भोज्जा

शनिवार, ६ ऑक्टोबर, २०१८

गौतम बुद्धांचा आरसा आणि नरेंद्र मोदी

मला कोणाच्या हाताखाली काम करायचे नाहीये. मला माझा स्वतःचा व्यवसाय करायचा आहे आणि त्या मुळे भांडवल जमा करण्यासाठी म्हणून मी एका कंपनीत सेल्स रिप्रेझेन्टटेटिव्ह म्हणून काम करतो. पण त्या साठी मला लोकांच्या दारोदार जावे लागते. कंपन्यांतून भेटी द्याव्या लागतात लोकांच्या सोईनुसार वेळा पाळाव्या लागतात .बऱ्याचदा तासनतास त्यांची वाट पहात ताटकळत थांबावे लागते. बऱ्याचदा पुन्हापुन्हा एकाच जागी जावे लागते ..काही ठिकाणी मला लोक ब्याद असल्यासारखी वागणूक देतात  आणि तेव्हा मला स्वतःचा फार राग येतो आणि वाटते कि,हे मी काय करतोय ? मी स्वतंत्र व्यवसाय कधी नि कसा सुरु करणार ? भांडवल कधी गोळा करणार ??? त्या पेक्षा मला एखाद्या चांगल्या कंपनीत क्लार्कची नोकरी मिळाली तर फार बरे होईल ... 

तामिळनाडूतल्या देवळांचे शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या तंजावर मधून एकाने मला पत्र पाठवून आपली ही वरील व्यथा माझ्या कडे मांडली होती,आणि तो मला त्यावर सल्ला मागत होता. 

त्याच्या या प्रश्नाचे उत्तर देण्याअगोदर आपण गौतम बुद्धांच्या आयुष्यातील एक प्रसंग पाहू. 

एकदा एक तरुण बुद्धांच्या कडे आला पण त्याला आपण आत्मसाक्षात्कारी महापुरुषाला भेटत आहोत हे माहित नव्हते.त्यामुळे त्याने जेव्हा बुद्धांचे तेजस्वी, प्रसन्न व्यक्तीमत्व बघितले तेव्हा तो अतिशय भारावून गेला व त्याने बुद्धांना पहिला प्रश्न विचारला कि,

तुम्ही परमेश्वराचे अवतार आहात काय ? 

नाही.. 

आपण स्वर्गातून अवतरले आहात काय ? 

नाही 

मग आपण ह्या पृथ्वी वरीलच अवतारी पुरुष आहात काय ?

नाही .. 

तरुणाच्या सर्व प्रश्नांची उत्तरे बुद्धां कडून नाही म्हणून आल्यावर मात्र त्याचा तोल काहीसा ढळला आणि त्याने बुद्धांना विचारले कि, 

मग आपण  कोण आहात ?

यावर मंद स्मित करत बुद्ध त्याला म्हणाले 
खरेतर या प्रश्नाने तू संभाषणास सुरुवात करणे अपेक्षित होते ... पण असो.. 

मी एक स्वच्छ आरसा आहे .माझ्या समोर जे आहे त्याचे फक्त प्रतिबिंब मी समोरच्याला दाखवतो..समोरचे दृश्य जरी दूषित असेल तरी त्याने आरशावर काही परिणाम होत नाही ..तो दूषित होत नाही . आरसा फक्त जे समोर आहे तेच दाखवतो.

If our consciousness can be like a mirror, then the life will have a different flavour. This is a famous saying of Buddha." (तुमचे आचार,विचार,व्यवहार,नियत जर स्वच्छ असेल तर ते तुमच्या आयष्याला एक सुंदर अर्थ प्राप्त करून देतात..) या वाक्याला खूप गूढ अर्थ आहे.. 
एखाद्याने तुमची स्तुती केली,तुम्हाला हुशार संबोधले तुमचे कौतुक केले किंवा तुमची तुलना थेट चाणक्या बरोबर केली किंवा तुम्हांला नवे ठेवली,तुमची निंदा नालस्ती केली आणि जर बुद्ध म्हणाले त्या प्रमाणे तुमचे मन आरशा सारखे स्वच्छ असेल तर समोरच्याला ते जो बोलत आहे फक्त ते त्याला  प्रतिबिंबित होईल.  

आता त्या तंजावरच्या तरुणाच्या प्रशांकडे वळू .त्याच्या अडचणीवर त्याने काय करावे किंवा न करावे हे मी त्याला आत्ता थेट सांगणार नाहीये तर त्यासाठी मदन मोहन मालवीय यांच्या आयुष्यातील एका प्रसंगाची त्याला आठवण करून देणार आहे.. 

बनारस विश्व हिंदू युनिव्हर्सिटीच्या  उभारणी साठी मदन मोहन मालवीय यांनी अथक आणि पराकोटीचे प्रयत्न केले त्यात कुठेही कसूर ठेवली नाही. त्यासाठी  ते हैद्राबादच्या प्रचंड श्रीमंत निजामाकडे युनिव्हर्सिटीला पैशाच्या रूपात मदत मागण्यासाठी गेले.निजामास भयंकर राग आला. एका हिंदू विश्व विद्यालयासाठी हा माणूस माझ्या सारख्या सच्च्या मुसलमाना समोर हा हे धाडस करूच कसा शकतो असा विचार करत निजामाने त्यांना हाकलून देण्याचा खूप प्रयत्न केला पण ,काहीतरी मदत घेतल्याशिवाय मालवीय तेथून जायला तयार होईनात.. शेवटी निजाम संतापला व त्याने त्याच्या एका पायातील रत्नजडित जोडा मदन मोहन मालवीय यांना रागाने फेकून मारला. 

मालवीयांनी शांतपणे तो निजामाचा मौल्यवान जोडा उचलला व ते बाहेर पडले ते थेट हैद्राबादच्या बाजारपेठेत जाऊन उभे राहिले. तेथे त्यांनी त्या निजामाच्या मौल्यवान जोडायचा लिलाव मांडला.. खुद्द निजामाचा मौल्यवान जोडा म्हणल्यावर हा-हा म्हणता बाजारपेठेत गर्दी झाली व बघता बघता बोली चढत गेली.. कुठूनशी ती गोष्ट निजामाच्या कानावर गेली.

आता निजाम बेचैन झाला. त्याच्या जिवंतपणी त्याच्या वापरत्या वस्तूचा लिलाव खुद्द त्याच्या हैद्राबाद मध्ये होतोय व ते घ्यायला लोक भलीमोठी बोली लावत आहेत  म्हणल्यावर,निजामाने त्याच्या दरबारातील एक विश्वासू सेवकांस त्वरित घटनास्थळी पाठविले व भल्यामोठ्या चढ्या रकमेला तो स्वतःचाच जोडा पुन्हा ताब्यात घेतला.मदन मोहन मालवीय यांनी अशाप्रकारे प्रतिकूल परिस्थिती अनुकूल करवून घेतली.  

सध्याच्या नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकार बाबत सुद्धा जनतेचे तेच झालेय.. काही जण निजामाच्या भूमिकेत आहेत ज्यांना मोदींची प्रत्येक कृती १००% फक्त आणि फक्त  चुकीचीच वाटते जे  त्यांना वारेमाप नावे  ठेवतात तर काही जण मदनमोहन मालवीयांच्या भूमिकेत आहेत...जे मोदींच्या प्रत्येक कृतीचा अर्थ काढत  निराश न होता त्यातून संधी शोधत त्यांचे गुणगान व  स्तुती करतात.    

तात्पर्य काय तर पुरेसा अभ्यास किंवा माहिती न घेता पूर्वग्रहदूषित नजरेने किंवा बुद्धीने एखाद्या गोष्टी,घटनेकडे,व्यक्तीकडे न पहाता तुमचे मत बनविताना प्रथम तुम्ही आरशासारखे स्वच्छ आहात कां याचा प्रथम विचार करा कारण आरसा कधी खोटे प्रतिबिंब दाखवत नाही.तुम्ही जसे आहात तेच तुम्हांला आरशात दिसते.                

 संदर्भ : वरील स्वैरानुवादा साठी स्वामी सुखबोधानंद यांच्या Oh ,Life relax please ! चा आधार घेतला आहे.धन्यवाद स्वामीजी !    

रविवार, २६ ऑगस्ट, २०१८

आयुष्याशी झुंज घ्यावी तर अशी : ए.के. हंगल

आज २६ ऑगस्ट २०१८ ,आजच्या दिवशीच ७ वर्षांपूर्वी तब्बल ९७ वर्षांचे ज्येष्ठ अभिनेते ए के हंगल यांचे देहावसान झाले होते. एक संवेदनशील अभिनेता म्हणून त्यांची ओळख आपल्याला आहेच पण मला त्यांच्या अभिनेता या ओळखी पेक्षा त्यांची देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील सक्रिय पण अंतिमक्षणी अतिशय उपेक्षित राहिलेले स्वातंत्र्य सेनानी हि ओळख मनाला जास्त भावून जाते.

१९१४ साली पाकिस्तानात एका संपन्न काश्मिरी ब्राह्मण कुटुंबात जन्मलेले ए के हंगल हे भारताचे प्रथम पंतप्रधान पंडित नेहरू यांचे अतिशय जवळचे नातेवाईक होते हे बहुदा असंख्य लोकांना माहित नसेल.पंडितजींची पत्नी आणि स्व.इंदिरा गांधी यांची आई कै .सौ.कमला नेहरू आणि ए.के.हंगल यांची आई या सख्ख्या चुलत बहिणी होत्या. आणि त्या मुळेच हंगल यांची त्याच काँग्रेसच्या कारकिर्दीत त्यांच्या वृद्धापकाळी विपन्नावस्थेमुळे झालेली वाताहत मनाला फार चटका लावून जाते.

स्वातंत्र्या साठी आपली उभी जवानी ज्या माणसाने देशासाठी वाहिली, ज्यांची १९४६ ते १९४९ अशी ऐन जवानी मधील मोलाची ३ वर्षे पाकिस्तान मध्ये तुरुंगात गेली  ,कशा साठी ??? तर इंग्रजांनी केलेल्या जालियन वाला हत्याकांडा विरुद्ध त्यांनी आवाज उठवला म्हणून,पण अशा व्यक्तिमत्वाचे विस्मरण नंतरच्या काळात तत्कालीन सरकारला व्हावे याचे फार वैषम्य वाटते.पण हे गृहस्थ इतके मानी होते कि,त्यांनी त्यांच्या विपन्नावस्थेत सुद्धा  ते नेहरू कुटुंबाचे जवळचे नातेवाईक असूनही कधी त्याचे भांडवल करून सहानुभूती किंवा मदत मिळवण्याचा कधी प्रयत्न केला नाही.हा इतका मुलखावेगळा माणूस होता कि, त्यांनी २२५ चित्रपटात काम केले पण त्यातील त्यांनी जेमतेम ५० सिनेमेच आपल्या आयुष्यात बघितले.शेवटच्या काही वर्षात तर ते ८-८ १०-१० महिने घराबाहेर सुद्धा पडत नसत..   

स्वतः जन्माने काश्मिरी पंडित असूनही त्यांनी त्यांचा परंपरागत व्यवसाय सोडून टेलरिंग या विषयात इतके प्राविण्य मिळवले होते कि, त्यांचे स्वतःचे पेशावर मध्ये भले मोठे टेलरिंग शॉप होते. ते स्वतः सूट शिवण्यात स्पेशालिस्ट होते ... इतके कि ते  *त्या काळी* एका सूटची शिलाई तेव्हाचे ८०० रुपये घेत असत व लोक त्यांना ती देत असत.   

आता विचार करा कि, असा हा वेलसेटल्ड माणूस जेव्हा १९४९ साली त्या कराचीतील तुरुंगातून सुटून स्वातंत्र्य सेनानी म्हणून ३५व्या वर्षी जेव्हा खिशात अवघे २० रुपये घेऊन बाहेर पडला असेल आणि त्याला देशाची झालेली फाळणी, त्या सोबतचा हिंसाचार ,कत्तली ,हत्याकांडे स्वतःचा धंदा,कुटुंब  उध्वस्त झालेलं बघावं लागलं असेल तेव्हा त्याची काय मानसिक अवस्था झाली असेल याचा विचारही करवत नाही.

पण त्यांनी हार मानली नाही कि कुठल्या सवलतीची ,आरक्षणाची किंवा सहानुभूतीची मदत अपेक्षित धरली नाही.त्यांनी आयुष्याला पुन्हा नव्याने सुरवात करत आपले उर्वरित आयुष्य ऑल टुगेदर नवीन म्हणजेच पूर्णवेळ अभिनेता होऊन सन्मानाने सुरु केले व त्यात नावलौकिक मिळवत राष्ट्रपतींच्या हस्ते "पद्म भूषण " हा मानाचा 'किताब मिळविला..


तर अशा या ए.के. हंगल यांचा हा आयुष्यपट पहाता आजच्या तरुणपिढीस त्यातून एकच आदर्श घेता येईल कि, *आयुष्याशी झुंज घ्यावी तर अशी* 

हंगल जींच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांचा एक गाजलेला सीन आज तुमच्या साठी.
   आजच्या लेखासाठी गुगल इमेज,विकिपीडिया व यूट्यूब यांचे सहकार्य घेण्यात आले आहे. संबंधितांचे मनापासून आभार 

बुधवार, ८ ऑगस्ट, २०१८

Kai Bar Yun Hi Dekha Hai

पालकांना नको असलेलं मूल जन्माला यावं ,त्यांनी जग रहाटी म्हणत त्याचं संगोपन करावं आणि एक दिवस त्यानं ध्यानीमनी नसतांना दैदिप्यमान यश मिळवत बोर्डात प्रथम यावं आणि  हे यश केवळ मला पालकांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे मिळालं आणि मी त्यांचा सदैव ऋणी राहीन,हे यश त्यांचं आहे अशी मीडियाला सर्वप्रथम प्रतिक्रिया द्यावी... आता अशावेळी त्या पालकांचे चेहरे त्यानंतर एकमेकांच्याकडे बघतांना काय होत असतील याची फक्त कल्पना करा.     

वास्तव जीवनात या सदृश प्रसंग १९७२ साली घडला आहे . 

दिग्दर्शक बासू चॅटर्जी *रजनीगंधा* सिनेमा बनवत होते.. केवळ २-३ लाखात हा माणूस चांगला सिनेमा बनवतो व त्यावर पैसे मिळू शकतात म्हणून अमेरिकेतील २ तरुणांनी भागीदारीत निर्माता म्हणून याच प्रॉडक्शन सुरु केलं.बासूदांनी स्वतःचे बंगाली वजन वापरत सलील चौधरींना त्या साठी संगीतकार नेमलं आणि लताच्या आवाजात प्रथम "रजनीगंधा फूल तुम्हारे " हे गाणे रेकॉर्ड केले.. त्याचे शूट पूर्ण झाले .. सिनेमाचे इतर शूट सुद्धा दरम्यानच्या काळात वेगात सुरूच होते कारण सर्व अभिनेते नवीन असल्याने तारखांचा प्रश्नच नव्हता. चित्रपट संपत आला व आता केवळ एक गाणे लताच्या आवाजात रेकॉर्ड करावयाचे बाकी होते...जे पडद्यावरनायिकेवर बॅकग्राउंडवर दिसणार असल्याने ज्याचे शूट गाण्या आधीच संपले होते. 

गाणे करण्यासाठी बासुदांनी निर्मात्याद्वयाला लताजींचे त्या वेळच्या एका गाण्याचा त्या घेत असलेल्या मोबदल्याचे ३ हजार रुपये पाठवायला सांगितले. ३००० हि रक्कम त्या काळी खूप मोठी होती ... निर्माते नाराज झाले. त्यांना वाटले ,हे पैसे म्हणजे वेस्ट ऑफ मनी होतोय...कारण गाणं तसं ही बॅकग्राउंडलाच आहे आणि त्यातून जर अगदी करायचेच असेल तर कमी पैशात गाणारी दुसरी गायिका घ्या किंवा दोन हजारात जे कोणी गाईल त्याच्याकडून ते गाऊन घ्या असे त्यांनी कळवले.   पण हे गाणे लताजींनी गाणेच  गरजेचे आहे कारण ते नायिकेच्या मनाची उलघाल दाखवणारे आहे असे चित्रित होणार हे बासुदांनी त्यांना पटवून सांगायचा प्रयत्न केला पण व्यर्थ.निर्मात्यांनी दोन हजार रुपये पाठवून दिले व यांतच काय ते भागवून घ्या सांगितले..बासुदांची आता मात्र पंचाईत झाली..   

आता नवीन गायिका शोधून ऐन वेळेला प्रयोग कुठला करायचा म्हणून बासुदांनी सलील चौधरींना त्यांची झालेली गोची कानावर घातली.. ते सुद्धा सर्व कहाणी  ऐकून थक्क झाले.कारण लता हे गाणं करतीये असं ते जवळ-जवळ शेवट पर्यंत समजत होते... शेवटी केवळ नाईलाज म्हणून त्या काळी २००० रुपये प्रति गाणे मोबदला घेणारे मुकेश यांना रेकॉर्डिंगला पाचारण केले व त्यांच्या आवाजात ते रेकॉर्ड झाले.त्या काळी दोन हजाराचे मोल सुद्धा किती मोठे होते ते सांगतो म्हणजे समजेल. या चित्रपटाची नायिका विद्या सिन्हा हिला या सिनेमाचा एकूण मोबदला म्हणून रुपये ५०००/- देण्यात आला होता.      

पण या गाण्याचे  नशीब बघा या गाण्याला १९७३ साली सर्वोत्कृष्ट पार्शवगायनासाठी म्हणूनचा मुकेश यांना त्यांच्या आयुष्यातील पहिला-वहिला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला.मुकेशजींनी त्यासाठी सलिलदा आणि बासूदा यांचे त्यावेळी त्यांना इतके सुंदर गाणे गायची संधी दिल्याबद्दल जाहीर आभार मानले...आता नुसती कल्पना करा बासूदा आणि सलिलदा यांची  त्या क्षणी एकमेकांच्या कडे पाहतांना काय गोची झाली असेल...पण जी होती  ती सत्य परिस्थिती त्यां दोघांनी  मुकेश यांना शेवट पर्यंत कानावर घातली नाही.किंबहुना त्यांचे मुकेश जिवंत असे पर्यंत उभ्या आयुष्यात ते धाडसच झाले नाही.

आज  हे सगळं रामायण सांगायचं कारण म्हणजे या गाण्यांत पडद्यावर  विद्या बरोबर दिसणारा नट दिनेश ठाकूर याचा ८ ऑगस्ट हा जन्मस्मृतिदिन आहे. राजस्थान मधे जन्मलेल्या दिनेशने दिल्लीतून अभिनयाचे प्रशिक्षण घेत हिंदी सिनेमांत चरित्र भूमिका केल्या व मुंबईतील पृथ्वी थिएटर्सच्या एकूणच जडणघडणीत याचे निर्माता,अभिनेता,दिग्दर्शक म्हणून फार मोठे योगदान होते... वयाच्या ६५व्या वर्षी हा गेला सुद्धा... असो.. आता *ते* गाणे बघू... 
आजच्या लेखासाठी अनिता पाध्ये यांच्या "यही है जिंदगी" या पुस्तकाचा संदर्भ घेतला आहे. धन्यवाद अनिताजी.   


शुक्रवार, ३ ऑगस्ट, २०१८

बेक़रार करकें हमें यूँ न जाइए !

मैत्रीची आजवर आपण अनेक उदाहरणे बघितली पण या मैत्रीचे हे उदाहरण दुर्मिळ या सदरात मोडते. 

गोष्ट आहे १९६७-६८ सालातली.प्रख्यात हिंदी गीतकार आणि कवि शकील बदायुनी हे त्यांच्या वयाच्या अवघ्या ५०व्या वर्षी पाचगणीला एका आरोग्य केंद्रात मधुमेह आणि क्षयरोगाने त्रस्त होऊन अतिशय हालाकीच्या परिस्थितीत आपला  शेवटचा काळ घालवीत होते. 

कुठूनशी हि बातमी त्यांचे जिवलग स्नेही नौशाद ,ज्यांनी त्यांना हिंदी सिनेमांत गीतकार म्हणून प्रथम ब्रेक दिला होता त्यांच्या कानावर गेली. ते त्वरित पांचगणीला पोहोचले. शकील यांची पैशाअभावी झालेली खस्ता हालत त्यांना बघवली नाही.. त्यांनी त्वरित मुंबईला जाऊन त्यांना ३ सिनेमांचे गीतकार म्हणून कॉन्ट्रॅक्ट देववले आणि त्या तीनही सिनेमांच्या गाण्यांच्यासाठी साठी त्यांना प्रत्येकी दसपट मोबदला मिळवून दिला. 

आजचे शकील यांचे १९६८च्या आदमी सिनेमातील गाणे हे त्या काळातीलच आहे... ज्यांची आज ३ ऑगस्ट हि पुण्यतिथी आहे.हे गाणे आत्ता पडद्यावर जरी तुम्ही दिलीपकुमार यांच्यावर चित्रित झालेले बघत असाल तरी शकील यांना ते आयुष्यात कुठल्या टप्प्यावर येऊन पोहोचले आहेत याची त्यांना जाणीव असणारे आहे त्यामुळे हे गाणे तुम्ही आज शकील बदायुनी,नौशाद आणि रफी साहेब यांच्या नजरेतून बघितले तर त्यात एक अतिशय वेगळा,गहिरा आणि अतिशय दर्दभरा अर्थ भरलेला दिसून येईल. 

हे गाणे करतांना त्याचे संगीतकार नौशाद आणि गायक मोहम्मद रफी यांची मनःस्थिती कशी झाली असेल याची आज आपण कल्पनादेखील करू शकत नाही... 

त्यामुळे आज हे गाणे पहाण्या ऐवजी मी म्हणेन कि, ऐका फक्त...  😥😭👇
सौजन्य : या लेखासाठी इंटरनेट आणि यू ट्यूब यांचे सहकार्य घेतले आहे. संबंधितांचे मनापासून आभार 

गुरुवार, १२ जुलै, २०१८

मोरा गोरा अंग लै ले ! च्या निमित्ताने

१९६३ साली आलेल्या "बंदिनी" च्या  काही निवडक आठवणी आहे. त्यातील एक आठवण आमचे ज्येष्ठ स्नेही आणि विशेषत्वे संगीतकार शंकर-जयकिशन यांच्या सोबत त्यांच्या म्युझिक क्रू मधे अकॉर्डिअन वादक म्हणून साथसंगत केलेल्या श्री.व्हिक्टर कडनार यांची आहे.श्री व्हिक्टर यांचे सध्याचे वय ८३ वर्षे आहे. 

ते आज आठवायचं कारण म्हणजे आज १२ जुलै ,बिमल रॉय या जुन्या जाणत्या दिग्दर्शकाचा जन्म स्मृतिदिन.अवघ्या ५६ वर्षांचे आयुष्य लाभलेल्या या बंगाली-हिंदी सिनेमा दिग्दर्शकाने वास्तववादी,सामाजिक आणि संवेदनक्षम चित्रपट बनवत हिंदी-बंगाली चित्रपट सृष्टीवर एक कायमचा ठसा उमटवून ठेवला आहे.दो बिघा जमीन,मधुमती,परख,सुजाता,बंदिनी हि त्यातील काही निवडक नावे.

१९६२-६३ साली बंदिनीच्या निर्मिती काळात व्हिक्टर सर काही एक कामानिमित्त बिमल रॉय यांच्या ऑफिसात गेले होते. बिमलदा बिझी असल्याने स्वाभाविकपणे  त्यांना वेटिंग रूम मध्ये बसावे लागले. तेवढ्यात बंदिनीचा सहनायक असलेला धर्मेंद्र हा सुद्धा तेथे त्याच्या काही एक कामा निमित्त आला. बंदिनीच्या निर्मिती काळात धर्मेंद्र हा चित्रपट सृष्टीत अतिशय नवखा होता..त्याचे अद्याप नाव झाले नव्हते ... त्याच्या ग्रामीण पार्श्वभूमी मुळे त्याला इंग्रजी बोलण्याचा सुद्धा सराव नव्हता.त्यामुळे आता या प्रसंगी त्या मोकळ्या वेळात व्हिक्टर यांच्या सोबत संवाद साधतांना त्याला अडचण येत होती.हि गोष्ट लक्षात येताच व्हिक्टर सर यांनी त्यास आप टेन्स मत होईये ,और फिक्र करना  छोड दीजिये , बिमल दा जैसे भारत के महान फिल्म डायरेक्टर ने आपको इस फिल्म के लिय सिलेक्ट किया है ये फिल्म के बाद आप का पूरे इंडस्ट्री में बडा नाम होगा इसका मुझे पूरा विश्वास है ,एक दिन आप हिंदी फिल्म इंडस्ट्रीमें बहोत नाम कमाओगे... आमच्या व्हिक्टर सरांचे  ते बोल धर्मेंद्रच्या बाबतीत पुढे जाऊन शंभरटक्के खरे ठरले...  

व्हिक्टर सरांनी मागे एकदा हा किस्सा आम्हांला जेव्हा सांगितला तेव्हा त्या नंतर उगाचच माझ्या डोळ्यापुढे तेव्हा  व्हिक्टर सरां कडे पाहून मनमोकळा ,निरागस हसणारा धर्मेंद्र डोळ्यासमोर येऊन गेला.. असो... 

बिमलदांचा दुसरा किस्सा सुद्धा या बंदिनीचाच आहे. बंदिनीच्या निर्मिती प्रक्रियेत कसे कोण जाणे पण संगीतकार एस डी बर्मन आणि गीतकार शैलेंद्र यांच्यात एक दिवस काही एक खटकले व शैलेंद्र फिल्म मधून बाजूला झाले.. पिक्चरचे एक महत्वाचे गाणे अद्याप लिहिणे बाकी होते... शैलेंद्र तर नाही मग आता काय करायचे ? मोठा प्रश्न आला. त्यांची जागा कोण घेणार ??? सरते शेवटी कुणा एकाने पाकिस्तानातून आपला मोटार मेकॅनिक हा पेशा सोडून हिंदी सिनेमात नशीब काढायला आलेल्या संपूर्णसिंग कालरा या २६-२७ वर्षाच्या तरुणाचे नाव बिमलदा आणि सचिनदा यांना सुचविले.बिमलदा सुरवातीला प्रथम तयार नव्हते पण   सचिनदांनी जरा जास्तच आग्रह केला म्हणून त्यांनी या तरुणाला ते  गाणे लिहायची संधी दिली... तब्बल ५ दिवस खपून त्याने ते तयार केले आणि या गाण्याच्या निमित्ताने हिंदी सिनेमाला ,आज त्यांना आपण ओळखत असलेल्या  "गुलज़ार " या नावाची आणि व्यक्तीची ओळख झाली... 

गीतकार गुलज़ार साहेबांचे ते डेब्यू गाणे आज या निमित्ताने...  
आजच्या लेखासाठी यु ट्यूब आणि इंटरनेट यांचे सहकार्य घेतले आहे...संबंधितांना मनःपूर्वक धन्यवाद.   

मंगळवार, ३ जुलै, २०१८

गाण्या मागचे रडगाणे


⏩➤ परवा सहज नेट वर सर्फिंग करतांना एक गमतीदार गोष्ट नव्याने समजली आणि गंमत वाटली.. अमिताभ दौर मध्ये त्याचे "कालिया" आणि "नमकहलाल" हे दोन अनुक्रमे हिट आणि सुपरहिट सिनेमे अवघ्या चार महिन्यांच्या फरकाने प्रदर्शित झाले होते. कालिया आला होता २५ डिसेंबर १९८१ ला आणि नमक हलाल प्रदर्शित झाला होता ३० एप्रिल १९८२ ला.


कालियाच्या मागे त्याच्या निर्मिती पासूनच नष्टर लागले होते.कारण कालिया साठी निर्मात्यांचा पहिला चॉईस होता धर्मेंद्र पण त्याच्या तारखा मिळू शकल्या नाहीत त्या मुळे मग निर्मात्याने कालियाची आयडियाचं ड्रॉप केली... नंतर मग त्याची निर्मिती अमिताभला घेऊन सलीम-जावेद जोडीने करायचे मनावर घेतले.पण निर्मिती अगोदरच त्यांना लीड रोलसाठी साठी इथे अमिताभच्या ऐवजी विनोद खन्ना हवा असं
 वाटायला लागलं आणि त्यांनी सुद्धा कालियाची आयडिया सोडून दिली..अशा तऱ्हेने दोन जणांनी सोडून दिलेल्या  कालियाची निर्मिती शेवटी त्या वेळी धर्मेन्द्रचा सेक्रेटरी असलेल्या इकबालसिंग या  इंडस्ट्रीतल्या जुन्याजाणत्या तंत्रज्ञाने करावयाचे मनावर घेतले... त्याचे हे पहिलेच होम प्रॉडक्शन , पैशाची वानवा पण तरी देखील केवळ अमिताभ या नांवावर त्या काळात सिनेमा चालतो हे त्याला पक्के ठाऊक असल्याने पट्ठ्यानें धाडस केलेच...        

पण माणसाला सगळी सोंगं आणता येतात पण पैशाचं सोंग आणता येत... पिक्चर कट टू कट बजेट मधे शूट करून सुद्धा शेवटी-शेवटी  निर्माता इकबालसिंग एका गाण्याच्या शुटिंगवर येऊन अडला.कारण पिक्चरच्या स्टोरीला धरून गाणं इनडोअर सेटवर करणं भाग होतं आणि जवळचे पैसे जवळपास संपलेले... पण मरता क्या न करता या उक्तीला धरून त्यानं नमक हलालचा निर्माता सत्येंद्र पाल याला मदतीची गळ घातली. सत्येंद्रपालने सुद्धा त्या वेळी नेमके  "नमकहलाल" मधलं परवीन बाबीवर शूट झालेले "जवान जानेमान ,हसीना दिलरुबा" हे पुढे नंतरच्या काळात गाजलेल्या गाण्याचे  शूटिंग नुकतेच संपवले होते व तो त्या गाण्यासाठी साठी तयार केलेला सेट तोडण्याच्या तयारीत होता.इकबालसिंगने त्यांस विनंती करून तो तयार सेट तसाच ठेवला फक्त त्यात थोडेफार ,किरकोळ मॉडिफिकेशन करून स्वतःच्या गाण्याला फ्रेश लूक द्यायचा प्रयत्न केला व कालिया मधलं गाजलेलं "जहाँ ये 'तेरी नजर हैं ! मुझे जा मेरी खबर हैं हे अमिताभवर शूट झालेलं गाणं केलं ...    


नंतरच्या काळांत दोन्ही सिनेमे २५-५० आठवडे थेटरात चालले..नंतरच्या काळात  छायागीत मधे आपण हि दोन्ही गाणी असंख्यवेळा बघितली...  टीव्हीवर तर  दोन्ही सिनेमाची पारायणं केली पण आपल्या कुणाच्या कधी हि गोष्ट आजवर प्रकर्षाने लक्षात अली नाही ... गंमत आहे नाही ? नाही म्हणायला नमक हलाल मधल्या "जवान जानेमान " गाण्यात  फक्त एकाच  अंतऱ्यात अनवाणी पायाने नाचणारी परवीन बाबी  पाहून काही तद्न्य किडा प्रेक्षकांनी हि पिक्चरच्या कंटिन्यूटी डिपार्टमेंटची चूक निदर्शनाला आणली होती म्हणा !!! पण या दोन्ही गाण्याचा अक्खा सेट जसाच्या  तस्साच आहे हे कधी कुणाच्या लक्षात आले नाही... कालियाच्या आर्ट डायरेक्टरने " जहाँ ये तेरी नजर है " च्या वेळी तर कमालच केलीये ...त्याने "जवान जानेमान "च्या वेळी वापरलेली फक्त टेबले ,खुर्च्याच काय तर इव्हन त्यावरील टेबल क्लॉथ सुद्धा बदलले नाहीत... दोन्ही गाण्यात सेम..टू ..सेम .. एवढेंच काय तर परवीन बाबीच्या जवान जानेमन मधे  कधी माऊथ ऑर्गन तर कधी ड्रमसेट वाजवणारा ज्युनियर आर्टिस्ट ,अमिताभच्या जहाँ ये 'तेरी नजर मधे गिटार वाजवतांना दिसतो.. सगळीच धमाल.. असो... 

पण  आता या उपर या सगळ्या गमतीतली  सर्वात मोठी गम्मत म्हणजे "कालिया" हा "नमक हलाल "च्या चार महिने अगोदर प्रदर्शित झाला होता...म्हणजे मार्केट मधे डुप्लिकेट माल आधी आला आणि ओरिजिनल माल प्रेक्षकांना नंतर पहायला मिळाला ... 

चला तर मग आपण आधी ओरिजिनल पाहू आणि नंतर डुप्लिकेट बघुयात...   कृपया संपूर्ण गाणी फक्त यू ट्यूबवर पहावीत ... 
सौजन्य :आजच्या लेखासाठी इंटरनेट व यू ट्यूबचे सहकार्य घेण्यात आले आहे...Thanks ...  
बुधवार, २७ जून, २०१८

हरवत गेलेला "पंचम" ... २७ जून


एके दिवशी दुपारच्या वेळी किशोरकुमारच्या घरचा फोन वाजला तो नेमका किशोरदांनीच  घेतला.पलीकडून आवाज आला ,
"दादा, पंचम बोल रहा हूँ! अमित हैं ?

झोपलाय तो  !  किशोरदांनी त्याला सांगितले.  यावर आश्चर्यचकित होत आरडी म्हणाला , आत्ता दुपारी ?  या वेळी झोपलाय ? त्यावर किशोरदा म्हणाले  कां ? काही स्पेशल ? त्यावर आरडी म्हणाला, हां ! उससे एक गाना गवाना था मुझे ! त्यावर  थोड्या मस्करीत किशोरदा त्याला म्हणाले "यार गाना ही गवाना है तो उसे भूल जा ! मैं आता हूं उधर ! ". पण आरडी सुद्धा कमी नव्हता तो म्हणाला "नको तू आता ५०+ आहेस , तुझा आवाज येथे फिट्ट बसत नाहीये ... हसत हसत किशोरदांनी आरडीचा फोन अमितच्या रूममध्ये ट्रान्स्फर केला.अमितने तो उचलला नि पलीकडून आरडी जवळ जवळ त्याच्यावर जणू खेकसलाच ,
YOU idiot, you are sleeping in the afternoon??? Come fast...
तुला आत्ता आशा बरोबर एक गाणे गायचे आहे.तासाभरात स्टुडिओत हजर हो ...

हे साल होते १९८५ किंवा १९८६ची सुरवात.. संगीतकार म्हणून आरडी बर्मनचा डाऊन फॉल होत गेलेला कालावधी... पण त्याला कारण पण तसेच होते...
हिंदी चित्रपट सृष्टीचा १९५० नंतरचा बॅडपॅच असलेलं दशक कोणते तर निर्विवादपणे १९८० ते ९० चे दशक म्हणून सांगता येईल.कारण सलग दोन दशके सिनेमात काम करत म्हातारे झालेले किंवा होत गेलेले सिनेमांचे हिरो आणि हिरॉईन्स (सध्या पण तीच अवस्था आहे म्हणा ) पाहून-पाहून लोक कंटाळले होते. त्यांना रिप्लेस केलेल्या फ्रेश चेहर्‍याच्या, पण नायकांच्या मुलांना त्यांच्या सुरवातीच्या एखाद दुसऱ्या सिनेमाव्यतिरिक्त जनतेने नाकारले होते. नावीन्य हरवले होते. निर्माते दिग्दर्शक ऍक्शन,तद्दन गल्लाभरू टुकार सिनेमांच्या मानसिक गुलामगिरीतून अद्याप बाहेर पडले नव्हते. व्हिडिओ पायरसिने चित्रपट सृष्टीचे कंबरडे मोडले होते आणि त्यात भर म्हणून , टीव्ही मीडियाने हिंदी चित्रपटाच्या  हक्काच्या प्रेक्षकांवर डल्ला मारला होता.  त्यामुळे नावीन्या विना प्रेक्षक वर्ग पुन्हा वळणार नाही व नवीन चेहरे घेतल्याने सर्व दृष्टीनेच स्वस्तात सिनेमा बनवता येऊन रिस्क फॅक्टर कमी होतोय हे ओळखून हिन्दी सिनेमात सगळीकडेच रिप्लेसमेंटचे वारे वाहू लागले ... पण याचा सर्वाधिक फटका बसला तो सर्वकालीन ग्रेट म्हणून आज २०१८ मध्ये सुद्धा सगळ्यांच्या आठवणीत असलेल्या आर डी बर्मनला..
कारण आरडी तेव्हा काही म्हातारा झाला नव्हता..तो तेव्हा हार्डली ४५-४६ चा होता ...आणि त्याचं संगीत तर अजून तरुणच होतं  ...  संगीतकार म्हणून त्याचे पोटेन्शियल अजूनही निर्वीवादच होते पण एकेकाळी  आपला डावा पाय सीटवर दुमडून कारने खंडाळ्याला आशा सोबत लॉन्ग ड्राईव्हला जाताना,डाव्याहातात सिगारेट पेटवून तिचे झुरके मारत उजव्या हाताने गाडीच्या टपावर ठेका धरत अगदी सहजपणे "खेल खेलमें " मधलं "खुल्लम खुलला प्यार करेंगे" चे कॉम्पोझिशन करणारा आरडी ,संगीतकार म्हणून अजून तितकाच ताजा असूनही सिनेमा निर्माते-दिग्दर्शक ,फायनान्सर ते समजण्याच्या योग्यतेचे नव्हते.कारण १९४२ लव्ह स्टोरी च्या म्युझिक साठी तर केवळ विधूविनोद चोप्रा हाटून बसला म्हणून त्याचं संगीत १९९४ ला आपण ऐकू शकलो... अन्यथा १९४२ लव्हस्टोरीच्या एंटायर म्युझिकसाठी अवघे २ लाख रुपये मोबदला द्यायला सुद्धा निर्माते तयार नव्हते…. असो.... काळाचा महिमा ... दुसरं काय म्हणायचं याला ... पण खरं बोलायचं तर आरडीचा शेवटचा आधार किशोरकुमार जेव्हा १९८७ ला अचानक तडकाफडकी गेला तेव्हाच आरडीच्या संगीतावर मर्यादा आल्या ही वास्तवता होती... फिमेल व्हॉईसला त्याचे वैवाहिक संबंध ताणले गेलेलं असून सुद्धा निदान "आशा" होती ... पण मेल व्हॉइसचं काय ? पण १९४२ ला नेमका सिनेरसिकांचं नशीब म्हणून किशोरला बऱ्याचअंशी रिप्लेस करणारा कुमार शानू मिळाला नि त्यानं संधीचं सोनं केलं ..

आरडीचे आजचे गाणे श्रवणीय तर नक्कीच आहे पण हा जीवा नावाचा सिनेमा कधी बनला ,कधी आला नि कधी गेला ते त्यातील नायक नायिका सुद्धा आज सांगू शकणार नाहीत...त्यामुळे त्यातील आजच्या गाण्याच्या पहिल्या अंतर्‍यातील गुलज़ारचे खालील काव्य शब्दशः वेस्ट गेले.  

जब से तुम्हारे,  नाम की मिस्री  होठ लगायी है...
 मीठा सा ग़म, है और मीठी,  सी तनहाई SS...  है...
रोज़  रोज़ आँखों तले .

असो ... कालाय तस्मै नमः ! म्हणू नि गाणे पाहून पेक्षा  ऐकून पुढे जाऊ ... आरडी बर्मनच्या आज २७ जून रोजीच्या ७९ व्या स्मृतिदिनी , ही गान भावांजली आपण सादर अर्पण करूयात   .. 
RD ,we miss you a lot ....
आजच्या लेखासाठी इंटरनेटचे सहकार्य घेण्यात आले आहे... संबंधितांचे मनःपूर्वक आभार...    
सोमवार, २५ जून, २०१८

संगीतप्रेमींचा मदनमोहन डे २५ जून


सरकाईले खटीया जाडा लगे, किंवा मै तो रस्तेसे जा रहा था ,भेलपुरी खा रहा था वाल्या करिश्मा कपूरचा आज खरतर वाढदिवस ... पण आज तिच्या बद्दल मी काहीच लिहिणार आणि बोलणार नाहीये कारण तिच्या पेक्षाही मला स्वर्गीय संगीतकार मदन मोहन जास्त जवळचा वाटतो.  २५ जून हा त्याचा पण वाढदिवस होता.आज तो असता तर ९४ वर्षांचा असता ..  त्याचे हिंदी सिनेसंगीतातील  योगदान आणि करिश्माचे काम यात जमीन आसमान इतका फरक आहे...त्यामुळे आज फक्त त्याच्यावरच  बोलणे आणि लिहिणे इष्ट ...  असो.

 लौकिकदृष्ट्या मदनमोहन शास्त्रीयसंगीत बिंगीत काही शिकला  नव्हता पण हिन्दी सिनेसंगीताचे प्रचंड प्रेम,ध्यास ,उत्कृष्ठ कान आणि प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा संगीताला संपूर्ण आयुष्य वाहून घ्यायची त्याची जिद्द या जोरावर तो कानसेनांच्या गळ्यातील ताईत झाला होता.  

खरतर हा त्याच्या  काळातल्या काय किंवा अगदी कुठल्याही काळातल्या काय ,हिरोच्या तोंडात मारेल इतका तो हॅन्डसम,त्यातून कंडिशन फेवरेबल  त्या मुळे इतरांच्या भरीला पडत याने २-४ सिनेमात तोंडाला रंग फसून बघितला देखील पण तो तिथे रमला नाही... त्यातून  याचे वडील चुनीलाल सिंनेमासृष्टीशी निगडीत ... निगडीत कसले ? तेच इंडस्ट्री होते कारण त्या काळातील अख्खा  फिल्मीस्तान स्टुडिओ  त्यांच्या मालकीचा होता ,पण पोराने या धंद्यात सुद्धा येऊ नये या आग्रही मताचे ते होते .उलट देशप्रेमाने भारावलेले असल्याने  ,त्यांनी मदनची रवानगी  सक्तीने इंडियन मिलिटरी मध्ये केली , त्या मुळे संगीतावरील त्याच्या प्रेमामुळे मदनमोहनने जेव्हा त्याची संगीतकार म्हणून सिनेक्षेत्रात काम करायची इच्छा वडिलांच्या जवळ बोलून दाखवली व  मिलिटरी अकाउंट्स ची त्याची नोकरी सोडून जेव्हा तो घरी आला तेव्हा त्याच्या या कोट्याधीश बापाने त्याला  शब्दशः घराबाहेर हाकलून दिले.

तसं बघितलं  तर बापाची ही तेव्हा काहीच चूक नव्हती कारण मदनमोहनच्या आधीच्या सातपिढ्यात कुणाचा संगीताशी म्हणून संबंध आला नव्हता . त्यातून मदनमोहनचे संगीतातील कोणतेही प्राथमिक शिक्षण सुद्धा झालेले नव्हते. पण मदनमोहन सुद्धा इतका मानी आणि निग्रही की,भले त्याने रेल्वे प्लॅटफॉर्म वर चणे खात त्या नंतरचे त्याचे  सुरवातीचे काही दिवस काढले पण हार  पत्करून  पुन्हा  लाळघोटेपणाने बापाच्या  घरात म्हणून नाही गेला. पुढील ३-४ वर्षात त्याने स्वतंत्र यशस्वी संगीत दिग्दर्शक म्हणून जेव्हा इंडस्ट्रित नाव कमावले आणि बापाने त्याच्या एका फिल्मच्या प्रिमियर शोला जाऊन जेव्हा त्याचे हिट म्युझिक पहिले तेव्हा त्याने  पोराला  तिथेच मिठी मारली व दोघांच्या अश्रुचा बांध तेथेच फुटला...  बापाने नंतर अर्थातच मुलाला सन्मानाने त्याच्या  घरी नेले.

संगीतकार म्हणून मदनमोहन किती ग्रेट होता हे आजच्या पिढीला नुसते तसे सांगून पटणार नाही किंवा समजणार नाही.. त्या मुळे आज योगायोगाने त्याचा एक  पुरावा मिळालाय तोच तुमच्या समोर ठेवतो.. एकाच गाण्याला दोन संपूर्ण वेगवेगळ्या चाली देणे यात तर त्याचा हात कुणीच धरू शकत नव्हते ...किंबहुना मला तर दाट शंका आहे की, एकाच गाण्याच्या अनेक उत्तमोत्तम चाली ऐकून बहुदा तेव्हाच्या निर्माता-दिग्दर्शकांच्या डोक्याचा नक्की गोविंदा होत असणार ...

आजच्या  तरुणपिढीतल्या बर्‍याच लोकांना हे माहीत नाही की, २००४ साली शाहरुख खान-प्रीती झिंटाचा आलेला वीर-जारा मदनमोहनच्या साऊंडट्रॅक वरच  तयार झालाय.. किंबहुना मदनमोहनच्या मुलाने त्याचे वडील गेल्यावर एकदा सहज म्हणून त्यांचे रेकोर्डेड पण अन रिलीज्ड सॉन्ग ट्रॅक यश चोपडला ऐकवल्यावर त्याने त्या साठी वीर-जारा बनवला...असो ...  
तर आता ऐका आणि पहा तर मग...    
आजच्या लेखासाठी व व्हिडीओज साठी युट्युबचे सहाय्य घेतले आहे... संबंधितांचे मनःपूर्वक आभार...
From Right Bhupinder,Madan Mohan ,Lata & others


Above both songs from Film "Mausam"बुधवार, २३ मे, २०१८

देव करो ,नि उद्याचा दिवस माझा असेल !


 ग्रेट सूफी संत हसन शेवटच्या घटका मोजत असता त्याचे काही शिष्य त्याला म्हणाले "महाराज , आपल्या कडे या क्षणी सुद्धा जगाला खूप काही देण्यासारखं आहे  हे आम्ही जाणतो ...   आपण अजून बोलू शकत आहात ,तरी कृपया आपण आम्हांला आपल्या गुरूंचे ते नांव सांगा ,ज्यांच्या कडून आपल्याला इतकी अगाध ज्ञानप्राप्ती या आयुष्यात झालीये...

हसन म्हणाला " आत्ता या क्षणी मी ती नावं सांगत बसलो तर काही दिवस,महिने,वर्षे लागतील,जो वेळ आता माझ्या कडे नाहीये ,ज्यांच्या कडून मी आयुष्यात खूप काही शिकलो, पण माझे त्यातील ३ गुरूं असे होते ज्यांना मी कधीच   विसरू शकत नाही....

माझा पहिला गुरु एक चोर होता ... 

एकदा वाळवंटात मी रस्ता चुकलो आणि एका अपरात्री मी एका गावात येऊन पोहोचलो. सगळ्यांचे दरवाजे बंद होते त्या मुळे त्या भयानक थंडीत मला आता कुठेच आसरा मिळायची शक्यता नव्हती ,तितक्यात माझी एका  चोराशी गाठ पडली... मी त्याच्याशी माझ्या रात्रीच्या निवाऱ्या बद्दल विचारणा केली असता तो म्हणाला , " तुम्ही चेहऱ्यावरून एखादे धार्मिक ,अध्यात्मिक गुरु दिसताय . तुमच्या चेहऱ्यावर ते तेज मला स्पष्ट दिसतंय ,पण व्यवसायाने मी एक चोर आहे आणि माझ्या कामाला बाहेर पडलोय... पण तुमची तयारी असेल तर चला ,मी तुम्हांला माझ्या घरी घेऊन जातो ,तुम्ही माझ्या कडे आज मुक्काम करा...माझी काही एक हरकत नाहीये .... क्षणभर मी घाबरलो पण विचार केला कि, मी सूफी आहे आणि हा चोर असून सुद्धा याला माझी भीती वाटत नाही तर मी याला भिण्याचे कारण काय ??? मी त्याच्या मागे चालत त्याच्या घरी पोहोचलो...

मी अंदाज बांधल्याचा विपरीत तो चोर स्वभावाने, वर्तणुकीने  आणि आदरातिथ्याने इतका चांगला होता  कि, मी त्याच्या कडे रमलो आणि पुढील काही महिने मी त्याच्याच  घरी राहिलो...आता तो रोज रात्री मला सांगायचा ..."मी माझ्या कामाला जातोय ,पण तुम्ही तुमची पूजा-अर्चा ,ध्यानधारणा निवांत करा,माझी चिंता करू नका... मी रात्री उशिराने येईन..

तो रात्री परतल्यावर मी उत्सुकतेपोटी त्याला रोज विचारायचो  "आज ,काही मिळालं का ?" आणि तो सांगायचा  कि, .....नाही !.... आज काही नाही मिळालं  पण उद्या मात्र नक्की मिळेल... हा प्रकार पुढे जवळपास महिनाभर असाच सुरु राहिला ,..... चोर रोज रात्री चोरी करायला जायचा आणि रिकाम्या हाताने परत यायचा... पण  मला त्याचे नेहमी आश्चर्य वाटायचे कि, त्या महिन्याभरात तो  मला कधीही  निराश झालेला दिसला नाही...तो मला रोज सांगायचा " देव करो नि, उद्याचा दिवस माझा असेल... माझं काम होईल...या उपर तो मला म्हणायचा कि, "महाराज ! तुम्ही तर इतके देवधर्माचें करता ,तुम्ही तर आमच्या पेक्षा देवाच्या जास्त जवळचे आहात त्या मुळे  तुम्ही सुद्धा देवाकडे माझ्या साठी प्रार्थना करा कि, या गरीब माणसाला मदत कर ...त्याला त्याच्या कार्यात यश मिळू दे ! त्याचे काम उद्या नक्की होऊ दे....  

तर हा चोर होता माझ्या आयुष्यातील माझा पहिला गुरु...कारण मी वर्षानुवर्षे ध्यानधारणा करून,कित्येकवेळा देवप्राप्तीच्या अतिशय जवळ पोहोचायच्या पायरीवरून जेव्हा-जेव्हा  मागे खेचला जायचो आणि माझा देवावरील ,देवाच्या अस्तित्वावरील विश्वास उडायची वेळ यायची तेव्हा-तेव्हा मला या चोराचे ते शब्द आठवायचे कि, " देव करो नि उद्याचा दिवस माझा असेल",मी उद्या पुन्हा प्रयत्न करेन !  ... आणि मी तेव्ह-तेव्हा आठवायचो कि,हा चोर असूनही "त्या उद्या" करीत इतका प्रयत्नवादी आणि आशावादी राहू शकतो तर मी अजून एक दिवस प्रयत्न करायला का हरकत नाही ? आणि मी पुन्हा ध्यानधारणेच्या मार्गावर मार्गस्थ व्हायचो...माझा दुसरा गुरु एक कुत्रा होता !


एकदा मला  तहान लागल्याने पाणी पिण्यासाठी मी एका नदी तीरापाशी आलो. तिथेच हा कुत्रा मला दिसला...त्याला सुद्धा  तहान  लागली होती... पण तो नदीकाठी जायचा पाण्यात त्याचेच प्रतिबिंब पहायचा ,घाबरायचा त्या प्रतिबिंबावर भुंकायचा आणि मागे फिरायचा असे दोन-चारदा झाले ... पण त्या कुत्र्याला तहानच इतकी लागली होती कि, शेवटी हिय्या करून त्याने त्या पाण्यातल्या त्याच्या प्रतिबिंबावर चाल केली आणि पाण्यात उडी घेतली.. प्रतिबिंब गायब झाले ,कुत्र्याने त्याची क्षुधा भागवली आणि तो पोहत-पोहत निवांतपणे पाण्याबाहेर पडला... 


हा सगळा प्रकार दूर उभा राहून मी पाहत होतो... मला लगेच लक्षात आले कि, या प्रसंगाच्या निमित्ताने देवाने मला संदेश पाठवलाय ... कि, वेळ आल्यावर तुम्हाला त्या अज्ञाताची कितीही भीती वाटो ,पण  त्या भीतीवर स्वार होत जर तुम्ही त्यात उडी घेतली,स्वतःला विश्वासाने त्यात झोकून दिले तर ती भीती कायमची दूर होते.... मग मी विचार केला कि, जर त्या कुत्र्याला ते जमू शकले तर मला का म्हणून जमणार नाही ???  आणि त्या नंतर माझ्या मनांतील "एखादी गोष्ट करतांना "ती मला जमेल नां " ही माझी भीती कायमची गेली... तर अशा तऱ्हेने तो कुत्रा हा माझा दुसरा गुरु होता...

माझा तिसरा गुरु एक छोटा मुलगा होता ...

एकदा मी एका गावात संध्याकाळी जवळपास अंधार पडत असतांना शिरलो आणि मला समोरून एक छोटा मुलगा मशिदीच्या दिशेने हातात पेटवलेली मेणबत्ती अतिशय सांभाळून नेतांना दिसला... हातातील ती मेणबत्ती विझू नये म्हणून त्याने एका हाताने तिच्या ज्योतीवर काळजीपूर्वक आडोसा धरला होता आणि  तो जपून चालत होता..... का कोण जाणे पण  मी त्याला वाटेतच जरा थांबवलं... आणि विचारलं कि, "ही मेणबत्ती तू स्वतः पेटवली का ? तो म्हणाला हो !" मग मला त्याची थोडीशी गम्मत करावीशी वाटली, म्हणून मी त्याला विचारलं कि,मग त्यात उजेड कोठून आला ? कारण हि मेणबत्ती पेटवे पर्यंत तेथे अंधार होता आणि ती तू पेटवल्यावर पेटली .... तर आता मला सांग कि, त्यात उजेड कोठून आला कारण तू तो उजेड येतांना बघितला असणार ! नाही का ?

माझ्या या प्रश्नावर तो मुलगा मनापासून खळखळून हसला आणि त्याने त्या मेणबत्तीच्या ज्योतीवर जोरात फुंकर मारली आणि ती विझवली... मला समजलं नाही कि, त्यानं हे असं का केलं ते ? पण नंतर त्याने माझ्याकडे वळून पाहिलं आणि मला विचारलं कि, "आत्ता हि मेणबत्ती तुमच्या समोर पेटलेली होती... तिच्यात उजेड होता ,आणि आत्ता तुमच्या डोळ्यादेखत तो उजेड नाहीसा झालेला तुम्ही बघितलात तर आता तुम्ही मला सांगा कि, तो उजेड कुठे गेला ?... तुमच्या डोळ्यादेखत सगळा प्रसंग घडलाय !


त्या मुलाच्या त्या अनपेक्षित कृतीने मी आता गांगरून गेलो.. निरुत्तर झालो ... माझ्यातला "स्वाभिमान" कितीही नाही म्हणलं तरी दुखावला गेला .. माझ्या ,ज्ञानाला,बुद्धिमत्तेला त्याने मोठा हादरा बसला ... मी जमिनीवर आलो आणि त्या क्षणापासून माझ्यातला  माझा "मी" हा तेथेच गळून पडला....     

 स्वैर अनुवाद.. :ओशो -सिक्रेट ऑफ सिकेट्स  वरून साभार   गुरुवार, २६ एप्रिल, २०१८

"रिमझिम गिरे सावन" वाली मौसमी चॅटर्जी

आज २६ एप्रिल ,मौसमी चटर्जी आज सत्तरीची झाली...”शतायुषी भव !” अशी तिला हार्दिक शुभेच्छा ! ... 

तिचा आणि  अमिताभचा  “मंझिल” पिक्चर तुम्हाला आठवतोय ? हो तोच “रिम झिम गिरे सावन “ फेम... ! आज त्या सिनेमाच्या निर्मितीच्या कहाणी  सोबत त्याच्यातील त्या  हिट गाण्याच्या शूटिंगच्या वेळची  अधिकृत कहाणी ... तुमच्या साठी ...  

मंझिल पिक्चर रिलीज जरी १९७८-७९  ला झाला तरी मुळात तो  प्रचंड रखडलेला पिक्चर होता...त्याचे शूटिंग “जंजीर”(१९७२) यायच्या अगोदर म्हणजे  अमिताभ जेव्हा कोणी ही नव्हता तेव्हा सुरू झाले होते.. अमिताभला हा पिक्चर जया भादूरीने त्याच्यावरच्या प्रेमापोटी तिचे वजन वापरुन, दिग्दर्शक बासू चटर्जीला अमिताभला घ्यायची गळ घालून मिळवून दिला होता...त्यात अमिताभचे क्रेडिट शून्य होते...  पण नेमके झाले असे कि, जंजीरच्या अगोदरचे  अमिताभचे तेव्हाचे आलेले जवळपास सगळे पिक्चर इतके सपाटून आपटले की,या पिक्चरच्या निर्माता त्रिकुटाने सिनेमाचे थोडेफार शूटिंग झालेले असताना सुद्धा सगळेच पैसे डुबायचा धोका नको म्हणून इतर निर्मात्यांनी जसे अमिताभ सोबतचे सिनेमे त्या काळी  बंद केले होते तसा त्यांचा हा सिनेमा देखील डबा बंद करून टाकला कारण निर्माते म्हणून एकतर त्यांचा हा पहिला सिनेमा ,आणि तो सुद्धा त्यांनी बासू चटर्जी केवळ कमी पैशात सिनेमा करतो म्हणून सुरू केलाला असा ...

पण १९७२ ला अमिताभचा प्रथम जंजीर आला नंतर ७३ला मजबूर,७५ला दीवार आणि नंतर शोले आला आणि सगळी गणितच बदलून गेली...नुसत्या अमिताभच्या एकट्याच्या नावावर पिक्चर चालायचे दिवस आले... त्या मुळे  त्या मंझिलच्या निर्माता त्रिकुटास त्यांनी  त्यांच्या डबाबंद केलेल्या  पिक्चरची आठवण झाली .... त्यांनी बासूला गळ घालत,अमिताभचे पाय धरत  पुन्हा पिक्चर सुरू करायला लावलं आणि त्या मुळेच निर्मिती दरम्यान मधे प्रचंड गेलेला कालावधी हा चित्रपट पहाताना लगेच लक्षात येतो... सुरवातीचा अमिताभ आणि सुरवातीची मौसमी यांच्या तब्येती आणि नंतरच्या तब्येती यात बर्‍यापैकी तफावत आहे तर असा  हा निर्मिती दरम्यानचा  कंटीन्यूटी नसलेला अमिताभचा  पिक्चर १९७९ला रिलीज झाला आणि विशेष म्हणजे निर्मात्याचे “अमिताभ लाटेत “ फक्त त्याच्या एकट्याच्या नावावर उखळ पांढरे करून गेला...

त्याच सिनेमातील गाजलेले हे खालील गाणे “रिम झिम गिरे सावन “ मौसमीला आणि अमिताभला जेव्हा पब्लिकला ओळखता येत नव्हते  तेव्हाचे होते ... ते गिरगाव चौपाटी आणि फोर्ट मधे सलग तीन दिवसाच्या खर्‍याखुर्‍या पावसात शूट झाले होते ...त्या वेळचे वैशिष्ट्य म्हणजे अमिताभ हा पडेल हीरो म्हणून निर्मात्यांमध्ये अप्रिय होता पण त्या काळातील इतर हिरोइन्सला मात्र  तो जया (भादूरी)ची प्रॉपर्टी आहे हे माहीत असून ही त्यांच्या साठी तो  “ हॉट प्रॉपर्टी” होता...आणि मौसमी सुद्धा त्याला अपवाद नव्हती...ती पण अमिताभवर लट्टू होतीच त्या मुळे  तिचे आणि अमिताभचे सूर सुद्धा  त्या काळी मस्त  जमले होते. 

या गाण्याच्या  शूटिंग तिसर्‍या म्हणजे शेवटच्या दिवशी ते जवळपास संपत आले असताना दुपारच्या लंचब्रेक मधे मौसमी दिग्दर्शक बासू चटर्जी जवळ बोलली कि , “हे इतके मस्त जमून आलेले प्रेमगीत पडद्यावर हीरो-हिरोईन गाताहेत असं तुम्ही दाखवणार आहात पण केवळ हात हातात घेण्या पलीकडे त्यांच्यात असणारी जवळीक पडद्यावर  व्यक्त होतांना दिसत नाहीये .. त्या मुळे त्यांच्यातील प्रेम दाखवण्या साठी गाण्यात अमिताभने मला किमान उचलून घेतलय एवढं तरी तुम्ही दाखवाच... मला ते  या गाण्यात  हवय ... तिने जणू हट्टच धरला .....

आता बासूची पंचाईत झाली ..कारण एक तर मौसमी पडली सिनेमाची नायिका ... त्यातून तिने स्वतःहून ही केलेली मागणी पण  सिनेमाच्या स्टोरीत मात्र नायक-नायिकेची अशी अंगाची झटा-झटी  अपेक्षित नाही कारण नायक –नायिका एकमेकाला प्रथमच भेटत असल्याने त्यांची इथवर मजल गेलेली दाखवणे हे  गाण्यात दाखवता येत  नव्हते ... पण तिकडे मौसमी तर हटून बसलेली ... या सगळ्या मधली सर्वात महत्वाची गम्मत म्हणजे  इकडे अमिताभला ,म्हणजेच चित्रपटाच्या नायकाला  दिग्दर्शक आणि नायिके मधे काय शिजतय ह्याच्यातील ओ का ठो माहीत नाही ... तो पूर्णपणे अनभिज्ञ ... आणि बासूला  ते  अमिताभ जवळ सुद्धा बोलता येईना... शेवटी त्याने सुवर्ण मध्य साधत गाण्यात अमिताभने मौसमी त्या फोर्ट मधील समुद्र कठड्या वरून चालताना तिला   हात देत व नंतर  वरुन खाली उतरवताना तिला उचलून खाली ठेवले आहे असे  गाण्यात दाखवले व दिग्दर्शक या नात्याने त्याच्या नायिकेचा “हट्ट” पूर्ण केला ... गाण्यात तो प्रसंग साधारण पावणे दोनव्या मिनिटाला येतो...आणि तो जसा घडला तसाच ठेवलाय....  पहा तर मग...

मला माहितीये ,हे गाणे तुम्ही आजवर बर्‍याचदा ऐकले आणि बघितले आहे पण आता त्या अमिताभने मौसमीला “उचलून घेतलेल्या” शॉट साठी तुम्ही ते आत्ता परत पहाणार ...

आजच्या लेखासाठी अनिता पाध्ये यांच्या "यही है जिंदगी" या पुस्तकाचा संदर्भ घेतला आहे... हिंदी सिनेमाची आवड असणाऱ्यांनी एकवार जरूर वाचून संग्रही ठेवावे असे मराठी पुस्तक... धन्यवाद पाध्ये मॅडम ...  

मंगळवार, २४ एप्रिल, २०१८

पू S S रे पचास हजार !!! हीच याची ओळख ...


न्यूयॉर्कच्या विमानतळावरील एका अमेरिकन इमिग्रेशन ऑफिसरने मागे एकदा जेव्हा “शोले” मधील   “सांबा “ म्हणून मॅकमोहनला ,त्याचा पासपोर्ट न बघताच लगेच ओळखले होते  तेव्हा त्याच्या बायकोचा म्हणजेच  “मिनी”चा ऊर अभिमानाने नक्कीच भरून आला असणार यात शंका नाही... पण त्या मागची खरी कहाणी काही वेगळीच होती...      
पू S S रे  पचास हजार !!! या शोलेतल्या केवळ तीन शब्दांनी ज्याची “सांबा” म्हणून  जगभर ओळख निर्माण झाली  त्या  शोलेच्या शूटिंगसाठी  मॅकमोहनने  मुंबई- बंगलोर च्या तब्बल २७ वार्‍या केल्या होत्या ...त्या काळी एका मल्टी स्टारकास्ट फिल्म मध्ये मोठा रोल मिळाला म्हणून तो बेहद्द खुश होता ... शोले मधल्या त्याच्या रोलवर त्याचे करियर खूप काही अवलंबून असल्याची त्याला पूर्ण जाणीव होती ... पिक्चर रिलीज व्हायची तो सुद्धा वाटच बघत होता , पण पिक्चर वाजवी पेक्षा खूपच मोठा झाल्याने सांबाच्या रोलला ,रमेश सिप्पीला नाइलाजाने कात्री लावणे भाग पडले...पण हे मॅकला तो पिक्चर बघितल्यावरच समजले आणि त्या मुळेच  १९७५-७६ साली मिनर्व्हा मधून शोलेचा प्रिमियर पाहून बाहेर पडतांना मॅकमोहन प्रचंड नाराज आणि निराश झाला होता...रमेश सिप्पी त्याची नाराजी जाणून होता आणि त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न करत होता पण..... तो त्या वेळी कुणाचे ,काहीच ऐकून घ्यायच्या मनःस्थितीत नव्हता .... पण त्या पू S S रे  पचास हजार !!! या ३ शब्दांनी नंतर  त्याचे उभे आयुष्य बदलून गेले... सांबा हीच  त्याची पुढील आयुष्यात ओळख बनली....  व तो भारतीय प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहिला ...      

पूर्वी  एकदा मॅकमोहन सहकुटुंब पुण्यात आला असता ,कुठूनशी तो अमुक-अमुक हॉटेलमध्ये उतरलाय अशी लोकांना खबर लागली... बघता-बघता हॉटेल बाहेर इतकी गर्दी जमली की, सांबा-सांबा अशा आरोळ्यांनी परिसर दुमदुमून गेला... शेवटी पोलिसांना बोलावून त्या गर्दीतून सांबाला व त्याच्या कुटुंबियांना बाहेर काढतांना नाकात दम आले ... शोलेच्या रिलीज नंतर इतक्या वर्षांनी सुद्धा मॅक मोहनची त्या छोट्याश्या रोल मधील इतकी प्रसिद्धी बघून त्याचे कुटुंबिय तेव्हा प्रचंड आश्चर्यचकीत झाली होते...

आज २४ एप्रिल हा मॅक मोहनचा जन्मदिवस .. तो आज जर असता तर त्याने ८१ व्या वर्षात आज पदार्पण केले असते... पण २०१० साली फुफ्फुसच्या कॅन्सरने  तो गेला.... १९३८ साली तेव्हाच्या अखंड भारतात तो कराची मध्ये एका मिलिटरी ऑफिसरच्या घरात जन्माला आला.भारत स्वतंत्र झाल्यावर प्रथम त्याचे कुटुंबीय लखनौला व नंतर मुंबईत येऊन स्थिरावले... मॅक मोहन सिनेमा क्षेत्रात तसं म्हणल तर अपघाताने आला कारण बर्‍याच जणांना हे माहीत नाही की, मॅक हा एक उत्कृष्ट क्रिकेटियर होता व त्याला क्रिकेट मध्ये करियर करण्यात रस होता.. पण मेव्हणा रवी टंडन    चित्रपट क्षेत्रात असल्याने त्याने सुद्धा ऍडिशनल नॉलेज अधिक थोडीफार आवड या नात्याने  अभिनयाचे रीतसर प्रशिक्षण घेतले व प्रथम अमिताभ-प्राण सोबत मजबूर मध्ये “प्रकाश” ची  व नंतर शोले मधली सांबाची भूमिका केली आणि पुढे त्याचे क्रिकेट चे  क्षेत्रच बदलून गेले. नव्वदी च्या दशकातील रविना टंडनचा तो नात्याने मामा लागत होता...

मॅक मोहन हिन्दी सिनेमा क्षेत्रातील अशा अभिनेत्यात मोडायचा की ज्याचे इंग्रजी भाषेवर अतिशय उत्तम प्रभुत्व होते... तो इंग्रजी अतिशय अस्खलित बोलू आणि लिहू शकत असे... रीडर्स डायजेस्ट हे त्या काळातील बुद्धिजीवी वर्गाचे मासिक त्याचे सर्वात आवडते मासिक होते... त्याच्या कुटुंबियांच्या मते म्हणे मॅकचा “ड्रेस सेन्स “ पुष्कळ चांगला होता  ...तो त्याचे कपडे अमेरिकेतील  लॉस एंजल्स किंवा मुंबईतील “कचीन्स” मधील “माधव” या त्याच्या ठरलेल्या शिंप्या कडूनच शिवत असे ...    त्याच्या खाजगी आयुष्या बद्दल सांगायचे तर त्याच्या तरुणपणी  त्याचे नाव बराच काळ गीता (सिद्धार्थ काक)  बरोबर जोडले जायचे ... ही गीता सिद्धार्थ म्हणजे तीच जी शोले मध्ये ठाकुर झालेल्या संजीव कुमारची थोरली सून म्हणून दाखवली गेली होती ती... पण त्यांचे लग्न झाले नाही... तिने नंतर “सुरभि” वाल्या सिद्धार्थ काक बरोबर लग्न केले आणि मॅक मोहनची लग्न गाठ जुहू मधील आयुर्वेदिक आरोग्य निधी हॉस्पिटल मधील  आयुर्वेदिक डॉक्टर असलेल्या डॉ. मिनी सोबत जमून गेली.... मॅकचे वडील त्यांच्या वार्धक्यात  ती काम करत असलेल्या हॉस्पिटल मध्ये   अॅडमिट असताना योगायोगाने मॅकचे आणि तिचे सूर जमून आले होते...व त्याचे “निदान” लग्नात झाले...    

एक यशस्वी संसार असे मॅकच्या संसाराचे थोडक्यात वर्णन करता येईल... त्याच्या दोन्ही मुली व मुलगा आज हिन्दी सिनेमात वेगवेगळ्या क्षेत्रात आपापला ठसा उमटवुन कार्यरत आहेत.... तर असा हा मॅक मोहन .... सिनेमात वरवर रफ अँड टफ ... टपोरी .. दिसणारा ,भासणारा....   पण वास्तवते मध्ये अतिशय बुद्धीमान आणि निराळा असणारा.... थोडक्यात काय तर दिसतं तसं नसतं हेच खरं....  वुई मिस यू  मॅक ...
आजच्या लेखासाठी साठी संदर्भ.. Actor Mac Mohan: Cricketer who became Sambha in Sholay आणि इंटरनेट ...                         
Read more at: http://www.merinews.com/article/actor-mac-mohan-cricketer-who-became-sambha-in-sholay/15884493.shtml&cp