भोज्जा

सोमवार, १ जानेवारी, २०१८

अशोक सराफ , नाना पाटेकर , १ जानेवारी ,जन्मदिवस

आज तारखे प्रमाणे नूतन वर्षारंभ ...

आज १ जानेवारी हा अशोक सराफ , नाना पाटेकर आणि जैकी श्रॉफ यांचा जन्मदिवस...  त्या तिघांना मनःपूर्वक शुभेच्छा... आज अशोक आणि नानाचे  मी अनुभवलेले दोन किस्से या निमित्ताने ...


अशोकला मी प्रत्यक्षात बघितले होते १९८५-८६ साली  त्याच्या छक्केपंजे या मराठी सिनेमाच्या शुटींगच्या वेळी ,पुण्याच्या डेक्कनवरच्या  सध्याच्या जगन्नाथ राठी इन्स्टीट्यूट मध्ये. त्या वेळी त्याच्या शॉटला अजून थोड अवकाश होता आणि तो निवांतपणे एका झाडी खाली ,योगायोगाने आमच्या जवळच खुर्चीतच  बसला होता आणि आजूबाजूला असणारी तुरळक गर्दी न्याहाळत होता.त्याच्या चेहऱ्यावर अतिशय निश्चल ,निवांत किंवा काहीसे गंभीर किंवा क्वचित काहींच्या मते थोडे शिष्ट ,आगावू वाटणारे असे म्हणले तरी चालेल असे भाव होते.ते भाव  पाहता , हा माणूस या नंतर अगदी थोड्या वेळात  कॅमेर्या पुढे जाऊन विनोदी शॉट देणार आहे असे त्या वेळी मला जरा सुद्धा वाटत नव्हते.

पण थोड्याच वेळात दिग्दर्शक व्ही के नाईक यांनी इतर सहकलाकारांची रिहर्सल घेऊन याला यायला सांगितले आणि इतकावेळ बोली भाषेत ज्याला मढ म्हणतात तसं तोंड करून बसलेला अशोक, डायरेक्टरने  “एक्शन” म्हणताच असा काही सुटला कि आम्ही ते बघून चकणेच झालो. शॉट पहिल्याच टेकला ओ.के.झाला...

मराठी आणि हिंदी मध्ये याने पुढे इतके मोठे नाव  मिळवले ते त्याच्या याच अफलातून अदाकारीवर ...

दुसरं किस्सा आहे नाना पाटेकरचा... याला त्याच्या तरुणपणी प्रत्यक्षात बघायचा योग मला कधी आला नाही ,पण आमच्या मित्राच्या परिचयातील पुण्यातील पेरुगेटा  जवळील मंदार भोपटकरांच्या घराची डागडुजी,किरकोळ रिनोवेशनचे काम करतांना अपघाताने मला नानाचे पुण्याच्या बाजीराव रोडवरच्या बँक ऑफ महाराष्ट्रचे द.म.अवघे १०० रु.च्या रिकरिंग अकौंटचे पासबुक हाती लागले होते.नाना हा मंदार भोपटकरांचा पुण्यातला स्नेही ...  हि घटना आहे साधारण ९६-९७ मधली..  पासबुक मात्र जुने होते ,नानाचे नाव व्हायच्या अगोदरचे म्हणजे तो नाटकात होता तेव्हाचं.त्या पासबुकात  ते रिकरिंग चालू केल्यानंतर साधारण फक्त ४-५ एन्ट्रीच केल्या गेल्या होत्या. पुढे नाना बहुदा अंकुश,परिंदा नंतर मुंबईला शिफ्ट झाल्याने ते बंद पडले होते... आणि ९६-९७ पर्यंत नाना हिंदी सिनेमात बडं प्रस्थ झाला होता.

पण त्याचं ते त्या वेळच १०० रुपयाच रिकरिंग अकौंट बघून मला तेव्हा खूप गम्मत वाटली होती. ते पासबुक मी “ हे बघा “ असं म्हणत भोपटकरांना सुद्धा दाखवले होते.. पण ते नानाचे चांगले परिचित असल्याने त्यांना त्याचे काही विशेष वाटले नव्हते....
“ कुणाचंच ? नानाचंय ना ? मग बोलायला नको !”
पण  हे सांगतांना त्यांच्या डोळ्यातले  मिश्कील भाव मात्र तेव्हां बरचं काही  सांगून गेले ... 


नानाला आजच्या दिवशी त्याच्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा... आणि अशोकचा एक विनोदी सीन आणि नाना-जैकीचा परीन्दातील एक सीन त्या निमित्ताने..  ↓   
  👍

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा