भोज्जा

गुरुवार, ९ सप्टेंबर, २०१०

"सहस्त्रबुद्धे" नि "पोलीस"


एका रविवारी मी सकाळी-सकाळी मित्रा बरोबर खरेदी साठी तुळशीबागे जवळ गेलो होतो.सकाळ असूनही मंडईचा परिसर असल्याने गर्दी हि होतीच.मित्रं काही एक खरेदी साठी दुकानात गेल्याने नि दुकानात गर्दी असल्याने मी बाहेरच उभा राहून गर्दीचे निरीक्षण करू लागलो.तेवढ्यात एक गोरेगोमटे गृहस्थ आपल्या बायकोला स्कूटर वर घेऊन त्या दुकाना समोर येऊन थांबले.नुकतीच मंडई केली असल्याने(बहुदा आठवड्याची)स्कूटर पिशव्यांनी गच्च भरल्या सारखी दिसत होती.गृहस्थ गाडी वरून खाली न उतरता बायकोला थोडे दरडावण्याच्या सुरातच"लौकर ये"असा दम देऊन तिथेच थांबले.'नो पार्किंगचा'बोर्ड असल्याने त्यांनी गाडी वरून उतरणे नि गाडी पार्क करणे हुशारीने टाळले नि ते पण माझ्या प्रमाणेच प्रेक्षकांच्या गर्दीत मिसळले.


बायको लौकर येत नसल्याने ५-७ मिनिटा नंतर त्यांची चुळबुळ सुरु झाली.हळू हळू चुळबुळीचे रुपांतर रागात व्हायला लागले असे मला वाटले.सुमारे १० मिनिटा नंतर त्यांच्या बायकोने दुकानाच्या दारातूनच त्यांना"अहो जरा आत या "असा आवाज दिला नि त्यांनी काही उत्तर द्यायच्या आतच ती पुन्हा दुकानात अदृश्य झाली.झालं,गृहस्थांना आत जाण्या शिवाय पर्याय राहिला नाही.गाडीवर ढीगभर पिशव्या,त्यात पुन्हा नो पार्किंगचा बोर्ड त्या मुळे त्यांची पंचाईत झाली.मी तेथेच उभा असल्याचे त्यांनी आल्या पासून बघितलेच होते त्या मुळे अखेर गाडी उभी करून त्यांनी मला "जरा प्लीज लक्ष द्या"असे विनंती वजा बजावले नि ते बायकोच्या मागे दुकानात गेले.

गृहस्थ माझ्या वर जबाबदारी टाकून गेले खरे पण पुढच्या ५ मिनिटातच तेथे एक पोलीस उभा येऊन ठाकला.मी गाडी जवळ उभा असल्याने स्वाभाविकपणे त्याने ती माझी आहे काय असे विचारले.माझे नाही उत्तर ऐकताच मग कोणाची आहे, काही माहिती आहे का?असा उलटा प्रश्न विचारला.मी दुकाना कडे बोट दाखवून आत गेलेल्या गृहस्थांची आहे असे सांगितले.पोलिसाने"जरा बोलवा त्यांना"असे मला फर्मान काढले.मी त्यांना बोलवायला दुकानच्या दिशेने जाणार तेवढ्यात ते गृहस्थ नि त्यांची बायको दुकानातून बाहेर पडले नि आमच्या दिशेने आले.मला धन्यवाद देत ते गाडी कडे वळले नि पोलिसाने त्यांना अडविले.रहदारीच्या रस्त्यावर नो पार्किंगच्या बोर्डच्या खाली स्कूटर उभी केली म्हणून प्रथम त्यांच्या कडे लायसन्स मागितले.ते उगीच बघितल्या सारखे केले न केले नि १०० रुपये दंड भरा असे फर्मान काढले.१०० रुपये दंडाचे नाव काढताच गृहस्थांची बायको एकदम उसळून आली.आता जोडीला बायकोचीही साथ मिळाल्याने गृहस्थांना देखील जोर चढला.दुकानातून घेतलेले सामान जड असल्याने फक्त बायकोला मदत करण्याच्या हेतूने आपण २ मिनिटां साठी तेथे गाडी लाऊन गेल्याचे त्याने पोलिसाला सांगितले.सोबत मला हि साक्षीला घेतले.पण पोलीस काही केल्या ऐकेना.हळू हळू आवाज चढायला लागले तशी गर्दी जमायला लागली.गोरा गोमटा गृहस्थ,त्यांची गोरीपान बायको नि पोलीस,लोक 'काय झालं, काय झालं'विचारायला लागले तसे पोलिसाने काही बोलायच्या ऐवजी पावती पुस्तक काढले नि कायद्याच्या रक्षण कर्त्याच्या भूमिकेत प्रवेश केला.त्याने लायसन्स उघडले,क्षणभर बारकाईने बघितले पण त्यास काही दिसले नसावे किंवा कळले नसावे म्हणून त्याने गृहस्थांना आडनाव काय असा प्रश्न विचारला.

लोकां पुढे झालेल्या तमाशाने बाई जरा जास्तच चिडल्या होत्या त्या मुळे आडनाव काय असा प्रश्न विचरल्यावर नवऱ्याने काही सांगायच्या आत"तुम्हीच वाचून लिहा" असे उत्तर देऊन त्या मोकळ्या झाल्या.ह्याच्या वरच काही कळत नाहीये असे पोलिसाने सांगितल्यावर,'तुम्हाला वाचता येत का' असा प्रतीप्रश्न बाईने पोलिसाला केला,नि 'तुम्ही एक शब्द बोलू नका' असा नवऱ्याला दम दिला.पोलिसाने पुन्हा त्यांना आडनाव विचारले पण गृहस्थान पुढे मौनाची लक्ष्मण रेषा मारल्याने ते तोंड उघडायला तयार नव्हते.मी जवळच उभा असल्याने शेवटी पोलिसाने लायसन्स मला देत काय आडनाव लिहिलंय ते जर बघा हो असे सांगितले.मी "सहस्त्रबुद्धे" असे सांगितल्या वर त्याने "काय?"असा प्रश्न विचारला.मग मात्र गृहस्थांनी स्वतःच त्यांचे आडनाव पुन्हा एकदा सांगितले.पोलिसाने पेन सरसावत पावती पुस्तक काढले खरे पण मराठी मध्ये सहस्त्रबुद्धे कसे लिहायचे हे काही केल्या त्याला उमगेना.त्याने मनातल्या मनात त्यांची उजळणी देखील केली पण जमलेल्या गर्दी मुळे तो हि बावचळून गेला होता.त्याने माझी मदत घ्यायचा प्रयत्न करताच बाई माझ्या वर कडाडल्या.मी बाजूला झालो.

आता नो पार्किंग,गुन्हा,दंड ह्या गोष्टी हळू हळू बाजूला पडून तुम्हाला साधं सहस्त्रबुद्धे हे आडनाव मराठीत लिहिता येत नाही?तर मग तुम्ही नक्की किती शिकलात?तुम्हाला पोलीस कोणी केले?तुमचा बिल्ला नंबर काय?तुमचे आडनाव काय?असे प्रतिप्रश्न बाईंनी विचारायला सुरुवात केली नि पोलिसाची जमलेल्या लोकांपुढे होत असलेल्या तमाशा मुळे पंचाईत झाली.शेवटी गर्दीतल्या एका सुज्ञाने जाऊ द्या जाऊ द्या असे केल्याने सहस्त्रबुध्यांनी पोलीसा कडील आपले लायसन्स काढून घेत गाडीला किक मारली.

आत्ताच बाबाच्या ब्लॉग वर एक कॉमेंट दिली नि त्यातील "अब्रू नुकसानी" ह्या शब्दा मुळे लक्षात आलं कि खरच मराठी भाषा हि फक्त बोलायलाच नव्हे तर लिहायला तर अजून अवघड आहे.त्या मुळे  ह्या किस्स्याचे प्रयोजन.हा किस्सा  माझ्या समोर आपल्या अगदी तुळशीबागे समोरच्या राज स्टेनलेस स्टील ह्या दुकांना समोर प्रत्यक्षात घडला होता.गम्मते नै ?

1 टिप्पणी: