हिंदी सिनेमात मेथड अक्टिंगचा जनक समजले जाणारे दिलीपकुमार यांचा मध्यंतरी ११ डिसेंबर रोजी ९५ वा वाढदिवस साजरा झाला.शतायुषी भव अशा या महान अभिनेत्याला प्रथम शुभेच्छा ...
खरे तर यांच्या आधी उणीपुरी १० वर्षे अगोदर मोतीलाल यांनी मेथड ऍक्टिंग ही पद्धत हिंदी सिनेमांत सुरु केली.पण हिंदी सिनेमाला ग्लॅमर १९५० नंतर आले व दिलीपकुमार यांची कारकीर्द बहरली १९५० नंतर त्या मुळे नाव मात्र यांचे झाले. मेथड ऍक्टिंग म्हणजे चित्रपटातील भूमिकेत संबंधित पात्र कसे वागेल ,बोलेल ,हावभाव करेल याचा अभिनेता/अभिनेत्री यांनी विचार करून कलाकाराने केलेला अभिनय म्हणजे मेथड ऍक्टिंग. मूक चित्रपटातील अभिनेते अतिरंजित किंवा नाटकीय पद्धतीने अभिनय कला सादर करत असत.त्या मुळे या मेथड ऍक्टिंगचे महत्व .
१९४४ साली ज्वारभाट या सिनेमापासून दिलीपकुमार यांची कारकीर्द सुरु झाली.सुरवातीच्या काळात यांची जोडी जमली ती कानन कौशल यांच्या सोबत.आपल्या उण्यापुऱ्या ६० वर्षाच्या चित्रपट कारकिर्दीत यांनी अवघ्या ४१ सिनेमांत काम केले. *यांचा अभिनय म्हणून म्हणाल तर अभिनय कलेचा जणू वस्तुपाठच...पण त्या बद्दल मी हेतुपुरस्सर आज कमी बोलणार आहे* .कारण प्रचंड मोठे नाव असूनही यांच्या बद्दल बरेच उलटसुलट मतप्रवाह ,मतभिन्नता त्यांच्या चाहत्यां मध्ये आहे. काही यांना हिंदी सिनेमां सृष्टीत देव समजतात तर काही दानव. तसेच दिलीपकुमार यांचा काळही खूप जुना असल्याने बऱ्याच जणांना त्याचा संदर्भ लागणे कठीण जाईल.
यांचा जन्म जरी पेशावरचा,आणि कौटिम्बिक पार्श्वभूमी जरी उत्तम होती ,म्हणजे वडील जमीनदार व सफरचंदाचे मोठे फळ विक्रेते ,तरी १९४० साली यांनी तत्कालीन एकसंध भारतातील पेशावर मधून थेट पुणे गाठले.इंग्रजी भाषेवरील प्रभुत्वा मुळे पुण्यात त्यांनी मिलिटरी कँटीन मध्ये २ वर्षे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर सॅन्डविचचा स्टॉल चालवला.अधूनमधून नाशिक जवळील देवळालीला वडिलांच्या सफरचंदाच्या धंद्यात सुद्धा त्यांना मदत केली.
कॉन्ट्रॅक्ट मधून शिल्लक टाकलेले तब्बल ५००० र. घेऊन १९४२ साली यांनी नंतर मुंबईत जे पाऊल टाकले ते आजतागायत ...
आता यांच्या चित्रपट कारकिर्दीतील कटू मतां विषयी थोडे स्पष्ट बोलू.
खरे तर हे अभिनेते, पण काही सन्माननीय अपवाद वगळता यांनी अभिनय केलेल्या जवळपास प्रत्येक चित्रपटात, त्याच्या निर्मिती पासून शेवटापर्यंत प्रत्येक प्रक्रियेत अवाजवी लुडबुड करणे ,ढवळाढवळ करणे हा मोठा दोष यांच्यात ठासून भरला होता.असं काही जण म्हणतात ... पण हिंदी सिनेमा क्षेत्रांतील ते बडे प्रस्थ असल्याने सगळेच व्यावसायिक त्यांचा हा तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत गेले. त्याचा परिणाम यांची चित्रपट संख्या त्यांच्या ६० वर्षाच्या कारकिर्दीनुसार जर बघितली तर ती अतिशय नगण्य आहे. अवघी ४१.
हिंदी सिनेमांत जेव्हा यांचं नाव झाले त्या नंतर तर यांची हि ढवळाढवळ इतकी वाढली कि, त्यांचा प्रत्येक चित्रपट पूर्ण होण्यास किमान ३ ते ४ वर्षे लागायला लागली.यांच्या अदाकारीवर आंधळे प्रेम करणारे किमान ४ चित्रपट निर्माते तर शब्दशः देशोधडीला लागले असं म्हणतात ... मनमोहन देसाई या १९८० च्या दशकातील चित्रपट निर्माता ,दिग्दर्शकाचे वडील तर यांच्या मुळे साफ कंगाल झाले. यांना व यांची पत्नी सायरा बानो यांना घेऊन ते बनवत असलेला "मास्टर " हा सिनेमा ,कधीच पूर्ण होऊ शकला नाही.... असं म्हणतात कि ,सिनेमा सुरु करतांना हे इतके संपन्न होते कि यांचे कपडे पार परदेशातून शिवून यायचे आणि चित्रपट निर्मिती दरम्यान ते पार भिकेला लागले.नूतन-दिलीपकुमार हे नायक-नायिका म्हणून १३ रिळे पूर्ण झालेला शिकवा सुद्धा दिलीपकुमार मुळे कधी पडदा बघू शकला नाही असं म्हणतात ...
यांनी त्यांच्या दुसऱ्या पत्नीशी अस्माशी विवाह केल्याचे (१९७९-१९८२) जेव्हा १९८२ साली म्हणजे तब्बल ४ वर्षांनी जेव्हा यांनी पब्लिक आऊट केले तेव्हा ,यांच्यावर प्रचंड राळ उडाली. दुसऱ्या लग्नासाठी प्रथम १३ वर्षे संसार सोबती असलेल्या सायराला घटस्फोट, नंतर अस्मा बरोबर लग्न आणि ४ वर्षाने पुन्हा काडीमोड आणि पुन्हा सायरा बरोबर दुसऱ्यांदा लग्न याने त्यांची जनमानसातील इमेज डागाळली गेली. सायरा बरोबरच्या पहिल्या लग्नाच्या वेळी तिचे वय होते २२ आणि तर यांचे होते ४४ हा सुद्धा त्या काळी विनाकारण थट्टेचा विषय झाला होता.
पण यांची प्रतिष्ठा खरी पणाला लागली ,जेव्हा बेगम पारा (सख्खी मोठी भावजय) , सख्खा मेव्हणा इकबाल खान व इतर जवळचे नातेवाईक यांनी मीडिया जवळ १९८२ नंतर जेव्हा उघडपणे यांच्या कागाळ्या केल्या तेव्हा. पण तेव्हा बरे होते ,मीडिया हा बाल्यावस्थेत होता नि आजच्या इतका प्रगल्भ नव्हता ... अन्यथा १९७९ साली तत्कालीन बॉंबेचे शेरीफपद भूषविलेल्या दिलीपकुमार यांना २००० साली राज्यसभेचे खासदार करायला काँग्रेस धजावलीच नसती....
उमेदीच्या काळात , हिंदी चित्रपट निर्माते,दिग्दर्शक ,वितरक,फायनान्सर यांच्याशी यांनी जर टीमवर्क म्हणून या क्षेत्रात काम केले असते तर यांच्या चित्रपटांची संख्या आज किमान २०० च्या वर असती व येणाऱ्या पुढील पिढ्यांसाठी आजच्या काळात दिसणाऱ्या अक्टिंगच्या कार्यशाळा दिसल्याच नसत्या. नुसते यांचे सिनेमे बघून कित्येक जणांना अभिनय कशाशी खातात हे समजले असते. जुन्या चित्रपट रसिकांना हि खंत कायम असणार यात शंका नाही...
तात्पर्य : सुरी कितीही धारदार असली तरी तिचा जर वापर झाला तरच त्या सुरीला अर्थ आहे.अन्यथा तिच्यात आणि लोखंडाच्या पात्यात फरक तो काय ?
आजच्या व्हिडीओचे वैशिष्ट्य म्हणजे ज्या मनमोहन देसाईंनी दिलीपकुमार यांच्या सोबत त्यांच्या वडिलांचा अनुभव लक्षात ठेऊन कटुतेमुळे कधी काम केले नाही,त्यांनी त्यांच्या कोहिनूर चित्रपटावरून सुपरहिट अमर अकबर अँथनी मध्ये मात्र एक सीन घेतलेला तुमच्या लक्षात येईल.. अपरिहार्य पणे तुम्ही दिलीपकुमार आणि अमिताभ बच्चन यांची तुलना करणारच हि मला खात्री.. 👇
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा