मला कोणाच्या हाताखाली काम करायचे नाहीये. मला माझा स्वतःचा व्यवसाय करायचा आहे आणि त्या मुळे भांडवल जमा करण्यासाठी म्हणून मी एका कंपनीत सेल्स रिप्रेझेन्टटेटिव्ह म्हणून काम करतो. पण त्या साठी मला लोकांच्या दारोदार जावे लागते. कंपन्यांतून भेटी द्याव्या लागतात लोकांच्या सोईनुसार वेळा पाळाव्या लागतात .बऱ्याचदा तासनतास त्यांची वाट पहात ताटकळत थांबावे लागते. बऱ्याचदा पुन्हापुन्हा एकाच जागी जावे लागते ..काही ठिकाणी मला लोक ब्याद असल्यासारखी वागणूक देतात आणि तेव्हा मला स्वतःचा फार राग येतो आणि वाटते कि,हे मी काय करतोय ? मी स्वतंत्र व्यवसाय कधी नि कसा सुरु करणार ? भांडवल कधी गोळा करणार ??? त्या पेक्षा मला एखाद्या चांगल्या कंपनीत क्लार्कची नोकरी मिळाली तर फार बरे होईल ...
तामिळनाडूतल्या देवळांचे शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या तंजावर मधून एकाने मला पत्र पाठवून आपली ही वरील व्यथा माझ्या कडे मांडली होती,आणि तो मला त्यावर सल्ला मागत होता.
त्याच्या या प्रश्नाचे उत्तर देण्याअगोदर आपण गौतम बुद्धांच्या आयुष्यातील एक प्रसंग पाहू.
एकदा एक तरुण बुद्धांच्या कडे आला पण त्याला आपण आत्मसाक्षात्कारी महापुरुषाला भेटत आहोत हे माहित नव्हते.त्यामुळे त्याने जेव्हा बुद्धांचे तेजस्वी, प्रसन्न व्यक्तीमत्व बघितले तेव्हा तो अतिशय भारावून गेला व त्याने बुद्धांना पहिला प्रश्न विचारला कि,
तुम्ही परमेश्वराचे अवतार आहात काय ?
नाही..
आपण स्वर्गातून अवतरले आहात काय ?
नाही
मग आपण ह्या पृथ्वी वरीलच अवतारी पुरुष आहात काय ?
नाही ..
तरुणाच्या सर्व प्रश्नांची उत्तरे बुद्धां कडून नाही म्हणून आल्यावर मात्र त्याचा तोल काहीसा ढळला आणि त्याने बुद्धांना विचारले कि,
मग आपण कोण आहात ?
यावर मंद स्मित करत बुद्ध त्याला म्हणाले
खरेतर या प्रश्नाने तू संभाषणास सुरुवात करणे अपेक्षित होते ... पण असो..
मी एक स्वच्छ आरसा आहे .माझ्या समोर जे आहे त्याचे फक्त प्रतिबिंब मी समोरच्याला दाखवतो..समोरचे दृश्य जरी दूषित असेल तरी त्याने आरशावर काही परिणाम होत नाही ..तो दूषित होत नाही . आरसा फक्त जे समोर आहे तेच दाखवतो.
If our consciousness can be like a mirror, then the life will have a different flavour. This is a famous saying of Buddha." (तुमचे आचार,विचार,व्यवहार,नियत जर स्वच्छ असेल तर ते तुमच्या आयष्याला एक सुंदर अर्थ प्राप्त करून देतात..) या वाक्याला खूप गूढ अर्थ आहे..
एखाद्याने तुमची स्तुती केली,तुम्हाला हुशार संबोधले तुमचे कौतुक केले किंवा तुमची तुलना थेट चाणक्या बरोबर केली किंवा तुम्हांला नवे ठेवली,तुमची निंदा नालस्ती केली आणि जर बुद्ध म्हणाले त्या प्रमाणे तुमचे मन आरशा सारखे स्वच्छ असेल तर समोरच्याला ते जो बोलत आहे फक्त ते त्याला प्रतिबिंबित होईल.
आता त्या तंजावरच्या तरुणाच्या प्रशांकडे वळू .त्याच्या अडचणीवर त्याने काय करावे किंवा न करावे हे मी त्याला आत्ता थेट सांगणार नाहीये तर त्यासाठी मदन मोहन मालवीय यांच्या आयुष्यातील एका प्रसंगाची त्याला आठवण करून देणार आहे..
बनारस विश्व हिंदू युनिव्हर्सिटीच्या उभारणी साठी मदन मोहन मालवीय यांनी अथक आणि पराकोटीचे प्रयत्न केले त्यात कुठेही कसूर ठेवली नाही. त्यासाठी ते हैद्राबादच्या प्रचंड श्रीमंत निजामाकडे युनिव्हर्सिटीला पैशाच्या रूपात मदत मागण्यासाठी गेले.निजामास भयंकर राग आला. एका हिंदू विश्व विद्यालयासाठी हा माणूस माझ्या सारख्या सच्च्या मुसलमाना समोर हा हे धाडस करूच कसा शकतो असा विचार करत निजामाने त्यांना हाकलून देण्याचा खूप प्रयत्न केला पण ,काहीतरी मदत घेतल्याशिवाय मालवीय तेथून जायला तयार होईनात.. शेवटी निजाम संतापला व त्याने त्याच्या एका पायातील रत्नजडित जोडा मदन मोहन मालवीय यांना रागाने फेकून मारला.
मालवीयांनी शांतपणे तो निजामाचा मौल्यवान जोडा उचलला व ते बाहेर पडले ते थेट हैद्राबादच्या बाजारपेठेत जाऊन उभे राहिले. तेथे त्यांनी त्या निजामाच्या मौल्यवान जोडायचा लिलाव मांडला.. खुद्द निजामाचा मौल्यवान जोडा म्हणल्यावर हा-हा म्हणता बाजारपेठेत गर्दी झाली व बघता बघता बोली चढत गेली.. कुठूनशी ती गोष्ट निजामाच्या कानावर गेली.
आता निजाम बेचैन झाला. त्याच्या जिवंतपणी त्याच्या वापरत्या वस्तूचा लिलाव खुद्द त्याच्या हैद्राबाद मध्ये होतोय व ते घ्यायला लोक भलीमोठी बोली लावत आहेत म्हणल्यावर,निजामाने त्याच्या दरबारातील एक विश्वासू सेवकांस त्वरित घटनास्थळी पाठविले व भल्यामोठ्या चढ्या रकमेला तो स्वतःचाच जोडा पुन्हा ताब्यात घेतला.मदन मोहन मालवीय यांनी अशाप्रकारे प्रतिकूल परिस्थिती अनुकूल करवून घेतली.
सध्याच्या नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकार बाबत सुद्धा जनतेचे तेच झालेय.. काही जण निजामाच्या भूमिकेत आहेत ज्यांना मोदींची प्रत्येक कृती १००% फक्त आणि फक्त चुकीचीच वाटते जे त्यांना वारेमाप नावे ठेवतात तर काही जण मदनमोहन मालवीयांच्या भूमिकेत आहेत...जे मोदींच्या प्रत्येक कृतीचा अर्थ काढत निराश न होता त्यातून संधी शोधत त्यांचे गुणगान व स्तुती करतात.
तात्पर्य काय तर पुरेसा अभ्यास किंवा माहिती न घेता पूर्वग्रहदूषित नजरेने किंवा बुद्धीने एखाद्या गोष्टी,घटनेकडे,व्यक्तीकडे न पहाता तुमचे मत बनविताना प्रथम तुम्ही आरशासारखे स्वच्छ आहात कां याचा प्रथम विचार करा कारण आरसा कधी खोटे प्रतिबिंब दाखवत नाही.तुम्ही जसे आहात तेच तुम्हांला आरशात दिसते.
संदर्भ : वरील स्वैरानुवादा साठी स्वामी सुखबोधानंद यांच्या Oh ,Life relax please ! चा आधार घेतला आहे.धन्यवाद स्वामीजी !