भोज्जा

शनिवार, २३ एप्रिल, २०११

ही मराठी ब्लॉगर्सची मानसिकता ? का अजून काही?

              मराठी ब्लॉगिंग मध्ये अगदी थोडीफार  लुडबुड करायला लागल्या पासून बऱ्याच  मराठी ब्लॉग्जला भेट द्यायचा योग आला.काहींचे लिखाण हे खूप आवडले ,तर काहींचे तितकेसे नाही.ह्यातील सर्वात खटकलेली गोष्ट म्हणजे एखाद्या ब्लॉगरचे एखादे पोस्ट  आपल्याला अगदी वाचल्या वाचल्या त्या क्षणी आवडले म्हणून आपण अतिशय उत्साहाने त्यावर काही कॉमेंट दिली तर जवळपास ९० टक्क्याहून ब्लॉग वर "आपली टिप्पणी मंजुरी मिळाल्यानंतर दृश्यमान होईल" हि पाटी त्वरित आपल्या समोर येते नि आपण खट्टू  होऊन जातो.साल म्हणजे होत कस कि आपण एखाद्याच्या मुलाचे तो परीक्षेत  चांगल्या मार्काने पास झाला म्हणून अगदी कौतुकाने बाजारातून अगदी चांगले पेन विकत घेऊन त्याला  प्रेझेंट  द्यायला वेळात वेळ काढून त्याच्या घरी जावे तर त्याच्या बापाने.......... "तो  स्कॉलरशिपच्या अभ्यासाची तयारी करतोय तुम्ही नंतर भेटा"...  असे सांगितल्या सारखे होते.आता हातातले आणलेले पेन त्याच्या बापाने आता बघितलेलेच असल्याने ते त्याला देण्या शिवाय पर्यायच राहिला नसल्याने पेन त्याच्या बापाकडे सोपवून "बरंय येतो" म्हणत आपण काढता पाय घेतो,अन तो हि ते  पेन (निर्लज्जपणे)हातात घेत "पुन्हा या" म्हणायला मोकळा.आपण तिथून बाहेर पडता पडता मनात ठरवलेलेच असते कि “सालं, कौतुकानं म्हणून आलो तर तू  हि ट्रीटमेंट देतोयेस,मुलाला दोन मिनिट भेटू द्यायला काय झाल होत? ”

"झक मारली नि तुझ्या कडे आलो.पुन्हा कोण कशाला मरायला तुझ्या दारात येतंय?”
   
कौतुकाने कॉमेंट द्यायला गेलेल्या वाचकाला जणू ब्लॉगरकडून अशी ट्रीटमेंट मिळाल्याचा भास  तर होत नसेल
              मित्रांनो,म्हणजे खास करून वाचकांनो,हो कारण तेच बहुसंख्येने असतात,कारण ब्लॉगिंग क्षेत्रात सुद्धा काही अगदी सगळेच पु.ल. किंवा  कुसुमाग्रज नाहीयेत.तर मित्रांनो.... माझ्या सारखा हाच अनुभव आपल्या पैकी बऱ्याच जणांना येऊन गेला असणार यात शंका नाही.पण आपण कुठेच बोलू शकत नाही. माझ्या सारखे कुत्र्याच्या छत्री सारखे मौसमी उगवणारे ब्लॉगर संख्येने जरी बरेच असले तरी दर्जेदार लिखाण,अभ्यासपूर्ण लेखाची मांडणी ह्याची मराठी मध्ये काही अगदीच वानवा नाही.

              तथापि ह्या पद्धतीचे comment  moderation(म्हणजे ब्लॉगरची  मंजुरी असा ह्या पुढे अर्थ अभिप्रेत धरण्यात यावा )  असंख्य  ब्लॉगवर पहाता डोक्यात असा किडा येऊन गेला कि च्यायला.... सालं मराठी ब्लॉगरची  हि मानसिकताच  आहे का,कि मराठी माणूस बुळचटच होत चाललाय  ? राकट देशा,कणखर देशा,दगडांच्या देशा गोविंदाग्रजांच्या बरोबरच अनंतात विलीन झाला कि काय? अरे जरा बिनधास्त व्हा कि,रहा कि…..  समजा तुम्ही तुमचं ते moderation (म्हणजे "तुमच्या" मंजुरीचे  )ऑप्शन काढून टाकलं तर काय होईल? अगदी जास्तीत जास्त काय होऊ शकेल तर तुमच्या एखाद्या पोस्ट वर एखादे वेळी एखादा वाचक त्याला ते पोस्ट किंवा त्यातील मुद्दा ,विचार  अगदी नाहीच पटला तर   काही वेड वाकड तुमच्या अपरोक्ष तुमच्या ब्लॉग वर  कॉमेंट देईल किंवा देऊ शकेल.ह्या  पलीकडे काय होऊ शकणार आहे? ती कॉमेंट सभ्यतेच्या अगदी सर्वमर्यादा सोडून असेल तर वगळण्याचे शस्त्र  पण तुमच्या हातात आहेच ना? नि त्या उपर जर तुम्हाला काही कृती करावयाची असल्यासच  आता सायबर क्राईम कायद्या नुसार आपण त्या कॉमेंट धारकाचा तो अगदी कुठेही असला तरी त्याचा आय.पी.एड्रेस सहज मिळवू शकतो.अगदी त्याच्या लोकेशन सह.मग आपल्याला इतके असुरक्षित  वाटायचं कारणच कायअरे दोन घेणारा नि चार  देणारा  असा मराठी माणसाचा खाक्या आहे तो हे ब्लॉगर विसरले कि काय ? नि त्या मुळे जरा वाजवी पेक्षा जास्तच  डिफेन्सिव्ह झालेत ? नि समजा ती टीका सभ्यतेच्या मर्यादेत असेल तर तुमची काय हरकत आहे? नि आपले सर्व लिखाण हे लोकांना अगदी आवडलेच पाहिजे किंवा कोणी त्यावर ब्र सुद्धा काढता नये असा आग्रह सुद्धा का? अहो नाही आवडत कधी कधी.....अगदी जंजीर,मुकद्दर का सिकंदर दिल्या नंतर प्रकाश मेहराचा तद्दन फालतू जादुगर सुद्धा येऊ शकतो नि रोहित शेट्टी सुद्धा गोलमाल नंतर त्याचा आताचा गोलमालचाच तद्दन भिकारचोट सिक्वेल ही देऊ शकतो,नि आपण ते सगळ अनुभवतो सुद्धा कि हो? मग काळजी कसली?


              अपवादात्मक म्हणून  आमच्या महिला भगिनींनी हि दक्षता त्यांच्या ब्लॉग वर घेतल्यास ... नव्हे त्यांनी ती घ्यावीच ... किंवा ज्यांनी आपला ब्लॉग त्यांच्या व्यावसायिक दृष्टीकोनातून सुरु ठेवला आहे अशा मित्रांनी सुद्धा ती सुरु ठेवल्यास  वाचकांना सुद्धा ते खटकू नये किंवा खटकणार नाही.तथापि मी जे म्हणत आहे ते बाकी ९५ टक्के ब्लॉग बद्दल…….  


              आणि म्हणूनच मला हेरंब ओकचा "वटवट सत्यवान",विद्याधर भिसेचा " बाबाची भिंत ",नि सुहास यादवांचा "ऑप्शन मेकर" ह्या सारखे ब्लॉग नि अजून ही काही ब्लॉग हे त्याच्यातील उत्कृष्ट लिखाणाच्या पलीकडे जाऊन जास्त आवडतात. कुठल्याही प्रकारचे कोणतेही अडथळे नाहीत.त्या मुळे त्यांच्या सारख्याचे वाचकां बरोबर जुळलेले नाते जास्त प्रेमाचे नि आपलेपणाचे आहे. ह्या सारखे ब्लॉगर्स हे खरे मराठी शोभतात.हे इतके सविस्ताराने सांगायचे कारण म्हणजे बऱ्याच मराठी ब्लॉग वर बऱ्याच वेळा खूप चांगले लिखाण असून हि नि ते बऱ्याच वाचकांच्या नजरे खालून जाऊन हि तो लेख,ते लिखाण आवडल्याचे न आवडल्याचे कोणतेही प्रतिसाद तेथे दिसत नाहीत.कारणे काही हि असतील पण मला भासलेले कारण म्हणजे जरा स्पष्टच  बोलायचे तर लोक ,म्हणजेच वाचक ,जेथे  कॉमेंटला मॉडरेशन असेल किंवा असते  तेथे    कॉमेंटच्या बाबतीत एकदा ,दोनदा किंवा जास्तीत जास्त तीनदा विषाची परीक्षा घेऊन बघतात.नंतर मनातल्या मनात का होईना म्हणतातच कि "जा खड्ड्यात " ह्याचा.......ह्या वाचकांच्या मानसिकतेच्या मराठी ब्लॉगर्स नि जरूर विचार करावा. आपली कॉमेंट जर लगेच प्रकाशित झाली तर त्याने त्या वाचकाला कितीही नाही म्हटले तरी मनातून अगदी कणभर का होईना थोडासा आनंद हा होतोच ..जसा लहानग्या बाळाला त्याच्या आईने बाजारातून आणलेला खाऊ आधी तिला त्याने एक गोड पापा दिल्यावर मग तो खाऊ त्याच्या हातात ठेवल्या वर होतो तसा... आणि अगदी  तो खाऊ त्याच्या साठीच तिने आणला आहे हे त्याला माहिती असून सुद्धा. नि सर्वात महत्वाचे म्हणजे कॉमेंट मॉडरेशन(मंजुरी) म्हणजे तुमच्या लेखी तुम्ही फक्त अति शहाणे नि तुमच्या येथे येणारे सगळे बिनडोक नि मूर्ख  असे सुद्धा  वाचकाला वाटू शकले तर वाचकांचा त्यात काय दोष? बरे प्रथम भेट देणाऱ्या  बिचाऱ्याला  वाचकाला ह्याचा काहीच अंदाज नसतो .तो हमखास फसतो .त्यावर आमचे काही मित्रांनी नामी युक्ती शोधलीये.ते कोणत्याही ब्लॉग वर पहिल्या वेळी कॉमेंट देते वेळी नुसता झेड, टी,किंवा जी असा कोणताही  अल्फा बेट टाईप करतात. तो जर लगेच प्रसिद्ध झाला तर तो डिलीट करून कॉमेंट देतात नाही तर नुसता एखादा अल्फाबेट  हा कोणी ब्लॉगर काही प्रसिद्ध करत नाही. त्या मुळे त्यांचे श्रम वाचतात. असे त्यांना वाटते.नि सर्वात महत्वाचे आपल्यावर विनाकारण कोणी अविश्वास दाखवतोय ह्या भावनेचा त्यांना त्रास होत नाही.

 
              हे पोस्ट वाचल्या वर कदाचित काही मराठी ब्लॉगर्सचे "च्यायला हा कोण दीड शहाणा आलायरे आम्हाला अक्कल शिकवायला? कोण .... कोण आहे रे हा? च्यायला बघितलं पाहिजे जरा" असे मत होण्याची शक्यता सुद्धा मी बिलकुल नाकारत नाहीये.तसेच बऱ्याच ब्लॉगर्सला  वाचकांच्या कॉमेंटच्या बाबतीत  may be ,कदाचित काही वेडे वाकडे अनुभव सुद्धा आले असतील.त्या मुळे सुद्धा ते इतके कोशात गेले असतील पण तरी इतके डिफेन्सिव्ह होऊ नका हो .. आम्हा वाचकां वर इतका अविश्वास दाखवू नका हो आणि सर्वात महत्वाचे म्हणजे उगाच अगदी फार मोठ्या संस्कृती रक्षकाच्या भूमिकेत शिरून आमचे एखाद्या कॉमेंट मधील एखादे ओघवते  मराठी  संबोधन,जे क्वचित प्रसंगी अगदी फार खोलात गेल्यावर अगदी कदाचित थोडेफार अश्लील सुद्धा वाटू शकेल असे सुद्धा असू शकेल पण ती त्या कॉमेंटची  गरज असेल, नि सर्वात महत्वाचे ,म्हणजे ते तेथे शोभून दिसत असेल तर उगाच ते वगळू नका... तर   ,हे आम्हा वाचकांचे आपल्याला आवाहन आहे,विनंती आहे.


              खरे तर माझा हा कॉमन सेन्सिबल विचार ह्या आधी सुद्धा बऱ्याच वाचकांच्या डोक्यात येऊन गेला असणार,त्यांनी त्या विषयी माझ्या सारखेच त्या त्या लेखकांना आय मीन ब्लॉगरला  ह्याच्या  विनंत्या  सुद्धा केल्या  असायची शक्यता नाकारता येत नाही तथापि म्हणावी अशी फार काही सुधारणा नाही.असो.
 

              मी स्वतः शेयर बाजाराशी संबंधित अनेक इंग्रजी ब्लॉग्जला भेटी देत असतो,दिल्या आहेत.खरे तर ते क्षेत्र ते इतके बिन भरवशाचे,अनिश्चित नि धोकादायक आहे कि तेथे तुमच्या कोणत्याही चुकीला माफी नाही नि शिक्षा हि रोख स्वरूपात ...लगेच त्वरित.तेथे दया माया नाही..... तर सांगायची गोष्ट म्हणजे मी तेथे सुद्धा असे बरेच  फ्री ब्लॉग.... नव्हे, जवळपास सर्वच ब्लॉग असे पाहतो कि जेथे खरे तर लोकांनी तुमचा एखादा अंदाज एखादे दिवशी जरी अगदी चुकला तरी  मार मार शाब्दिक जोडे मारायची प्रचंड शक्यता असते.वेळ प्रसंगी अगदी खालच्या पातळीवर जाऊन सुद्धा...  कारण "त्याला"आर्थिक फटका बसलेला असतो ना? त्या मुळे त्याचे मुळातच डोके फिरलेले असते.पण मुळात खरे तर त्यांना त्या ब्लॉग धारकाने माझ्या कडे या नि पहा, बघा,मी सांगतोना ? असं कोणतही गूळ खोबर देऊन सांगितलं नसत,पण तरी हि ते ब्लॉगर्स साले इतके जबरदस्त आहेत/असतात कि ते त्यांच्या ह्या अनाहूत वाचकांच्या नुकसानीस कोणत्याही प्रकारे जबाबदार नसताना सुद्धा हि टीका अशी काही झेलतात पचवतात कि यंव रे यंव.अगदी अश्लाघ्य,अश्लील भाषेतील टीका तेवढीच फक्त ते नंतर नाईलाजास्तव  वगळून टाकतात. अन्यथा ती टीका हि स्वीकारायची त्यांची जबरदस्त मानसिकता असते..........ह्यातील सर्वात मला (उगीचच) खटकणारी गोष्ट म्हणजे अहो हे सर्व ब्लॉगधारक  इतर प्रांतीय आहेत.खास करून दक्षिणेतील.ह्या लोकांचे खास करून धाडस म्हणजे ह्यातील बरेचजण तर चालू मार्केट आवर्स मध्ये त्यांच्या ब्लॉग चे नियमित अपडेटेशन करणारे असतात.अहो म्हणजे तर केवढी रिस्क ... पण नाही तो क्लासच काही वेगळा आहे.... कारण रोजच्या साधारण १ लाख कोटी रुपयाहून अधिक उलाढाल असणाऱ्या भारतीय शेयर बाजारातील मुंबई सहित महाराष्ट्राचा रोजचा वाटा सिंहाचा म्हणजेच ७० टक्क्याहून जरी अधिक असला तरी,नि भले मुंबई हि देशाची आर्थिक राजधानी म्हणून जरी अजून ओळखली जात असली तरी महाराष्ट्रीयन ... हो महाराष्ट्रीयनच ....मराठी नाही ... माणसाचे त्या विषयाला वाहून घेतलेले ब्लॉग तर दूर राहून  द्यात अगदी इतर विषया वरील त्याच्या ब्लॉग वरील  लिखाणा वरील टीका झेलायची सुद्धा  त्याची मानसिकता कमीच आहे कि काय अशी शंका घ्यायला जागा आहे.
 


              मॉडरेशन शिवाय जर एखादा ब्लॉग प्रसिद्ध होत असेल नि तो दर्जेदार असेल तर त्याचा अवघ्या २ ते ३  वर्षात वाचक वर्ग किती असू शकतो ह्या साठी मी श्री. Ilango   ह्या "जस्ट निफ्टी" वाल्या तमिळ ब्लॉगर चे उदाहरण देऊ इच्छितो, अधिकृत पाठीराखे फक्त जेमतेम ५६१ पण आज पर्यंतचे   वाचक ६७,९३,३४५ आणि प्रत्येक दिवशी सरासरी १७,०३७ वाचक  तेथे नियमित भेट देत असतात असे त्याचा साईट मीटर सांगतो. मुळात इंग्रजी जाणणारा देशातला वर्ग हाच फक्त अजून इंटरनेटशी निगडीत  आहे हे जरी आपण मान्य केले नि शेयर बाजार हा  जुगारी मानसिकतेच्या लोकांचे क्षेत्र असल्याचे जरी आपण उघड उघड मान्य केले तरी, सर्व वाचकांच्या पसंतीस तो ब्लॉग  उतरण्याचे मुख्य कारण म्हणजे त्यातील दर्जेदार लिखाण.,योग्य भाषेतील अगदी कटू,जहरी टीका,अगदी क्वचित प्रसंगी वैयक्तिक  टीका सुद्धा झेलण्याची सदरहू ब्लॉगर ची कणखर मानसिकता,नि सर्वात महत्वाचे म्हणजे त्यास संयमित भाषेत उत्तर देण्याची त्याची ताकद
   

              मराठी ब्लॉग्ज मध्ये सुद्धा दर्जेदार लिखाणाची अगदीच काही वानवा नाहीये.तथापि   मला येथे खेदाने असे नमूद करावेसे वाटते कि मला  माझ्या गेल्या एक दीड वर्षाच्या मराठी ब्लॉगच्या सफरीत "मराठी मध्ये"फक्त "वटवट  सत्यवान" म्हणजेच हेरंब ओक हा एकच ब्लॉगर  वरील ब्लॉगरच्या  ताकदीचा नव्हे कणभर सरस असा आढळला.अर्थात दोघांचे क्षेत्र,लिखाणाची पद्धत,शैली हि पूर्णतया भिन्न आहे ..मी जे बोलतोय ते फक्त ब्लॉगरच्या मानसिकते विषयी.
  

              तरी आपले मराठी मधील ब्लॉगर ह्याचा म्हणजेच प्रामुख्याने त्यांच्या नि नंतर वाचकांच्या मानसिकतेचा विचार करतील काय ?
   
              का शेयर बाजाराशी  छोटेसे ट्रेडर म्हणून का होईना ते लोक निगडीत असल्याने,नि सदैव बाजारा कडून रट्टे बसून बसून कदाचित कोडगे  झाले  असल्याने सुद्धा त्यांना त्याचे म्हणजेच टीका,अपयश ह्याचे तितकेसे सोयर सुतक नसल्याने सुद्धा त्यांची मानसिकता जरा जास्तच बिनधास्त किंवा प्रगल्भ झाली असावी ? कि  त्या मुळे समजा एखाद्याने जर त्यांच्या  एखाद्या लिखाणावर  जर चुकून माकून अगदी काही टीका केलीच तर त्याचे त्यांना फारसे कौतुक नसावे असे वाटते तसेच त्यांना त्यांचे लिखाण  म्हणजे अगदी काळ्या दगडावरील पांढरी रेघ हा सुद्धा अभिनिवेश नसल्याने,नि त्यांचे  प्रत्येक लिखाण ,विचार,मत हे प्रत्येकाला पटलेच पाहिजे किंवा बरोबरच असते असा सुद्धा भ्रम किंवा समज नसल्याने ह्याचे काहीच वाटत नाही ?..कि त्यांचे  वडील काही महाराष्ट्राचे कोणी गव्हर्नर वगैरे नसल्याने किंवा ह्या पुढेही ते व्हायची बिलकुल शक्यता नसल्याने,क्वचित प्रसंगी अगदी एखाद्याची एखादी चुकून माकून काही बरी वाईट प्रतिक्रिया समजा अगदी आलीच तरी त्या एखाद्या बऱ्या वाईट प्रतिक्रिये मुळे  त्यांचे काय  किंवा,अगदी त्यांच्या घराण्याचे नाव काय  त्या मुळे धुळीला मिळणार असल्याची बिलकुल  शक्यता नसल्याने सुद्धा भिती अशी नसावी ,जी कदाचित इतरांना........ न जाणो कदाचित  असू शकेल....,    नक्की  काय ते कळू शकेल  काय
  
              हे आपले माझे comment  moderation च्या बद्दल  सगळे निव्वळ बिनकामाचे,नि कदाचित काहींच्या मते बिनडोक्याचे  अंदाज हि असू शकतील.कॉमेंटला  मॉडरेशन ठेवण्या साठी    दुसरी ह्या पलीकडे जाऊन हि काही कारणे असायची शक्यता सुद्धा मी नाकारत नाहीये... ती जिवंतच आहे नि राहील...पण तरी डोक्यात बऱ्याच दिवसा पासून वळवळत असलेला हा किडा ह्या आजच्या दिवशी आपल्या पुढे म्हणजे ब्लॉगर्स  नि वाचकां समोर पोस्टमार्टेम साठी ठेवला आहे.

              बघा..... बॉडी तशी हि बेवारसच आहे पण जर पोस्टमार्टेम करायच्या परिस्थितीत वाटली तर टेबला वर घ्या नाही तर ,उगीच चिरफाड करून बघण्या पेक्षा डायरेक्ट वैकुंठाला पाठवून द्या.
काय करायचं?घ्यायचं का फाडायला का नुस्त हुं म्हणायचं ?


              खरे तर पोस्ट वाजवी पेक्षा जरा जास्तच लांबलय ह्याची मला कल्पना आहे पण"च्यायला तू अगदी चांगला लेखक-बिखक किंवा फार शहाणा जरी नसला तरी तू निदान एवढे लिहू शकशील असं आम्हाला वाटतंय {म्हणजे त्यांच्या लेखी शेवटी मला अक्कल नाही ती नाहीच }हे माझ्या मित्रांनी मला ढोसल्या मुळेच ह्या "पीळपोस्टचे प्रयोजन"...... ते काही का असेना पण आता पाण्यात पडल्या वर त्याला वाचवायचे सोडून हा बुडतोय का वाचतोय हे प्रथम करमणुकीच्या दृष्टीकोनातून का होईना पण निदान लक्षपूर्वक पहाणाऱ्या..... पण नंतर तो बुडतोय म्हटल्यावर जिवाची पर्वा न करता त्याला वाचवायला जाणाऱ्यां त्या माझ्या हरामखोर :)) मित्रांना त्यांचे म्हणणे कुठे तरी,कोणी तरी "नेट" वर नेटाने आणल्याचा मला आनंद तर देता आला?

        
    


           


१५ टिप्पण्या:

 1. सदानंददादा, आवडली पोस्ट आणि पटलीही. मला आठवतंय तू पहिल्यांदा जेव्हा माझ्या ब्लॉगपोस्टवर प्रतिक्रिया दिली होतीस तेव्हा याच गोष्टीचा आवर्जून उल्लेख केला होतास.

  फक्त या गोष्टीत (कदाचित) अजून एक बाजू असू शकते ती म्हणजे हा मॉडरेशनचा मुद्दा बऱ्याच ब्लॉगर्सनी एवढा सिरीयसली घेतलेला नसतो. म्हणजे वाचकांना एवढा आक्षेप असेल किंवा त्रास होत असेल हे कदाचित त्यांच्या लक्षात येत नसेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे ब्लॉगर वर मॉडरेशन हे बाय डिफॉल्ट असतं. अनेक ब्लॉगर नियमित ब्लॉगिंग करत नसल्यानेही बऱ्याचदा हे मॉडरेशन डिसेबल केलं जात नसावं असा माझा अंदाज आहे. असो.

  अजून एक म्हणजे एवढ्या कौतुकाच्या शब्दांबद्दल अनेक आभार.. (थोडं किंबहुना जरा जास्तच कौतुक झालंय :) ) पण अजून असे अनेक उत्कृष्ट ब्लॉगर्स आहेत जे नियमित आणि दर्जेदार लेखन करतात..

  उत्तर द्याहटवा
 2. मित्रांनो ,
  हेच निरीक्षण त्या ब्लॉग्ज बद्दल सुद्धा आहे कि जे स्वतःला फार पुरोगामी समजून ,वेगवेगळ्या संघटनांच्या नावाखाली असेच वेगवेगळ्या नावाने काही ब्लॉग चालवतात ,त्या वर बऱ्याच वेळा ,बरीच स्फोटक (पण अर्थातच नेहमी प्रमाणे अशुद्ध,अश्लाघ्य,अश्लील भाषेत) अगदी एकेरी-तुकेरी वर येऊन सुद्धा वेळ प्रसंगी काही लिखाण करतात पण त्या वर प्रतिक्रिया व्यक्त करायला अटकाव करतात.थोडक्यात काय चर्चेने,वैचारिक देवाण घेवाण केल्याने काही प्रश्न सुटू शकतात,काही मार्ग निघू शकतो ह्या वर लोकांचा आता विश्वास उडत चालला आहे,नव्हे उडाला आहे..... अशी शंका यावी......आजच्या काळातील ,सामाजिक,आर्थिक,नि वैचारिक परिस्थितीचे हे प्रतिबिंब तर नव्हे?

  उत्तर द्याहटवा
 3. हेरंब,
  अतिशय मनःपूर्वक धन्यवाद येथे भेट दिल्या बद्दल...तू वाचत होतास हे मला कळत होतच /माहित होतंच पण वाचकांची हि तक्रार फार पूर्वी पासूनची आहे,होती हे इतरांना हि लक्षात याव हा खरे तर ह्या मागचा मूळ हेतू आहे."कौतुक जरा जास्तच झालाय" अस तुला वाटत पण "आमच्या" दृष्टीने ती वास्तवता आहे.:)) खरे तर मराठी माणसा मध्ये इतके गट्स आहेत कि त्या मुळे ह्या अगदी किरकोळ वाटणाऱ्या गोष्टीचा सुद्धा त्रास होतो.. केवळ एक वाचक म्हणून.....आणि म्हणून खरे तर ह्या पोस्टचे प्रयोजन... केवळ "त्या"ब्लॉगर्स साठी कि ज्यांच्या पर्यंत आम्ही त्वरित,अगदी आमची इच्छा असूनही पोहोचू शकत नाही...
  ता. क.
  मी काही कोणी हाडाचा लेखक ,कवी-बिवी बिलकुल नाहीये,( हे तुला माहिती असावं :))पण काही तरी बिनकामाचे पण कदाचित महत्वाचे(म्हणजे असं मला वाटत) असं क्वचित प्रसंगी काही तरी बाहेर येऊ शकत रे!

  उत्तर द्याहटवा
 4. आणि हो आता तू माझे सदानंद हे नाव घेऊन कॉमेंट दिल्याने मग mynac हि काय भानगड आहे ह्या वर आता एक पोस्ट कधी तरी येणारच,त्या अपघाताचा :)) एकदा खुलासा करणं होणारच.. :))

  उत्तर द्याहटवा
 5. मॉडरेशन हे नियमित ब्लॉगिंग नसल्याने,...बाय डिफोल्ट असल्याने,किंवा सिरीयसली घेतले नसल्याने वगैरे वगैरे हे तितकेसे पटत नाही... पण ठीक आहे चला मान्य करू........ पण...... त्याच ब्लॉगरला त्याचे नवीन पोस्ट अगदी तयार झाल्या झाल्या 'मराठी ब्लॉग्ज नेट,मराठी कॉर्नर,मराठी सूची,मराठी ब्लॉग्ज जगत,मराठी नेटभेट वगैरे साईट वर त्वरित प्रकाशित करायची बरी चांगली माहिती असते? ह्याचेच वाचकांना राहून राहून आश्चर्य,कौतुक नि गम्मत वाटत रहाते:))

  उत्तर द्याहटवा
 6. दोस्त, मुद्दा रास्त आहे आणि तो मांडलाही व्यवस्थित आहे. पण मी माझ्या ब्लॉगवर कमेंट मॉडरेशन ठेवलं आहे ते कोण काय प्रतिक्रिया देतं - चांगली असली तर पब्लिश नाहीतर डीलीट किंवा वाद कुणी घालायचा यासाठी नाही, तर याच्याही पलिकडे - ज्या स्पॅम कमेट्स येतात त्यासाठी! बर्‍याच वेळा वाचकाला तो कॅप्चा कोड लिहायलाही आवडत नाही आणि तो काढला तर स्पॅम कमेंट्सची भडीमार होतेच - मग त्यात कोणत्या लिंक आणि काय असतं - हा वेगळा विषय! मात्र जर माझ्या - किंवा - कुणाच्याही ब्लॉगवर अशी स्पॅम असणारी कमेंट पब्लिश झाली - आणि पुढील वाचकाला त्रासदायक होऊ शकते.
  थोडक्यात सांगायचं तर - चोखंदळ वाचक त्याला आवडलेल्या लेखावर प्रतिक्रिया देतोच मग भलेही ती प्रतिक्रिया थोडया वेळाने प्रकाशित झाली तरी चालेल..!

  उत्तर द्याहटवा
 7. mynac काय आहे ते नक्की कळव.
  तुझा मुद्दा योग्य आहे. मी माझ्या ब्लोग्गर वरील सर्व मोडरेषन आधीच काढले होते. वर्डप्रेस वर पण काढले होते. पण अचानक दोन दिवस स्पॅम मेल यायला लागले. त्यामुळे परत वर्डप्रेस च्या ब्लॉग वर कॅमेंत मॉडरेशन ठेवायला लागले. दोनच दिवसापूर्वी परत काढले आहे. बघुया काय होते ते.
  बाकी लेख मस्त जमलाय. कीप ईट अप !!!

  उत्तर द्याहटवा
 8. प्रती भुंगा,
  चोखंदळ वाचक हा प्रतिक्रिया देतो ,१०० % मान्य पण..... पण "भुंग्या" सारख रुणुझुणु करता यायला प्रत्येकाला नाही जमत राव :))मित्रा ती उंची गाठणं म्हणजे काय ख्यायच्या गोष्टी आहेत? आणि राहता राहिली स्पॅम कॉमेंट बाबतची गोष्ट तर मी स्वतः त्या बाबत अज्ञानी आहे.. हे १०० टक्के मान्य करतो ,तथापि लेखात उल्लेख केलेल्या जस्ट निफ्टी ब्लॉग वर मला हा कधी अनुभव आला नाही. अन त्या मुळे कदाचित अशी समजूत असावी,आणि वसंतरावांना २७ वर्षांच्या नोकरीतून हेड क्लार्क म्हणून रिटायर झाल्यावर पी.एफ.चे ७,१९,२३४.४३ रुपये मिळाल्यावर अन त्याची एफ डी करण्या साठी त्यांनी ते घरी आणल्यावर "एका रात्री साठी का होईना पण एवढे पैशे घरात म्हणल्यावर आय.टी.वाल्यांची रात्री धाड तर पडणार नाही ना? हि त्यांच्या बायकोला सतावणारी भीती :)" हि भीती ज्या प्रकारात मोडते /असते तसेच काहीसे असावे अशी आपली माझ्या बापड्याची एक भाबडी समजूत.तथापि,आपल्या मताचा मी पूर्ण आदर करतो,कारण आपला अनुभव निश्चितच मोठा आहे. धन्यवाद.

  उत्तर द्याहटवा
 9. आशिष, नक्की... नक्की कळवणार..
  आणि राहता राहिली गोष्ट लेख जमण्या विषयी तर हि आपलेपणाची,आपलेपणातून एक वाचकांचा एक प्रतिनिधी म्हणून कैफियत मांडायचा केलेला फक्त प्रयत्न आहे,लिखाणात कितपत "राम" आहे हे ठाऊक नाही पण,आम्ही अस्सल पुणेकर "टीकाराम" म्हणून उगीचच प्रसिद्ध नाही?:))
  येथे भेट देऊन वाचकांना स्पॅम मेल अन कॉमेंट मॉडरेशनच्या नात्या बाबत माहिती पुरविल्या बद्दल धन्यवाद.

  उत्तर द्याहटवा
 10. अगदी सहमत आहे आपल्याशी . वाचकांच्या प्रतिक्रिया ह्या लिहिणार्‍याला सुधरवतात अस मला वाटत. त्यावर कसल डोंबलाच मॉडरेशन करणार?
  करणार्‍यांबद्दल काय बोलावे .. असो ज्याची त्याची जाण समज ..

  उत्तर द्याहटवा
 11. प्रती,प्रीतमोहोर,
  येथे भेट दिल्या बद्दल नि प्रतिक्रिया व्यक्त केल्या बद्दल मनःपूर्वक आभार.

  उत्तर द्याहटवा
 12. एका दुर्लक्षित पण महत्त्वाच्या मुद्दयाकडे मराठी ब्लॉगर्सचे लक्ष वेधल्याबद्दल धन्यवाद! हा लेख वाचून मी माझा ब्लॉग "आगळं! वेगळं!!!" वरील मॉडरेशनचा 'अडथळा' काढून टाकला आहे.

  उत्तर द्याहटवा
 13. रमणजी,
  सर्व प्रथम,येथे आपले स्वागत आहे. मी आपल्या अनेक चाहत्यां पैकी एक चाहता असून आपले ब्लॉग वर नियमित येत असतो.{अर्थात हे आपणास ठाऊक आहेच म्हणा :)} मुळात ब्लॉगर आणि वाचक ह्यात सुसंवाद असावा,असलेला वाढावा हा, ह्या पोस्टचा मनातील उद्देश आहे.आपण त्यास दिलेल्या प्रतिसाद बद्दल आपले अभिनंदन,नि धन्यवाद.
  कदाचित"ट्रेडिंग"हे रक्तात भिनले गेल्याने देणाऱ्या पेक्षा घेणारा हा नेहमी मोठा असतो ,कारण तो त्याचा पैसा आणि येथे त्या दृष्टीने बघायचे म्हणले तर, त्याचा वेळ तुम्हाला देत असतो त्या मुळे त्याचा विचार सर्व प्रथम झाला पाहिजे हि त्या मागची भावना आहे,विचार आहे.मुळात मराठी माणसात व्यापारी वृत्तीचा तसाहि अभावच आहे म्हणा ,कारण आमचा मित्र नंदू कुलकर्णी (आता वारला बिचारा) अगदी शेवट पर्यंत,"शेटजी,काजू कसे दिलेत ? ह्या गिऱ्हाईकाच्या प्रश्नावर " पैसे किती आणलेत ? त्या पद्धतीने सांगतो "असेच उत्तर(?) द्यायचा.त्याचे गिऱ्हाईक हि बिचारे त्या काळी पुण्याच्या आजूबाजूच्या खेड्यातले असायचे त्या मुळे,त्यांना हि त्यातील खोच कितपत कळायची हि सुद्धा म्हणा शंकाच होती! असो....

  उत्तर द्याहटवा
 14. क्षितीज,
  स्वागत :)
  अन प्रोफाईल मधील फोटो मस्त.
  Like !

  उत्तर द्याहटवा