भोज्जा

सोमवार, २५ जून, २०१८

संगीतप्रेमींचा मदनमोहन डे २५ जून


सरकाईले खटीया जाडा लगे, किंवा मै तो रस्तेसे जा रहा था ,भेलपुरी खा रहा था वाल्या करिश्मा कपूरचा आज खरतर वाढदिवस ... पण आज तिच्या बद्दल मी काहीच लिहिणार आणि बोलणार नाहीये कारण तिच्या पेक्षाही मला स्वर्गीय संगीतकार मदन मोहन जास्त जवळचा वाटतो.  २५ जून हा त्याचा पण वाढदिवस होता.आज तो असता तर ९४ वर्षांचा असता ..  त्याचे हिंदी सिनेसंगीतातील  योगदान आणि करिश्माचे काम यात जमीन आसमान इतका फरक आहे...त्यामुळे आज फक्त त्याच्यावरच  बोलणे आणि लिहिणे इष्ट ...  असो.

 लौकिकदृष्ट्या मदनमोहन शास्त्रीयसंगीत बिंगीत काही शिकला  नव्हता पण हिन्दी सिनेसंगीताचे प्रचंड प्रेम,ध्यास ,उत्कृष्ठ कान आणि प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा संगीताला संपूर्ण आयुष्य वाहून घ्यायची त्याची जिद्द या जोरावर तो कानसेनांच्या गळ्यातील ताईत झाला होता.  

खरतर हा त्याच्या  काळातल्या काय किंवा अगदी कुठल्याही काळातल्या काय ,हिरोच्या तोंडात मारेल इतका तो हॅन्डसम,त्यातून कंडिशन फेवरेबल  त्या मुळे इतरांच्या भरीला पडत याने २-४ सिनेमात तोंडाला रंग फसून बघितला देखील पण तो तिथे रमला नाही... त्यातून  याचे वडील चुनीलाल सिंनेमासृष्टीशी निगडीत ... निगडीत कसले ? तेच इंडस्ट्री होते कारण त्या काळातील अख्खा  फिल्मीस्तान स्टुडिओ  त्यांच्या मालकीचा होता ,पण पोराने या धंद्यात सुद्धा येऊ नये या आग्रही मताचे ते होते .उलट देशप्रेमाने भारावलेले असल्याने  ,त्यांनी मदनची रवानगी  सक्तीने इंडियन मिलिटरी मध्ये केली , त्या मुळे संगीतावरील त्याच्या प्रेमामुळे मदनमोहनने जेव्हा त्याची संगीतकार म्हणून सिनेक्षेत्रात काम करायची इच्छा वडिलांच्या जवळ बोलून दाखवली व  मिलिटरी अकाउंट्स ची त्याची नोकरी सोडून जेव्हा तो घरी आला तेव्हा त्याच्या या कोट्याधीश बापाने त्याला  शब्दशः घराबाहेर हाकलून दिले.

तसं बघितलं  तर बापाची ही तेव्हा काहीच चूक नव्हती कारण मदनमोहनच्या आधीच्या सातपिढ्यात कुणाचा संगीताशी म्हणून संबंध आला नव्हता . त्यातून मदनमोहनचे संगीतातील कोणतेही प्राथमिक शिक्षण सुद्धा झालेले नव्हते. पण मदनमोहन सुद्धा इतका मानी आणि निग्रही की,भले त्याने रेल्वे प्लॅटफॉर्म वर चणे खात त्या नंतरचे त्याचे  सुरवातीचे काही दिवस काढले पण हार  पत्करून  पुन्हा  लाळघोटेपणाने बापाच्या  घरात म्हणून नाही गेला. पुढील ३-४ वर्षात त्याने स्वतंत्र यशस्वी संगीत दिग्दर्शक म्हणून जेव्हा इंडस्ट्रित नाव कमावले आणि बापाने त्याच्या एका फिल्मच्या प्रिमियर शोला जाऊन जेव्हा त्याचे हिट म्युझिक पहिले तेव्हा त्याने  पोराला  तिथेच मिठी मारली व दोघांच्या अश्रुचा बांध तेथेच फुटला...  बापाने नंतर अर्थातच मुलाला सन्मानाने त्याच्या  घरी नेले.

संगीतकार म्हणून मदनमोहन किती ग्रेट होता हे आजच्या पिढीला नुसते तसे सांगून पटणार नाही किंवा समजणार नाही.. त्या मुळे आज योगायोगाने त्याचा एक  पुरावा मिळालाय तोच तुमच्या समोर ठेवतो.. एकाच गाण्याला दोन संपूर्ण वेगवेगळ्या चाली देणे यात तर त्याचा हात कुणीच धरू शकत नव्हते ...किंबहुना मला तर दाट शंका आहे की, एकाच गाण्याच्या अनेक उत्तमोत्तम चाली ऐकून बहुदा तेव्हाच्या निर्माता-दिग्दर्शकांच्या डोक्याचा नक्की गोविंदा होत असणार ...

आजच्या  तरुणपिढीतल्या बर्‍याच लोकांना हे माहीत नाही की, २००४ साली शाहरुख खान-प्रीती झिंटाचा आलेला वीर-जारा मदनमोहनच्या साऊंडट्रॅक वरच  तयार झालाय.. किंबहुना मदनमोहनच्या मुलाने त्याचे वडील गेल्यावर एकदा सहज म्हणून त्यांचे रेकोर्डेड पण अन रिलीज्ड सॉन्ग ट्रॅक यश चोपडला ऐकवल्यावर त्याने त्या साठी वीर-जारा बनवला...असो ...  
तर आता ऐका आणि पहा तर मग...    
आजच्या लेखासाठी व व्हिडीओज साठी युट्युबचे सहाय्य घेतले आहे... संबंधितांचे मनःपूर्वक आभार...
From Right Bhupinder,Madan Mohan ,Lata & others






Above both songs from Film "Mausam"



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा