भोज्जा

बुधवार, ७ मार्च, २०१८

संगीतकार कल्याणजीं मधील आनंदजी

मध्यंतरीची  २ फेब्रुवारी म्हणजे होळी आणि त्या बरोबरच संगीतकार कल्याणजी-आनंदजी जोडगोळीतील आनंदजी यांचा तेव्हां वाढदिवस होता.ते त्या दिवशी  ८४ वर्षांचे झाले.तरुण पिढीला ते माहित आहेत ते त्यांच्या डॉन मधल्या “ ये मेरा दिल,प्यार का दिवाना" आणि मै  हूं मै हूं मैं हूं  डॉन  मुळे.पण वास्तवता अशी आहे कि,त्यांनी डॉनच्या अगोदर आणि नंतर सुध्दा असंख्य सुश्राव्य गाणी  आज वर केलेली आहेत. 

कच्छ गुजरातमधल्या एका ग्रोसरी,किराणामाल दुकानदाराचा कल्याणजी हा मोठा मुलगा आणि धाकटा मुलगा आनंदजी हि गुजराथी मुले.त्यांचे वडील कच्छ मधून धंद्यात नशीब काढायला मुंबईत आले आणि थेट गिरगाव मधल्या मराठी वस्तीत रमले.दोन्ही भावांचे बालपण नि तारुण्य गिरगाव मध्ये गेल्याने गुजराथी कुटुंबात जन्म घेऊन देखील आनंदजी अतिशय उत्तम मराठी बोलतात.... कदाचित कित्येकांना  हे माहित देखील  नाही.

हिंदी सिनेमा क्षेत्राची नि संगीताची कोणतीही पार्श्वभूमी नसतांना गिरगावातील त्या काळीचे उच्चप्रतीचे सामाजिक,बौद्धिक आणि सांगितीक वातावरण त्यांना संगीताची गोडी लावायला कारणीभूत ठरले.संगीतकार म्हणून १९५४ ते १९९६ या  त्यांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत त्यांनी सर्वप्रकारचे फिल्मी,राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवले आहेत.आणि आजच्या तारखेला एक यशस्वी निवृत्ती जीवन ते अतिशय आनंदाने जगत आहेत. 

आपल्या ४२ वर्षाच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी दिलीपकुमार,अमिताभ,अनिल कपूर,विनोद खन्ना, रेखा ,श्रीदेवी या सारख्या बिनीच्या कलाकारांना घेऊन देशात आणि परदेशात असंख्य सांगीतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून देशातील आणि परदेशातील असंख्य समाजसेवी संस्थांना शब्दशः करोडो रुपयांची रुपयांची देणगी मिळवून दिली आहे.

संगीताप्रती त्यांच्या असलेल्या निष्ठेने  त्यांना फक्त येथेच थांबवले नाही तर त्यांनी नवोदित गायक-गायिकांच्या साठी   स्वतःची सांगीतिक अकादमी सुरु करून तरुण पिढीस त्यांचा संगीतातील प्रवास सुकर होण्यास प्रचंड मदत केली आहे.मार्गदर्शन केले आहे.त्यांनी हिंदी सिनेमात प्रथम ब्रेक  दिलेले गायक गायिकांची यादी तर इतकी भली मोठी आहे कि ती वाचतांना आपण थकतो.

कुमार शानू,अलका याद्निक, साधना सरगम,मनहर उदास,सपना मुखर्जी, उदित नारायण ,सुनिधी चौहान यांचे संगीतातील प्राथमिक शिक्षण आणि गायक-गायिका म्हणून ब्रेक कल्याणजी-आनंदजी यांच्या माध्यमातूनच झाला आहे.भारतीय सिने संगीताच्या सुवर्णयुगातील सर्वच्या सर्व प्रमुख गायकांच्या सोबत त्यांनी २५० हून अधिक सिनेमात असंख्य कर्णमधुर गाणी दिली आहेत.

आजचे त्यांचे कर्णमधुर गाणे शशी कपूर –शर्मिला टागोरच्या “आमने सामने” मधून घेतले आहे.आता या आमने सामने मुळे थोडे विषयांतर होतेय पण तरी सांगतोच ज्याचा कल्याणजी-आनंद्जीं सोबत शून्य संबंध आहे 
.. पण या गाण्यात सुद्धा शशी कपूर त्याच्या कपूर खानदानाच्या “तब्येतीच्या खासियतीला “ जागलाय.ही कपूर मंडळी म्हणजे हिंदी सिनेमातली  एक गम्मतच आहेत. त्यांना यश मिळायला सुरुवात झाली कि ,त्यांची कमरेखाली वाढ व्हायला  सुरवात होते.हे या मंडळींचे वैशिष्टय....या गाण्यात सुद्धा पहा , शशी कपूरच्या खांद्या पेक्षा त्याचं सीटच  जास्त बाहेर आलंय ... आत्ताच्या पिढीतला रणबीर कपूर हे सर्व जाणून आहे कारण त्याला हे माहित आहे कि,आपल्या बापजाद्यांना प्रेक्षकांनी असं सहन केले पण आत्ताची तरुण पिढी मात्र ते खपवून न घेता त्याच्या , त्याच ढुंगणावर लाथ घालेल. 😜

रणबीर कपूरचं सोडा पण या गाण्यात मात्र  त्या “ वाढता-वाढता वाढे ,भेदिले शून्य मंडळा”  अशा शशी कपूरला सहन कराच...प्लीज....  

त्या सोबत दुसरे असे सांगणे कि,शशीकपूर गाण्याच्या काही कडव्यात बूट घातलेला दिसतो  तर  काहीत अनवाणी ? हे कसे ? तर  त्याचे उत्तर  अतिशय सोप्पे आहे ,सिनेमाची नायिका शर्मिला ही सुद्धा संपूर्ण गाण्यात पूर्ण अनवाणी आहे...बहुदा त्या वेळी ती तिच्या  चित्रपटातील आई-बापाला फसवून,त्यांचा डोळा चुकवून  आलेच जाऊन इथे असं सांगून घरातून बाहेर पडली असावी व इकडे दऱ्या खोऱ्यात येऊन गाणी गात बसली असावी... असो... 

...... आता कल्याणजी- आनंद्जींचे ते अप्रतिम गाणे पहा.👇


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा