भोज्जा

शुक्रवार, २९ डिसेंबर, २०१७

राजेश खन्ना : जन्म २९ डिसेंबर १९४२.

गोष्ट आहे १९७८-७९ मधली.बासू चटर्जी अवघ्या ३-५ लाखात सिनेमा बनवतो हे माहिती झाल्यावर सेक्रेटरीला पुढ्यात घालून त्याला निर्माता व्हायचंय असं सांगत जितेंद्र ,धर्मेंद्र ,राजेश खन्ना यांनी पडद्या मागचे निर्माते बनत १९७६ ते १९८० मध्ये स्वतः हिरो बनत अनुक्रमे प्रियतमा,दिल्लगी आणि रेड रोझ हे सिनेमे बनविले व पैसे पण मिळवले.

त्यातील आजचा मानकरी राजेश खन्ना . कारण त्याचा नि त्याच्या मुलीचा ट्विंकलचा आज २९ डिसेंबर हा जन्मदिवस.

रजनीगंधा ,छोटीसी बात ,चितचोर याचे यश बघत एकदिवस राजेशने सुद्धा बासूला फोन करून आपल्याला पिक्चर करायचंय सांगत भेटायला बोलावले... बर भेटायचं तर तेव्हा राजेश प्रचंड बिझी. त्यातून बारा पिंपळावरचा मुंजा... भेटता भेटेना...शेवटी राजेशलाच एक दिवस ऑकवर्ड झालं नि त्यान बासूला कुठल्याश्या रेकॉर्डिंग स्टुडीओत बोलावले.

बासू गेला तर याचं ,डबिंग चाललं होतं ... शेजारी व्हिस्कीचा ग्लास नि साहेब समोर पडद्यावर सीन पाहून संवाद म्हणत होते... डबिंग झाल्यावर राजेशने थेट मुद्द्याला हात घालत बासूला सांगितले, एखादी स्टोरी बघ.. तुला कोण-कोण , कसं-कसं लागतंय ते तुझ तूच बघ नि सिनेमा सुरु कर. पैशाची काळजी करू नको....

हि मंडळी अशीच होती.. हाडाचे कलाकार.. एक नंबर सनकी ...

बासूने “रेड रोझचे” कथानक फायनल केले नि राजेशला विचारले कि कसं वाटतंय कथानक... राजेश म्हणला “माझ्या साठी हे योग्य आहे असं तुला वाटतंय ना ? मग बास ..
हिरो म्हणून राजेश फायनलच होता पण नायिका म्हणून कुणाला घ्यायचं ? असं नंतर बासूने त्याला विचारल्यावर राजेश म्हणला तूच सांग... कुणाला आणू ?... तू कुणीपण सांग ,ती काम करणार ...
पूनम धिल्लनकडे तारखा होत्या म्हणून मग तिला निवडली..

हा चित्रपट करताना बासूला राजेशचा एक वेगळाच पैलू समजला.म्हणजे गम्मत बघा ... निर्माता राजेश ,नायक राजेश,पैसा अडका सगळा राजेशचा पण हा बाबा इतका मनस्वी होता कि हा स्वतःच्या सिनेमासाठी बासूला तारखाच द्यायचा नाही... कारण तो त्या काळी टॉपचा हिरो होता व बाहेरच्या सिनेमात प्रचंड बिझी असायचा... त्या मुळे व्हायचं उलट कि त्याचं नुकसान होऊ नये,सिनेमा वेळेत पूर्ण व्हावा या साठी बासू चटर्जीला त्याची मनधरणी करावी लागायची... नि दादा-बाबा करत त्याला  सेटवर आणावे लागायचे... बर पैशाच म्हणालं तर बासूने नुसता आवाज टाकायचा .. सेक्रेटरी पुडकं घेऊन हजर व्हायचा .. बिलकुल कुरकुर नाही कि आधीचे हिशेब दाखवा हि भानगड नाही... बासू सोबत त्याचा हा पहिलाच सिनेमा असूनही राजेशचा याच्यावर पूर्ण विश्वास... पण त्या मुळे व्हायचं उलट .. कशात काही नसतांना बासूला याचं प्रचंड प्रेशर यायचं... तो ते राजेश पाशी बोलून पण दाखवायचा .. त्यावर उलट राजेशच ,बासूला सांगायचा “दादा टेन्शन मत लो... पिक्चर चली , नही चली तो भी चिंता मत करो...
तर असा हा अफलातून राजेश खन्ना ... हिंदी सिनेमातला  एकमेव सुपरस्टार ...

या सिनेमाच्या वेळचेच दोन किस्से सांगतो नि मग थांबतो...

रेड रोझ च्या वेळी एकदा बासूने लोणावळ्याला आऊट डोअर शुटींग ठेवलं होत.. नायिकेसकट सगळे वेळेत आले पण हा बाबा येतो येतो म्हणत दुपारच्या १ वाजे पर्यंत आलाच नाही... राजेशचा सेक्रेटरी ऊर्फ या सिनेमाच्या डमी निर्मात्याने लंचब्रेक डिक्लेयर केला .. सगळ  युनिट व्यवस्थित जेवलं नि नंतर त्या सेक्रेटरीने आज साहेब काही येत नाहीयेत त्या मुळे pac अप करूयात ... असं सांगितलं ..

बासू सेक्रेटरीवर वैतागला नि म्हणाला कि, राजेश येत नाहीये हे तुला आधीच माहित होत, तर तू मघाशीच का म्हणून नाही सांगितलं ?.. त्या वर त्या सेक्रेटरीने बासूला सांगितले कि साहेबांना आज जमणारच नव्हते पण आपले शेड्यूल आधी लागले होते नि लंच ब्रेकच्या अगोदर जर pacअप केले असते तर युनिटचा विनाकारण हाफ डे लागला असता आणि जेवायची व्यवस्था जी आधीच केली होती ते जेवण आणि अन्न सुद्धा वाया गेले असते त्या मुळे साहेबांनीच मला हे असे या पद्धतीने कर म्हणून सांगितले होते... ते मी फक्त केले...... आहे कि नाही ? याला म्हणतात १०० नंबरी सुपरस्टार ..

याचं सिनेमात एका सिक्वेन्स मध्ये राजेश सकाळी दूधवाल्या भैय्याच्या वेशात नायिकेकडे येतो असा एक शॉट आहे.. हा सीन तीन वेळा कॅन्सल करावा लागला ..  कारण सकाळी सूर्य उगवतोय आणि  सिनेमाचा नायक ऊर्फ राजेश हा सायकलवर येतोय असा प्रसंग होता ... पण सलग तीन दिवस झालं काय कि, साहेब , सेटवर उगवायचेच मुळात ११ – १२ नंतर .. मग त्या नंतर कसलं डोम्बलाच शूट करणार.. शेवटी बासूने कंटाळून चवथ्या दिवशी भर बाराच्या उन्हात हा शॉट घेतला ... आज सुद्धा तुम्हांला तो सिनेमात बघयला मिळेल ... विशेष म्हणजे या चित्रपटाचा सर्वेसर्वा असूनही प्रत्येकवेळी होणाऱ्या उशिरा बद्दल बासू कडे येतांना ,राजेश अपराध्या सारखं ,कसनुस तोंड करत ,दाता खाली जीभ दाबत माफी मागायचा .. व दादा प्लीज गुस्सा मत होवो ! असं म्हणयचा ...  

असा हा अफलातून मनस्वी कलाकार आज जर हयात असता तर आज त्याची पंचाहत्तरी साजरी झाली असती.. वुई विल मिस यू राजेश ...

(आजच्या लेखना साठी संदर्भ अनिता पाध्ये यांचे “यही है जिंदगी” या मधून घेतला आहे.)

धन्यवाद अनिताजी ...  


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा