भोज्जा

सोमवार, २५ डिसेंबर, २०१७

जी पी.सिप्पी २५ डिसेंबर स्मृतिदिन

आज २५ डिसेंबर .. आणि खरे तर अटलबिहारी वाजपेई ,संगीतकार नौशाद यांचा जन्मदिवस किंवा चार्ली चाप्लीनचा स्मृतिदिन  पण .... मराठी माणसाने व्यवसायात काही शिकावे,बोध घ्यावा,आदर्श ठेवावा अशा व्यक्तिमत्वाची म्हणजेच जी.पी.सिप्पींची ओळख माझ्या अंदाजाने मराठी वाचकांना प्रथमच कुणी करून देत आहे....

मराठी माणसाने धंदा शिकावा तर तो सिंधी माणसाकडून. कारण काळाची गरज ओळखून, करत असलेल्या धंद्यातून योग्य नफा काढून घेत सर्वांगीण प्रगती करणे म्हणजे काय ते या लोकांच्या कडून शिकावे.  
आजचा दिवस त्या मुळेच  एका आदरणीय, काळाच्या सोबत किंबहुना काळाच्या खूप पुढे रहात सर्वांगीण प्रगती साधत भारतीय चित्रपट इतिहासात आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरणाऱ्या गोपालदास परमानंद ऊर्फ जी.पी.सिप्पी यांच्या स्मृती प्रित्यर्थ  समर्पित.

१९१४ साली सध्याच्या पाकिस्तानातील हैद्राबाद मध्ये त्यांचा जन्म झाला.स्वातंत्र्यासाठी गांधीजींच्या मिठाच्या सत्याग्रहात ६ महिने तुरुंगवास भोगलेला माझ्या माहितीतील हिंदी सिनेमातील हा एकमेव स्वातंत्र्य सैनिक आहे.    
फाळणीमुळे १९४७ साली म्हणजेच त्यांच्या वयाच्या ३३-३४ व्या वर्षी सर्व घरदार,जम बसलेला त्यांचा कराची,पाकिस्तानातील  कार्पेट विक्रीचा व हॉटेलिंगचा धंदा नाईलाजास्तव सोडून, मुंबईला येत त्यांनी वकिली सुरु केली.

१९४७ साली स्वातंत्र्योत्तर भारत सरकारचा नवीन मालकी तत्वावरील ओनरशिप बांधकाम कायदा अमलात आला आणि  त्यांना काळाची गरज लक्षात आली.मग  त्यांनी वकिली सोडून बांधकाम व्यवसायात उडी घेऊन  कुलाब्यात सिंध चेम्बर्स ही ओनरशिप तत्वावरील मुंबईतील पहिली बिल्डींग उभी केली.
पण या व्यवसायास त्या काळात बिलकुल भविष्य नव्हते कारण लोकांच्या कडे पैसाच नव्हता... आत्ता सारखे वलय तर बिलकुल नाही.... मग  काय करणार ? सिप्पींच्या ही गोष्ट त्वरित लक्षात आली व त्यांनी १९५२ साली काळाची गरज लक्षात घेत , चित्रपट निर्माता म्हणून हिंदी चित्रपट व्यवसायात येत त्याचे हि तंत्र आणि गणित लगेच समजून घेतले आणि  या नवीन व्यवसायात निर्माता व दिग्दर्शक या नात्याने घोडदौड सुरु केली.

१९७४ पर्यंत ते या व्यवसायात खूपच नावाजलेले व स्थिरावलेले व्यक्तिमत्व झाले.त्यांनी निर्माता म्हणून असंख्य हिट सिनेमे दिले व तुफान पैसा कमावला ...  

१९७३ च्या सीता और गीताच्या तुफान यशा नंतर मुलगा रमेश सिप्पीने त्यांच्या कडे शोलेच्या निर्मिती साठी १ करोड रुपये मागितले. विशेष म्हणजे सीता और गीताच्या निर्मिती साठी सिप्पींना तेव्हा सगळा मिळून  ४० लाख रुपये खर्च आला होता...पण सिप्पींनी शोलेची स्टारकास्ट, कथानक व स्वरूप लक्षात घेऊन मुलाला ३ कोटीचे बजेट मंजूर केले.... बाप असावा तर असा...   पुढचा इतिहास सांगण्यात हशील नाही कारण मुंबईतील मिनर्व्हा थेटरात सलग २८६ आठवडे मुक्काम ठोकत शोलेने इतिहासात रचला.

सध्याच्या काळात आपण १५०  कोटी रुपये बजेट असलेले चित्रपट पहातो ज्यात १५० कोटीं पैकी १०० कोटी नायक नायिकेचा मोबदला असतो व उरलेल्या ५० कोटीत सिनेमा बनलेला असतो.शोलेचे वैशिष्ट्य असे कि त्याची स्टारकास्ट डोळ्यापुढे आणा कारण  त्याच्या ३ कोटीं निर्मिती मूल्यातील  फक्त २० लाख रुपये हा चित्रपटात काम केलेल्या सर्व अभिनेत्यांचा मोबदला स्वरुपातला खर्च होता. म्हणून शोले सारखा सिनेमा हा इतिहासात एकदाच बनू शकतो.

शोलेच्या उत्तुंग यशा नंतर व वयाची साठी पार केल्यावर खरेतर एखादा माणूस गप्प पडला असता ... पण गप बसतील  ते सिप्पी कुठले ? १९८७ साली म्हणजे त्यांच्या वयाच्या ७३ व्या वर्षी दूरदर्शन वरील भारत-पाकिस्तान फाळणी या विषयाला वाहिलेली पहिली  प्रदीर्घ मालिका “बुनियाद” ची निर्मिती करून त्यांनी भावी पिढीला फाळणीच्या दुःखाची प्रथमच ओळख करून दिली. ही  मालिका त्या काळी प्रचंड लोकप्रिय व यशस्वी झाली होती.टीव्ही वरील “मालिका” हा आजच्या काळात सुद्धा लोकप्रिय असलेल्या ट्रेन्डचे जनक जी.पी.सिप्पी आहेत हे आजच्या पिढीला काय जवळपास कुणालाच माहित नाही.

निर्माता म्हणून वयाच्या ८४ व्या वर्षी (१९९८ साली )आपला शेवटचा हिंदी सिनेमा काढून त्यांनी सिनेसृष्टीतून निवृत्ती घेतली.अगदी आजच्या काळात सुद्धा हिंदी सिनेमात कित्येकजण असे आहेत ज्यांची ओळख आपल्याला जी पी सिप्पींच्या मुळे झालीये ... मग तो शाहरुख असो कि,अजून कोणी असो....


असे हे अलौकिक व्यावसायिक व्यक्तिमत्व आपल्यातून वयाच्या ९३ व्या वर्षी २००७ साली आपल्यातून निघून गेले ... त्यांना आजच्या या स्मृतीदिनी  मानाचा मुजरा...   🎥

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा