भोज्जा

शनिवार, ६ ऑगस्ट, २०११

ग्लास खाली ठेवायला शिका..!

त्या दिवशी प्राध्यापकांनी अगदी वर्गात शिरताच,  एका काचेच्या ग्लास मध्ये थोडेसे पाणी घेत तो हातात लांब धरतच त्या दिवशीच्या वर्गाला सुरुवात केली.
"ह्या ग्लासचे वजन किती असेल असे तुम्हाला वाटते ?"
खरे तर प्राध्यापकांच्या ह्या अनपेक्षित प्रश्नामुळे, सुरुवातीला सगळेच  विद्यार्थी बुचकळ्यात पडले खरे, पण नंतर अंमळ थोडेसे भानावर येत,
'५० ग्रॅम' !......१०० ग्रॅम !......सव्वाशे ग्रॅम ! अशी काहीशी उत्तरे त्यांच्या कडून आली.

ह्यावर प्राध्यापक महाशयांनी,
" खरे तर ! मलाही आत्ता, ह्याचे नक्की किती वजन आहे हे माहिती नाहीये,  पण,आता मला सांगा कि,जर मी हा ग्लास असाच अजून काही मिनिटे हातात धरून ठेवला तर काय  होईल ?" हा पुढचा प्रश्न विचारला.
"काहीही नाही ! काही होणार नाही "
विद्यार्थ्यांनी एकमुखाने सांगितले.
"ठीक आहे!......आता मला सांगा कि मी हा ग्लास... असाच... ह्या पद्धतीने समजा एक तास भर जर हातात धरून ठेवला तर काय होईल?"

"तुमचा हात दुखायला लागेल!"
एक विद्यार्थी उत्तरला. 
"अगदी बरोबर ! आणि समजा मी हा ग्लास जर असाच, जर दिवसभर धरून ठेवला तर काय होईल?"
"तर...तर तुमचा हात, जणू थिजून जाईल,नि हाताच्या स्नायूंवर प्रचंड ताण येऊन ,न जाणो तुम्हाला अर्धांगवायूचा झटका सुद्धा येऊ शकेल...एवेढेच   काय तर कदाचित हॉस्पिटल मध्ये सुद्धा दाखल करावे लागेल ... हे नक्की. "
एका विद्यार्थ्याच्या ह्या धाडसी उत्तरावर सर्व वर्ग खळखळून हसला खरा पण प्राध्यापक महाशयांनी ,त्या कडे दुर्लक्ष करत,
"पण " मी " ह्या सगळ्या गोष्टी करत असतांना त्या ग्लासच्या वजना मध्ये काही फरक पडला का ?" हा  पुढील प्रश्न विद्यार्थ्यांना विचारला.
विद्यार्थ्यान कडून अर्थातच "नाही" हे स्वाभाविक उत्तर आले.
"पण ! तो ग्लास ह्या पद्धतीने मी हातात धरून ठेवल्याने माझा हात,खांदा दुखावला गेला त्याचे काय ? "
प्राध्यापकांच्या ह्या प्रश्नावर  सर्व विद्यार्थी बुचकळ्यात पडले.
"मग... ह्यातून वेदनामुक्ती साठी  मी काय केले पाहिजे असे तुम्हाला वाटते ?
"तो ग्लास प्रथम खाली ठेवा!" एक  चुणचुणीत विद्यार्थी उत्तरला.

"बरोब्बर "  
प्राध्यापक महोदय उत्तरले....

मित्रांनो,
आपल्या दैनंदिन जीवनातील प्रॉब्लेम्स सुद्धा काहीशे असेच असतात.
ते  थोडाच  वेळ डोक्यात ठेवले तर ठीक,पण त्यावर जर उगाच अनावश्यक विचार मनात घोळत ठेवायला लागलो,तर त्याचा ताप व्हायला सुरुवात होते ...अन ह्या उपर  जर त्याच्या अनावश्यक नि कपोलकल्पित खोलात आपण जर जायला लागलो तर ते एक गंभीर दुखणे होऊन बसते नि आपण आपली निर्णयक्षमता गमावून बसतो.
आयुष्यात आव्हाने आणि अडचणींवर विचारमंथन हे स्वाभाविक नि योग्यच आहे,पण त्या ही पेक्षा रोज रात्री झोपतांना त्या विचारांचे ओझे रोजच्या रोज  डोक्यावरून उतरवून ठेवणे हे जास्त महत्वाचे असते आणि त्या मुळे होते काय कि,आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर ताजेतवाने,फ्रेश वाटून,त्या दिवशी आपल्या पुढ्यात येणाऱ्या प्रत्येक आव्हानास,अडचणीस आपण समर्थपणे तोंड देण्यास सज्ज राहू शकतो.

तेव्हा .. आजपासून  जेव्हा तुम्ही ऑफिस मधून घरी जायला निघाल तेव्हा,
"ग्लास खाली ठेवायचा" हे आवर्जून लक्षात ठेवा.
 
सदरहू  पोस्ट सौ.सुजाता ह्यांच्या सौजन्याने.धन्यवाद सुजाता     



1 टिप्पणी:

  1. माझे हे पोस्ट,माझ्या काही मित्रांना कदाचित विशेष वाटेल पण त्यांना आश्चर्य मात्र नक्कीच वाटणार नाही.कारण, खरे तर,आत्ता माझी आई हॉस्पिटल मध्ये दाखल आहे नि तिच्या ह्या अखेरच्या आजारातून ती पुन्हा आमच्या घरी परत येण्याच्या सगळ्या अशा तशा मावळल्या आहेत. ७९-८० हे वय तसे म्हटले तर खूपच जास्त नि वार्धक्य हे एका मर्यादेच्या पर्यंत जाऊन ठेपल्यावर ,स्वाभाविकपणे,औषधोपचार करून सुद्धा प्रकृती मध्ये लक्षणीय सुधारणा होण्यावर खूपच मर्यादा येतात.
    तसे पहिले तर आयुष्यात पूर्ण समाधानी असे कोणीच नसते पण तरी हि,सदैव समोरच्या कडून अतिशय माफक अपेक्षां बाळगल्याने एक समाधानी सौभाग्य जीवन तिच्या वाट्याला आले यात शंका नाही.आजच्या काळात मुलामुलींची लग्ने नि संसार ,योग्य त्या वयात करून देऊन/होऊन नातसूनमुख आणि ३ वर्षाचा पणतू बघण्याचे सौभाग्य तिच्या वाट्याला आले. त्यांना सुद्धा तिला दोन्ही हातांनी भरभरून देता आले ह्या पेक्षा अजून मोठे भाग्य ते कोणते ? एवढेच काय पण स्वतःच्या आणि काही अंशी नवऱ्याच्या वार्धक्याची सुद्धा तिची तिने पूर्ण सोय करून ठेवली ..नव्हे ती झाली हे विशेष.थोडक्यात काय अगदी रक्ताच्या हाडामासाच्या मुलांना/मुलींना सुद्धा एक नया पैशाची तोशीस तिने तिच्या ह्या अगदी अखेरच्या दिवसात सुद्धा लागून दिली नाहीये ..उलट त्यांचे जीवन केवळ तिच्या मुळेच अजून समृद्ध झाले/होत आहे/होत राहील हे विशेष.
    वयाच्या ५०-५५ व्या वर्षीच संसारातून जवळपास निवृत्ती घेतल्याने,खरे तर तिच्या सुना म्हणजेच आमच्या बायका,ह्या सुरुवातीच्या काळात नाराज होत्या /झाल्या पण ,लेकीच्या,मुलांच्या संसारात तिने कधीच ढवळाढवळ केली नाही हे तिच्या सुनां आज त्या स्वतः आज्या झाल्यावर त्यांच्या लक्षात येतेय.
    थोडक्यात काय "ग्लास खाली ठेवायला शिकायचं बाळकडू मला तिच्या कडून आणि माझ्या वडिलांकडून उपजत मिळाल्याने ह्या प्रसंगी माझे हे पोस्ट एक विशेष पोस्ट म्हणून आयुष्यभर माझ्या स्मरणात राहील ह्यात शंका नाही.कारण तिच्या प्रकृती बाबत वास्तवता समजल्या नंतर सुद्धा माझ्या वडिलांनी त्यांच्या वयाच्या ८४ व्या वर्षी सुद्धा वास्तवतेला सहज,.. स्वाभाविकपणे आणि धाडसाने सामोरे जाण्याचे जे धैर्य दाखविले आहे त्याला सलाम.
    त्या दोघांना माझा साष्टांग नमस्कार.

    ह्या नंतर मला काही दिवस आपली ब्लॉग द्वारे भेट घेता येणार नाही,तथापि आपल्या सर्वांच्या शुभेच्छांचे गाठोडे मी येथून जाताना सोबत नेत आहे.धन्यवाद.

    उत्तर द्याहटवा