भोज्जा

शुक्रवार, १९ जानेवारी, २०१८

मा.विनायक : मराठी सिनेमाचे ऐकेकाळचे आशास्थान


आपण बराच काळ सांभाळलेला शेयर , पैशाची नड आली म्हणून विकावा, तुमच्या कडून तो विकत घेतांना ,घेणाऱ्याने तुमच्यावर उपकार करतोय असे दाखवत त्याचा  रेट पाडून घ्यावा  आणि त्याच्या नंतर तो शेयर बाजारात ५०० पट वाढवा याला तुम्ही काय म्हणाल ???

मा.विनायक च्या बाबतीत १९३८ साली त्याच्या गाजलेल्या ब्रह्मचारीच्याबाबतीत नेमके हेच झाले. मावसभाऊ व्ही.शांताराम सोबत फारसे न जमल्याने त्याने हंस पिक्चर्सच्या बॅनर खाली आचार्य अत्रे लिखित ब्रह्मचारी हा सिनेमा मीनाक्षीला घेऊन कसाबसा पूर्ण केला,पण विनायकाच्या मनस्वी स्वभावामुळे तो करतांना त्याचे अत्र्यांच्या बरोबर सुद्धा वाजले ,अत्रे हंस पिक्चर्स मधून  बाजूला झाले .संस्थेच्या आर्थिक अडचणी वाढल्या , पिक्चर कसाबसा पूर्ण झाला आणि आता हा पिक्चर स्वतः रिलीज करायचा का ? निदान घातलेले भांडवल काढून घेत वितरकाला आउट राईट विकून टाकायचा ? असा विनायका पुढे प्रश्न उभा राहिला.

विनायकाने दुसरा सोयीचा मार्ग निवडला आणि ब्रह्मचारी एका मारवाड्याला अवघ्या १ लाखांत विकून टाकला.खरे तर त्या वेळी सिनेमा धंद्याशी त्या मारवाड्याचा काही एक संबंध नव्हता पण आता विकत घेतलाच आहे तर लाऊयात असा विचार करून तो पिक्चर त्या मारवाड्याने पुण्यातल्या आर्यन मध्ये लावला नि पहिल्या शो पासून ब्रह्मचारीअसा काही उचलला गेला कि ज्याचं नाव ते. मारवाडी तर ध्यानी मनी नसतांना इतका प्रचंड मालामाल झाला कि त्याच्या पुढच्या २-४ पिढ्यांची ददात मिटली.

ब्रह्मचारी चालण्यामागे पिक्चरच्या स्टोरीत,पटकथेत,गाण्यात,संवादात आणि सगळ्यात म्हणजे सेक्स अपीलमध्ये सर्वार्थाने दम होता हे मुख्य कारण होते .कारण १९३८ च्या काळात स्त्रियांचा  समाजाला उघडा दिसणारा जास्तीतजास्त भाग म्हणजे चेहरा,हात आणि पायाचे घोटे. अशा काळात मांड्या उघड्या टाकून  मीनाक्षीने सादर केलेले यमुना जळी खेळ खेळूया का ? हे गाणे पडद्यावर आले आणि तत्कालीन पब्लिकला वेड लाऊन गेले.

पण पिक्चर प्रचंड हिट होऊन सुद्धा विनायकाच्या हाती काहीही लागले नाही.कारण त्याचा त्याच्याशी संबंधच राहिला नव्हता. उर्वरित पुढील ९ वर्षाच्या आयुष्यात विनायकाने चित्रपट निर्मिती केली पण ब्रह्मचारीची उंची तो पुन्हा कधी गाठू शकला नाही हे वास्तव आहे. भविष्यात त्याची मुलगी नंदा हिने हिंदी सिनेमात मोठे नाव व पैसा मिळवून वडिलांची  चूक सुधारत तिच्या पदराच्या गाठीला  चांगली माया जमवून अंतिम दिवस व्यवस्थित गुजारले. पण विनायक मात्र  वयाच्या अवघ्या ४१ व्या वर्षी जलोदराने तडकाफडकी गेला.तो जायची वेळ  सुद्धा इतकी विचित्र होती कि इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त झालेला भारत, आपल्या स्वातंत्र्य प्राप्तीचा उत्सव साजरा करण्यात मग्न होती.(१९ ऑगस्ट १९४७)..त्या मुळे विनायक गेल्याचा दिवस हा सुद्धा फक्त इतिहासात नोंद ठेवण्याजोगाच होऊन बसला.        

आजचे गाणे ते तेच गाणे, ज्याने आजपासून ८० वर्षापूर्वी तमाम मराठी प्रेक्षकां मध्ये खळबळ माजवून दिलेले मा.विनायक- मीनाक्षीचे ब्रह्मचारीमधील.👇
आजच्या लेखासाठी इन्टरनेट ,आचार्य अत्रे लिखित "कऱ्हेचे पाणी " आणि यू ट्यूब यांचे सहकार्य लाभले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा