भोज्जा

गुरुवार, १ मार्च, २०१८

R.K .मधली एकेकाळची होळी

खरं तर राजकपूर गेला , नि हिंदी सिनेमातली होळीच संपली.हे आज आठवायचं कारण म्हणजे शबाना आझमीने यंदा श्रीदेवी गेल्यामुळे तिच्या घरी होळी साजरी करणार नाही म्हणून सांगितलं नि ते जुने दिवस आठवले.
च्यायला काय दिवस होते ते.......आर के मधल्या म्हणजे राजकपूरच्या  होळीचं आमंत्रण मिळाव म्हणून सिनेमा सृष्टीतली भलेभले तेव्हा तरसायचे इतके ते निमंत्रण मानाचे समजले जायचे .... आरके स्टुडीओतील तो रंगाने भरलेला हौद ,त्यातल्या नट नट्यांच्या लाजत-मुरडत नको-नको म्हणत मारलेल्या डुबक्या ,ते नंतरच भांगेच्या नावाखाली वाट्टेल ते पिणं आणि त्या नंतर खरं तर त्या होळी पार्टीत केलेला कल्ला यात जी मजा होती ती काही औरच होती.

मिडिया सुद्धा त्या काळी काही प्रथा पाळून असल्याने त्या आर.के.च्या होळीचं वृत्त नंतरच्या फिल्म फेयर ,स्टारडस्ट,स्टार अॅंड स्टाईल  मध्ये यायचं पण होळी नंतरच्या पहिल्या  अंकात बरंचस फिल्टर होऊनच .... त्या होळी पार्टीचं खरं वृत्त मग यायला लागायचं ते त्या नंतरच्या अंकात प्रसंगानुरूप त्याचा-किंवा तिचा किस्सा छापताना...कि,अमुक-अमुक नटाचा तेव्हां कसा तोल ढळला होता वगैरे,वगैरे.... 
त्या काळी आर के च्या होळीत खरा कल्ला करायच्या त्या बी ग्रेडच्या नट्या ज्या “सगळ्याचं लक्ष वेधून घेण्यासाठी “ नानविध क्लुप्त्या करायच्या ... उदाहरणार्थ मुद्दाम पांढरा स्वच्छ ,अंगा लगत शिवलेला ,पण बराचसा झिरझिरीत सलवार कमीज त्या  घालून यायच्या... ,भीड चेपावी म्हणून नंतर त्या थोडी जास्तीची टाकून  दंगा करायच्या  ,पार्टी रंगात आल्यावर रंगाच्या हौदात  मर्जीतल्या हिरोला,निर्मात्याला किंवा दिग्दर्शकाला ओढत नेऊन  डुबक्या मारणे, आघाडीच्या कलाकारां सोबत त्यांच्या बायकांसमोर त्या माहोलचा फायदा उठवत जरा जास्तीची लगट करणे,उघड उघड बिनधास्त फ्लर्ट करणे वगैरे,वगैरे.

.... या असल्या भानगडीत त्या काळी हिंदी सिनेमातल्या त्या काळातल्या व्हॅंपकॅंप मधल्या  आशा  सचदेव,आणि  गॅंग आघाडीवर असायच्या ... कारण त्यांना पक्क ठाऊक असायचं कि,या निमित्ताने आपल्याकडे बऱ्याच जणांचे हवे तेथे लक्ष जाते नि त्याचा पुढील रोल मिळायला आपल्याला सोयीचे होते.

राजकपूरला सुद्धा हे सगळं माहित असायचं त्या मुळे तो सुद्धा दरवर्षी हटकून त्या सगळ्यांना आवर्जून आमंत्रण द्यायचा.पण या दरम्यान हिरों सोबत होळी पार्टीला आलेल्या नटांच्या बायकांच्या पोटात गोळा उठायचा.त्या तिथून झटपट लौकरात लौकर बाहेर कसं पडता येईल याची गडबड करायच्या... घरी जाऊन नंतर नवरा-बायकोत भांडणं लागायची ती वेगळीच. 

आर.के.च्या या होळीचं वृत्त स्टार अॅंड स्टाईल मध्ये देवयानी चौबळ हि डॅशिंग महिला पत्रकार फार मस्त तिरकस पद्धतीनं बिनधास्त लिहायची.ही देवयानी चौबळ म्हणजे तीच,  जिचं राजेश खन्ना बरोबर त्याच्या लग्ना आधी नि नंतर सुद्धा अतिशय मस्त ब्रॅकेट होतं नि जिने धर्मेंद्र – हेमामालिनीचे  लग्ना अगोदरचे लफडे पहिल्यांदा बिनधास्त छापून धर्मेंद्रचा एका पार्टीत त्यानं टाकल्यावर  शब्दशः मार खाल्ला होता....तीच ही देवयानी चौबळ ... असो... 

नंतर तो राजकपूर पण गेला ,ती देवयानी सुद्धा गेली नि ते निधडे, अभ्यासू पत्रकार सुद्धा संपले... त्या मुळे शबानाने तिच्या कडची होळी यंदा कॅन्सल केली काय नि न केली काय ? आपल्यासाठी दोन्ही सारखचं ... 

त्या आर केच्या होळीची खरी मजा सुद्धा १९७२ ला पृथ्वीराज कपूर गेल्या नंतर पुढील १०-१२ वर्षेच  आली.नंतर राजकपूरच्या दम्याच्या आजारामुळे त्यातील रंग सुद्धा उडून गेला. त्यातून मग १९८८ ला राजकपूर गेला ,मिडिया सुद्धा हळूहळू अनावश्यक लायकीपेक्षा स्ट्रॉंग झाला, अभ्यासू पत्रकार संपले आणि  “आनी ,पानी, लोनी “ म्हणणारी तरुण पोरंसोरं पत्रकार म्हणून मिरवायला लागली आणि  मग तर  त्या पार्ट्यातली  सगळी उरली-सुरली गंमत सुद्धा  निघून गेली.... असो... 

आज २०१८ मधे त्या मुळेच १९७५च्या सुनील दत्तच्या “जख्मी “ फिल्म मध्ये गौहर कानपुरीने दिलमें होली जल रही है असं गाण्यात कां लिहून ठेवलं होतं ? ते आत्ता समजतंय ....  कालाय् तस्मै नमः म्हणायचं नि दुसरं काय ? चला ...... निदान त्या गाण्याच्या निमित्ताने कोणे ऐके काळी १९७४ ला मुंबई अशी पण होती हे तरी निदान तुम्हांला या निमित्ताने कळेल ......आज तेव्हढ ही पुरेसं आहे...चला तर मग ...👇

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा