एका  शेठजीच्या बंगल्याच्या मागच्या बाजूच्या कंपाउंड वॉल मागे जाऊन थांबला. आजूबाजूचा थोडा कानोसा घेत त्याने त्या भरभक्कम भिंतीला जवळच्या छिन्नी हातोड्याने भगदाड पाडले आणि सहजगत्या बंगल्याच्या आवारातून दबक्या पावलाने पुढे जात त्याने बघता बघता बंगल्याचा दरवाजा तोडत बंगल्यात प्रवेश केला.

                                इतक्या अंधारात सुद्धा तो आता बंगल्यात हॉल मध्ये टांगलेल्या प्रकाश हंड्यांच्या मंद प्रकाशात अगदी सराईता सारखं चालत जात होता ..जणू त्या बंगल्यातच तो राहत होता.  त्याचा मुलगा थक्क होत हे सगळं पाहात त्याच्या मागोमाग जात होता . इतरवेळी थरथरणारे ,क्वचित अडखळणारे आपल्या वडिलांचे पाऊल आत्ता मात्र न अडखळता ,थरथरता नेमके पणाने पुढे जात आहे हे पाहून तो विचार करतो न करतो तेवढ्यात तो चोर एका खोली पाशी जाऊन पोहोचला.

                                   आता त्याने खिशात हात घालत एक किल्ली काढली ,झटक्यात त्या खोलीचे कुलूप आणि दार उघडून तो आत शिरला आणि मागोमाग आलेल्या  त्याच्या मुला कडे बघत  त्याने फक्त नजरेने खुणावले " तिजोरी".

                                      बघता बघता चोराने ती तिजोरी जवळच्याच  कुठल्याशा किल्लीने उघडली  आणि मुलाला त्यातील वस्तू सोबत नेलेल्या पोत्यात भरायची खूण  केली.मुलगा तर थक्क होऊन हे सगळे पाहत होता,अनुभवत होता.वडिलांची हि अद्भुत कला अनुभवत तो त्या तिजोरीतील वस्तू पोत्यात भरायला घेणार  इतक्यात त्याला त्या खोलीचा  दरवाजा आणि त्यावरचे कुलूप कुणीतरी बाहेरून लावल्याचा आवाज आला. आणि तो दरवाजा जवळ पळत  गेला .. आणि बघतो ते काय त्याच्या वडिलांनी, म्हणजे त्या चोराने आता त्या खोलीला बाहेरून चक्क कुलूप लावत जोर जोरात चोर-चोर-चोर अशी आरोळी ठोकलेली मुलाने ऐकली आणि मुलगा  आत मध्ये मटकन खाली बसला.  चोराने या सर्व हालचाली इतक्या वेगाने केल्या पण त्याने कंपाउंडला पाडलेल्या त्या भगदाडा कडे  धाव घेताना त्याचा पाय नकळत वाटेतल्या एका स्टूल वर ठेवलेल्या फ्लॉवरपॉटला  लागला व तो खाली पडत खळकन मोठा आवाज झाला.

                                 आता संपूर्ण बंगल्याला जाग आली . काहींनी चोराला त्या भगदाडातून बाहेर पडताना बघितले आणि चोर-चोर चोर अशा आरोळ्यातून एकच हलकल्लोळ माजला. काही जण त्याच्या मागे धावले पण चोराने इतक्या सफाईने पोबारा केला होता कि तो कुणाच्या हाताला म्हणून  लागला नाही.

                             आता पहाटेचे तीन साडे तीन झाले होते . चोराचा मुलगा सुद्धा आता घरी पोहोचला . अतिशय रागाने तो सर्वप्रथम बापाच्या खोलीत गेला आणि बघतो तर काय ? त्याचा बाप डोक्यावरून पांघरून घेऊन चक्क घोरत निवांत झोपला  होता.

                           आता मात्र त्याचा राग प्रचंड अनावर झाला व त्याने त्वेषाने वडिलांच्या तोंडावरून पांघरूण काढत त्यांना हलवून जागे केले.

                         वडिलांनी त्याच्याकडे पहिले आणि विचारले,  अरे ! आलास का ? छान झाले. आणि पुन्हा डोक्यावरून पांघरूण घेत  तो झोपी जायला लागले  तसा मुलगा बापावर खूपच भडकला आणि त्याची भडास तो बापावर काढायला लागला.बापाने थोडावेळ थांबत .. ठीक आहे ,आता तू आलास ना ? बास ! झोप आता ,दमला असशील खूप .. पण मुलगा बापाचे बोलणे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता . त्याने निग्रहाने वडिलांना जागे राहायला लावले. आणि अतिशय चिडून म्हणाला तुम्ही माझे नक्की बाप आहेत का वैरी ? तुम्ही मला एकट्याला त्या खोलीत कोंडून गेल्यावर पुढे काय झाले ते  माहितीयेका ? तर ऐका 

                            बाप म्हणाला ,खरं तर मला खूप झोप आलीये आणि  खरं सांगू ? तुझी गोष्ट ऐकण्यात मला काडीचा रस नाहीये ,तू परत आलयेस हीच माझ्या साठी खूप महत्वाची  गोष्ट आहे, पण केवळ तू माझा मुलगा आहेस म्हणून मी तुझी गोष्ट  ऐकतोय . त्यावर मुलगा सांगायला लागला .. कि..

                                तुम्हीं मला त्या खोलीत कोंडून जेव्हा सोडून गेलात तेव्हा माझ्या मनात पहिला प्रश्न आला कि हा माझा बाप आहे का मागच्या जन्मीचा वैरी ? हा इतका दुष्ट कसा असू शकतो . ? याने हे असे का केले असावे ? ते हि स्वतःच्या मुलाच्या बाबतीत?

                            पण यावर मला जास्त विचार करायला तेव्हा वेळ मिळाला नाही कारण बाहेरच्या दिवाणखान्यात  आता लोक जमले होते व घरात चोर घुसलेला आहे हे त्यांना समजल्याने ते त्याचा आता कसून शोध घेत होते. आता घरमालक शेठजी  सुद्धा हॉल मध्ये आलेले होते .. चोराला सगळीकडे शोधल्यावर आणि तो न सापडल्यावर  जेव्हा सगळे पुन्हा हॉल मध्ये जमले तेव्हा शेठजींनी त्यांच्या जुन्या जाणत्या नोकराला तिजोरीची खोली बघायला सांगितले. चोराने पळून जाताना तिजोरीच्या खोलीला कुलूप लावल्याने ती बाहेरून बंद होती ..  नोकराने तेथील कुलूप पाहून शेठजींना तसे सांगितले. सगळ्यांना हायसे वाटले .. 

                         आता बाकी सगळे उद्या दिवस उजाडल्यावर बघू असे शेठजी म्हणाल्याचे ऐकल्यावर मात्र आतमध्ये आता माझ्या अंगात कापरे भरले. आता उद्या सकाळी मी चोरी न करता देखील  आयताच पकडला जाणार या जाणिवेने मी हबकून गेलो आणि का कोण जाणे पण मी काहीतरी करून  त्या खोलीचा दरवाजा उघडला जावा या हेतूने  खोलीतून मांजराच्या पिलाचा आवाज काढला.. 

                              रात्रीच्या शांततेमुळे तो सगळ्यांनी ऐकला नि शेठजींनी घरातील जुन्या जाणत्या स्त्री नोकराणीला ती तिजोरीची खोली उघडून त्या पिलाला बाहेर काढायला सांगत तेथून प्रस्थान केले. संध्याकाळी मी खोली बंद करतांना हे पिल्लू तिथे नव्हते म्हणतच  तिने खोलीचे दार उघडले अन ती  संधी साधून मी तिला जोरदार धक्का देत    जीवाच्या  आकांताने कंपाउंड वॉल च्या त्या पाडलेल्या भगदाडातून जीव मुठीत घेऊन बाहेर पळालो. घरातील लोक माझा पाठलाग करायला लागले. 

                            घरातल्या लोकांची  बोंबाबोंब ऐकून आता  बघताबघता चोर चोर ओरडत ५० लोक माझा पाठलाग करायला लागले आणि  आता मी पकडला जाणार असे मला स्पष्ट दिसायला  लागले ,तेवढ्यात पळताना मला गावा  बाहेरच्या विहिरीजवळ एक मोठ्ठी शिळा नजरेला पडली .. आणि कसे ते माहिती नाही पण एक क्षणभर विचार करत आहे नाही ती ताकद लावून मी ती उचलली आणि त्या विहिरीत टाकली. त्याचा भलामोठा  आवाज आला आणि विहिरीतून पाण्याचा जो मोठ्ठा फवारा उडला त्या गडबडीत मी जवळच्या पिंपळाच्या झाडामागे जाऊन लपलो.

                              आता माझा पाठलाग करणारे विहिरीजवळ येऊन ठेपले होते. विहिरीतून उडणारा पाण्याचा  फवारा  त्यांनी सुद्धा  बघितला असल्याने पडला पडला चोर पाण्यात पडला असा त्यांनी जल्लोष केला. काही जण त्या अंधारात चोराला शोधायला लागले. मी सुद्धा आता हळूच त्या गर्दीत सामील  झालो ..  काही जण म्हणाले .. चला बरे झाले सापडला ,कारण विहिरीला पायऱ्या नसल्याने आता चोर वर येऊ शकणार नाही म्हणून आता त्याला उद्या सकाळी येऊन पकडून चोप देऊ. असे म्हणत गर्दी पांगली .. आणि हे बघा मी आत्ता तुमच्या समोर उभा आहे .

                           हे सांगताना मात्र त्याच्या  नजरेत त्या वेळी "  बोला ,या सगळ्याला आता तुम्ही काय म्हणणार असा आत्मप्रौढीचा  प्रश्नार्थक भाव होता.  बापाने तो ओळखला .

                              बापाने त्याच्या डोळ्यात शांतपणे पहात फक्त इतकेच सांगितले "आता उद्या पासून तू तुझे काम एकट्याने करायला हरकत नाही. तुझे ट्रेनींग संपले आहे." 


तात्पर्य : मिळालेल्या यशाची कधी चर्चा करू नका.    


रविवार, २५ मार्च, २०१८

*तो* मोक्याचा क्षण



तिरंदाजीच्या असंख्य स्पर्धा जिंकल्या मुळे त्याचा अभिमान वाटण्या ऐवजी  गर्व असणाऱ्या एका तरुण तिरंदाजाने एका झेन तत्ववादी वयस्कर तिरंदाजास एकदिवस त्याच्या सोबत तिरंदाजीच्या स्पर्धेचे थेट आव्हान दिले.

असंख्य स्पर्धा जिंकलेल्या त्या तरुण तिरंदाजाचे नेमबाजीतील कौशल्य वादातीत होते ह्यात शंकाच नाही. कारण त्याने त्याच्या पहिल्याच बाणाने दूर झाडावर बसलेल्या एका पक्षाच्या डोळ्याचा नेमका वेध घेतला, .... आणि दुसऱ्या बाणाने त्या पहिल्या सोडलेल्या बाणाचे दोन तुकडे करून, छाती थोडी पुढे काढत त्याच्या हातातील ते धनुष्य त्या वयस्कर तिरंदाजांच्या हातात देत ....

" हं ! आता तुमची पाळी",बघा तुम्हांला जमतंय का ते  ?

असे म्हणत धनुष्य वयस्कर माणसा समोर ठेवले.

म्हाताऱ्याने त्याच्याकडे बघितले आणि अतिशय अविचल रहात,धनुष्याला हात सुद्धा न लावता फक्त त्या तरुण तिरंदाजाला नजरेने त्याच्या मागून यायला सांगितले आणि तो    शेजारचा उंच डोंगर चढायला लागला.

तो तरुण तिरंदाज चकित होत त्याच्या मागून चालायला लागला.तो उंचच -उंच डोंगर चढताना त्याची थोडी दमछाक होत होती, पण हा  म्हातारा आता काय करणार हि उत्सुकता त्याला म्हाताऱ्याबरोबर झप-झप पावलं उचलायला भाग पाडत होती.

थोड्याच वेळात दोघे त्या पर्वताच्या सर्वात उंच टोकावर एका दरी पाशी पोहोचले. तेथे पाहता  खाली खोल खाई नि त्या वर केवळ एक झाडाचा  कुजलेला ओंडका  पुलासारखा त्या दरीत लोम्बकळलेला त्या तरुण तिरंदाजाने बघितला, नि आता मात्र त्याची उत्सुकता शिगेस पोहोचली.

म्हातारा पुढे सरसावला…….अतिशय सावधतेने तोल सांभाळत दरीत लोम्बकळणाऱ्या त्या ओंडक्याकर म्हातारा बघता-बघता  मध्यभागी पोहोचला. खाली खोल खाई, कुजलेला तो ओंडका ... कोणत्याही क्षणी दरीत कोसळण्याची शक्यता असलेला...

म्हाताऱ्याने  तोल सांभाळत शांतपणे स्वतःच्या पाठीवरचे धनुष्य काढत त्याची प्रत्यंचा खेचली नि दरीच्या पलीकडच्या एका उंच झाडावर नेम धरला,नि क्षणात त्या दूरवरच्या झाडाचा अचूक वेध घेतला.

आणि…….

"आता तुझी पाळी "

असं म्हणत तो सावधपणे पक्क्या जमिनीवर स्थिरावला.

आता मात्र तो तरुण थोडा गांगरला .इतक्या धोकादायक परिस्थितीत हे आव्हान स्वीकारायच्या कल्पनेनेच तो तरुण जागेवर खिळला. मग आव्हान स्वीकारायचा तर प्रश्नच नव्हता.
म्हाताऱ्याला त्याची अडचण लक्षात आली त्याने थोडा दीर्घ श्वास घेत त्याला फक्त एवढेच सांगितले ....

" तुझे नेमबाजीतील कौशल्य वादातीत आहे यांत शंकाच नाही,पण मोक्याच्या क्षणी तू  तुझ्या  मनावरील नियंत्रण गमावून बसलास, आणि  हाच जेत्या मधील आणि पराभूत माणसातील फरक आहे आणि  ज्या दिवशी तू ही परीक्षा उत्तीर्ण होशील त्या दिवसापासून  तू आयुष्य खऱ्या अर्थाने जगायला सुरवात करशील.
*********************************************************************************    
ही झेन तत्वज्ञानातील कथा वाचल्यावर आता ज्याने त्याने स्वतःचे स्वतःला  खालील प्रश्नाचे उत्तर द्यावे कि ,  : *आपल्या आयुष्यातल्या मोक्याच्या क्षणी आपण  स्वतःला कधी असे तपासून बघितले आहे का ?* 

सहकार्य : इंटरनेट वरील Mind over Matter या झेन तत्वज्ञानातातील कथेचा स्वैरानुवाद ... धन्यवाद 



मंगळवार, २० डिसेंबर, २०११

जिब्राल्टरचा विमानतळ

जिब्राल्टर रॉक, जिब्राल्टरची सामुद्रधुनी ह्या विषयी आपण कधीतरी वाचले-पहिले असते तथापि स्पेनच्या दक्षिणेस असलेल्या, ब्रिटिशांची स्वायत्त वसाहत म्हणून जगभर ओळखल्या जाणाऱ्या  ह्या देशातील विमानतळाबाबत आपण त्या तुलनेत कमी वाचले किंवा बघितले असते.फक्त ६.८ चौ.कि.मी.एवढेच क्षेत्रफळ असणाऱ्या ह्या देशात जेथे लोकांना राहायला नीटशी जागा नाही, तेथे नागरी विमानतळा साठी जागा उपलब्ध करणे व त्यावर विमानतळ बांधणे  म्हणजे दिव्यच होते. तथापि "गरज ही शोधाची जननी असते" किंवा     whenever there is will , there is way  ह्या उक्तीला जागत ब्रिटिशांनी स्पेन आणि जिब्राल्टरला जोडणाऱ्या  विंस्टन चर्चिल या भर वाहतुकीच्या चौपदरी मुख्य रस्त्यावरचं,नव्हे त्या रस्त्यामध्येच, त्या रस्त्याला अगदी ९० अंशाच्या कोनात छेदणारा असा विमानतळ बांधलेला आहे.अर्थात हा विमानतळ फार मोठ्या वाहतुकीचा नाही.आठवड्याला येथून सुमारे ३० विमानेच  जा-ये करतात व ते हि फक्त इंग्लंडला.ह्यातील गमतीचा भाग म्हणजे त्या विमानतळावर एखादे विमान येण्यापूर्वी किंवा तेथून जाण्यापूर्वी सदरहू महामार्गावरील सुरु असलेली वाहतूक सुद्धा अगदी इतर सर्वसाधारण रस्त्या प्रमाणे फक्त तांबड्या सिग्नलनेच बंद केली जाते व विमान गेल्यावर रस्ता नेहमी प्रमाणे वाहतुकीला मोकळा केला जातो.विश्वास बसत नाही ना ?चला तर मग त्याचे हे फोटोच पहा.

मंगळवार, १३ डिसेंबर, २०११

तुमची झोपण्याची पद्धत आणि तुमचे व्यक्तिमत्व

"तुमच्या झोपण्याच्या पद्धतीवरून तुम्ही कसे असता किंवा असू शकता हे मी तुम्हाला सांगतो " असे   आपल्याला जर कुणी सांगितले तर आपण त्याला नक्कीच वेड्यात काढू.पण आजच्या ह्या इंटरनेटच्या जगात कुणीही,कधीही,कशावरूनही आणि काहीही सांगू शकतं... आपला विश्वास बसत नाही ना ? तर मग चला ही चित्रेच पहाना ! आणि मग नंतर ठरावा कि त्यात तथ्य किती नि करमणूक किती ते !

रविवार, ६ नोव्हेंबर, २०११

जे.आर.डी.टाटांचे दुर्मिळ पेंटिंग

मध्यंतरी सहजच सर्फिंग करत असता जे.आर.डी.टाटांचे  "एक दुर्मिळ पेंटिंग" पहाण्यात आले. हे चित्र म्हणे त्यांच्या रहात्या घरात ठेवले आहे.कुणा ऐक्या अनामित कलाकाराने हे पेंटिंग जे.आर.डी.टाटांना सप्रेम  भेट दिले होते.हे चित्र दिल्या वर ते नक्की कशाचे चित्र आहे हे कुणाला तसे काही उमगले नाही अशी काही ब्लॉग/साईट  वरील माहिती सांगते,आणि जे.आर.डी.ह्यांच्या निधना नंतर म्हणे त्याचे रहस्य उलगडले असे सांगतात.

तथापि ते बिलकुल पटत नाही.त्या चित्रकाराच्या ह्या अप्रतिम कलाकृतीचा पूर्ण मान राखून,असे अतिशय विश्वासाने सांगावेसे वाटते कि हि कला निश्चितच दुर्मिळ आहे तथापि अगदीच अनोखी वगैरे अशी बिलकुल नाही/नव्हती, कारण पुण्यातील "सकाळ" ऑफिस समोरील श्री आझाद मित्र मंडळाने ह्या चित्रकलेच्या पद्धतीच्या गणपतीच्या चित्राचा देखावा हा फार पूर्वी म्हणजे सुमारे १९७० ते ७५ ह्या काळात सादर केला होता.सदर मंडळाच्या विद्यमान अध्यक्षांची,श्री.अहिरे ह्यांची ह्या संदर्भात भेट होऊ शकली नाही,पण शक्य झाल्यास त्या वेळच्या त्या देखाव्याचा फोटो व त्या कलाकाराचे नाव त्या चित्रा सोबत नंतर नक्की देण्यात येईल.

सदरहू देखाव्यात त्या कलाकाराने,गणपतीचेच चित्र खाली मंचावर काढले होते आणि प्रेक्षक ते चित्र दुरून पाहणार असल्याने,आणि ह्या चित्राची मेख प्रेक्षकांच्या त्वरित लक्षात यावी ह्या हेतूने,त्या कलाकाराने स्टील रॉड ऐवजी,क्रोमियम प्लेटेड असा अर्ध गोलाकृती असा सुमारे सहा फूट उंचीचा पत्रा वापरला होता.ह्या अनोख्या देखाव्याची बातमी "सकाळ "च्या त्या वेळच्या गणेशोत्सवाच्या अंकात छापून आल्याने ,त्या काळी हा देखावा,पुणेकरांनी लांबून-लांबून येऊन बघितला असल्याचे स्मरते.

ते काहीहि  असो.सध्या आपण जे.आर.डी.टाटांचे ते दुर्मिळ पेंटिंग तर पाहूयात !

शुक्रवार, २८ ऑक्टोबर, २०११

पांडुरंगांची व्यंगचित्रे

महाराष्ट्राचे  आराध्यदैवत असलेल्या पांडुरंगाचे पंढरपूर हे ज्यांचे जन्मस्थान होते त्या, खऱ्या तर खूप मोठ्या, पण वादग्रस्त चित्रकाराला, म्हणजेच पैगंबरवासी मकबूल फिदा हुसेन ह्यांना  सर्वांच्या  भावना दुखावणारी  लक्ष्मी,सरस्वती आणि  भारतमातेची  नग्नचित्रे  काढल्याने ह्या देशातून परागंदा होऊन, लंडनला जाऊन अल्लाला प्यारे व्हावे लागले होते,त्या मुळे पांडुरंगांची व्यंगचित्रे असे वाचल्यावर आपल्या भुवया वर जाणे स्वाभाविक आहे.पण केवळ नाव साधर्म्या व्यतरिक्त ह्या पांडुरंगाचा नि आपल्या त्या पांडुरंगाचा काही एक संबंध नाही.उलट ह्या जेष्ठ कन्नड व्यंगचित्रकाराची मराठी वाचकांना माझ्या तर्फे थोडीशी तोंडओळख करून देण्याचा आणि आपल्या दिवाळीचा आनंद द्विगुणीत करून,ह्या महान व्यक्तिमत्वाला सलाम करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. 

मंगळवार, ११ ऑक्टोबर, २०११

अफलातून जादुगार डेव्हिड कॉपरफिल्ड

जादुगारी विश्वात "डेव्हिड कॉपरफिल्ड" हे नाव माहीत नाही असा माणूस शोधून सापडणे कठीण.११ गिनीज वर्ल्ड रेकॉर्डस नावावर असणारा आणि २१ एमी अवार्ड्स जिंकणाऱ्या ह्या अवलिया जादुगाराचे ,सहा देशांनी पोस्टाचे तिकीट काढून त्याच्या कौशल्याचा सन्मान केला आहे.असा मान मिळणारा आणि मिळविणारा तो जगातील एकमेव जादुगार आहे असे सांगितले जाते.ह्याच्या खेळाची आजवरची विकली गेलेली तिकिटे हि फ्रँक सिनात्रा,एल्व्हिस प्रिस्ले एवढेच काय पण अगदी मायकेल जॅक्सनच्या सर्व खेळांच्या पेक्षा हि जास्त आहेत असे त्याची साईट सांगते.थोडक्यात काय तर जिवंतपणीच  दंतकथा बनलेल्या ह्या जादुगाराला सलाम.आता एवढे वाचल्यावर आपल्याला त्याचा किमान एक तरी जादूचा खेळ बघणे हे ओघानेच आले.चला तर मग पाहूयातच...

रविवार, ९ ऑक्टोबर, २०११

"तिरुपती बालाजी"च्या "तिरुमला" पर्वताचे रहस्य

देशा परदेशातील कोट्यावधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेले तिरुपती बालाजी देवस्थान हे तिरुमला पर्वताच्या सात पर्वत रांगां मध्ये वसलेले आहे.ह्या सात पर्वत रांगांचे आणि श्री बालाजीचे नाते किती आणि कसे अतूट आहे हे आपल्याला एकदा तरी अवश्य बघायलाच हवे. चला तर मग ...

रविवार, २९ मे, २०११

डोक्याचा वापर !

जेव्हा एखाद्या उपयोग योग्य उत्पादनाची उपयुक्तता एका मर्यादे पर्यंत जाऊन पोहोचते, नि त्यात काही नवीन बदल करणे काही नैसर्गिक बंधनां मुळे शक्य होत नाही आणि केवळ त्या मुळे जर त्या उत्पादनाचा खप, खरे तर गरजेचा असूनही एका सॅच्युरेशन पॉइन्ट पर्यंत जाऊन पोहोचत असेल ,नि त्यात आता काही नवीन सुधारणा करणे शक्य नाही असे वाटत असतानाच कुणाच्या तरी डोक्यातून अफलातून कल्पना बाहेर येते नि त्या जुन्या उत्पादना मध्येच नाविन्य निर्माण होते.हेल्मेट हि वस्तू त्या पैकीच एक.आता  ह्या हेल्मेटच्या खालील चौदा प्रकारां मधून सर्वात जास्त नाविन्यपूर्ण अशी कोणती हेल्मेट निवडायची ह्या साठी सुद्धा आपल्याला पुन्हा डोक्याचाच  वापर करावा लागणार !:)  

शुक्रवार, २७ मे, २०११

उंटा(वर)चे शहाणपण !

ही एक अतिशय सरळ, साधी,अगदी छोटीशी अशी चित्ररूप गोष्ट आहे,पण ह्या छोट्याशा गोष्टीत सुद्धा, आपल्या पैकी काहींना, कदाचित, विचार करायला भाग पडण्या साठी,खूप काही अर्थ दडलाय ...



शुक्रवार, २० मे, २०११

त्या "चपट्या" नाकवाल्याची गोष्ट

खरं तर हे चपट्या नाकाचं, लहानसं, एक अगदी सर्वसाधारण कुत्र्याचं पिल्लू होतं,म्हणजेच "पग".मात्र, लोक त्याला "हच डॉग" म्हणूनच  ओळखायचे. ते छोटंसं  पिल्लू असताना त्याचे आयुष्यं खूप मस्तं चालले होते.एकदम आनंदात.
 खायचं,प्यायचं, खेळायचं नि झोपायचं ...... 

रविवार, १० एप्रिल, २०११

चांगल्या नोकरीच्या शोधात आहात? तर येथे भेटा....

या नोकरीत "वाचण्या" सारखं काहीच नाही,आपल्यातल्या टॅलंटला इथे कितपत वाव आहे हे ज्याचे त्यांनी आपापलेच  ठरवायचे आहे. विश्वास बसत नसेल तर बघा...... आणि वाटलं... तरच फक्त अप्लाय करा.