भोज्जा

सोमवार, ५ मार्च, २०१८

टिनू आनंद : अर्थात खुद्द अमिताभचा शहेनशहा

नर्गिसचे आज लग्न झाले” ही  आम्हा दोघां भावातील  गॉसिप-वजा चर्चा माझ्या वडिलांनी ऐकली आणि आपली मुलं “वाया जाणार “ याची त्यांना खात्री पटली ,कारण नंतर आमच्या वडिलांनी त्या बातमीची खातरजमा करायला लगेच त्यांच्या सोर्सेसला फोन केले नि ती गोष्ट खरी आहे हे जेव्हा त्यांना समजले  , त्या नंतर तर आमच्या “वाया जाण्यावर “ शिक्का मोर्तब झाले आणि  त्यांनी दुसऱ्या दिवशी  आमची रवानगी लगेच मुंबईहून  अजमेरच्या मायो कॉलेजच्या बोर्डिंग मध्ये केली .हा किस्सा टिनू आनंद २०१३ साली एका प्रदीर्घ इंटरव्ह्यू मध्ये सांगत होता. 

हा टिनू आनंद म्हणजे राजकपूरच्या जुन्या जमान्यातील त्याचा यशस्वी चित्रपट लेखक,सहकारी  आणि बरेच काही असे बडे प्रस्थ असलेल्या इंदर राज आनंद यांचा थोरला मुलगा आणि पुढे जाऊन अमिताभच्या सुवर्णकाळात त्याचा दिग्दर्शक म्हणून लागोपाठ ३ हिट सिनेमे दिलेला दिग्दर्शक ,अभिनेता ज्याचा आज ५ फेब्रुवारी हा जन्मदिवस. 

अमिताभच्या चित्रपट कारकिर्दीत ,त्याला आयुष्यात प्रथम  प्रत्यक्ष –अप्रत्यक्ष रुपेरी पडदा दाखवायचं संपूर्ण श्रेय सुद्धा फक्त आणि फक्त टिनू आनंदचे आहे हे खुद्द हिंदी चित्रपट सृष्टीत देखील कित्येकांना ठाऊक नाही.अर्थात त्याची सुद्धा एक लंबी कहानी है ,जो छोटी करके इसी पोस्ट में बादमे आनेही वाली है ! तर असो....

टिनू चे वडील इंदर राज आनंद यांनी चित्रपट सृष्टीतील गळेकापू स्पर्धा स्वतः अनुभवली असल्याने आपली मुले या क्षेत्रात येऊ नये अशी त्यांची मनापासून इच्छा होती.पण मॅट्रिक पर्यंत गेल्यावर टिनूने त्याला सिनेमातच दिग्दर्शक म्हणून करियर करायचे आहे हे जेव्हा वडिलांना सांगितले आणि  तो त्याच्या या निर्णय पासून ढळत नाहीये असे जेव्हा इंदर राज यांनी बघितले तेव्हा त्यांनी नाईलाजाने स्वतःचे वजन वापरत टिनूला तीन ऑप्शन दिले.त्या तीन ऑप्शन पैकी त्या वेळी केवळ निर्माता ,दिग्दर्शक के.ए.अब्बास यांच्या सिनेमात एका छोट्याश्या भूमिकेने चित्रपट क्षेत्रात प्रवेश ,सत्यजित रे यांचा सहायक दिग्दर्शक किंवा इटलीतील एका नावाजलेल्या दिग्दर्शकाचा सहाय्यक असे ते ३ ऑप्शन होते. के. ए.अब्बास तेव्हा “सात हिंदुस्थानी”बनवायच्या प्रक्रियेत असल्याने हा  ऑप्शन लगेच अमलांत येण्या सारखा असल्याने टिनूने तो ऑप्शन निवडला....आणि त्याच्या ऑप्शन चॉईस मधील पहिला  चॉइस म्हणजे  “ सत्यजित रे “ यांच्या कडे त्याची सहाय्यक दिग्दर्शक हा ऑप्शन त्याने थोडा बाजूला ठेवला..

पण नियतीच्या मनात तेव्हां काही वेगळेच होते कारण पुढे जाऊन टिनू आयुष्यात यशस्वी चित्रपट दिग्दर्शकच झाला पण सत्यजित रे यांचा सहाय्यक दिग्दर्शक होण्या अगोदर ,हिंदी चित्रपट सृष्टीच्या इतिहासातील एक फार मोठी घटना टिनू आनंदच्या हातून घडून गेली.त्याचे झाले असे कि, वडील इंदर राज आनंद सोबतचे घरगुती संबंध लक्षात घेता अब्बास यांनी  टिनू ची सातवा हिंदुस्थानी म्हणून त्यांच्या सिनेमात निवड तर केली ,पण  याच सात हिंदुस्थानी साठी अब्बास साहेब तेव्हां नवीन नायिकेच्या शोधात पण होते .ऐके दिवशी त्यांनी टिनू ची एक  दिल्ली मधील नीना सिंग हि मैत्रीण टिनू च्या  घरी आलेली    बघितली आणि त्यांनी टिनू ला विचारले कि ,तुझी हि मैत्रीण आपल्या सिनेमात काम करायला तयार आहे कां ? ते तीला विचार . बघ !

टिनू ने तिला विचारले आणि टिनूच्या  प्रस्तावाला  होकार देत नीना सिंग तयार सुद्धा झाली पण नुसती तयार नाही झाली तर  तिने तिच्या कलकत्त्यातील बर्ड अॅंड कंपनी मधील एक मित्र जो सिनेमात अभिनय करू इच्छितो त्या मित्राचा फोटो पण टिनू ला दिला व याला पण एखादा छोटासा रोल देता येईल का म्हणून टिनू कडे  विचारणा केली.

 इकडे सगळ्या या घटना घडत असतांना एके दिवशी अचानक टिनू ला सत्यजित राय यांनी सहायक दिग्दर्शक म्हणून त्यांच्या कडे बोलावले आणि दिग्दर्शन हा टिनू चा पहिला चॉइस असल्याने त्याने के.ए.अब्बासचा सात हिंदुस्थानी सोडायचा निर्णय घेतला. टिनू ने हि गोष्ट अब्बास यांच्या कानावर घातली. सोबत आता चित्रपटाची नवीन नायिका झालेल्या नीना सिंगच्या मित्राची गोष्टपण त्यांना सांगितली व विचारणा केली कि,आता मी सातव्या हिंदुस्थानीचा  रोल करत नाहीये नि अनायसे नीना ने तिचा मित्र काम मागतोय हे आपल्याला सांगितलंय तर त्याला मी इकडे मुंबईला बोलावून घेऊ का ?.. अब्बासने क्षणभर विचार केला नि सांगितले कि,हरकत नाही ,पण त्याला स्पष्ट शब्दात ही  कल्पना दे कि, त्याने त्याच्या खर्चाने येथे यायचे आहे,जायचे आहे ,रहायचे  आहे आणि त्याची फक्त ऑडिशन घेतली जाईल.त्या ऑडिशनला   ८ दिवस लागतील नाही तर १५ दिवस लागतील.आत्ता सांगता येत नाही आणि त्यातून त्याची जर निवड झाली तर पुढचे पुढे पाहू. 

 टिनूच्या सांगण्यावरून नीना सिंगने तिचा तो कलकत्त्याचा मित्र मुंबईत बोलावून घेतला आणि टिनू ने  त्याला  त्या नंतरच्या एका दिवशीच्या संध्याकाळी अब्बासच्या समोर उभा केला.त्या दिवशी  तो अब्बासच्या समोर टिनू ने उभा केलेला उमेदवार दुसरा तिसरा कुणी नव्हता तर तो खुद्द अमिताभ बच्चन होता ,ज्याने पुढे चित्रपट सृष्टीत स्वतःच्या नावाचा इतिहास रचला.

त्या दिवशी मात्र अमिताभची भेट अब्बास सोबत झाल्या नंतर अब्बासने टिनू ला ऑफिसमध्ये बोलावून घेत आता  त्याच्यावर एक पुढची कामगिरी सोपवली.अब्बासने टिनू ला सांगितले कि, त्या सकाळच्या पोराला आपण सातवा हिंदुस्थानी म्हणून घेऊ पण त्याला संपूर्ण सिनेमासाठी फक्त ५ हजार रुपये इतकाच मोबदला देण्यात येईल आणि सिनेमा बनायला वर्ष लागो नाहीतर ५ वर्ष लागो त्यात काडीचा बदल होणार नाही आणि हे सगळे त्याला तू आधीच सांगायचे आहे.... बघ तो तयार असेल तर त्याला घेऊ.

अब्बासचा प्रस्ताव नंतर संध्याकाळी टिनूने अमिताभच्या कानावर घातला.प्रस्ताव ऐकून त्या वेळी अमिताभचा धाकटा भाऊ अजिताभ ,जो त्या वेळी अमिताभ सोबत होता  तो तर   अतिशय खट्टू झाला.पण अमिताभ मात्र त्या सिनेमात काम करायला इतका उत्सुक होता कि,त्याने तो प्रस्ताव स्वीकारायचे ठरविले व त्यास मान्यता दिली. अशा तऱ्हेने टिनूच्या त्या सिनेमातील रोल नाकारण्याने अमिताभचा चित्रपट सृष्टीतील प्रवेश सुकर झाला नि सुरु झाला. पण हि कथा एवढ्यावरच संपत नाही.

गोवा मुक्ती संग्रामाची पार्श्वभूमी लाभलेल्या सात हिंदुस्तानीचे पहिले शूटिंग शेड्युल गोव्यात लागले नि पूर्ण झाले.शूटिंग नंतर जो तो विखुरला नि काही दिवसांनी पुन्हा दुसऱ्या शेड्युल साठी सगळ्यांना बोलावणे गेले पण चित्रपटाची नायिका नीना सिंग ही पहिल्या शेड्युल नंतर  दिल्लीला  जी गेली ती गेलीच.गायबच झाली....पुन्हा म्हणून कधी ती आलीच नाही.झालं चित्रपटाची  नायिका शोधण्यापासून पुन्हा सुरवात झाली..... थोडक्यात काय तर अमिताभला जिच्या रेकमेंडेशन मुळे या सिनेमात बोलावले गेले ती नीना सिंग आणि ज्या टिनू आनंदच्या या सिनेमातून  जाण्याने त्याला हा रोल मिळाला ते दोघेही या सिनेमातून कमी झाले नि अमिताभचा चित्रपट सृष्टीतील प्रवास सुरु झाला अशी ही एकूण कहाणी आहे बघा !  

पण अमिताभने सुद्धा त्याची जाण पुढे आयुष्यभर ठेवली.व टिनू स्वतंत्र दिग्दर्शक झाल्यावर त्याच्या सोबत लागोपाठ ३ सुपरहिट सिनेमे केले.खुद्द के ए अब्बास यांच्या अखेरच्या दिवसात त्यांचा हॉस्पिटलचा संपूर्ण खर्च अमिताभने त्याला ते समजल्यावर टिनू च्या माध्यामतून केला.या उपर या गोष्टीची वाच्यता सुद्धा कुठेही करायची नाही हे सुद्धा त्याने टिनू ला बजावले.टिनू ने सुद्धा दिलेला शब्द पाळत अब्बास साहेब गेल्यावर २०१३ च्या एका इंटरव्ह्यू मध्ये प्रसंगानुरूप हे सांगितले.... असो...

अमिताभचा आणि टिनू चा विशेष स्नेह जडला तो त्याने त्याचे लागोपाठ ३ सुपर हिट सिनेमे दिल्यावर ... त्याच्या पहिल्या *“कालिया”* च्या वेळची  गम्मत ऐकण्या सारखी आहे. टिनू जेव्हा त्याच्या सिनेमात अमिताभने काम करावे म्हणून त्याच्या मागे फिरत होता तेव्हा अमिताभ त्याच्या करीयरच्या सर्वोच्च उंचीवर होता आणि त्याला शब्दशः खाजवायला सुद्धा वेळ नव्हता.टिनू अमिताभने त्याचे कथानक ऐकावे म्हणून रोज त्याच्या मागे या स्टुडीओ मधून त्या स्टुडिओ मध्ये फक्त फिरत राहायचा. अमिताभला सुद्धा हे कळायचे पण त्याचा हि नाईलाज होता.शेवटी एकदिवस अमिताभलाच अपराधीपणाची जाणीव झाली व त्याने टिनूला हं तुझे कथानक ऐकवं !  म्हणून एका सिनेमाच्या सेटवरच सांगितले.टिनूने सगळे कथानक ऐकवले नि नंतर अमिताभ कडे पाहिले... आणि क्षणभरा नंतर तो अमिताभला तडक म्हणाला कि,मला माहितीये तुला माझ्या चित्रपटाची कथा मनापासून आवडलीये आणि तू हा सिनेमा करतोयस...

अमिताभ टिनू चे ते बोलणे ऐकून अतिशय चकित  झाला नि त्याने टिनूला विचारले कि,पण तुला हे कसे कसे समजले ?

त्यावर टिनू ने दिलेल्या उत्तराने अमिताभ इतका बेहद्द खुश झाला कि,पुढे त्यांचे असोशिएशन कायमचे जमले.टिनू ने त्याला एवढेच सांगितले कि,मला माहितीये कि तुला जर एखाद्या  चित्रपटाचे कथानक आवडले नाही तर तू दिग्दर्शकाने कथानक ऐकवल्या नंतर प्रथम आकाशाकडे बघतोस ,नंतर डोक्यावर हाताच्या बोटांनी तू तुझ्या केसांना हलकेच थापटतोस आणि नंतर समोरच्या दिग्दर्शकाला “ नाही “ म्हणतोस.माझे संपूर्ण कथानक ऐकून झाल्यावर या पैकी तू काहीच केले नाहीस त्या अर्थी तू हा सिनेमा करतोयेस  हे मी लगेच ओळखले.... टिनू च्या या निरीक्षणावर अमिताभ नंतर इतका खुश झाला कि त्याने त्याला त्या वेळी खळखळून हसून मनापासून दाद दिली.....तर असा हा अवलिया नव्हे तर औलादी टिनू आनंद. 

अशा या टिनूने  जरी हिंदी सिनेमात दिग्दर्शक म्हणून जरी नाव मिळवले तरी तो नको-नको म्हणत असतांना देखील काही निर्मात्यांनी  त्याला अभिनेता म्हणून त्यांच्या सिनेमात काम करायला भाग पाडलंय.त्याचा आजचा सीन हा कमल हसनच्या गाजलेल्या पुष्पक या मूक चित्रपटातील आहे.हा सिनेमा सुद्धा टिनूला मिळायचं कारण म्हणजे कमल हसन चा आग्रह आणि अमरीश पुरीची अनुपलब्धता. 
   
पुष्पक बनताना एक दिवस सारिकाचा म्हणजे त्यावेळच्या 🤣😜 कमल हसनच्या बायकोचा टिनू ला फोन आला कि उद्या आम्हांला भेटायला मद्रासला ये.आम्ही पुष्पक नावाने एक मूक चित्रपट काढतोय नि,कमल ने कुठल्याश्या मासिकांत म्हणे तुझा एक फोटो पाहिलाय आणि आता अमरीश पुरीच्या तारखा नसल्याने तो त्याच्या जागी व्हिलन म्हणून तुला घेतोय.तर तू लगेच निघ.  

टिनू ने तिला बरेच समजवायचा प्रयत्न केला कि,अगं मी आत्ता अमिताभला घेऊन शहेनशाह नावाचा मोठा सिनेमा करतोय नि मी त्याचा डायरेक्टर आहे.मी त्यात अॅक्टिंग करत नाहीये.पण सारिका त्याचं काही ऐकून घ्यायच्या मनःस्थितीत नव्हती ती म्हणली कि ते तू मला काही सांगू नकोस ,कमलचा तसा मला निरोप आहे ...आणि तू उद्या ये. टिनू धर्मसंकटात सापडला. अमिताभच्या तारखा तर घेतलेल्या नि इकडे हे हुकुमवजा प्रेमाचं बोलावण.संध्याकाळी भीत-भीत टिनू ने हि बाब अमिताभच्या कानावर घातली व त्याला विचारले कि,आता मी काय करू ते सांग .
अमिताभने त्याला शांत केले नि सांगितले कि,” काही काळजी करू नकोस तू उद्या जाऊन ये मी तुला पुढच्या तारखा देतो.पण   कमल ची ही संधी वाया घालवू नकोस.टिनू त्या प्रमाणेच वागला नि कॉमिक व्हिलन या पद्धतीची एका वेगळ्या पद्धतीची भूमिका टिनू ला करायची संधी मिळाली.टिनू ने त्या संधीचे अर्थातच सोने केले हे वेगळे सांगायला नको.


........लेख बराच मोठा होऊन ताणला गेलाय ते मला कळतंय पण तरी  या निमित्ताने पहा ... त्या पुष्पक मधील टिनू आणि कमल हसनचा एक मस्त सीन.
ता.क. (ताजा कलम)
हा पुष्पक त्या काळी कमल हसनचा मूक चित्रपट होता सुंदरच.पण संपूर्ण देशात तो त्याच्या वेगळेपणा बरोबरच “बिन मिशीचा  हंड्सम कमल हसन “ पहायला लोकांनी केलेल्या तुफान गर्दी मुळे देखील गाजला होता... पहा तर मग....👇 आजच्या लेखासाठी सहकार्य २०१३ मधील रेडीफ डॉट कॉम वरील टिनू आनंद  यांची प्रदीर्घ मुलाखत : मनःपूर्वक धन्यवाद 


1 टिप्पणी: