भोज्जा

रविवार, २७ नोव्हेंबर, २०११

पुण्यातील वॉकिंगप्लाझाचे कौतुक

पुण्यातील लक्ष्मीरोड वरील वॉकिंग प्लाझाचा प्रयोग यशस्वी होत आहे अशी आजच्या वर्तमान पत्रात बातमी आहे.हा प्रयोग यशस्वी  होणार नाही  किंवा होऊ शकणार नाही असे वाटायचे खरे तर काहीच कारण नाही आणि नव्हते.कारण पोलिसी  खाते आणि अतिक्रमण खाते ह्यांनी जर ह्या पूर्वी सुद्धा,हा सध्याचा समन्वय दाखविला असता तर, खरे तर हे असले प्रयोग करण्याची  वेळ सुद्धा त्यांचे वर आली नसती.वास्तविक पाहता ह्या दोन्ही खात्यांच्या प्रचंड निष्क्रियतेतूनच सध्याची परिस्थिती उद्भवली होती आणि आहे.लक्ष्मी रोडवरील आणि तेथील फुटपाथ वरील अनधिकृत फेरीवाले अतिक्रमण खात्याला न दिसणे आणि तेथे खरेदीला आलेल्या लोकांनी त्यांच्या गाड्यां मध्ये ड्रायव्हर बसवून ठेवून,ती वाहतुकीला अडथळा उत्पन्न होईल अशी उभी करून ठेवेणे आणि ते हि अगदी एका मागोमाग एक, अशा पद्धतीने, हे सर्व सगळ्यांना दिसत असून हि पोलिसांना ते न दिसणे हे, ह्या पूर्वीही शक्य नव्हते आणि ह्या पुढे हि नसेल.

मुळात गाडीत जर ड्रायव्हर त्याच्या सीटवर बसला असेल,........

त्याच्या समोर तेथून पुढे गाडी नेण्यासाठी काहीहि अडथळा अथवा तांबडा सिग्नल नसेल,आणि जर त्याच्या  तेथे तसे जागेवरच उभे राहण्याने त्याच्या मागून येणाऱ्या वाहतुकीला अडथळा निर्माण होत असेल तर खरे तर पोलिसांनीच  त्याला तेथून  रट्टे मारून  हाकलले पाहिजे,पण ड्रायव्हर कडून त्याच्या मालकाने "पोलिसांना देण्यासाठी दिलेली चिरीमिरी" गुपचूप नि बिनबोभाट पदरात पडून घेण्या कडेच त्यांचा फक्त कल असेल, तर त्याला नियम,तरी काय करणार ? आणि मुळात ड्रायव्हर सीटवर जर कुणी बसले असेल तर त्याला ती गाडी रस्त्यात वाहतुकीला अडथळा  उत्पन्न करून,त्याला हवी तितका वेळ, तेथे एकाच जागेवर उभी करून ठेवण्याचा हा अधिकार कोणत्या कायद्याने मिळतो ? आणि मिळाला ? हे  सर्वसामान्यांना आजतागायत न उलगडलेले कोडे आहे.

कधी काळी मारलेल्या आणि आता अतिशय अंधुक झालेल्या अशा पांढऱ्या पट्ट्याच्या अगदी थोडीफार बाहेर लागलेली दुचाकी अतिशय वेगाने आणि कार्य तत्परतेने उचलणाऱ्या पुणे वाहतूक पोलिसांना लक्ष्मीरोड वरील "वामा" दुकानाच्या बाहेर,हातगाडीवर एकूण मालाची किंमत जेमेतेक पाचएकशे  रुपये असलेल्या फेरीवाल्याची वर्षानुवर्षे  उसाच्या कांड्या विक्रीची हातगाडी,चणे-फुटणे  विक्रेत्याची हातगाडी दिसत नाही हे सुद्धा एक मोठे आश्चर्य आहे.

थोडक्यात काय तर जनमताच्या थोड्याफार रेट्या मुळे म्हणा किंवा आता पोलिसांना हि परिस्थिती त्यांच्या पूर्ण
हाताबाहेर गेल्याची थोडाफार जाणीव झाल्याने म्हणा किंवा केवळ त्या मुळेच त्यांच्यावर पडलेल्या ताणा मुळे म्हणा ..निदान आत्ता तरी जाग आली हे हि नसे थोडके.....हनुमानाला जशी  त्याच्या शक्तीची वेळोवेळी आठवण करून देणे भाग पडायचे तद्वत पोलिसी आणि अतिक्रमण खात्याला सुद्धा त्यांच्या अधिकाराची जनतेने वेळोवेळी , योग्यवेळी आठवण करून देणे क्रमप्राप्त झाल्याचे सध्याचे चित्र दिसते.....त्या मुळे संबंधित विभागातील स्थानिक लोकांना ह्या "यशस्वी प्रयोगाचे"  तितकेसे कौतुक आणि  अप्रूप नसल्यास त्यात आश्चर्य ते कोणते?   
 

1 टिप्पणी:

  1. ह्या पोस्ट साठी गुगल इमेजचे सहकार्य घेण्यात आले आहे.अनावधानाने त्याचा ऋणनिर्देश करणे राहून गेले.तरी चू.भू.दे.घे.
    धन्यवाद, ते मूळ चित्रकार नि छायाचित्रकार ...

    उत्तर द्याहटवा