भोज्जा

रविवार, २६ ऑगस्ट, २०१८

आयुष्याशी झुंज घ्यावी तर अशी : ए.के. हंगल

आज २६ ऑगस्ट २०१८ ,आजच्या दिवशीच ७ वर्षांपूर्वी तब्बल ९७ वर्षांचे ज्येष्ठ अभिनेते ए के हंगल यांचे देहावसान झाले होते. एक संवेदनशील अभिनेता म्हणून त्यांची ओळख आपल्याला आहेच पण मला त्यांच्या अभिनेता या ओळखी पेक्षा त्यांची देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील सक्रिय पण अंतिमक्षणी अतिशय उपेक्षित राहिलेले स्वातंत्र्य सेनानी हि ओळख मनाला जास्त भावून जाते.

१९१४ साली पाकिस्तानात एका संपन्न काश्मिरी ब्राह्मण कुटुंबात जन्मलेले ए के हंगल हे भारताचे प्रथम पंतप्रधान पंडित नेहरू यांचे अतिशय जवळचे नातेवाईक होते हे बहुदा असंख्य लोकांना माहित नसेल.पंडितजींची पत्नी आणि स्व.इंदिरा गांधी यांची आई कै .सौ.कमला नेहरू आणि ए.के.हंगल यांची आई या सख्ख्या चुलत बहिणी होत्या. आणि त्या मुळेच हंगल यांची त्याच काँग्रेसच्या कारकिर्दीत त्यांच्या वृद्धापकाळी विपन्नावस्थेमुळे झालेली वाताहत मनाला फार चटका लावून जाते.

स्वातंत्र्या साठी आपली उभी जवानी ज्या माणसाने देशासाठी वाहिली, ज्यांची १९४६ ते १९४९ अशी ऐन जवानी मधील मोलाची ३ वर्षे पाकिस्तान मध्ये तुरुंगात गेली  ,कशा साठी ??? तर इंग्रजांनी केलेल्या जालियन वाला हत्याकांडा विरुद्ध त्यांनी आवाज उठवला म्हणून,पण अशा व्यक्तिमत्वाचे विस्मरण नंतरच्या काळात तत्कालीन सरकारला व्हावे याचे फार वैषम्य वाटते.पण हे गृहस्थ इतके मानी होते कि,त्यांनी त्यांच्या विपन्नावस्थेत सुद्धा  ते नेहरू कुटुंबाचे जवळचे नातेवाईक असूनही कधी त्याचे भांडवल करून सहानुभूती किंवा मदत मिळवण्याचा कधी प्रयत्न केला नाही.हा इतका मुलखावेगळा माणूस होता कि, त्यांनी २२५ चित्रपटात काम केले पण त्यातील त्यांनी जेमतेम ५० सिनेमेच आपल्या आयुष्यात बघितले.शेवटच्या काही वर्षात तर ते ८-८ १०-१० महिने घराबाहेर सुद्धा पडत नसत..   

स्वतः जन्माने काश्मिरी पंडित असूनही त्यांनी त्यांचा परंपरागत व्यवसाय सोडून टेलरिंग या विषयात इतके प्राविण्य मिळवले होते कि, त्यांचे स्वतःचे पेशावर मध्ये भले मोठे टेलरिंग शॉप होते. ते स्वतः सूट शिवण्यात स्पेशालिस्ट होते ... इतके कि ते  *त्या काळी* एका सूटची शिलाई तेव्हाचे ८०० रुपये घेत असत व लोक त्यांना ती देत असत.   

आता विचार करा कि, असा हा वेलसेटल्ड माणूस जेव्हा १९४९ साली त्या कराचीतील तुरुंगातून सुटून स्वातंत्र्य सेनानी म्हणून ३५व्या वर्षी जेव्हा खिशात अवघे २० रुपये घेऊन बाहेर पडला असेल आणि त्याला देशाची झालेली फाळणी, त्या सोबतचा हिंसाचार ,कत्तली ,हत्याकांडे स्वतःचा धंदा,कुटुंब  उध्वस्त झालेलं बघावं लागलं असेल तेव्हा त्याची काय मानसिक अवस्था झाली असेल याचा विचारही करवत नाही.

पण त्यांनी हार मानली नाही कि कुठल्या सवलतीची ,आरक्षणाची किंवा सहानुभूतीची मदत अपेक्षित धरली नाही.त्यांनी आयुष्याला पुन्हा नव्याने सुरवात करत आपले उर्वरित आयुष्य ऑल टुगेदर नवीन म्हणजेच पूर्णवेळ अभिनेता होऊन सन्मानाने सुरु केले व त्यात नावलौकिक मिळवत राष्ट्रपतींच्या हस्ते "पद्म भूषण " हा मानाचा 'किताब मिळविला..


तर अशा या ए.के. हंगल यांचा हा आयुष्यपट पहाता आजच्या तरुणपिढीस त्यातून एकच आदर्श घेता येईल कि, *आयुष्याशी झुंज घ्यावी तर अशी* 

हंगल जींच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांचा एक गाजलेला सीन आज तुमच्या साठी.
   आजच्या लेखासाठी गुगल इमेज,विकिपीडिया व यूट्यूब यांचे सहकार्य घेण्यात आले आहे. संबंधितांचे मनापासून आभार 

1 टिप्पणी: