भोज्जा

मंगळवार, ५ नोव्हेंबर, २०१९

तब्बू , एक संवेदनशील अभिनेत्री

ती एक बार गर्ल डांसर आहे. तिचे तेथेच एका नामचिन गुंडा बरोबर सुत जुळते .ती त्याच्याशी लग्न करते .तिला दोन मुले होतात. मोठा मुलगा आणि धाकटी मुलगी .

काही काळाने तिचा गुंड नवरा पोलीस एन्काऊंटर मध्ये मारला गेलाय आणि नवऱ्याच्या माघारी तिच्या दोन्ही मुलांचे संगोपन आणि शिक्षण ती एकटी स्वतःच्या हिमती वर करत आहे. आणि अशातच तिच्या १४-१५वर्षाच्या मुलाला पोलिसांनी त्याने न केलेल्या गुन्ह्याबद्दल उचलून नेले आहे आणि आता ती त्याला त्या कचाट्यातून सोडवून आणण्यासाठी पोलिसांना द्यावयाच्या पैशाची तजवीज करण्याच्या मागे आहे....पण तिला जागोजागी नकार मिळत आहे...😢

 आणि केवळ त्या मुळे नाईलाजास्तव  ती आपल्या शरीराचा सौदा  करायला आता तयार झाली आहे ....😭

ही आहे आजच्या व्हिडीओ ची पार्श्वभूमी .

ती मुद्दाम सांगायचे कारण असे की चांदनी बार या 2001 साली आलेल्या सिनेमात हा प्रसंग तब्बू या संवेदनशील अभिनेत्रीने पडद्यावरती आपल्या अभिनयाने  शब्दशः जिवंत केला आहे...

 नको असलेल्या मार्गावरून केवळ पुत्र प्रेमासाठी जाणे भाग पडत आहे आणि त्या वेळी ती करत असलेली  गोष्ट चुकीची आणि गैर आहे हे समजत असून सुद्धा तिच्यातील आईचा झालेला नाईलाज ,त्यामुळे आलेली उद्विग्नता आणि अपराधीपणाची जाणीव तब्बू ने या अवघ्या चार मिनिटांच्या सीनमध्ये अतिशय प्रभावी पद्धतीने सादर केली आहे ...

हा सिनेमा सलग पहात असताना संवेदनशील प्रेक्षकाच्या डोळ्यांच्या कडा  त्यामुळे पाणावल्या गेल्या नाहीत तरच नवल .. या भूमिके करिता  तब्बूला  उत्कृष्ट अभिनेत्री चे  नॅशनल अवॉर्ड मिळालेले आहे. या सीन बद्दल इतके प्रास्ताविक करायचे कारण असे की ते अवॉर्ड  मिळाल्यावर  हा 👇सीन माझ्या करियर मधील आजवरचा सर्वोत्कृष्ट सीन आहे आणि माझ्यातील अभिनेत्रीचे  समाधान करणारा  आहे असे एका मुलाखतीत तेव्हा सांगितले होते.

तब्बू ४ नोव्हेंबरला 49 व्या वर्षात पदार्पण करत आहे..

 जन्मदिनाच्या तिला मनापासून शुभेच्छा आणि आता पहा तब्बूचा तो अप्रतिम परफॉर्मन्स
👌👌👌👌👌👇🙏

शनिवार, ६ ऑक्टोबर, २०१८

गौतम बुद्धांचा आरसा आणि नरेंद्र मोदी

मला कोणाच्या हाताखाली काम करायचे नाहीये. मला माझा स्वतःचा व्यवसाय करायचा आहे आणि त्या मुळे भांडवल जमा करण्यासाठी म्हणून मी एका कंपनीत सेल्स रिप्रेझेन्टटेटिव्ह म्हणून काम करतो. पण त्या साठी मला लोकांच्या दारोदार जावे लागते. कंपन्यांतून भेटी द्याव्या लागतात लोकांच्या सोईनुसार वेळा पाळाव्या लागतात .बऱ्याचदा तासनतास त्यांची वाट पहात ताटकळत थांबावे लागते. बऱ्याचदा पुन्हापुन्हा एकाच जागी जावे लागते ..काही ठिकाणी मला लोक ब्याद असल्यासारखी वागणूक देतात  आणि तेव्हा मला स्वतःचा फार राग येतो आणि वाटते कि,हे मी काय करतोय ? मी स्वतंत्र व्यवसाय कधी नि कसा सुरु करणार ? भांडवल कधी गोळा करणार ??? त्या पेक्षा मला एखाद्या चांगल्या कंपनीत क्लार्कची नोकरी मिळाली तर फार बरे होईल ... 

तामिळनाडूतल्या देवळांचे शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या तंजावर मधून एकाने मला पत्र पाठवून आपली ही वरील व्यथा माझ्या कडे मांडली होती,आणि तो मला त्यावर सल्ला मागत होता. 

त्याच्या या प्रश्नाचे उत्तर देण्याअगोदर आपण गौतम बुद्धांच्या आयुष्यातील एक प्रसंग पाहू. 

एकदा एक तरुण बुद्धांच्या कडे आला पण त्याला आपण आत्मसाक्षात्कारी महापुरुषाला भेटत आहोत हे माहित नव्हते.त्यामुळे त्याने जेव्हा बुद्धांचे तेजस्वी, प्रसन्न व्यक्तीमत्व बघितले तेव्हा तो अतिशय भारावून गेला व त्याने बुद्धांना पहिला प्रश्न विचारला कि,

तुम्ही परमेश्वराचे अवतार आहात काय ? 

नाही.. 

आपण स्वर्गातून अवतरले आहात काय ? 

नाही 

मग आपण ह्या पृथ्वी वरीलच अवतारी पुरुष आहात काय ?

नाही .. 

तरुणाच्या सर्व प्रश्नांची उत्तरे बुद्धां कडून नाही म्हणून आल्यावर मात्र त्याचा तोल काहीसा ढळला आणि त्याने बुद्धांना विचारले कि, 

मग आपण  कोण आहात ?

यावर मंद स्मित करत बुद्ध त्याला म्हणाले 
खरेतर या प्रश्नाने तू संभाषणास सुरुवात करणे अपेक्षित होते ... पण असो.. 

मी एक स्वच्छ आरसा आहे .माझ्या समोर जे आहे त्याचे फक्त प्रतिबिंब मी समोरच्याला दाखवतो..समोरचे दृश्य जरी दूषित असेल तरी त्याने आरशावर काही परिणाम होत नाही ..तो दूषित होत नाही . आरसा फक्त जे समोर आहे तेच दाखवतो.

If our consciousness can be like a mirror, then the life will have a different flavour. This is a famous saying of Buddha." (तुमचे आचार,विचार,व्यवहार,नियत जर स्वच्छ असेल तर ते तुमच्या आयष्याला एक सुंदर अर्थ प्राप्त करून देतात..) या वाक्याला खूप गूढ अर्थ आहे.. 
एखाद्याने तुमची स्तुती केली,तुम्हाला हुशार संबोधले तुमचे कौतुक केले किंवा तुमची तुलना थेट चाणक्या बरोबर केली किंवा तुम्हांला नवे ठेवली,तुमची निंदा नालस्ती केली आणि जर बुद्ध म्हणाले त्या प्रमाणे तुमचे मन आरशा सारखे स्वच्छ असेल तर समोरच्याला ते जो बोलत आहे फक्त ते त्याला  प्रतिबिंबित होईल.  

आता त्या तंजावरच्या तरुणाच्या प्रशांकडे वळू .त्याच्या अडचणीवर त्याने काय करावे किंवा न करावे हे मी त्याला आत्ता थेट सांगणार नाहीये तर त्यासाठी मदन मोहन मालवीय यांच्या आयुष्यातील एका प्रसंगाची त्याला आठवण करून देणार आहे.. 

बनारस विश्व हिंदू युनिव्हर्सिटीच्या  उभारणी साठी मदन मोहन मालवीय यांनी अथक आणि पराकोटीचे प्रयत्न केले त्यात कुठेही कसूर ठेवली नाही. त्यासाठी  ते हैद्राबादच्या प्रचंड श्रीमंत निजामाकडे युनिव्हर्सिटीला पैशाच्या रूपात मदत मागण्यासाठी गेले.निजामास भयंकर राग आला. एका हिंदू विश्व विद्यालयासाठी हा माणूस माझ्या सारख्या सच्च्या मुसलमाना समोर हा हे धाडस करूच कसा शकतो असा विचार करत निजामाने त्यांना हाकलून देण्याचा खूप प्रयत्न केला पण ,काहीतरी मदत घेतल्याशिवाय मालवीय तेथून जायला तयार होईनात.. शेवटी निजाम संतापला व त्याने त्याच्या एका पायातील रत्नजडित जोडा मदन मोहन मालवीय यांना रागाने फेकून मारला. 

मालवीयांनी शांतपणे तो निजामाचा मौल्यवान जोडा उचलला व ते बाहेर पडले ते थेट हैद्राबादच्या बाजारपेठेत जाऊन उभे राहिले. तेथे त्यांनी त्या निजामाच्या मौल्यवान जोडायचा लिलाव मांडला.. खुद्द निजामाचा मौल्यवान जोडा म्हणल्यावर हा-हा म्हणता बाजारपेठेत गर्दी झाली व बघता बघता बोली चढत गेली.. कुठूनशी ती गोष्ट निजामाच्या कानावर गेली.

आता निजाम बेचैन झाला. त्याच्या जिवंतपणी त्याच्या वापरत्या वस्तूचा लिलाव खुद्द त्याच्या हैद्राबाद मध्ये होतोय व ते घ्यायला लोक भलीमोठी बोली लावत आहेत  म्हणल्यावर,निजामाने त्याच्या दरबारातील एक विश्वासू सेवकांस त्वरित घटनास्थळी पाठविले व भल्यामोठ्या चढ्या रकमेला तो स्वतःचाच जोडा पुन्हा ताब्यात घेतला.मदन मोहन मालवीय यांनी अशाप्रकारे प्रतिकूल परिस्थिती अनुकूल करवून घेतली.  

सध्याच्या नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकार बाबत सुद्धा जनतेचे तेच झालेय.. काही जण निजामाच्या भूमिकेत आहेत ज्यांना मोदींची प्रत्येक कृती १००% फक्त आणि फक्त  चुकीचीच वाटते जे  त्यांना वारेमाप नावे  ठेवतात तर काही जण मदनमोहन मालवीयांच्या भूमिकेत आहेत...जे मोदींच्या प्रत्येक कृतीचा अर्थ काढत  निराश न होता त्यातून संधी शोधत त्यांचे गुणगान व  स्तुती करतात.    

तात्पर्य काय तर पुरेसा अभ्यास किंवा माहिती न घेता पूर्वग्रहदूषित नजरेने किंवा बुद्धीने एखाद्या गोष्टी,घटनेकडे,व्यक्तीकडे न पहाता तुमचे मत बनविताना प्रथम तुम्ही आरशासारखे स्वच्छ आहात कां याचा प्रथम विचार करा कारण आरसा कधी खोटे प्रतिबिंब दाखवत नाही.तुम्ही जसे आहात तेच तुम्हांला आरशात दिसते.                

 संदर्भ : वरील स्वैरानुवादा साठी स्वामी सुखबोधानंद यांच्या Oh ,Life relax please ! चा आधार घेतला आहे.धन्यवाद स्वामीजी !    

रविवार, २६ ऑगस्ट, २०१८

आयुष्याशी झुंज घ्यावी तर अशी : ए.के. हंगल

आज २६ ऑगस्ट २०१८ ,आजच्या दिवशीच ७ वर्षांपूर्वी तब्बल ९७ वर्षांचे ज्येष्ठ अभिनेते ए के हंगल यांचे देहावसान झाले होते. एक संवेदनशील अभिनेता म्हणून त्यांची ओळख आपल्याला आहेच पण मला त्यांच्या अभिनेता या ओळखी पेक्षा त्यांची देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील सक्रिय पण अंतिमक्षणी अतिशय उपेक्षित राहिलेले स्वातंत्र्य सेनानी हि ओळख मनाला जास्त भावून जाते.

१९१४ साली पाकिस्तानात एका संपन्न काश्मिरी ब्राह्मण कुटुंबात जन्मलेले ए के हंगल हे भारताचे प्रथम पंतप्रधान पंडित नेहरू यांचे अतिशय जवळचे नातेवाईक होते हे बहुदा असंख्य लोकांना माहित नसेल.पंडितजींची पत्नी आणि स्व.इंदिरा गांधी यांची आई कै .सौ.कमला नेहरू आणि ए.के.हंगल यांची आई या सख्ख्या चुलत बहिणी होत्या. आणि त्या मुळेच हंगल यांची त्याच काँग्रेसच्या कारकिर्दीत त्यांच्या वृद्धापकाळी विपन्नावस्थेमुळे झालेली वाताहत मनाला फार चटका लावून जाते.

स्वातंत्र्या साठी आपली उभी जवानी ज्या माणसाने देशासाठी वाहिली, ज्यांची १९४६ ते १९४९ अशी ऐन जवानी मधील मोलाची ३ वर्षे पाकिस्तान मध्ये तुरुंगात गेली  ,कशा साठी ??? तर इंग्रजांनी केलेल्या जालियन वाला हत्याकांडा विरुद्ध त्यांनी आवाज उठवला म्हणून,पण अशा व्यक्तिमत्वाचे विस्मरण नंतरच्या काळात तत्कालीन सरकारला व्हावे याचे फार वैषम्य वाटते.पण हे गृहस्थ इतके मानी होते कि,त्यांनी त्यांच्या विपन्नावस्थेत सुद्धा  ते नेहरू कुटुंबाचे जवळचे नातेवाईक असूनही कधी त्याचे भांडवल करून सहानुभूती किंवा मदत मिळवण्याचा कधी प्रयत्न केला नाही.हा इतका मुलखावेगळा माणूस होता कि, त्यांनी २२५ चित्रपटात काम केले पण त्यातील त्यांनी जेमतेम ५० सिनेमेच आपल्या आयुष्यात बघितले.शेवटच्या काही वर्षात तर ते ८-८ १०-१० महिने घराबाहेर सुद्धा पडत नसत..   

स्वतः जन्माने काश्मिरी पंडित असूनही त्यांनी त्यांचा परंपरागत व्यवसाय सोडून टेलरिंग या विषयात इतके प्राविण्य मिळवले होते कि, त्यांचे स्वतःचे पेशावर मध्ये भले मोठे टेलरिंग शॉप होते. ते स्वतः सूट शिवण्यात स्पेशालिस्ट होते ... इतके कि ते  *त्या काळी* एका सूटची शिलाई तेव्हाचे ८०० रुपये घेत असत व लोक त्यांना ती देत असत.   

आता विचार करा कि, असा हा वेलसेटल्ड माणूस जेव्हा १९४९ साली त्या कराचीतील तुरुंगातून सुटून स्वातंत्र्य सेनानी म्हणून ३५व्या वर्षी जेव्हा खिशात अवघे २० रुपये घेऊन बाहेर पडला असेल आणि त्याला देशाची झालेली फाळणी, त्या सोबतचा हिंसाचार ,कत्तली ,हत्याकांडे स्वतःचा धंदा,कुटुंब  उध्वस्त झालेलं बघावं लागलं असेल तेव्हा त्याची काय मानसिक अवस्था झाली असेल याचा विचारही करवत नाही.

पण त्यांनी हार मानली नाही कि कुठल्या सवलतीची ,आरक्षणाची किंवा सहानुभूतीची मदत अपेक्षित धरली नाही.त्यांनी आयुष्याला पुन्हा नव्याने सुरवात करत आपले उर्वरित आयुष्य ऑल टुगेदर नवीन म्हणजेच पूर्णवेळ अभिनेता होऊन सन्मानाने सुरु केले व त्यात नावलौकिक मिळवत राष्ट्रपतींच्या हस्ते "पद्म भूषण " हा मानाचा 'किताब मिळविला..


तर अशा या ए.के. हंगल यांचा हा आयुष्यपट पहाता आजच्या तरुणपिढीस त्यातून एकच आदर्श घेता येईल कि, *आयुष्याशी झुंज घ्यावी तर अशी* 

हंगल जींच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांचा एक गाजलेला सीन आज तुमच्या साठी.
   आजच्या लेखासाठी गुगल इमेज,विकिपीडिया व यूट्यूब यांचे सहकार्य घेण्यात आले आहे. संबंधितांचे मनापासून आभार