भोज्जा

रविवार, २५ मार्च, २०१८

*तो* मोक्याचा क्षण



तिरंदाजीच्या असंख्य स्पर्धा जिंकल्या मुळे त्याचा अभिमान वाटण्या ऐवजी  गर्व असणाऱ्या एका तरुण तिरंदाजाने एका झेन तत्ववादी वयस्कर तिरंदाजास एकदिवस त्याच्या सोबत तिरंदाजीच्या स्पर्धेचे थेट आव्हान दिले.

असंख्य स्पर्धा जिंकलेल्या त्या तरुण तिरंदाजाचे नेमबाजीतील कौशल्य वादातीत होते ह्यात शंकाच नाही. कारण त्याने त्याच्या पहिल्याच बाणाने दूर झाडावर बसलेल्या एका पक्षाच्या डोळ्याचा नेमका वेध घेतला, .... आणि दुसऱ्या बाणाने त्या पहिल्या सोडलेल्या बाणाचे दोन तुकडे करून, छाती थोडी पुढे काढत त्याच्या हातातील ते धनुष्य त्या वयस्कर तिरंदाजांच्या हातात देत ....

" हं ! आता तुमची पाळी",बघा तुम्हांला जमतंय का ते  ?

असे म्हणत धनुष्य वयस्कर माणसा समोर ठेवले.

म्हाताऱ्याने त्याच्याकडे बघितले आणि अतिशय अविचल रहात,धनुष्याला हात सुद्धा न लावता फक्त त्या तरुण तिरंदाजाला नजरेने त्याच्या मागून यायला सांगितले आणि तो    शेजारचा उंच डोंगर चढायला लागला.

तो तरुण तिरंदाज चकित होत त्याच्या मागून चालायला लागला.तो उंचच -उंच डोंगर चढताना त्याची थोडी दमछाक होत होती, पण हा  म्हातारा आता काय करणार हि उत्सुकता त्याला म्हाताऱ्याबरोबर झप-झप पावलं उचलायला भाग पाडत होती.

थोड्याच वेळात दोघे त्या पर्वताच्या सर्वात उंच टोकावर एका दरी पाशी पोहोचले. तेथे पाहता  खाली खोल खाई नि त्या वर केवळ एक झाडाचा  कुजलेला ओंडका  पुलासारखा त्या दरीत लोम्बकळलेला त्या तरुण तिरंदाजाने बघितला, नि आता मात्र त्याची उत्सुकता शिगेस पोहोचली.

म्हातारा पुढे सरसावला…….अतिशय सावधतेने तोल सांभाळत दरीत लोम्बकळणाऱ्या त्या ओंडक्याकर म्हातारा बघता-बघता  मध्यभागी पोहोचला. खाली खोल खाई, कुजलेला तो ओंडका ... कोणत्याही क्षणी दरीत कोसळण्याची शक्यता असलेला...

म्हाताऱ्याने  तोल सांभाळत शांतपणे स्वतःच्या पाठीवरचे धनुष्य काढत त्याची प्रत्यंचा खेचली नि दरीच्या पलीकडच्या एका उंच झाडावर नेम धरला,नि क्षणात त्या दूरवरच्या झाडाचा अचूक वेध घेतला.

आणि…….

"आता तुझी पाळी "

असं म्हणत तो सावधपणे पक्क्या जमिनीवर स्थिरावला.

आता मात्र तो तरुण थोडा गांगरला .इतक्या धोकादायक परिस्थितीत हे आव्हान स्वीकारायच्या कल्पनेनेच तो तरुण जागेवर खिळला. मग आव्हान स्वीकारायचा तर प्रश्नच नव्हता.
म्हाताऱ्याला त्याची अडचण लक्षात आली त्याने थोडा दीर्घ श्वास घेत त्याला फक्त एवढेच सांगितले ....

" तुझे नेमबाजीतील कौशल्य वादातीत आहे यांत शंकाच नाही,पण मोक्याच्या क्षणी तू  तुझ्या  मनावरील नियंत्रण गमावून बसलास, आणि  हाच जेत्या मधील आणि पराभूत माणसातील फरक आहे आणि  ज्या दिवशी तू ही परीक्षा उत्तीर्ण होशील त्या दिवसापासून  तू आयुष्य खऱ्या अर्थाने जगायला सुरवात करशील.
*********************************************************************************    
ही झेन तत्वज्ञानातील कथा वाचल्यावर आता ज्याने त्याने स्वतःचे स्वतःला  खालील प्रश्नाचे उत्तर द्यावे कि ,  : *आपल्या आयुष्यातल्या मोक्याच्या क्षणी आपण  स्वतःला कधी असे तपासून बघितले आहे का ?* 

सहकार्य : इंटरनेट वरील Mind over Matter या झेन तत्वज्ञानातातील कथेचा स्वैरानुवाद ... धन्यवाद 



२ टिप्पण्या: