भोज्जा

बुधवार, ११ एप्रिल, २०१८

माशाने गिळलेले माणिक : प्रिया राजवंश

समुद्रातील माशाने गिळलेले माणिक जसे पुन्हा कधी मिळू शकत नाही तसे काहीसे हिच्या म्हणजे प्रिया राजवंशच्या  आयुष्याचे झाले... *अभिनेत्रीचा बाथरूम मधील संशयास्पद मृत्यू* याचे  प्रिया राजवंश हे    हिंदी  सिनेमा सृष्टीतील पहिले उदाहरण आहे. १९७०- ८० च्या दशकात अवघ्या ६ सिनेमांतून दिसलेली पण तेव्हाच्या लोकांच्या  तरीही  लक्षात राहिलेली आणि पडद्यावरच्या पेक्षा प्रत्यक्षात जास्त सुंदर,देखणी आणि खानदानी दिसणारी आणि असणारी ही अभिनेत्री.     

सिनेअभिनेत्री असूनसुद्धा प्रिया तिच्या चित्रपट कारकिर्दी पेक्षा प्रेक्षकांच्या स्मरणांत मात्र भलत्याच कारणानें लक्षात राहिली हे मात्र तितकेच खरे.  त्याचे कारण म्हणजे यशस्वी आणि उत्कृष्ट  लिव्ह इन रिलेशनशिप चे भारतीय चित्रपट सृष्टीतील एकमेव उदाहरण म्हणजे प्रिया राजवंश-चेतन आनंद हि जोडी. तसे बघितले तर दोघांच्या वयात तब्बल १६ वर्षांचे अंतर पण तरी हि ३० वर्षाहून अधिक काळ म्हणजेच चेतन आनंदच्या मृत्यू पर्यंत चेतन आनंद-प्रियाचे  नाते अतिशय अतूट आणि अभेद्य राहिले.त्यातल्या प्रिया राजवंशाचा मागच्या महिन्यात २७ मार्चला १८ वा स्मृतिदिन होता.  
  
प्रिया राजवंश चा हिंदी सिनेमांत प्रवेश तसा म्हणला तर अपघातानेच झाला.कारण सिमल्या सारख्या नयनरम्य ठिकाणी स्वातंत्र्यपूर्व काळात फॉरेस्ट ऑफिसर म्हणून काम करणाऱ्या सुंदर सिंग यांची हि मुलगी ,हिचे खरे नाव "वीरा" सिंग. त्यांच्या कुटुंबाचा आणि चित्रपट क्षेत्राचा दूर-दूर संबंध नव्हता.पण सिमल्यात कॉलेजमध्ये शिकतांना इंग्रजी नाटकातून कामे करत हि कॉलेजचे सेन्सेशन बनली आणि कॉलेजातील मुलेच ,हि पुढे जाऊन हिंदी सिनेमांत आघाडीची अभिनेत्री होणार अशी अटकळ बांधायला लागले. पण झाले भलतेच.

हिच्या वडिलांची इंग्लंड मध्ये बदली झाली नि हि लंडनला गेली. तिथे नाट्यक्षेत्रातील डिप्लोमा करतांना १९५८  साली ,हिच्या २२व्या वर्षी एका फोटोग्राफरने काढलेला तिचा फोटो काही एक कारणाने चेतन आनंद म्हणजे देवानंद यांच्या मोठ्या भावा पर्यंत १९६२  सुमारास पोहोचला. ते तेव्हा त्यांचा भारत-चीन युद्धावरील आधारित "हकीकत " हा सिनेमा......  जो पुढे जात प्रचंड हिट झाला तो बनवायच्या विचारात होते.त्या हकीकत साठी चेतन यांनी लीड हिरॉईन म्हणून *वीरा* ची निवड करत तिच्या  खानदानी सौंदर्याला साजेसे तिचे नामकरण "प्रिया राजवंश " म्हणून केले आणि प्रियाचा फिल्मी प्रवास सुरु झाला. 

हकीकत रिलीज झाला ,हिट सुद्धा झाला आणि १९६४च्या सुमारास उमा सोबतच्या ११ वर्षांच्या संसाराला वैतागलेल्या चेतन यांनी वेगळे रहायचा निर्णय घेतला आणि प्रियाने त्यांना साथ द्यायचा निर्णय घेतला. लौकिक अर्थाने हि साथ विवाह बंधनात कधीच अडकली नाही पण प्रियाने चेतनशी आयुष्यभर संपूर्ण एकनिष्ठ रहात त्याच्या १९९७च्या मृत्यू पर्यंत त्याला साथ दिली.चेतन आनंदच्या सिनेमांच्या व्यतिरिक्त प्रियाने तिला असंख्य संध्या येऊनही बाहेरच्या कोणत्याही सिनेमात आयुष्यात कधी काम केले नाही.यातच सगळे आले  कि,तिची साथ काय होती ते !  आपल्या पेक्षा वयाने १६ वर्षांहून मोठ्या असलेल्या चेतन आनंदवर प्रियाने निस्सीम प्रेम केले. चेतनने सुद्धा त्याच्या प्रियावरील निस्सीम प्रेमाला जागत बांद्र्या मध्ये त्या काळी तिच्या साठी प्रथम फ्लॅट घेतला व नंतर तिला  सुंदर बंगला बांधून दिला व तिच्या  संपूर्ण आयुष्याची जबाबदारी स्वीकारली व निभावली.  

प्रियाचे आणि चेतनचे हे आगळे-वेगळे नाते ,आनंद कुटुंबाने सुद्धा त्याला मान्यता देत मनोभावे जपले. पण १९९७ला चेतन आनंद गेला आणि नंतर सगळेच बदलले.प्रिया आणि चेतन यांना कोणतीही संतती नव्हती  आणि चेतनच्या कुटुंबीया सोबत १९६४ पासून निरोगी नाते  जपल्याने प्रियाने सुद्धा नंतर चेतनने तिला बांधून दिलेल्या बांद्र्यातील बंगल्यात त्याच्या दोन मुलांची नावे  लावण्यास सुद्धा संमती दिली होती पण बाप गेल्यावर चेतनच्या दोन्ही मुलांची बुद्धी फिरली व त्यां दोघांनी प्रियाच्या बंगल्यातील दोन्ही नोकरांना हाताशी धरून वयाची साठी उलटून गेलेल्या प्रियाला अपमानास्पद वागणूक देत प्रॉपर्टीवरून त्रास द्यायला सुरवात केली.

हा सगळा प्रकार पहाता "गुल " या प्रियाच्या भावाने तिला सगळे सोडून तू लंडनला निघून ये असे हि सांगून पाहिले  कारण आई-वडील गेल्यावर प्रियाचा एक भाऊ इंग्लंडला व एक भाऊ अमेरिकेत सेटल झालेले होते आणि तसेही आता इथे भारतात तिचे आपले असे  कोणीच  नव्हते. चेतन आनंदच्या मुलांचे वर्तन पहाता आणि उतारवयात भावांवर भार होण्या पेक्षा तिच्या वाट्याचा बंगल्याचा भाग किंवा संपूर्ण बंगला विकून तिच्या वाट्याचा मोठा असा तिसरा आर्थिक हिस्सा पदरात पाडून  घेऊन प्रिया तिच्या  सिमल्यातील मोठ्या बंगल्यात तिचे उर्वरित आयुष्य काढायचा विचार करत होती.

पण बापाच्या माघारी मिळालेल्या प्रॉपर्टीच्या आणि तिच्यातून  मिळू शकणाऱ्या प्रचंड संपत्तीच्या अति हव्यासापोटी दोन्ही मुलांनी २७ मार्च २००० साली रात्रीच्या वेळी तिच्याच बाथरूम मध्ये त्याच बंगल्यातील २ नोकरांच्या मदतीने खून केला आणि तिच्या अपघाताचे नाट्य रचले.पण चेतन आनंद यांचा धाकटा भाऊ विजय आनंद यांच्या नावे प्रियाने लिहून ठेवलेले एक पत्र आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्याच बंगल्यात घटनेपूर्वीच्या काळात  घरगडी म्हणून काम करणारा  १६-१७ वर्षीय सुरेश अरुमुघम याची साक्ष महत्वाची ठरली आणि सदरहू खुनातील सर्व आरोपींना आजन्म सक्तमजुरीची कारावासाची शिक्षा झाली.... असो.                     

    
 थोडक्यात काय तर अवघ्या ६ सिनेमांत काम केलेल्या या अभिनेत्रीने २०१८ मधे चित्रपट कथेची वानवा असलेल्या हिंदी सिनेमा नव लेखकांना तिच्या मरणाने सुद्धा पैसे कमवायची संधी उपलब्ध करून दिली. तिच्या आयुष्यावरील येऊ घातलेल्या सिनेमांत प्रिया राजवंशच्या रूपात सोनाक्षी सिन्हा म्हणे प्रमुख भूमिकेत दिसणार आहे असे समजते.


अशा या प्रियाचे आजचे गाणे हे त्या काळी एक प्रचंड गाजलेले पण ऑल टाईम हिट गाणेच आहे हे वेगळे सांगायला नकोच.... विशेष म्हणजे प्रत्यक्षात यातील हीरो हा वयाने तिच्या पेक्षा त्या वेळी १० वर्षांने लहान होता .. पण वाटत नाही तसे यातच प्रियाचे सौंदर्य आले…..जाता जाता अजून फक्त एवढेच सांगतो कि चेतन आनंद-प्रिया राजवंश या मुलुखा वेगळ्या जोडीचे सर्व सिनेमे हे राजवंश या तिच्या  इंग्रजी नावातल्या त्यातल्या शेवटच्या या अक्षरावरून म्हणजेच  *ह* या नावाने सुरुवात होणारेच आहेत. उदा. हकीकत,हिर-रांझा ,हसते-जख्म  वगैरे.... चेतन आनंद आयुष्यभर तिच्या प्रेमाला किती जागला होता त्याचे हे अनोखे आणि अतिशय दुर्मिळ उदाहरण होय...   


  



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा