भोज्जा

शनिवार, १८ नोव्हेंबर, २०१७

यात आपण नक्की कुठे ?

जेव्हा-जेव्हा तुम्ही सजगपणे  इतिहासा कडे बघता तेव्हा- तेव्हा   असे लक्षात येते कि,जेव्हा कोणत्याही देशातील तमाम जनता त्यांची जात,पात,देव,धर्म ,उदबत्या ,पणत्या,धूप, निरांजन , मेणबत्या हे फक्त आपापल्या श्रद्धा स्थाना पुरते आणि स्वतः पुरतेच जेव्हा मर्यादित ठेवतात आणि  देशाच्या सर्वांगीण विकासासाठी  " तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार " हि उक्ती विज्ञानाची कास धरत जेव्हा पूर्णपणे अंगी बाणवतात तेव्हांच त्या-त्या देशांचा विकास शक्य झाला आहे.

जेव्हा गॅलिलिओने (इ.स. १५६४-१६४२) " पृथ्वी हि स्वतः भोवती फिरत सूर्या भोवती फिरते व चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे " हे जगाला सूर्यमालेच्या रूपात ज्ञात करून दिले आणि ख्रिश्चन धर्मियांनी ती वास्तवात  निदान त्याच्या मृत्यूपश्चात कां होईना पण स्वीकारत स्वतःच्या विचारसरणीत जेव्हा बदल केला तेव्हा आणि फक्त तेव्हाच  यूरोप आणि नंतर अमेरिकेत खऱ्या अर्थाने विकासाला सुरुवात झाली.साधारण साडेसोळाव्या शतकापर्यंत जगातील जवळपास सर्वच देश हे देव-धर्म, आणि त्यांचे-त्यांचे धर्मग्रंथ केवळ यातच अडकलेले होते.विज्ञानाची कास धरे पर्यंत   ख्रिस्तपूर्व ४०० वर्षे जुन्या ऍरिस्टोटल या ग्रीक तत्ववेत्याचे तत्वज्ञान हा युरोपियन समाजाचा जणू धर्मग्रंथ होता.भगवान येशू ख्रिस्त यांचे पर्यंत आणि  नंतर बायबलमध्ये वेळोवेळी त्या-त्या काळातील देवासमान विचारवंतांनी त्यात लेखन करत, कालानुरूप स्वीकारयोग्य बदल केले.जे जगासाठी नंतर भविष्यात वरदान ठरले.

या विश्वाचा पृथ्वी हा केंद्रबिंदू असून तो सूर्यमालेचा उगम  बिंदू आहे या तो पर्यंतच्या समाजमान्यतेला जेव्हा गॅलिलिओने सोळाव्या शतकात सप्रमाण खोटे सिद्ध करत  छेद दिला तेव्हा त्याला सुद्धा धर्मगुरूंच्या आणि समाजाच्या रोषाला बळी पडावे लागले. १९३२च्या सुमारास गॅलिलिओला अंधत्व आले आणि त्या नंतर  आयुष्यातील शेवटची १०-१२ वर्षे तर त्याला सुद्धा धर्मबुडव्या म्हणून तुरुंगवास  सहन करावा लागला. शेवटी-शेवटी तर गॅलिलिओ इतका हरला कि त्याने या सर्वांचा प्रतिकार करणेसुद्धा सोडून दिले. पण निदान गॅलिलिओ नंतरच्या शास्त्रज्ञांनी त्याच्या मृत्यू पश्चात त्याचे संशोधन योग्य ठरवत ते जगाला सप्रमाण मान्य करावयास लावले. त्याने एक गोष्ट मात्र झाली युरोपियन समाजाने त्यांच्या डोळ्यावरची आजवरची झापडे उतरविली आणि ते नव्या दृष्टीने स्वतःकडे पाहू लागले.

त्या मुळे सध्याच्या मानवजातीच्या भौतिक प्रगतीची खरी सुरवात साधारण १७व्या शतकापासून सुरु झाली असे ढोबळमानाने समजायला हरकत नसावी.

आता त्याकाळात येथे भारतात काय परिस्थिती होती ? तर येथे मुघल अंमल होता. फक्त महाराष्ट्रापुरते बोलायचे तर शिवाजी महाराज जेव्हा १६३० साली जन्माला आले तेव्हा गॅलिलिओ ६४ वर्षांचा होता नि अंधत्वाकडे नि तुरुंगवासाकडे त्याची वाटचाल सुरु होती. पण महाराज जन्माला येईपर्यंत त्याने सूर्यमालेतील ग्रहांचा त्यांच्या भोवती फिरणाऱ्या चंद्राचा ,दुर्बिणीच्या शास्त्राच्या उगमाचा  आणि लंबकाच्या गतीचा शोध लावून झाला होता.गुरुत्वाकर्षणा सोबत गतीचे तीन नियम नियमबद्ध करणारा आणि रंगसूत्राला नियमबद्ध करणारा आयझॅक न्यूटन याचा जन्म १६४२ चा म्हणजे शिवाजी महाराज १२ वर्षांचे असताना झाला .      शिवाजी महाराज जन्माला येण्या अगोदरच्या शतकात  गॅलिलिओच्या जन्मउपरांत ते मृत्यू पर्यंत यूरोपातील शास्त्रज्ञांनी जगाच्या इतिहासावर दूरगामी परिणाम करणारे असे जवळपास १५ शोध आधीच लागलेले होते , व ते जगन्मान्य झाले होते.

थोडक्यात फक्त देव-देव ,जाती-धर्म आणि धर्मग्रंथ या पलीकडे जात सोळाव्या शतकापूर्वी  लागलेले महत्वपूर्ण शोध पहाता युरोपियन समाजाने ढोबळमानाने साधारण १६ व्या शतकाच्या उत्तरार्धात कात टाकायला सुरवात केली आणि यूरोपीयनेतर मानवजातींच्या खूप अगोदर नवनवीन शोधांच्या मदतीने प्रचंड वेगाने पुढे जात समृद्धीच्या दिशेने वाटचाल सुरु केली. इथे भारतात मात्र शिवाजी महाराजांसारखे अलौकिक नेतृत्व स्वतःच्या जनतेच्या अस्तित्वाच्या लढाईत अडकून पडले होते. साधारण पुढील ३०० वर्षे म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळे पर्यंत यूरोपियदेश आणि नंतर शोध लागलेली अमेरिका प्रचंड प्रगत होत निम्याहून अधिक जगावर अंमल करीत होते. ते हि त्यांचे मांडलिक असलेल्या देशांच्या जीवावर.

या भौतिक प्रगतीचा मोठा वाटा मांडलिक देशांवर अंमल मिळवत आपल्याला सुद्धा मिळावा या सत्तेच्या लालसेपोटी जर युरोपियन देशां-देशां मध्येच जर दोन महायुद्धे झाली नसती तर  बाकी जगाची आज दिसणारी निदान थोडीफार का होईना अशी जी प्रगती दिसते आहे ती कितपत झाली असती ? अशी शंका घ्यायला जागा आहे.  .कारण आधुनिक विज्ञानाचा जात-पात -देव-धर्म या पलीकडे जाऊन  विचार करण्या पेक्षा आता सो कॉल्ड हुशार लोक सुद्धा   फक्त मोठमोठ्या बाता मारत बऱ्याचदा वैयक्तिक कारणापोटी किंवा क्वचित स्वतःच्या समाजाचे भले करायच्या नावाखाली फक्त स्वार्थ साधण्यात धन्यता मानताना दिसत आहेत.
आधुनिक विज्ञानात संगणक युगातील काही संशोधने वगळता बाकी १६ व्या शतकानंतरच्या  मानव जातीच्या उत्क्रांती साठी,भौतिक सुधारणा करण्यासाठी कोणत्याही शोधाची झळ भारतास  खास करून तिसऱ्या जगास  कधीच सोसावी लागली नाही. *तिकडनं इकडे आलं नि ते माझं झालं*  हि आपली ऐदखाऊ वृत्ती बळावत गेली. आधुनिकतेचा ,सुधारणांचा फायदा घेत फक्त सुखलोलुपता वाढत गेली. पण त्या साठी ऋणी राहण्याऐवजी ,आमच्या पुराणकाळात तर या गोष्टी फार पूर्वीच होत्या ,त्यात  काय विशेष ? अशा गप्पा ठोकत किंवा  पूर्वजांच्या शौर्याच्या नुसत्या बढाया मारत ,कधी जातीच्या नावावर तर कधी धर्माच्या नावावर तर कधी कोणे एकेकाळी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाची भरपाई म्हणून त्याची किंमत वसूल करण्यासाठी फक्त या प्रगतीचा  उपयोग करून घेणे सुरु झाले.
 पण दुसऱ्या महायुद्धा नंतरच्या भीषण नरसंहार आणि नुकसानीच्या प्रखर वास्तवतेची जाणीव आशियातील फक्त जपानला सर्वप्रथम झाली. मानवी जीवनाची किंमत, त्यांचे मोल त्यांच्या लक्षात आले  प्रखर वास्तवतेची जाणीव आणि आधुनिक सुधारणांचा देशाच्या सर्वांगीण विकासा करीत येणे शक्य आहे हे लक्षात घेऊन त्या दृष्टीने फक्त तेथील राज्यकर्त्यांनींच नव्हे तर तेथील आम जनतेने सुद्धा हि गोष्ट मनावर घेतली.
याचे उदाहरण द्यायचे तर १९४५ ला दुसरे महायुद्ध हिरोशिमा-नागासाकी अणुहल्ल्याने संपुष्टात आले. संपूर्ण जपान बेचिराख झाला पण राखेतून उभे रहात पुढच्या अवघ्या वीस वर्षांत स्वतःमध्ये नेत्रदीपक बदल करत जपानने प्रगतीची इतकी मजल गाठली कि अवघ्या जगाने थक्क होऊन तोंडात बोटे घातली.याचे अतिशय साधे नि सहज समजणारे उदाहरण द्यायचे झाले तर , जेव्हा १९६२ च्या भारत-चीन युद्धात डबलबारी बंदुकीने युद्ध लढणाऱ्या आपल्या देशाच्या जवानांना अपमानास्पदरितीने हार पत्करायला भाग पडले होते आणि त्या नंतर आपले तत्कालीन राज्यकर्ते आता पुढे काय करायचे असा विचार करत पाकिस्तान सोबतच्या १९६५ च्या युद्धाची , आयात शस्त्र सामुग्रीच्या जीवावर तयारी करण्यात मग्न होता , तेव्हा भारतीय चित्रपट निर्माते तिकडे दुसऱ्या महायुद्धानंतर प्रचंड प्रगत झालेल्या   जपानला जाऊन  लव्ह इन टोकियो हा सिनेमा नि त्यातील गाणी टोकियोतील रस्त्यावर शूट करत होते.  आणि इकडे १९६६ ला तो पडद्यावर आल्यावर तेथील १९४५ च्या दुसऱ्या महायुद्धा नंतरच्या जपानच्या प्रगतीने थक्क होऊन आपण थेटरात फक्त स्वतःचीच नव्हे तर दुसऱ्याच्या पायाची सुद्धा बोटे  तोंडात घालत होतो. 
बोलण्या सारखे नि लिहिण्या सारखे अजून खूप काही आहे पण सांगावे तितके थोडेच आहे हे आपण सर्वच जण जाणतो. आतातरी स्वतः सोबत देशाचाही विचार करूयात नि  फक्त नियमाप्रमाणे वर्तन करत तो  कृतीत आणायचा प्रयत्न करूयात.


जपानची १९४५ च्या दुसऱ्या महायुद्धानंतरची प्रगती या गाण्यातून बघुयात.  

   सौजन्य :युट्यूब , ThodeSeAurGane Thanks a lot.                            

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा