कोणाच्या कपाळावर कधी केस उगवतील काही सांगता येत नाही. म्हणजेच एखाद्याचं नशीब कुणामुळे,कशामुळे आणि कधी फळफळेल ते काही सांगता येत नाही... थोडक्यात काय तर नशिबाची सुद्धा एक गंमतच असते,.... आता हेच बघा नां ,याच्या काकानं त्याला त्या मल्लिका शेरावतच्या समोर मर्डर मधे उभा तो काय केला, ते ४-६ किसिंग सीन ते काय टाकले ? नि पिक्चर तुफान चाललं ते काय ? सगळंच अवघड .... आता लक्षात आलं ? मी कोणाबद्दल बोलतोय ते ? बरोब्बर मी त्या इम्रान हाश्मी बद्दलच बोलतोय.ज्याचा आज २४ मार्च हा जन्मदिवस आहे.त्या मुळे त्याला सर्वप्रथम शुभेच्छा ... हो !आधीच देतो.... कारण नंतर-नंतर म्हणत परत राहून जायला नको.
याची बॅकग्राउंड शोधायचा एक अपयशी प्रयत्न केला पण तो सोडून दिला ... कारण याची आई ख्रिश्चन ,वडील मुस्लिम नि काका हिंदू ... सगळंच कोड्यात टाकणारं ...डोक्याचा गुंता करणारं ,त्या मुळे तो नाद सोडला पण हा महेश भटचा पुतण्या , फक्त एवढं इथे महत्वाचे.
२००२ च्या राज सिनेमाचा असिस्टंट डायरेक्टर ते फुटपाथ नावाच्या एका पडेल चित्रपटाचा हिरो म्हणून याची हिंदी सिनेमात कारकीर्द सुरु झाली पण फेल गेली ... त्या नंतर मात्र महेश भटने याला घेऊन २००३-४ ला भिगे होठ तेरे फेम "मर्डर" काढला नि याचं नशीब फळफळलं.
२००९च्या मोहित सुरीच्या राझ पर्यंत सगळं आलबेल होतं पण २००९ला हा एका भलत्याच प्रकरणामुळे चर्चेत आला.....झालं असं कि, यानं तेव्हा बांद्रयात एका उच्च्भ्रू सोसायटीत एक फ्लॅट घेतला नि त्याची एन ओ सी मिळायला त्याला वेळ लागला......झालं याने थेट अल्पसंख्यांक आयोगाकडे धाव घेत "मी मुस्लिम असल्याने मला नाकारले जात असल्याची" ओरड करत मीडियामध्ये जाऊन गोंधळ माजवला.
नेहमीप्रमाणे .... याचा काका महेश भट लगेच त्याच्या बाजूनं उभा राहिला.... पण सिनेसृष्टीतल्या शाहरुख खानने मात्र "मला कधी असा अनुभव आला नाही,हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत अनुभव असू शकतो" असे सांगत व सलमान खानने "लोक आपल्याशी असे कां वागताहेत याचा प्रथम स्वतःच्या वर्तणुकी कडे लक्ष देत विचार करावा. विनाकारण धर्म -जात वगैरे मधे आणून लोंकांची फुकटची सहानुभूती मिळवायचा प्रयत्न करू नये". असे सुनावले.
त्याला अर्थातच हे सुनवायला पडद्या मागचं अजून हे ही एक कारण असावं कि,२००९ पर्यंत , तसाही हा ऍग्रेसिव्ह लव्हर बॉयच्या इमेज मधे सिनेमातून फिट होत चालला होता नि सलमान -शाहरुखला सुद्धा हा थ्रेटच होत होता,त्या मुळे त्या दोघांनी सुद्धा या आल्या संधीचा फायदा उठवत पाहुण्याच्या काठीने साप मारायची संधी साधली.शाहरुख-सलमान याच्या सोबत नाही म्हणल्यावर विषयच संपला... बांद्र्यातला त्याचा फ्लॅट झाला पण इंडस्ट्रीत मात्र त्याच्या करियरला ब्रेक लागला. असो...
नेहमी मी अशी कथा संपल्यावर त्या दिवसाच्या त्या उत्सवमूर्तीच्या गाण्याचा -एखाद्या सीनचा व्हिडीओ वगैरे टाकतो पण आज त्याला फाटा देणार कारण आज मोबाईल साथ देत नाहीये. त्या मुळे त्या ऐवजी आज या कहाणीतून बोध देणार आहे.
बोध : आयुष्यात तुम्ही यशस्वी व्हायला सुरवात झाली कि,प्रथम ते यश पचवायला शिका . लगेच उडायला लागू नका कारण तुमचे पंख कापायला ल *य* जणं टपलेले असतात,कारण *त्यांच्या* आकाशातील एक जागा बळकावत तुम्ही त्यांना अडचण होत असता...
दुर्बोध : वास्तवते मधे फक्त वय-वर्षे ३ ते ५ पर्यंतच छान दिसणारी पण ते लक्षात न घेता मुलीं मधे व स्वतःला अजून मुलीच समजणाऱ्या महिलां मधे प्रचंड लोकप्रिय असणारी पाऊट ची नेहमीच विचित्र आणि ओंगळवाणी दिसणारी फोटो-पोज म्हणजेच चंबू पोझ इम्रान हाश्मीच्या पडद्यावरच्या येडचाळ्यां मुळे रूढ झाली अशी जाणकारांची माहिती आहे.... त्या मुळे ती शक्यतो टाळा ... ती सरसकट सगळ्यांना जमत पण नाही आणि शोभत पण नाही.... बऱ्याच जणींच्या हे लक्षात येत नाही पण त्यांचा तो फोटो लोकं बारकाईनं,छान आला म्हणून न बघता ही म्हातारपणी कशी दिसेल याचा अंदाज बांधत वेळ घेत असतात .....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा