भोज्जा

शुक्रवार, ३ जून, २०११

चिंतातूर जंतू.. अर्थात डांबरट पुणेकर...

आम्ही रिटायर्ड,म्हणजे लोकांच्या दृष्टीने रिकामटेकडे,पण आमच्या दृष्टीने सर्वात जागरूक असे पुणेकर सध्याच्या "वाघ्या" नाट्या विषयीच्या गदारोळा मुळे  फार नाराज आहोत.ह्या विषयातील तज्ञ, इतिहास संशोधक त्यातील सत्य-असत्य,वास्तवता-काल्पनिकता ह्याचा जरूर  तो पाठ पुरावा करतील,तो महाराष्ट्र पुढे आणतील ह्यात आमच्या मनात शंका नाही.पण ह्या भानगडीत त्यांनी "आमच्या" सारख्यांचे फार "नुसकान" केले आहे.   
छ्या ! पुरावे देऊन काहींनी  खेळातील सगळी गम्मत घालवायचा चंगच बांधलाय राव ! हे बरोबर नाही,अस नसतं चालत.आत्ता कुठे गणगौळण संपून वगाच्या दिशेने प्रवास सुरु होणार होता नि मधेच काही लोकं सगळा खेळाच्या रंगाचा बेरंग करून टाकतात.आमच्या सारख्या रिकामटेकड्या  पुणेकरांची  आत्ता-आत्ता कुठे ह्या विविध गुणदर्शनाच्या प्रयोगां मुळे थोडीशी करमणूक देखील व्हायला लागली होती,नि बेजान नीरस आयुष्यात रंग भरायला लागला होता नि मध्येच काहींनी  ही अशी (खरी) माहिती उपलब्ध करून सगळा रंगाचा बेरंग करून  टाकला.एक तर आम्ही रिटायर झाल्या पासून हिंग लाऊन आम्हाला कोणी विचारात नाही.जुनं  पुणं,आताची बिघडलेली तरुण पिढी....(हो ! म्हणजे आमच्या मते,....कारण वय झाल्यावर तसं म्हणायचा एक प्रघात असतो ) पुण्यातील वाढती गर्दी  , बेशिस्त वाहतूक,वाढती महागाई,सध्याचे राजकारण ते पार लादेन-बिदेन असले अगदी नॅशनल,इंटरनॅशनल विषयसुद्धा चघळून चघळून पार चोथा झाले होते,त्या मुळे,असं कोणी काही नवीन पिल्लू आमच्या डोक्यात सोडलं कि,सर्वात प्रथम म्हणजे आम्हाला रमायला होतं! नंतर आमची तल्लख बुद्धी प्रवासाला निघते म्हणजेच चालायला लागते नि नंतर नंतर तर पळायला लागते.
मध्यंतरी लालमहाल प्रकरणा मुळे आमचे दिवस कसे भुरकन उडून गेले ते कळले पण नाही.डाव खूपच रंगला होता.पण  ह्या नाट्याचे खरे सुपरस्टार  पुण्यातील "ते "सरदारजी होते आणि  “त्या सरदारजींनी त्या नाट्यात पाहुण्या कलाकाराची भूमिका वठवून खरे  तर जास्त गम्मत आणली होती.पण सदरहू नाट्याच्या निर्मात्यांनी  महाराष्ट्रातील ज्या तमाम खास प्रेक्षकांना डोळ्या पुढे ठेऊन हा नाट्य प्रयोग आयोजित केला होता,त्या प्रेक्षकांनी शेवट पर्यंत प्रयोगास हजेरी अशी लावलीच नाही.त्या मुळे त्या प्रेक्षकांचे  प्रयोगा बद्दलचे नक्की असे मत शेवट पर्यंत कळूच शकले नाही.खरे तर पुण्यातलाच भांडारकर मधला नाट्य प्रयोग कल्पने पेक्षा अधिक रंगल्याने निर्माते खुशीत होते,अन प्रयोग हाउसफुल्ल होऊन लोकांसमोर यायची आपली हि हौस त्यात भागतेय असं दिसल्यावर ,त्यांचा हुरूप वाढला पण होता.
दृक-श्राव्य माध्यमातून मिळणाऱ्या अनपेक्षित प्रसिद्धी मुळे वातावरण तसे त्यांना हवे तसे अनुकूल झाले होते,पण........ ह्या सगळ्या भानगडीत सदरहू नाट्याचा एक  प्रमुख सहनिर्माता अचानक फुटला नि त्याला एका बड्या बॅनरने आपल्या कडे खेचले, त्या मुळे सलीम- जावेद जोडी मधल्या जावेदने किंवा शंकर -जयकिशन मधल्या शंकरने  किंवा आत्ताच्या जतीन-ललित मधल्या जतीनने आपली स्वतंत्र चूल जेव्हा मांडली तेव्हा त्या  जोड्यांचे  जे (हाल) झाले तेच या सध्याच्या "वाघ्या" नवनाट्याच्या निर्मात्यांचे या  प्रयोगाचे वेळी झाले. त्यांच्या सध्याच्या ह्या नव्या नाट्यप्रयोगाची संहिता ही अगोदर नीट तपासली गेली नाही.त्याच्या कॉपी राईट विषयी नि त्यातील प्रमुख पात्राच्याहिष्ट्री विषयी ते अनभिज्ञ होते.त्यांनी जो "अळूची भाजी नि वरण भात" प्रेक्षक वर्ग डोळ्या समोर ठेऊन हा प्रयोग आयोजित केला होता,ते प्रेक्षक आधीच्या दोन प्रयोगां प्रमाणेच (म्हणजेच नेहमी प्रमाणे) ह्या वेळी पण गैरहजरच राहिले,पण अचानक मधेच मूळ संहितेच्या कॉपी राईट विषयी तिसऱ्याच एका पार्टीने आपला बिनतोड युक्तिवाद लोकां समोर ठेऊन निर्मात्यांना पार  मुळा पासून हादरवून टाकले. थोडक्यात काय  श्वान जमातीच्या मागे लागून ह्या वेळी नाट्य निर्मात्यांनी स्वतःचे शब्दशः नि अक्षरशः कुत्रं हाल  करून घेतले.         
पण ह्या सगळ्या भानगडीत आमचे किती "नुसकान" झालं ह्याची तुम्हाला कल्पना नाही. कारण आता तुम्ही म्हणता तो पुरावा खोडून काढण्या साठी नाट्य निर्मात्यांना अभ्यास करण्याची मगजमारी आली कि नाही ? विनाकारण वेळ जातो हो  त्यांचा ह्या असल्या बिनकामाच्या  अन फालतू  गोष्टीत.नि सर्वात महत्वाचे म्हणजे त्यांना काय एवढीच   कामं असतात का नि  आहेत  का ? आणि त्यांनी वेळ काढायचा तरी कधी ? प्रयोगाची म्हणून अशी काही इतर तयारी असते का नाही ? कां वेगवेगळ्या टी.व्ही. चॅनल वर त्यांची होत असलेली नि त्यांना मिळत असलेली प्रसिद्धी तुम्हाला बघवत नाही ? हां तिथल्या त्या अर्ध्या एक तासाच्या चर्चेत  त्यांच्याकडे बोलण्या सारखे, दाखविण्या सारखे, थोडक्यात म्हणजे तुम्हाला हवे तसे ठोस  मुद्दे नसतात ही किरकोळ गोष्ट घटकाभर सोडून द्या, अन आम्हाला पण हे कळत नाही कि खर तर ते पुरावे-बिरावे आजच्या काळात लागतातच कशाला ? आपलं एकदा ठरलंय नां कि आपल्याला सगळ बदलायचं आहे म्हणून,घरातल्या फर्निचर सारखं ! मग ? अहो ! इथे एक तर आमच्या नाट्य निर्मात्यांना खाजवायला वेळ नाहीये, त्या मुळे आता तुम्हीच सांगा कि ह्या इतक्या "टाईट" शेड्युल मधून त्यांनी अभ्यासाला वेळ काढायचा तरी कधी ? शक्य  तरी आहे का ते ? मग ?    
आता त्यात अजून एक भानगड होऊन बसलीये, म्हणजे रामदेव बाबा,आण्णा हजारे ह्यांनी पुन्हा एकदा तमाम देशाला हाक दिलीये.त्यातच अजितदादा बाळासाहेब ठाकरे शब्दशः (पुतळ्यांच्या रूपाने का होईना पण) पेटून उठलेत,त्या मुळे ह्या वेळेचा रायगडावरचा "वाघ्या नाट्यप्रयोग" हा पुढे ढकलायच्या ऐवजी  बहुदा ओंफसच होणार अशी चिन्हं दिसताहेत. पण काही हरकत नाही.... होत ते चांगल्या साठीच अशी आमची प्रथम पासून धारणा नि विचारसरणी आहे नि काळ हे सर्वावरचे  भले उशिरा परिणाम करणारे का असेना पण जालीम औषध आहे अशी आमची मनोमन खात्री आहे.
ता.क.
संध्याकाळी  हात पाठी मागे बांधून,डुध्ढाचार्याच्या नजरेने  सिटीपोस्ट चौकात चक्कर टाकली. दादा-ठाकरे ह्या नवीन युद्धाचे पडसाद तेथे उमटून गेले होते.युद्धा नंतरच्या काही खाणाखुणा, निदान काही भग्नावशेष तरी बघायला  मिळतील ह्या अपेक्षेनेआशेने, आशाळभूत नजरेने  गर्दीतून आट्यापाट्या खेळत गेलो.पण फुस्स  झाले.समोरच  फरासखाना (पोलीस चौकी)असल्याने हाती काहीच लागले नाही..... का दोन्ही पार्ट्यांना सुद्धा हेच हवे होते कि नुसती हवा करायची,नि खडाखडी करून कुस्ती रिंगणाच्या कडेला न्यायचीते ?  ? हो कारण हल्ली काही सांगवत नाही. कारण  वरून म्हणे कुठून तरी ह्यांच्या शेपट्या पिळल्या जातात नि मिडिया...म्हणजे खास करून (फक्त) टि.व्ही.न्यूज चॅनलवाले आमंत्रित करुन,ते आलेत ह्याची व्यवस्थित खातरजमा करुन मगच आंदोलन,निषेध वा तत्सम खेळ सुरु केला जातो.आतल्या गोटातली तर अशी हि एक खबर आहे कि पोलिसांना सुद्धा आधीच सांगून सवरून तेथे गाड्या उभ्या करायला सांगून आम्हाला अटक करा अशी विनंतीवजा सूचना म्हणे देऊन ठेवली जाते.नि टि.व्ही वाल्यांनी ती झालेली अटक  बातम्यात दाखविण्या साठी मांडवली केली जाते खर खोटं देव जाणे :) हो ! कारण हे चॅनलवाले नेमके कुठून अन कसे बरे बरोब्बर  अँगल लाऊन कॅमेरे तयार ठेऊ शकत असतील बरे ?....... हा बिनडोक प्रश्न आम्हाला नेहमी पडायचा,म्हणून या वेळी थोडं त्याच्या मुळाशी जायचा उगीच आपला एक वेडा प्रयत्न केला, पण अं sss हं उत्तर नाही सापडले.
कळावे,
(सर्व प्रकारचा )लोभ  आहेच,वृद्धी व्हावी हि विनंती,
आपला,
चिंतातूर जंतू.. अर्थात डांबरट  पुणेकर...                         

1 टिप्पणी:

  1. खरं तर ह्या चिंतातूर जन्तूला ह्या असल्या भानगडी मध्ये नाक खुपसायचं काही कारण नाहीये पण,जिथे सर्व सामान्य माणूस रोजचं म्हणजेच दैनंदिन जीवन जगताना दीनवाणा झालाय आणि दैन्यावस्थे कडे वेगाने प्रवास करतोय हे बघितलं कि ह्या असल्या गोष्टींचा खूप संताप येतो.त्याचे होणारे हाल हे सध्या कुणाच्याच लेखी नाही. जो -तो... मग भले ते राज्यकर्ते असतील किंवा अजून कोणी असतील, ते स्वतःच्याच पोळीवर तूप ओढून घेण्यात मग्न आहेत. लोकांच्या अगतिकतेचा नि असहाय्यतेचा फायदा करून घेण्यात जो तो तत्पर झालाय.म्हणजे झालंय कसं कि शेळी जातीये जीवानिशी नि खाणारा म्हणतोय वात्तड.नि ह्या वर संताप येऊन सुद्धा सामान्य माणूस निवडणूक नि मतदान ह्या व्यतरिक्त त्याचे मनोगत जास्तीत जास्त वर्तमान पत्रातून फक्त २५ ओळी मध्ये वाचकांच्या पत्रव्यवहाराच्या माध्यमातूनच मांडू शकतो.खरे तर गेल्या काही दिवसा पासून वा वर्षा पासून म्हणा हवे तर ...खऱ्या सर्वसामान्य माणसाला मग तो कोणत्याही जातीचा असो वा धर्माचा ..त्याला ह्या सगळ्या प्रकारा विषयी न आस्था आहे न उत्सुकता न काही घेणं देणं...आत्ताच्या काळात त्याला सुखाने पोटा पुरते चार घास मिळाले ..नव्हे त्याला भुकेला कोंडा नि मानेला धोंडा जरी मिळाला तरी बास ..तो खुश आहे.ते राहिलं बाजूला, रोज उठून बघव तर नवी काही तरी उद्भवलेलच असत.अहो इथे सर्वसामान्यांची अवस्था म्हणजे "घरच झालं थोडं नि व्याह्याने धाडलं घोड" अशी झालीये नि तुम्ही काय घेऊन बसलायेत ?

    उत्तर द्याहटवा