जर्मनी हा देश औद्योगिकदृष्ट्या प्रचंड प्रगत देश आहे. बेन्झ,बी एम डब्लू ,सिमेन्स हे जगप्रसिद्ध ब्रान्ड सुद्धा इथलेच. अगदी अणुभट्टी साठी लागणारे पंप सुद्धा इथे एखाद्या छोट्या शहरामध्ये सुद्धा बनतो अन त्यांच्या प्रचंड प्रगतीची साक्ष देतो.
इथे यायच्या अगोदर वरील सगळ्या पार्श्वभूमीमुळे,इथले लोक हे अतिशय चैनीचे अन छानछोकीचे जीवन जगत असणार हा माझा स्वाभाविक समज होता,अन त्यात काही गैर सुद्धा नव्हते
मी जेव्हा जर्मनीतील दुसऱ्या अन युरोपमधील आठव्या क्रमांकाच्या मोठ्या शहराला म्हणजेच हॅम्बर्गला जेव्हा पोहोचलो ,तेव्हा तेथे माझ्या मित्रांनी माझ्या स्वागताच्या जय्यत तयारीचा एक भाग म्हणून एका रेस्टॉरंटमध्ये भोजन समारंभाचे आयोजन केले होते.
आम्ही जेव्हा हॉटेल मध्ये पोहोचलो तेव्हा फारशी गर्दी अशी नव्हतीच.बरीच टेबले अजून रिकामीच होती.कोपऱ्यातल्या एका टेबलावर एक तरुण जोडपे जेवत बसले होते.समोर फक्त दोन बियरचे कॅन अन दोन डिशेस,...बसं... इतक्या मस्त अशा ह्या तरुण जोडप्याचे हे असे एवढेसे जेवण, 'हे' रोमँटिक जेवण इथे ह्यांच्या देशात असूच कसे शकते ह्या कल्पनेनेच मी चकित झालो.हे सगळ बघून "सालं ह्या चिक्कू प्रियकराला हे सगळ पाहून हि पोरगी सोडून तर जाणार नाही ना?" असा हि विचार क्षणभर माझ्या डोक्यात उगीचच येऊन गेला.
एक म्हाताऱ्या बायकांचा कंपू ,दुसऱ्या एका टेबलावर ,जेवणावर ताव मारत बसला होता.वेटर डिश घेऊन आला कि त्याचे प्रत्येकाला व्यवस्थित वाटप करून तो, ते, त्यांच्या डिश मध्ये वाढत होता नि त्या सुद्धा अगदी मन लाऊन चवीने त्याचा आस्वाद घेत त्याचा अगदी चाटून पुसून फन्ना उडवीत होत्या.
अर्थात ह्या गोष्टींकडे आम्ही फार लक्ष हि दिल नाही नि त्याची आम्हाला काही गरज हि नव्हती म्हणा,नि आमच्या पोटात कावळे कोकलत असल्याने,आमच्या तेथल्या तात्पुरत्या स्थानिक अशा भारतीय मित्राने आमच्या जेवणाची ऑर्डर, ती सुद्धा जरा जास्तीचीच अशी, आधीच देऊन ठेवली होती नि खरे तर आम्ही त्याची आतुरतेने वाट पाहत होतो.हॉटेलात फारशी गर्दी नसल्याने वेटरने आमचे जेवण सुद्धा तसे बऱ्यापैकी लौकरच आणले नि आमचेसुद्धा जेवणानंतरचे पुढचे कार्यक्रम आधीच ठरलेले असल्याने आम्ही तेथे फार वेळ दवडू हि इच्छित नव्हतो.अन त्या मुळे आम्ही घाईघाईत जेवण जेऊन,काही तसंच टाकून, तेथून पटकन निघायच्या गडबडीत होतो.
जेवणाचे बिल देऊन जेव्हा आम्ही हॉटेलच्या बाहेर पडलो तेव्हा,थोडे पुढे गेल्यावर आम्हाला मागून कोणी तरी आवाज दिल्या सारखे वाटले म्हणून आम्ही मागे वळून बघितले तर हॉटेल मॅनेजर आम्हालाच परत बोलावत होता." आता ह्याचं अजून काय रहायलय"?असं मनातल्या मनात म्हणत आम्ही परत हॉटेलमधे गेलो तर मघाशी बघितलेल्या त्या म्हाताऱ्या बायका बिलिंगकौंटरपाशी मॅनेजरशी आमच्या बद्दलच काहीतरी बोलत होत्या.आम्ही विचारणा केल्यावर आम्हाला कळले कि,आम्ही आमच्या ताटात अन टेबलावर बरेच पदार्थ तसेच ठेऊन दिल्याने,टाकल्याने त्या नाराज झाल्या होत्या......ह्या बायका निरुद्योगी असल्याने बहुदा त्यांची हि फुकटची लुडबुड असावी असे आम्हाला क्षणभर वाटून गेले.
"अहो आम्ही त्याचे पैसे तर दिलेय ना?" आमच्या मित्राने त्यांना समजावणीच्या सुरात सांगण्याचा प्रयत्न केला.
मात्र हे ऐकल्यावर,अनपेक्षितपणे त्यातील एकीचा पारा असा काही चढला म्हणता कि तिने पटकन पर्स मधून फोन काढला नि कोणालातरी नंबर घुमवला.पुढच्या काही क्षणात दोन गणवेशधारी इसम आमच्या पुढ्यात येऊन उभे ठाकले.चौकशीअंती कळले कि ते तेथील "सामाजिक सुरक्षा संस्थेचे" अधिकारी आहेत.आमच्या वादाचे कारण शांतपणे ऐकून घेत त्यांनी आम्हास ५० मार्कचा दंड जागेवरच ठोठावला.आम्ही तर पुरते गपगार पडलो.
फार काही न बोलता आमच्या मित्राने पाकिटातून ५० मार्कची नोट काढून देत,झाल्या प्रकारा बद्दल त्याची क्षमा मागितली.
दंडाची पावती बनवून देत त्याने आम्हाला कडक शब्दात सुनावले "मिस्टर,ह्या पुढे कुठेही गेल्यावर तेवढेच मागवा जेवढे तुम्ही खाणार आहात,अन पैसा भले तुमचा असेल पण त्याच्या उगमस्रोताची मालकी समाजा कडेच आहे(हे लक्षात ठेवा).जगात असे बरेच लोक आहेत ज्यांना धड एक वेळ सुद्धा पोटाला काही मिळत नाही,त्या मुळे अन्नाची अशा प्रकारे नासधूस करण्याचा तुम्हाला कोणताही अधिकार नाही,भले तुम्ही त्याचे पैसे का दिले असेनात."
ह्या इतक्या प्रगत देशातील सर्वसामान्य नागरिकांची ही विचारसरणी नि मानसिकता बघून आमच्या माना तर झाल्या प्रकाराने शरमेने पार खाली गेल्या.लहानपणी सांगितलेले "खाऊन माजा पण टाकून माजू नका"हे आम्ही पुरते विसरलो होतो.त्या अधिकाऱ्यांशी सहमत न होण्याचा कुठे प्रश्नच नव्हता.त्यांचे बोलणे आम्हाला मनापासून पटले होते.
खरे तर आपण अशा देशात राहतो कि,जिथे मुळात उगमस्रोताचीच कमतरता आहे,पण आपण मात्र आपल्या डोळ्यांवर पट्टी बांधलीय नि कानात बोळे घातलेत.आपण आपल्या वाईट सवयी बदलण्याचा विचार करून,त्या साठी प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे हा धडा मात्र आम्हाला ह्या झाल्या प्रसंगातून मिळाला.
आमच्या त्या मित्राने तर नंतर त्या दंडाच्या पावतीची फोटोकॉपी काढून ती आम्हा सर्व मित्रांना"स्मरण भेट" म्हणून पाठवून दिली,कि ह्याच्या साठी कि "अशी चूक पुन्हा आयुष्यात कधी न होण्यासाठी"
"अशी चूक नकोच नाही का?" ह्या पोस्टचा मराठी स्वैरानुवाद सौ.जय ईलँगो ह्यांचे सौजन्याने ( Thanks Mrs Jay Mam ) |
मित्रांनो ,
उत्तर द्याहटवाखरे तर म्यानेजर ,रोम्यांटिक,ऱ्या, हे किंवा बरेच असे काही शब्द जे मराठीत असे लिहित नाहीत, पण गुगलच्या मराठी टायपिंगला मला अजून योग्य पर्याय न मिळाल्याने इथे मराठीची "ही" अशी दुर्दशा उघड्या डोळ्यांनी पहावी लागत आहे.त्या बद्दल क्षमस्व.भारतीय इतर भाषां मध्ये सुद्धा अशीच परिस्तिथी असेल कि नाही ह्या बाबत माझ्या मनात शंका आहे. खास करून दाक्षिणात्य भाषां मध्ये.ते लोक तर त्यांना अशा चुकांसाठी फाडून खातील.बहुदा देवनागरी म्हणजे फक्त हिंदी असा गुगलवाल्यांचा गैरसमज असावा असे वाटते. त्या मुळे कित्येक मराठी जोडाक्षरे लिहिताना अक्षरशः फे फे उडते नि प्रचंड वेळ वाया जातो. असो.आपल्या येथील भेटी बद्दल आभारी आहे. धन्यवाद.
अगदी सर्व साधारण दिसणारी मुलगी किंवा बाई,तिला बाहेर जातांना नीटनेटक नटून थटून झाल्यावर सुद्धा ३-३ दा परत आरशात पहातेच,आणि कुठं काय कमी राहील का? किंवा हे करून बघितलं तर अजून बरं दिसेल का? जरा अजून बरं वाटेल का? ह्याचा स्वाभाविक विचार करतेच.तद्वत ह्या म्यानेजरने,क्यानने,ह्याम्बर्गने,काऊनटरने माझे डोके खाल्ले.सालं खटकतच राहिलं.शेवटी ईकडन तिकडनं युनिकोड मध्ये जाऊन शेवटी त्याचा महंमदचा महादेव केला नि जीवाला थोडी शांतता मिळाली.मॅनेजर,कॅन,हँबर्ग,काऊंटर हे नि अशा पद्धतीचे जोडशब्द लिहिते वेळी गुगलच्या युनिकोडचा नक्कीच उपयोग होतो हे मान्य करावेच लागेल.तरी रेस्टोरंटने अजून पालथे पडले आहे ते आहेच. ऑ काही केल्या अजून जमला नाहिए. नशीब फ्रेंच रेस्तोरो पेक्षा हा बरां.असो. तरं सांगायचा मूळ मुद्दा काय कि आपल्या पैकी बऱ्याचजणांची मराठीतून लिहितांना किंवा कॉमेंट देतांना,अगदी मनातून ईच्छा असून सुद्धा, लिहायची पंचाईत होते अशांनी http://www.google.com/transliterate/marathi हि लिंक त्यांच्या कडे आवर्जून सेव्ह करून ठेवावी.चांगली आहे.उपयोगी पडते/पडेल. एकदम मस्त बिस्त ह्या साठीच म्हणले नाही कारण काही मोजक्या शब्दांशी अजून आट्या-पाट्या चालूच आहे. पण निदान "समथिंग ईज बेटर दॅन अजिबात नथिंग".तुका म्हणे त्यातल्या त्यात.
उत्तर द्याहटवा