भोज्जा

मंगळवार, २ जानेवारी, २०१८

२ जानेवारी ,सदाशिव अमरापूरकर ,यांचा जन्मदिवस

जेव्हा पाहिजे तेव्हा फक्त डोळ्यातूनच अभिनय करत भय,लालसा,लंपटपणा,अगतिकता किंवा मिश्कीलपणा दाखविण्याचे अंगभूत कौशल्य असलेले अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांचा आज जन्मदिवस. आज ते असते तर ते ६७ वर्षांचे असते.     

खरं तर अभिनयापेक्षा अभिनेत्याला आजच्या काळात देखणं असणं ही गरज आहे ,पण अमरापूरकर हे त्या दृष्टीने नशीबवान कारण ते अशा काळात अभिनय क्षेत्रात आले कि जेव्हा अभिनेत्याच्या कुळा पेक्षा नि सौंदर्यापेक्षा त्याच्या अभिनय कर्तुत्वाला दाद देणारा प्रेक्षक उपलब्ध होता.

नगर सारख्या तेव्हाच्या निमशहरी गावातून येऊन त्यांनी थेट मराठी नाट्य चित्रपट व्यवसायात आणि हिंदी सिनेमा जगात जे कर्तुत्व आणि नाव कमावले त्याला तोड नाही.आपल्या पहिल्याच “अर्धसत्य” या हिंदी सिनेमात फिल्मफेयर सारखे सिने जगतातील मानाचे पारितोषिक मिळवत त्यांनी तेथे राखीव अशा ए श्रेणीच्या अभिनेत्यांच्या पंगतीत स्थान मिळवले.अमरापूरकारांचे वैशिष्ट्य असे कि , हिंदी सिनेमात तगडे मानधन घेत असतांना देखील त्यांनी मराठी रंगभूमी आणि सिनेमांत जसा वेळ उपलब्ध असेल तेव्हां काम केले.

आजकाल मराठीतून हिंदीत गेलेले किंवा मराठी भाषिक असून देखील फक्त हिंदीत काम करतांना मराठीत काम केले तर ,आपले हिंदीतील मानधन कमी होईल हि भीती वाटणारे असंख्य कलाकार आहेत . उदा.माधुरी दीक्षित,श्रेयस तळपदे वगैरे ..ते मराठीत काम करत नाहीत कारण  हिंदीत टॉपला असतांना केवळ मराठीत काम करण्याने हिंदीत कमी मानधनाचा धनी होण्याची भीती  त्यांना सदैव भेडसावते.किंवा त्यांचे करियर उतरणीला लागल्यावर “ मला चांगला रोल मिळाला तर ,मराठीत काम करायला देखील आवडेल “ वगैरे सारखी फालतू कारणे ती लोकं देतात पण अम्रापूरकरांना असे फालतू प्रश्न कधीच पडले नाही.कारण त्यांचा स्वतःवर ,स्वतःच्या अभिनयावर इतका दांडगा विश्वास होता कि ते एकाच वेळी मराठी आणि हिंदीत अतिशय सहजगत्या वावरायचे.त्यांनी त्यांच्या स्टारडमचे कधीही अवडंबर माजवले नाही.सामन्यांमधील असामान्य वावर कसा असावा ते आजच्या पिढीच्या अभिनेत्यांनी यांच्या कडून शिकावे.
त्यांचा आजचा सीन हा १९८७ च्या अमिताभच्या सुपरहिट ‘आखरी रास्ता” मधून घेतलाय.आपल्या हिंदीतल्या व्हिलन म्हणून कारकिर्दीला त्यांनी इथून सुरवात केली होती.खलनायक म्हणून हा त्यांचा जरी पहिलाच सिनेमा होता आणि समोर अमिताभ जरी होता तरी त्यांनी ,या सिनेमावर आपली इतकी छाप सोडलीये कि ज्याचं नाव ते. तुम्हांला देखील फक्त या छोट्याशा प्रसंगातून ती जाणवेल असा विश्वास आहे...  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा