भोज्जा

शनिवार, १७ मार्च, २०१८

संगीताचा गुलाम आणि गुलामचं संगीत

१९७३ च्या फिल्मफेयर अॅवाॅर्ड नाईट मध्ये स्टेजवर अचानक एक बाका प्रसंग उद्भवला.मनोजकुमारच्या ”बेईमान” या त्या वर्षीच्या ७ फिल्मफेयर अॅवाॅर्ड जिंकलेल्या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचं पारितोषिक "प्राण" या बुजुर्ग अभिनेत्याला  जाहीर झालं आणि प्राणने ते स्टेजवर जात स्वीकारायचं मात्र नाकारलं.

त्या मागचं कारण मात्र जेव्हां त्यानं सांगितलं तेव्हा उपस्थितांमधील  १०० पैकी १०० जणांची त्याला मनापासून मान्यता होती पण फक्त प्रायोजकांची त्याला मान्यता नव्हती.प्राणने त्या मागचे कारण देतांना त्या वर्षीचे संगीताचे फिल्मफेयर अॅवॉर्डचे खरे मानकरी त्याच्या मते पैगंबरवासी गुलाम मोहम्मद होते आणि ते सुद्धा त्यांच्या  निधनानंतर ४ वर्षांनी प्रदर्शित झालेल्या  “पाकीजा “ च्या  त्यांच्या ऑल टाईम ग्रेट म्युझिक साठी.

खरं तर प्राणचा आणि "पाकीजा" चा काडीचा संबंध नव्हता पण त्याने अभिनय केलेला व त्या वर्षीचा हिट सिनेमा असलेल्या “बेईमान”च्या शंकर जयकिशन च्या तद्दन सामान्य संगीता पेक्षा पाकीजाचे म्युझिक कैक पटीने उजवे होते यात शंकाच  नाही.आणि म्हणूनच प्राणने त्याचा विरोध करत  त्याचे ते तेव्हाचे पारितोषिक नाकारले.प्राणची ती कृती किती योग्य होती हे  आज २०१८ मधे म्हणजेच पाकीजाच्या ४२ वर्षा नंतर सुद्धा लक्षात येते कारण पाकीझाचे संगीत तरुण पिढीला आजही भावते नि बेईमान नावाचा एक ७ फिल्मफेयर अॅवाॅर्ड विनर सिनेमा येऊन गेला होता हे माहित देखील नाही यातच सगळे आले. तेव्हाच्या एच.एम.व्ही.ला म्हणजेच आत्ताच्या सारेगामाला १९९७ साली ते पाकीजा़चे म्युझिक पुनः प्रदर्शित करावे लागले यातच सगळे आले. 

या पाकीजाच्या वेळच्या घटना आठवायचं आज कारण म्हणजे त्याचे संगीतकार गुलाम मोहम्मद ज्यांचा आज १७ मार्च २०१८ हा बरोब्बर ५० वा स्मृतिदिन आहे. १९०३ मध्ये जन्मलेले गुलामजी हिंदी सिनेमात त्यांच्या उमेदीच्या काळात उत्कृष्ट तबलजी व ढोलक वादक म्हणून प्रसिद्ध होते.राजकपूरच्या गाजलेल्या बरसात मधील “बरसात में ताक धीं ना धीं " त्यांनीच वाजवलंय...उमेदीच्या काळात आपल्यापेक्षा १४-१५ वर्षांनी लहान असणाऱ्या नौशाद यांचा सहाय्यक म्हणून त्यांनी आपली कारकीर्द सुरु केली आणि १९४८ ते १९५५ वर्षाला प्रत्येकी तीन या प्रमाणे चित्रपटांचे स्वतंत्र यशस्वी संगीत दिग्दर्शक अशी ८ वर्षे त्यांची प्रमुख कारकीर्द झाली. पण १९५५ नंतर व खास करून १९५७-५८ च्या पाकीजाच्या निर्मितीच्या सुरवातीच्या काळा नंतर त्यांच्या कारकीर्दीला जे ग्रहण लागले ते लागलेच.खरे तर कारण कोणतेच नाही पण गुलामजी त्यांत भरडून निघाले आणि पाकिजा अर्धवट असतांना १९६८ सालीच ते अल्लाला प्यारे झाले.पाकीजाचे नंतरचे त्यांचे राहिलेले थोडे संगीत नौशाद यांनी त्यांच्यावरील प्रेमाला जागून पुरे केले.

हा पाकिजा त्या काळी त्या सिनेमाशी संबंधित असणाऱ्या बऱ्याच जणांच्या आयुष्याशी खेळून गेला,धूळधाण उडवून गेला.मुळात पाकीजाची निर्मिती जवळपास पंधरा वर्षे सुरु होती.निर्माता दिग्दर्शक आणि सिनेमातील नायिका मीनाकुमारी हिचा खाजगी जीवनात  पती असलेला कमाल अमरोही हा म्हटलं तर तसा सणकीच होता.या सिनेमासाठी त्याने वारेमाप खर्च करून लावलेले लंबे चौडे सेट्स, चित्रपट पूर्ण होण्यास लागलेला वेळ ,मीनाचे दारूच्या आहारी जात तिच्या तब्येतीची उडालेली धूळधाण ,सिनेमाचा संगीतकार गुलाम मोहम्मद आणि त्याचे कॅमेरामन जोसेफ विरस्चींग यांचे निधन आणि सर्वात महत्वाचे  म्हणजे फायनान्सर लोकांचा अमरोही वरील पूर्ण उडालेला विश्वास या अशा वातावरणात १९७२च्या फेब्रुवारीत पाकीझा रिलीज झाला.

पाकीझाच्या निर्मितीच्या काळातले संगीत आणि तो पूर्ण होतानाचा आर .डी.बर्मनच्या काळातील बदललेले संगीत या मुळे चित्रपट संगीताची  व्याख्या पूर्णपणे बदलली होती.त्या मुळे पाकिजा रिलीज व्हायच्या अगोदर त्याचे संगीत जरी रेडीओ वर हिट होउन  वाजत होते तरी त्या काळी फक्त चित्रपटातील हिट संगीत चित्रपट चालायला पुरेसे नसायचे.त्या मुळे पाकीजाचे पडद्यावर स्वागत मात्र अतिशय थंड झाले.पहिल्या दोन चार आठवड्यात तर प्रचंड खर्चिक अशा ऑल टाईम सुपर फ्लॉप मध्ये त्याची नोंद होतच  होती  तेवढ्यात कथेत एक मोठा  ट्वीस्ट आला नि ३१ मार्च १९७२ ला म्हणजे चित्रपट रिलीज झाल्यावर त्याच्या दुसऱ्याच महिन्यात मीनाकुमारी गेली.झाले ... मीनाकुमारी प्रती प्रेक्षकांचा असणारा स्नेह ,आणि सहानुभूतीच्या लाटेने प्रेक्षक मीनाकुमारीची पाकीझातील तिची शेवटची अदाकारी बघायला सिनेमा थेटरात खेचले गेले आणि नंतर चित्रपटाने दैदिप्यमान यश संपादन केले.

पण वाईटात कां होईना एक बरे झाले कि, त्या मुळे १९४० ते १९७० च्या हिंदी सिनेमाच्या संगीताच्या सुवर्णयुगातील संगीतातील तारा पै.गुलाम मोहम्मद हे पाकीजाच्या रूपाने लोकांनी त्या काळी अनुभवले.

आजचे गुलामजींचे त्याच पाकीझा मधील प्रचंड गाजलेले गाणे या निमित्ताने 👇

२ टिप्पण्या:

  1. आपला ब्लॉग उत्कृष्ट वाटला.मराठी साहित्यातील काही अप्रतिम कालसुसंगत लेख,कथा आणि इतर साहित्य शोधून ते आम्ही आमच्या #पुनश्च या पोर्टलवर प्रसिध्द करतो. त्यासाठी १०० ते १५० व्र्षांपुर्वीचेही साहित्य आम्ही वाचतो आणि उत्तम निवडून वाचकांना पोर्टलवर देतो. नुकतीच मराठी ब्लॉगर्स साठी आम्ही एक अभिनव स्पर्धा जाहीर केली आहे. कुठलेही प्रवेशमुल्य नसलेल्या या स्पर्धेत तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर www.punashcha.com या आमच्या वेबसाईटला भेट द्या आणि स्पर्धेबद्दल सविस्तर जाणून घेऊन भाग घ्या.

    उत्तर द्याहटवा