भोज्जा

शुक्रवार, ६ एप्रिल, २०१८

सरदारजीं वर विनोद करण्या आधी हे वाचा .....


जालंधर रेल्वे स्टेशनवर मी उभा असतांना एक लांब दाढी वाढवलेला ,शर्टावर समोरच्याला पटकन नजरेत भरेल अशा पद्धतीने  कृपाण खोवलेला आणि डोक्यावर काळा टर्बन बांधलेल्या एका तरुण सरदारजीने माझे लक्ष वेधून घेतले.खरं तर हे म्हणायचं कारण काहीच नाही पण त्याच्या उग्र व्यक्तिमत्वामुळे  आणि त्याच्या त्या पेहराव मुळे दिसायला तो जणू एखादा अतिरेकीच  असावा असे विनाकारण मला त्या वेळी वाटले.

 माझी ट्रेन यायलापण  अजून अवकाश होता.अशावेळी वेळ कसा काढायचा हा मला प्रश्न असतांना नेमके  समोर असे व्यक्तिमत्व नजरेत आल्याने ,आता  मी विनाकारणच त्याची प्रत्येक कृती त्याच्या नकळत न्याहाळत वेळ घालवू लागलो.तेवढ्यात प्लॅटफॉर्मवर  एक पॅसेंजर ट्रेन आली.ट्रेन खचाखच भरली होती,पण तरीही ती प्लॅटफॉर्मवर  लागल्यालागल्या एकच झुंबड उडाली.तो तरुण सरदारजी सुद्धा  त्या ट्रेनमध्ये घुसायचा नेटाने प्रयत्न करायला लागला,पण ट्रेन लगेचच सुटल्याने तो प्रयत्न निष्फळ ठरला व तो गाडी पासून थोडासा हताश पणे दूर झाला.

त्या तरुण सरदारजीची ती धडपड ,मागच्या डब्यातील दारात उभा राहिलेला एक तरुण  माझ्याप्रमाणेच प्रवासातील करमणूक म्हणून बघत होता. तेवढ्यात  आता ट्रेन सुटल्याने ,त्या तरुण सरदारजी पासून कोणताही “धोका” होणार नाही याची खात्री पटल्याने त्याने त्याचा डबा सरदारजी पाशी येताच सरदारजीला जाता-जाता थोड  खिजवायच्या  उद्देशाने ,त्याच्या कडे हसत-हसत बघत “सरदारजी बारा बज गये “ असे म्हणत हात हलवला.

त्या तरुण सरदारजीने ते ऐकलेन खरे पण त्यावर काही बोलायच्या ऐवजी  त्याच्या उत्तरादाखल त्याच्या कडे बघत काहीसे गूढ हास्य केले.

मात्र त्याचे ते गूढ हास्य त्या क्षणी मला विनाकारणच बेचैन करून गेले.गर्दी थोडी पांगल्यावर मी पुढाकार घेत त्या सरदारजी पाशी जाऊन त्याला त्याच्या त्या हसण्या मागे काय कारण आहे हे विचारायचे ठरवले.

मी सरदारजी  पाशी जात त्याला त्याचे कारण विचारले पण ,त्याने मला  जे उत्तर दिले त्याने मात्र मी साफ भुईसपाट झालो.

सरदारजी म्हणाला कि,तुम्ही समजता तसं तो माझी खिल्ली उडवत नव्हता तर तो माझ्या कडे मदत मागत होता,असा त्याचा अर्थ आहे ...अर्थात त्या मागे फार मोठा इतिहास आहे आणि तो प्रत्येकाला माहित असतोच असे नाही.... त्या नंतर तो पुढे सांगू लागला कि,.....

आज २१वे शतक सुरु आहे पण १७व्या शतकात हिंदुस्थानवर मुघल राज्य करत असतांना ते येथील हिंदूंवर अनन्वित अत्याचार करत त्यांना पशूची वागणूक देत असत.ते त्यांच्या स्त्रियां स्वतःची मालमत्ता समजत आणि हिंदूंना त्यांचा धर्म बदलावयास भाग पाडून इस्लाम धर्म  स्वीकारायची जबरदस्ती करत असत.जे ते करावयास नकार देत असत त्यांना ते जीवे मारत असत.

वर्षानुवर्षे देशात अशी परिस्थिती असतांना व या विरुद्ध कुणीच मदतीला येत नसल्याने काही काश्मिरी हिंदू ब्राह्मण पंडित शिखांचे नववे धर्मगुरू श्री गुरु तेगबहादूरजी यांना भेटले व त्यांनी त्यांच्या कडे स्वतःच्या व इतर हिंदू कुटुंबियांच्या संरक्षणाची व या मुघल आक्रमणाचा बंदोबस्त करावयची विनंती केली.श्रीगुरु तेग बहादूरजी यांनी ती मान्य केली.      

श्री गुरु तेग बहादूरजी त्या हिंदू काश्मिरी पंडितांच्या वतीने तत्कालीन मुघल सम्राटास त्या वेळी भेटले व त्यास त्यांनी विनंती केली कि, तुम्ही हिंदूंवर व त्यांच्या स्त्रियांवर हे अत्याचार थांबवा ,त्या ऐवजी (तुमच्यात धमक असेल तर ) मला आणि माझ्या अनुयायांना ईस्लाम धर्म स्वीकारायला राजी करून दाखवा किंवा भाग पाडून  दाखवा आणि हे काम जर तुम्हांला जमले तर मी स्वतः माझ्या सर्व अनुयायांना व सर्व हिंदूंना तुमचा धर्म स्वीकारायला सांगेन आणि  ते तो प्रस्ताव मान्य करतील  असा शब्द देतो.मात्र ते जर तुम्हांला जमले नाही तर तुम्ही हिंदूंवर व हिंदूंच्या स्त्रियांवर अत्याचार करणे कायमचे सोडून द्या.

तत्कालीन मुघल सम्राटाने श्री गुरु तेग बहादूरजी यांचा हा प्रस्ताव मान्य केला.पण त्या नंतर लाख प्रयत्न करून देखील तो श्री गुरु तेग बहादूरजी व त्यांच्या अनुयायांना ईस्लाम धर्म स्वीकारायला राजी करू शकला नाही.सरतेशेवटी त्याने त्यांचा व त्यांच्या अनुयायांचा अत्याचार करत छळ मांडला व त्यातच दिल्लीच्या चांदणी चौकात श्री गुरु तेग बहादूरजी व त्यांच्या अनुयायांचा शेवट झाला.

श्री गुरु तेग बहादूरजी यांनी ,स्वधर्माचा काही एक संबंध नसतांना ,केवळ दिलेला शब्द पाळत दुसऱ्या म्हणजेच हिंदू धर्माच्या रक्षणा साठी स्वतःचा देह ठेवला ... आणि “हिंद की चद्दर “ अशी स्वतःची  संपूर्ण जगाला ओळख करून दिली.. पण त्यावेळी ज्यांच्या साठी श्री गुरु तेग बहादूरजी यांनी त्यांचे सर्वस्व दिले त्या पैकी मात्र  कोणीही केवळ स्वतःच्या जीवाच्या भीतीने श्री गुरु तेगबहादूर जी यांचे पार्थिव उचलण्या साठी त्या वेळी  पुढे झाले नाही हा इतिहास आहे.

श्री गुरु तेग बहादूरजी यांच्या नंतर त्यांचे पुत्र श्री गुरु गोविंद सिंग जी  शिखांचे दहावे गुरु,यांनी एकूण परिस्थिती लक्षात घेता “खालसा” ची स्थापना करत ,संपूर्ण शीख धर्मियांना,मानवतेचे धडे देत संपूर्ण जगात स्वतःची ,स्वतंत्र ,वेगळी आणि अशी ओळख निर्माण करून द्यायचा चंग बांधला.ज्या योगे अगदी दहा हजार लोकांत सुद्धा शीख धर्मीय ठळकपणे  ओळखला जाऊ लागला.


सुरवातीला शीख धर्मीय इतर समाजापासून वेगळी अशी त्यांची स्वतंत्र ओळख नसल्याने पटकन ओळखता येत नसत,तसेच त्यांची संख्या ही कमी होती , पण श्री गुरु गोविंद सिंग जींच्या  मुळे आता ते सोपे झाले.त्यांच्यातील एकजूट जास्त वाढीला लागली.अशातच  १७३९ साली मुघल घुसखोर,लूटखोर  नादिर शाह  हिंदूंची लूट करत त्यांच्या २२०० बायका रातोरात पळवून नेत आहे  ...ही  बातमी वाऱ्याच्या वेगाने पसरत त्या वेळच्या शीख आर्मीचे  प्रमुख कमांडर जस्सा सिंगजी यांच्या कानावर गेली.त्यांनी लगोलग नादिर शाहच्या त्या खलिफा वर रातोरात हल्ला चढवला व ते पळवून नेत असलेली हिंदूंची लूट आणि त्यांच्या २२०० बायका,स्त्रिया यांची सुटका करत,त्यांना सन्मानाने त्यांच्या-त्यांच्या घरी पोहोचविले.

हा प्रकार त्याकाळी फक्त एवढ्यावरच थांबला नाही .त्या नंतरच्या काळात अब्दाली किंवा इराणी घुसखोर जेव्हा-जेव्हा या प्रकारे हिंदुस्थानची लूट करून पळून जाऊन हिंदू स्त्रियांना अब्दालच्या बाजारात नेऊन विकण्या साठी नेण्याचा प्रयत्न करायचे तेव्हा-तेव्हा त्या-त्या वेळचे कडवे शीख लढवय्ये त्यांना रात्रीच्या बाराच्या त्या युद्धात पराभूत करून हिंदूंची आणि त्यांच्या बायकांची मुघलांच्या तावडीतून सुटका करायचे. 


खरे तर त्या वेळी शीख लढवय्ये सैनिक संख्येने त्या तुलनेत खूप कमी असत पण ते ज्या त्वेषाने आणि एकजुटीने मुघालांवर रात्री बाराच्या सुमारास हल्ला चढवत असतं ते लक्षणीय होते.

हा प्रकार त्या काळी त्या नंतर इतक्या वेळा वारंवार घडू लागला कि,रात्रीचे बारा वाजले कि सरदारजींच्या मदतीची आस असणारे निश्चिंत होत आणि त्यांची भीती असणारे हादरून जात जीव मुठीत धरून बसायला लागले.त्या मुळे त्यांच्या शत्रूंनी आणि स्वतःला अति हुशार समजणाऱ्या काही मंडळींनी  त्या नंतर असा अपप्रचार सुरु केला कि, रात्री बारा नंतर सरदारजी  बेफाम,बेलगाम होतात,त्यांचा काही भरवसा देता येत नाही ,ते कोणत्याही थराला जाऊ शकतात.पण “सरदारजी बारा बज गये “ मागचे खरे कारण वरील प्रमाणे आहे....

त्या मुळेच मघाशी त्या रेल्वेतल्या तरुणाने जेव्हां मला , “सरदारजी,बारा बज गये” असा आवाज दिला तेव्हा त्याची बहिण,पत्नी,किंवा आई संकटात आहे आणि तिला मदत करण्यासाठी तो माझ्यापाशी याचना करतोय असाच  मी त्या ‘सरदारजी,बारा बज गये “ चा अर्थ घेतला आणि मला , मी सरदारजी असल्याचा अभिमान वाटला म्हणून माझ्या तोंडावर ते हसू आले.

“सरदारजी,बारा बज गये” चा हा एवढा प्रदीर्घ इतिहास मला तेव्हा पूर्णपणे नवीन होता आणि जेव्हा तो मी या तरुणाच्या तोंडून ऐकला त्या क्षणी माझ्या मनात सरदारजींच्या प्रती एक वेगळा स्नेह आणि आदर वाढीस लागला.

त्या मुळे या देशातील प्रत्येक नागरिकाने या पुढे सरदारजींच्या वर जोक करण्या आधी याचा विचार प्रथम केला पाहिजे कि,या देशात एक सच्चा सरदारजी जन्माला येण्यासाठी शीख समाजाने अगोदर काय-काय खस्ता खाल्लेल्या आहेत.

त्या मुळे त्या प्रत्येक शहीद सरदारजी साठी, हा लेख तुम्हांला किमान एकाला तरी फॉरवर्ड करावासा वाटला तरी त्या प्रत्येक शहीद सरदारजीला ही आदरांजली असेल....धन्यवाद.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा