भोज्जा

शनिवार, २० जानेवारी, २०१८

बेफाम ,बेलगाम परवीन बाबी

त्या ढिगारावजा टेकडीवर ,गर्दी पासून थोडी दूर , एकटीच उभी राहून १९-२० वर्षाची ती मुलगी  निवांतपणे बराचवेळ सिगारेटचे झुरके मारत,समोर चाललेले शूटिंग बघत उभी होती.आपल्याकडे कुणाचं खास लक्ष आहे हे तिच्या गावी सुद्धा नव्हते.ती तिच्याच मस्तीत मस्तपैकी रमली होती.शेवटी  न राहवून त्यानं युनिट मधल्या स्पॉट बॉयला जवळ बोलावत तिला बोलावण धाडलं. ती सुद्धा येस ? ”  म्हणंत ,अतिशय निर्विकार चेहऱ्याने त्याच्या समोर येऊन उभी राहिली.

सिनेमात काम करायला आवडेल का ? ” त्यानं थेट प्रश्न विचारात मुद्द्याला हात घातला.           
नक्कीच ! पण मला यातील कोणताही अनुभव नाही.तिने सुद्धा थेट उत्तर दिले. ठीक आहे “  म्हणत त्यानं तिच्या हातात स्वतःच कार्ड दिले आणि मुंबईला येऊन भेटण्यास सांगितले.

हा प्रसंग घडला होता १९६९-७० साली जेव्हा निर्माता दिग्दर्शक बी आर इशारा त्याच्या कुठल्याशा सिनेमाचे आउट डोअर शूटिंग बाहेर गावी करत होता तेव्हा आणि ती तेव्हाची १९-२० वर्षाची ती मुलगी होती परवीन बाबी.जी १३ वर्षां पूर्वी  आज २० जाने.ला आपल्यातून गेली.( २० जाने.२००५) 

त्या काळी इशाराने दिलेले त्याचे ते कार्ड घेऊन पुढे काही दिवसांत खरोखरच मुंबईच्या  बी.आर इशाराच्या ऑफिस मध्ये येऊन जेव्हां परवीन , दत्त म्हणून उभी राहिली तेव्हा  इशाराने सुद्धा दिलेल्या शब्दाला जागत   तिच्या सोबत कॉन्ट्रॅक्ट केले आणि  तिला आपल्या पुढील सिनेमाची नायिका म्हणून कायम केले. सिनेमा तर लगेच सुरु होणार नव्हता, त्या मुळे चित्रपट सुरु होई पर्यंत तिला खर्चा साठी म्हणून काही एक रक्कम दरमहा देण्याचे परस्पर संमतीने ठरल्यावर तिनेहि मान डोलावत त्याला होकार दिला  आणि ती ऑफिस मधून बाहेर पडली.

सिनेमा तर इशारा काही लगेच सुरु करू शकला नाही पण ती खर्चाची दरमहा रक्कम मात्र तो  तिला पुढील साधारण दीड पावणेदोन वर्षे नियमित देत होता आणि ती सुद्धा प्रत्येक महिन्याला ते पैसे त्याच्या ऑफिस मधून न चुकता घेऊन जात असे.सगळ्यात कहर म्हणजे त्या कालवधीत परवीनने इशाराला  सर ,अपनी पिक्चर कब शुरू करेंगे “ ? असं एकदाही विचारलं नाही.

दरम्यानच्या काळात तिने   साईड बाय साईड काही मॉडेलिंगची कामे करत वर खर्चाची जुळवा जुळव केली . दरम्यानच्या काळात तिची  ओळख चित्रपट सृष्टीत होणाऱ्या पार्ट्यां मधल्या तिच्या नियमित हजेरीने  सिनेमावाल्यांना होत गेली आणि त्यांचे तिच्याकडे लक्ष वेधले गेले.त्या सुरवातीच्या काळात  निर्माते तिला त्यांच्या सिनेमात काम करण्या संबंधी विचारपूस करायचे ,पण ही इतकी स्ट्रेट फॉर्वर्ड होती किती सुद्धा त्या निर्मात्यांना निरागसपणे बी.आर.इशारा कडे जणू तो तिचा सेक्रेटरी आहे अशा थाटात पाठवीत असे .

हा प्रकार वारंवार व्हायला लागल्यावर  शेवटी न राहवून इशारानेच  त्या काळातील हॅंड्सम् क्रिकेटियर सलीम दुराणीला घेऊन हिच्या सोबत "चरित्र " नावाचा सिनेमा केला.पण तो सिनेमा आला कधी ? पडला कधी ? नि गेला कधी हे कोणाला समजले देखील नाही पण इशाराने त्याच्या शब्दाला जागत हिला कॅान्ट्रॅक्ट मधून आधीच मुक्त केल्याने हि आता फ्री लान्स पद्धतीने कोणत्याही सिनेमात काम करायला मोकळी झाली..  नि फ्री लान्स झाल्यावर मग मात्र  ती सुटलीच.

पारंपारिक भारतीय हिरोईनच्या प्रतिमेस संपूर्ण छेद  देऊन  वेस्टर्नाइज् पद्धतीचे फीचर्स, हावभाव,वागणे, बोलणे ,चालणे आणि वावरणे याची परफेक्ट पद्धतीने हिंदी चित्रपट सृष्टीला ओळख करून देणे हे परवीन बाबीचे हिंदी चित्रपट सृष्टीतील सर्वात मोठे योगदान.तसे पाहिले तर अभिनयात ही फार अफलातून होती वगैरे काहीच नाही. गमतीची गोष्ट ,म्हणजे निर्माते दिग्दर्शक सुद्धा ते जाणून होते पण हिच्या आवाक्यातल्या भूमिकां ते तिला देत गेले ,आणि  ती  सुद्धा त्यात एकदम फिट्ट बसत गेली.

 पडद्यावर आणि पडद्याबाहेर अतिशय बिनधास्त वावर हे तिचे खास वैशिष्ट्य होते . आपल्या बहराच्या जेमतेम १० वर्षाच्या कालावधीत तिने त्या काळातल्या सर्व प्रमुख नायकां सोबत काम केले पण त्यातल्यात्यात पडद्यावरचा नायक म्हणून हिला फक्त अमिताभच सांभाळू शकला. अमिताभ सोबतच्या ८ सिनेमात हिची त्याच्या सोबत फार मस्त केमिस्ट्री जमली होती . ते आठही सिनेमे त्या काळी हिट किंवा सुपरहिट कॅटेगिरीत जाऊन बसले.

परवीनचे  करियर जरी अल्प असले तरी तिच्या बद्दल लिहिण्यासारखे आणि सांगण्या सारखे खूप काही आहे ... त्या मुळे फक्त एवढेच सांगून थांबतो कि , ज्या काळी लोकांना "लिव्ह इन रिलेशनशिप" हा प्रकार , ......प्रकार तर सोडा पण ही संज्ञा देखील माहित नव्हती त्या काळी  ही ,अनुक्रमे कबीर बेदी.डॅनी डेन्झोपा आणि महेश भट यांच्या सोबत तशी राहिलीये यातच सगळं आल.    


अशा अपघाताने चित्रपट सृष्टीत प्रवेश आणि  एक्झिट  हे जिच्या  करियरचे वैशिष्ट्य ठरले  , त्या परवीन बाबीचा अमिताभच्या गाजलेल्या १९७५ च्या दीवारमधील एक बिनधास्त सीन आज तुमच्या साठी...👇👌
आजच्या लेखा साठी सहकार्य अनिता पाध्ये यांच्या यही है जिंदगी मधील ,बी.आर.इशारा आत्म निवेदनाचे आणि यू ट्यूब चे : मनःपूर्वक धन्यवाद 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा