भोज्जा

सोमवार, ८ जानेवारी, २०१८

आईएँ मेहेरबान .. कमर जलालाबादी


ओम प्रकाश भंडारी उर्फ कमर जलालाबादी यांना जाऊन आज (९ जानेवारी) १४ वर्ष झाली,पण जो पर्यंत कॅलेंडर मधे १ तारीख आहे तो पर्यंत त्यांना कुणी कधी विसरू शकणार नाहीत . कारण १९५४ ला आलेल्या सुधीर फडके संगीत दिग्दर्शित " पहिली तारीख " मधील "खुष है जमाना आज पहिली तारीख है " या गीताचे गीतकार कमर जलालाबादीच होते.

पंजाब  मधल्या जलालाबाद जवळील एका खेड्यात १९१९ साली जन्माला आलेला हा उर्दूप्रेमी माणूस.गावाच्या नावाने आपली ओळख निर्माण करत त्यांनी तब्बल १५६ सिनेमातून सुमारे ७०० गीते लिहिली. मॅट्रिक होत शालेय शिक्षण पूर्ण करत त्यांनी पत्रकार म्हणून लाहोर मध्ये काही दैनिकात काम केल्यावर १९४० ला ते पुण्यात प्रभात फिल्म कंपनीत आले आणि नंतर १९४२ ला मुंबईला जाऊन यशस्वी गीतकारांच्या पंक्तीत जाऊन स्थिरावले.

आपल्या १९४२ नंतरच्या ४० वर्षाच्या चित्रपट गीतलेखनाच्या प्रवासात त्यांनी त्या-त्या काळातील सर्व यशस्वी संगीतकार आणि गायक-गायिकांच्या साठी चित्रपट गीतलेखन केले. आपल्या चाहत्यांच्या हिंदी,उर्दू,इंग्रजी आणि प्रादेशिक भाषातून आलेल्या प्रतिसादाला उत्तरे पाठवत तिला फॅनमेल संबोधणे आणि चाहत्यांना " पंखे " म्हणणे यांनीच चित्रपट सृष्टीत रूढ केले.ते आपल्या चाहत्यांच्या प्रत्येक पत्रास स्वतःचा एक फोटो जोडत वैयक्तिकरित्या उत्तरे देत असत.

ते अतिशय सहृदयी आणि  धार्मिक प्रवृत्तीचे होते.त्यांच्या बहिणीची परिस्तिथी बिकट आहे असे बघितल्यावर त्यांनी त्या काळी आपला राहता खार ,मुंबई मधील बंगला तिला देऊन टाकला आणि ते स्वतः जुहू मधे एका छोट्या घरात पुढे रहावयास लागले.

अशा या मोठ्या मनाच्या गीतकारास आजच्या दिवशी मनापासून मानवंदना आणि अभिवादन ... 

आजचे गाणे त्यांनी गीतलेखन केलेल्या आणि त्या काळी प्रचंड गाजलेल्या " हावडा ब्रिज " मधून घेतले आहे...
व्हिडीओ सहकार्य : यू ट्यूब आणि लेखन सहकार्य : इन्टरनेट 
मनःपूर्वक धन्यवाद .कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा