भोज्जा

शुक्रवार, २३ फेब्रुवारी, २०१८

पाहताच ती बाला ,कलिजा खलास झाला

पाहताच ती बाला ,कलिजा खलास झाला
अशी ती मधुबाला ,... बाला कसली ? ज्वालाच म्हणायची खरं तर !!!!!
*मधुबाला* आणि *ज्वाला* अशी आठवण यायचं आज कारण म्हणजे आज २३ फेब्रुवारी हा तिचा  स्मरणदिन.आज पासून ४९ वर्षांपूर्वी ती आपल्यातून निघून गेली पण मागे तिच्या  सौंदर्याच्या आणि  अभिनयाच्या आठवणी ठेऊन.

तिची नृत्य-प्रवीण सहनायिका मिनू मुमताझ  मागे एकदा म्हणाली होती कि,मधुबाला दिसायला नुसती सुंदरच होती एवढेच खरे नाही, तर तिची स्फटिका समान तेजस्वी  कांती इतकी नितळ होती कि तिने पान जरी खाल्ले तरी ते तिच्या गळ्यातून खाली उतरताना  दिसायचे.यातला अतिशयोक्ती भाव सोडा पण तिने तिच्या सौंदर्याने तमाम प्रेक्षकांनाच नव्हे तर १९६० सालातल्या हिंदी सिनेमातील असंख्य मान्यवरांना सुद्धा तेव्हा वेडे केले होते यात शंका नाही .


मधुबाला ही हिंदी सिनेमासृष्टीतील अशी एकमेव अभिनेत्री होती कि जिला प्रेक्षकांनी कधी म्हातारी झालेली बघितली नाही.... तिची  समवयस्क “नर्गिस” पुढे रिटायर झाली वहिदा ,नूतन सारख्या  नायिका पुढे वयस्क भूमिकांच्या मध्ये दिसल्या पण मधुबालाचे रूप  मात्र तमाम दुनियेच्या नजरेत नेहमी  तरुण म्हणूनच  राहिले.  

भारतीय रसिकांचे दुर्दैव असे कि ,हिंदी सिनेमा रंगीत होऊनसुद्धा १९६० सालातील मुगले आझम मधील तिचे  “ प्यार किया तो डरना क्या “ हे एकमेव रंगीत  गाणे आणि ती गेल्यावर १९७० साली तिचा सोहराब मोदी,सुनील दत्त ,प्राण सोबत आलेला पूर्ण लांबीचा  “ज्वाला “ या फक्त एकमेव रंगीत हिंदी सिनेमात तिचे अलौकिक सोंदर्य सिनेरसिकांना बघायला मिळाले.”ज्वाला” ची  शोकांतिका सुद्धा अशी कि, ज्वाला १९५० सालापासून निर्मिती अवस्थेत होता नि १९५४  आणि विशेषत्वे १९६० नंतरच्या  मधुबालाच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे तर तो इतका रखडला कि, १९६० नंतर तर मधुबालाला त्या सिनेमाला फारशा तारखाच देता आल्या नाहीत.त्यातच १९६० नंतर तर तिने नवीन सिनेमांचे प्रस्ताव स्वीकारणे सुद्धा बंद केले होते त्या मुळे नाईलाजास्तव ज्वालाच्या  कथेत बदल होत त्यातील तिचा रोल निर्मात्याला अतिशय अनिच्छेने कमी करावा लागला. या सिनेमातील  शेवटच्या काही प्रसंगा मध्ये तर सिनेमा पूर्ण करतांना निर्मात्याला मधुबालाच्या डूप्लीकेटचा वापर करावा लागला. ढासळलेल्या  प्रकृती अस्वास्थ्याने मधुबालाने दिग्दर्शित करावयास घेतलेला “ फर्ज और इश्क “ हा सिनेमा सुद्धा त्यामुळे तेव्हा कायमचा अपूर्ण राहिला.तिचे दिग्दर्शनाचे स्वप्नसुद्धा त्या मुळे स्वप्नच राहिले.... तर अशा या ज्वाला मधुबालाला आजच्या दिवशी विनम्र श्रद्धांजली......    

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा