भोज्जा

मंगळवार, २७ फेब्रुवारी, २०१८

सदमा ...अर्थातच श्रीदेवी

 १९८३ मध्ये पुण्यातल्या नीलायम मधून सेकंड शो टाकून बाहेर पडतांना तिच्यासाठी कित्येक पुरुषांनी डोळ्याच्या कडा रुमालाने पुसलेल्या मी बघितल्या होत्या नि निमित्त होते तिचा आणि कमल हसनचा “सदमा “ हा सिनेमा.होय,मी श्रीदेवी बद्दलच बोलतोय. जी काल-परवा सगळ्यांना सोडून गेली.

मुळात श्रीदेवी काय ? हेमामालिनी काय किंवा जयाप्रदा काय ? या सगळ्या दाक्षिणात्य नट्या सिनेमात आल्या त्या त्यांना पहिल्या पासून सिनेमा सृष्टीचे वेड होते ,आवड होती किंवा त्यांनी ते क्षेत्र करियर म्हणून निवडायचं असं अगदी फार पूर्वी लहानवयात किंवा कळत्या वयात ठरवलं होत म्हणून किंवा अजून काही म्हणून असं मुळीच नाही.तर केवळ पालकांची त्यातल्यात्यात आईची इच्छा म्हणून या मुली सिनेमा सृष्टीत ढकलल्या गेल्या असं म्हणलं तर ते योग्य ठरेल.

या तिघीतली श्रीदेवी तर अवघ्या चार वर्षांची असतांना इथे शब्दशः लोटली गेली.लोटली गेली या साठी म्हणलं कि,मध्यंतरी तिचा एक किस्सा सांगितला गेला कि ती चार वर्षांनी असतांना  एका तमिळ सिनेमात ती पहिलीतल्या मुलीची भूमिका  करत होती. करत कसली ? जगत होती ... कारण चित्रपटाची गरज म्हणून तिच्यावर एक प्रसंग शूट होत होता ज्यात तिने शाळा सुटल्यावर रस्त्याच्या पलीकडून धावत येत आईला बिलगायचा असा प्रसंग होता.कॅमेरा रस्त्याच्या पलीकडे लावला होता व दिग्दर्शकाने फक्त हातातला रुमाल हलवला कि ,श्रीदेवीने रस्त्यातील वाहने न पहाता फक्त सुसाट वेगाने पळत येत कॅमेर्याच्या बाजूला असलेल्या तिच्या सिनेमातल्या आईला मिठी मारायची बस...  

अवघे ४ वर्षांचे बालसुलभ वय ...तिकडे रुमाल फडकवला जाताच मागचा पुढचा विचार न करता डायरेक्टर वर पूर्ण विश्वास ठेवून श्रीदेवी खरोखरच भन्नाट वेगाने धावत सुटली नि जे व्हायला नको तेच झाले ... पलीकडे पोहोचता-पोहोचता एका वाहनाने तिला उडवली व ती रस्त्यात पडली.दिग्दर्शक , निर्मात्याच्या काळजाचातर पार ठोका चुकला......नंतर तिला दवखान्यात नेऊन उपचार झाले हा भाग वेगळा पण प्रसंग बाका होता ... हा प्रसंग आज सांगायचे कारण म्हणजे भूमिका जगणे हे तिच्या रक्तातच होते , जे तिने निष्ठेने आयुष्यभर केले.

मुळात पैसा,प्रसिद्धी याचा हव्यास नसल्याने तिला इथे काहीच गमवायचे नव्हते.तिला जे काही मिळाले हा तिच्यासाठी म्हटलं तर एक बोनसच होता.कारण एका सर्वसाधारण मध्यमवर्गीय कुटुंबातील हि मुलगी चार-चौघींच्या सारखी लग्न-मूल या विचारसरणीच्या मुशीतच  बसणारी होती.पण आयुष्याला वेळोवेळी मिळत गेलेल्या केवळ अनपेक्षित कलाटण्या तिला इथवर म्हणजेच बोनी कपूर पर्यंत घेऊन आल्या .. अन्यथा १९८५ ला मिथुन चक्रवर्ती सोबतचा हिचा पहिला विवाह जर यशस्वी होत होता तर तिचे आजचे चित्र बरेचसे वेगळे दिसले असते.१९८८ ला मिथुनने योगीता बालीला घटस्फोट द्यायचे नाकारल्याने केवळ तिला त्याच्या  पासून काडीमोड घ्यावा लागला होता.अन्यथा ती स्टिकप् होती....त्या नंतर निर्माण झालेली पोकळी बोनी कपूरच्या रूपाने तिने भरून काढली हा भाग वेगळा,  पण याच बोनीला ती ऐके काळी मिथुनच्या सांगण्यावरून राखी बांधायची हा सुद्धा तिच्या आयुष्यातला एक विनोदच होता.

करीयरच्या सुरवातीलाच अति सर्वसाधारण रूप असल्याची खंत तिने प्रथम नाकावरील प्लास्टिक सर्जरी करत लोकांच्या सांगण्यावरून मिटवायचा प्रयत्न केला ,पण तिच्या हे कधीच लक्षात आले नाही कि त्या सर्जरीच्या अगोदरच ती जशी आहे तशी प्रेक्षकांनी तिला स्वीकारली होती, बाह्य रुपाची नि दिखाऊ सौंदर्याची तिला कोणतीच गरज कधीच नव्हती. पण केवळ  काळाबरोबर रहावायाच्या बेगडी नादाच्या अट्टाहासाने तिने स्वतःची माती करून घेतली. त्यामुळे सिनेसृष्टीतल्या सगळ्यांना श्रीदेवीच्या जाण्याने  एक चांगला धडा मिळाला कि Act Your Age हा निसर्गाचा नियम जर तुम्ही पाळला तर वाढते वय आणि वार्धक्य सुकर होते. अन्यथा त्याचा शेवट ,न जाणो खेदकारक होऊ शकतो.मायकेल जॅक्सन हा तिच्या आधीच्या पिढीचा बळी होता.हे वेगळे सांगणे नको....असो ...

श्रीदेवीच्या स्मृतीप्रित्यर्थ आजचे दोन व्हिडीओ बालू महेंद्रूच्या १९८२ च्या “मुन्द्रम पिराई “  या गाजलेल्या तमिळ सिनेमातील आहे ज्याचा १९८३ ला हिंदीत “ सदमा “ या नावाने रिमेक केला गेला होता. हा बालू महेंद्रू म्हणजे तोच श्रीलंकन तमिळ  ,ज्याने पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूट मधली फोटोग्राफीची खोटी डिग्री दाखवून हिंदी सिनेमात स्वतंत्र फोटोग्राफर म्हणून प्रथम कारकीर्द सुरु केली होती व पुढे ती बाब लक्षात आली होती.पण ही गोष्ट लक्षात आली तो वर बालू चित्रपट सृष्टीत इतका मोठा नि यशस्वी झाला होता कि ती वास्तवता नजरेआड केली गेली नि  आज तर ती गोष्ट कुणाच्या लक्षात पण नाही.पण एके काळी दै.सकाळने त्याची नोंद घेतली होती हे तितकेच खरे....याच बालूने पुढे जाऊन राष्ट्रीय एकात्मतेवर २०१३ साली एक सुंदर फिल्म बनवली.त्याला केंद्र सरकारचे  पारितोषिक देखील मिळाले होते . २०१७ साली तर त्याला तामिळनाडू सरकारचे मरणोत्तर “लाईफ स्टाईल अचिव्हमेंट “ अॅवॉर्ड दिले गेले ... असो... 

आजचे  दोन्ही व्हिडीओ त्याच बालू महेन्द्राच्या गाजलेल्या सिनेमात  कमल हसनच्या अभिनयासाठी पाहिले जातात पण तरीही ते श्रीदेवी साठी म्हणून आज टाकायचे कारण म्हणजे काळानुरूप श्रीदेवी किती प्रगल्भ अभिनेत्री होत गेली ते बारकाईने बघीतले तर त्यात लक्षात येते कारण दोन्ही प्रसंग एक सारखेच आहेत. जे शेवटच्या ५ मिनिटांत या चित्रपटाला संपूर्ण कलाटणी देतात.ज्या प्रसंगात  ”चित्रपटाच्या कथेनुसार , सीन मध्ये नायका प्रती  चेहऱ्यावर संपूर्ण अनोळखी भाव प्रदर्शन करणे “ हा इतका साधा प्रसंग श्रीदेवीला अॅक्ट करायचा होता आणि तो सुद्धा श्रीदेवीने इतक्या सहजसुंदरतेने  त्यात सादर केला आहे कि प्रत्यक्ष सिनेमा बघतांना सुद्धा प्रेक्षकांना या सीनमध्ये एकाच वेळी ,श्रीदेवीचा राग,नायक कमल हसनची अगतिकता त्याच्या प्रती कणव आणि सत्य परिस्थिती समजल्याने वास्तवतेचे भान हे  सगळे एकाच वेळी अनुभवायला मिळते.....विशेष सांगायचे म्हणजे  या सिनेमात तिने नाकावर प्लास्टिक सर्जरी केली नव्हती पण तरीही ती अतिशय मोहक दिसली होती हे विशेष...असो...

मुन्द्रम पिराई च्या पहिल्या व्हिडीओ साठी सहकार्य जी श्रींनी यांचे घेतले आहे.या व्हिडीओचे वैशिष्ट्य म्हणजे हा सीन प्रत्यक्ष सिनेमातीलच आहे पण हा व्हिडीओ सदरहू सिनेमाचे प्रख्यात संगीतकार इलाई राजा यांनी फार वर्षां नंतर मुद्दामून विदाऊट म्युझिक यु ट्यूब वर टाकला व ज्यांना कोणाला याला मूळ सिनेमातील या प्रसंगाला त्यांनी जे पार्श्वसंगीत दिले होते त्या  पेक्षा वेगळे पार्श्वसंगीत देऊन तो अधिक प्रभावी करायचा असेल त्यांनी तो करण्याची हौशी तंत्रज्ञांना परवानगी व संधी दिली. जी.श्रींनी हे त्या पैकीच एक हौशी तंत्रज्ञ ... मला त्यांचे पार्श्वसंगीत सगळ्यात भावले त्या मुळे हा व्हिडीओ मी त्यांच्या पार्श्वसंगीतासह टाकत आहे... तुम्हांला सुद्धा तो नक्की आवडेल अशी आशा आहे.प्रतिक्रियेच्या रुपात जर तुम्ही ती व्यक्त केली तर ती मी जी.श्रींनी यांच्या पर्यंत नक्की पोहोचवेन... बाय द वे  इलाई राजा यांना गुरुस्थानी मानणारे अजय-अतुल मराठीत हा प्रयोग कधी करतील याची मी वाट बघत आहे... असो... 

पेशन्स ठेऊन तुम्ही इतका मोठा लेख तुम्ही इथवर वाचलात धन्यवाद...
पहा तर मग ते दोन व्हिडीओ ...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा