भोज्जा

गुरुवार, २६ एप्रिल, २०१८

"रिमझिम गिरे सावन" वाली मौसमी चॅटर्जी

आज २६ एप्रिल ,मौसमी चटर्जी आज सत्तरीची झाली...”शतायुषी भव !” अशी तिला हार्दिक शुभेच्छा ! ... 

तिचा आणि  अमिताभचा  “मंझिल” पिक्चर तुम्हाला आठवतोय ? हो तोच “रिम झिम गिरे सावन “ फेम... ! आज त्या सिनेमाच्या निर्मितीच्या कहाणी  सोबत त्याच्यातील त्या  हिट गाण्याच्या शूटिंगच्या वेळची  अधिकृत कहाणी ... तुमच्या साठी ...  

मंझिल पिक्चर रिलीज जरी १९७८-७९  ला झाला तरी मुळात तो  प्रचंड रखडलेला पिक्चर होता...त्याचे शूटिंग “जंजीर”(१९७२) यायच्या अगोदर म्हणजे  अमिताभ जेव्हा कोणी ही नव्हता तेव्हा सुरू झाले होते.. अमिताभला हा पिक्चर जया भादूरीने त्याच्यावरच्या प्रेमापोटी तिचे वजन वापरुन, दिग्दर्शक बासू चटर्जीला अमिताभला घ्यायची गळ घालून मिळवून दिला होता...त्यात अमिताभचे क्रेडिट शून्य होते...  पण नेमके झाले असे कि, जंजीरच्या अगोदरचे  अमिताभचे तेव्हाचे आलेले जवळपास सगळे पिक्चर इतके सपाटून आपटले की,या पिक्चरच्या निर्माता त्रिकुटाने सिनेमाचे थोडेफार शूटिंग झालेले असताना सुद्धा सगळेच पैसे डुबायचा धोका नको म्हणून इतर निर्मात्यांनी जसे अमिताभ सोबतचे सिनेमे त्या काळी  बंद केले होते तसा त्यांचा हा सिनेमा देखील डबा बंद करून टाकला कारण निर्माते म्हणून एकतर त्यांचा हा पहिला सिनेमा ,आणि तो सुद्धा त्यांनी बासू चटर्जी केवळ कमी पैशात सिनेमा करतो म्हणून सुरू केलाला असा ...

पण १९७२ ला अमिताभचा प्रथम जंजीर आला नंतर ७३ला मजबूर,७५ला दीवार आणि नंतर शोले आला आणि सगळी गणितच बदलून गेली...नुसत्या अमिताभच्या एकट्याच्या नावावर पिक्चर चालायचे दिवस आले... त्या मुळे  त्या मंझिलच्या निर्माता त्रिकुटास त्यांनी  त्यांच्या डबाबंद केलेल्या  पिक्चरची आठवण झाली .... त्यांनी बासूला गळ घालत,अमिताभचे पाय धरत  पुन्हा पिक्चर सुरू करायला लावलं आणि त्या मुळेच निर्मिती दरम्यान मधे प्रचंड गेलेला कालावधी हा चित्रपट पहाताना लगेच लक्षात येतो... सुरवातीचा अमिताभ आणि सुरवातीची मौसमी यांच्या तब्येती आणि नंतरच्या तब्येती यात बर्‍यापैकी तफावत आहे तर असा  हा निर्मिती दरम्यानचा  कंटीन्यूटी नसलेला अमिताभचा  पिक्चर १९७९ला रिलीज झाला आणि विशेष म्हणजे निर्मात्याचे “अमिताभ लाटेत “ फक्त त्याच्या एकट्याच्या नावावर उखळ पांढरे करून गेला...

त्याच सिनेमातील गाजलेले हे खालील गाणे “रिम झिम गिरे सावन “ मौसमीला आणि अमिताभला जेव्हा पब्लिकला ओळखता येत नव्हते  तेव्हाचे होते ... ते गिरगाव चौपाटी आणि फोर्ट मधे सलग तीन दिवसाच्या खर्‍याखुर्‍या पावसात शूट झाले होते ...त्या वेळचे वैशिष्ट्य म्हणजे अमिताभ हा पडेल हीरो म्हणून निर्मात्यांमध्ये अप्रिय होता पण त्या काळातील इतर हिरोइन्सला मात्र  तो जया (भादूरी)ची प्रॉपर्टी आहे हे माहीत असून ही त्यांच्या साठी तो  “ हॉट प्रॉपर्टी” होता...आणि मौसमी सुद्धा त्याला अपवाद नव्हती...ती पण अमिताभवर लट्टू होतीच त्या मुळे  तिचे आणि अमिताभचे सूर सुद्धा  त्या काळी मस्त  जमले होते. 

या गाण्याच्या  शूटिंग तिसर्‍या म्हणजे शेवटच्या दिवशी ते जवळपास संपत आले असताना दुपारच्या लंचब्रेक मधे मौसमी दिग्दर्शक बासू चटर्जी जवळ बोलली कि , “हे इतके मस्त जमून आलेले प्रेमगीत पडद्यावर हीरो-हिरोईन गाताहेत असं तुम्ही दाखवणार आहात पण केवळ हात हातात घेण्या पलीकडे त्यांच्यात असणारी जवळीक पडद्यावर  व्यक्त होतांना दिसत नाहीये .. त्या मुळे त्यांच्यातील प्रेम दाखवण्या साठी गाण्यात अमिताभने मला किमान उचलून घेतलय एवढं तरी तुम्ही दाखवाच... मला ते  या गाण्यात  हवय ... तिने जणू हट्टच धरला .....

आता बासूची पंचाईत झाली ..कारण एक तर मौसमी पडली सिनेमाची नायिका ... त्यातून तिने स्वतःहून ही केलेली मागणी पण  सिनेमाच्या स्टोरीत मात्र नायक-नायिकेची अशी अंगाची झटा-झटी  अपेक्षित नाही कारण नायक –नायिका एकमेकाला प्रथमच भेटत असल्याने त्यांची इथवर मजल गेलेली दाखवणे हे  गाण्यात दाखवता येत  नव्हते ... पण तिकडे मौसमी तर हटून बसलेली ... या सगळ्या मधली सर्वात महत्वाची गम्मत म्हणजे  इकडे अमिताभला ,म्हणजेच चित्रपटाच्या नायकाला  दिग्दर्शक आणि नायिके मधे काय शिजतय ह्याच्यातील ओ का ठो माहीत नाही ... तो पूर्णपणे अनभिज्ञ ... आणि बासूला  ते  अमिताभ जवळ सुद्धा बोलता येईना... शेवटी त्याने सुवर्ण मध्य साधत गाण्यात अमिताभने मौसमी त्या फोर्ट मधील समुद्र कठड्या वरून चालताना तिला   हात देत व नंतर  वरुन खाली उतरवताना तिला उचलून खाली ठेवले आहे असे  गाण्यात दाखवले व दिग्दर्शक या नात्याने त्याच्या नायिकेचा “हट्ट” पूर्ण केला ... गाण्यात तो प्रसंग साधारण पावणे दोनव्या मिनिटाला येतो...आणि तो जसा घडला तसाच ठेवलाय....  पहा तर मग...

मला माहितीये ,हे गाणे तुम्ही आजवर बर्‍याचदा ऐकले आणि बघितले आहे पण आता त्या अमिताभने मौसमीला “उचलून घेतलेल्या” शॉट साठी तुम्ही ते आत्ता परत पहाणार ...

आजच्या लेखासाठी अनिता पाध्ये यांच्या "यही है जिंदगी" या पुस्तकाचा संदर्भ घेतला आहे... हिंदी सिनेमाची आवड असणाऱ्यांनी एकवार जरूर वाचून संग्रही ठेवावे असे मराठी पुस्तक... धन्यवाद पाध्ये मॅडम ...  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा