१९७५च्या मार्च महिन्यात हाजी अली
पाशी गाडी येताच त्यानं हातातील “ती” मानाची फिल्म फेअर ट्रॉफी समुद्राच्या दिशेने भिरकावली ,एकवार
समुद्राकडे कटाक्ष टाकत त्याने “ते” गाणे
इतिहासजमा करून टाकले आणि त्याच्या पुढच्या
प्रवासास सुरुवात केली.
फिल्म इंडस्ट्रीत हा किस्सा ओ.पी.ऊर्फ ओमकार प्रसाद नय्यर यांच्या नावावर
सांगितला जातो.ज्यांचा १६ जानेवारी हा आज जन्मदिवस आहे.वरील गाण्याचा किस्सा हा
फिल्म इंडस्ट्रीतील अशा एकमेव गाण्यासाठी आहे ,जे ओ.पी.नय्यर यांच्या करिता गीतकार
एच.एस.बिहारी यांनी लिहिले ,१९७२ च्या ऑगस्ट महिन्यात अवघ्या एका तासांत रेकॉर्ड
केले गेले , १९७३ च्या नोव्हेंबर महिन्यात
प्रथम रेडीओ सिलोनवर वाजवले गेले आणि १९७५ ला त्याला फिल्मफेयरचे अवार्ड मिळाले ....ज्या
सिनेमासाठी ते तयार केले गेले तो सिनेमा होता सुनीलदत्त ,रेखाचा “ प्राण जाये पर
वचन न जाये “ आणि हा सिनेमा रिलीज झाला १८ जानेवारी १९७४ ला.
पण आश्चर्याची बाब म्हणजे हे गाणे सुपर हिट होऊन देखील या गाण्याचे चित्रीकरण कधीच होऊ शकले
नाही आणि हे गाणे सिनेमात सुद्धा कुठे ऐकू येत नाही. विशेष म्हणजे या गाण्याला मार्च १९७५ ला झालेल्या फिल्मफेयर अवार्ड नाईट
मध्ये १९७५चे बेस्ट फिमेल सिंगर अवार्ड मिळाले.पण न जाणो हे गाणे अशा कोणत्या
कुमुहूर्तावर बनले होते ,कारण केवळ आशा भोसले यांच्या मुलीला त्या १९७२च्या ऑगस्ट
महिन्यात ओ.पी.नय्यर यांनी मारले ,एवढे किरकोळ कारण आशा आणि ओ .पी.चा १५ वर्षांचा
सांगीतिक प्रवास थांबवायला कारणीभूत ठरले होते.गाण्याचे रेकॉर्डिंग तर झालेले होते
पण ओ.पी.बरोबरच्या भांडणामुळे आशाने या
गाण्याचे पैसे घेतले नाहीत आणि पैसे न घेतल्याने तिने हे गाणे सिनेमात वापरू दिले
नाही.पण गाणे रेकॉर्ड केले गेल्यामुळे मात्र हे गाणे प्राण जायेच्या एल
पी,ई.पी.रेकॉर्डवर कायम स्वरूपी जतन झाले.
या गाण्यानंतर ओ.पी. आणि आशा मधील दुरावा इतका टोकाला गेला कि,१९७५ फिल्म फेयर
अवार्ड नाईट मध्ये या गाण्याला उत्कृष्ठ स्त्री पार्श्वगायिकेचा मान मिळतोय आणि
आशा तो पुरस्कार स्वीकारायला जाणार नाहीये हे जेव्हा ओ.पी.ला कुठूनतरी बाहेरून समजले तेव्हां ओ.पी.ने
स्वतः फिल्मफेयरवाल्यांना फोन करून “ माझ्या एका
उत्कृष्ट पार्श्व गायिकेच्या वतीने ,
गाण्याचा जन्मदाता या नात्याने मी तो पुरस्कार स्टेजवर स्वीकारेन " असे काहीशा कुत्सितपणे
कळवले होते .हे गाणे आशा –ओ.पी.नय्यर कॉम्बिनेशन मधील शेवटचे गाणे ठरले.
या प्रसंगा नंतरच्या आपल्या पुढील ३५ वर्षांच्या सांगीतिक प्रवासात नंतर ओ.पी.ने
अलका याद्निक ,कविता कृष्णमूर्ती,कृष्णा कल्ले ,शारदा यांना घेऊन काही गाणी केली
खरी पण ओ.पी.-आशाचा टच पुन्हा कोणत्याच गाण्यात अनुभवायला मिळाला नाही व ओ.पी.मागे
पडला तो पडलाच . तसे बघितले तर ओ.पी. आणि वाद हे
समीकरण त्या काळी चित्रपट सृष्टीला नवीन नव्हते.आशा बरोबरच्या भांडणा अगोदर केवळ
त्याच्या संगीत शैलीला लताचा आवाज सूट नाही या त्याच्या आग्रही भुमिके मुळे त्याने
त्याच्या संपूर्ण फिल्मी करियर मध्ये लताला घेऊन एकही गाणे केले नाही आणि रफी
बरोबरच्या कुरबुरी मुळे महेंद्र्कपूर,मुकेश,किशोरकुमार यांना घेऊन त्याने नंतरच्या
काळात वेळ मारून नेली होती. पण एवढे असूनदेखील १९६०च्या दशकात एका सिनेमाच्या
संगीता साठी निर्मात्या कडून वाजवून १ लाख रुपये मोबदला घेणारा असा तो दुर्मिळ
संगीतकार होता.विशेष म्हणजे संगीताचे कोणतेही प्राथमिक शिक्षण न घेता अतिशय
मोजक्या वाद्यवृंदाच्या सहाय्याने ओ.पी.ने अप्रतिम संगीत देत ,रसिकांचे कान तृप्त
करत त्यांच्या मनात स्वतःची जागा केली हे त्याच्या सांगितिक प्रवासातील विशेष.
चला तर मग ऐकूयात ते वादग्रस्त गाणे...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा